कुमुदिनी आणि मी
कॅालेजचा पहिला दिवस मी कधीच विसरू शकत नाही.त्यादिवशी मला कुमुदिनीचे प्रथम दर्शन झाले.
आपलं पण रॅगिंग होईल म्हणून हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून इकडे तिकडे बघत पण कुणाला घाबरत नाही असा आव आणत तिने कॅालेजमध्ये प्रवेश केला होता.
पण कॅालेजमधील टवाळ कार्टी तिचं ते सौंदर्य बघून घायाळ झाली आणि तिचं रॅगिंग करायचं विसरून गेली.
त्यात माझ्या सारख्या भित्र्या भागूबाईचा मात्र फायदा झाला.मग मी ठरवलं काहीही झालं तरी कुमुदिनीशी मैत्री करायची.
पण तिचं माझ्याकडे लक्ष जाईल असे कुठचेच गुण माझ्याकडे नव्हते.फक्त होतं ते सुंदर अक्षर.त्यामुळे सगळी मुलं,मुली माझ्याकडून नोट्स लिहून घेण्यासाठी धडपडायची.आणि परत परत नोट्स लिहील्यामुळे माझे सगळे विषय पक्के व्हायचे.
बाकी माझी किरकोळ शरीरयष्टी आणि मुखदुर्बळ मग काय कुणीही माझ्याशी मैत्री करायचं ते फक्त नोट्स लिहून घेण्यासाठी.पण कुमुदिनीच्या बाबतीत ती शक्यता नव्हती कारण तिचं अक्षर पण मोत्याच्या दाण्यासारखे होतं.आणि ती कॅालेज पण कधी बंक करत नसे.
मग काय मी आपला लांबूनच तिला न्याहाळत बसे.माझ्या मुखदुर्बळ स्वभावाचं मी काही करू शकत नव्हतो.पण मी ठरवलं आता आपण आपलं शरीर कमावयाचं.मग सुरू झाले व्यायाम करणे आणि योग्य डायेट घेणे.मी शरीर पिळदार बनवलं खरं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
कुमुदिनी एका मुलाच्या प्रेमात पडली होती आणि सगळ्या कॅालेजमध्ये त्यांच्या प्रेमाच्या चर्चा व्हायला लागल्या.
कधी त्यांचे भांडण झाले की ते भांडण मिटवण्यासाठी सर्व कॅालेजमधली मुलं,मुलीच नाही तर प्रोफेसरसुद्धा पुढाकार घ्यायचे.त्यांचे भांडण मिटले तर बाकीची मुलं अभ्यासात लक्ष द्यायचे.कॅालेजचे लैला,मजनू होते ते.
कॅालेज संपले आणि आमच्या सगळ्यांची ताटातूट झाली.मी तर कुमुदिनीच्या कधी खिजगणतीतच नव्हतो.तिचा मित्र विवेक याच्याशी पण कधी मैत्री झाली नव्हती.
मग कॅालेज संपल्यावर त्यांचं लग्न झालं की नाही कळलंच नाही.
मी पण पोस्टग्रॅज्युएशन नंतर नोकरीमध्ये रमलो होतो.
नोकरी चांगली असल्यामुळे आता घरून लग्नासाठी तगादा सुरू झाला आणि मला कुमुदिनीची आठवण झाली.
काय करत असेल कुमुदिनी आता?अजूनही तितकीच आकर्षक असेल का ?की बाकीच्या मुली लग्नानंतर बदलतात तशी बदलली असेल?
मग मी कॅालेजमधल्या मित्रांचा शोध घ्यायचं ठरवलं.कॅालेज सोडून जवळ जवळ पंधरा वर्ष झाली होती.
बरेचसे मित्र आता संसारात रमले होते.आणि मला सगळ्यांनी सल्ला दिला,
“अरे त्या कुमुदिनीला विसर आता.ती विवेकच्या संसारात रमली असेल आणि तीन ,चार पोरांची आई पण झाली असेल.तू ओळखू पण शकणार नाहीस तिला ,ती समोर आली तर.”
मी पण माझा शोध चालूच ठेवला होता.
आणि एक दिवस मला कुमुदिनीचे दर्शन झाले.
मी एका कॅान्फरन्ससाठी दिल्लीला गेलो होतो.मी ज्या हॅाटेलमध्ये उतरलो तिकडे फ्रंट ॲाफीस मॅनेजर होती कुमुदिनी.
मी चेक् ईन् करत असताना एक स्त्री तिकडे आली तिने रिसेप्शनीस्टला काही तरी सांगितलं आणि परत गेली.तिचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही.पण मी मात्र तिला ओळखलं.ती कुमुदिनीच होती.
मी त्या रिसेप्शनीस्टला विचारलं,” आता आल्या होत्या त्या कोण?”
“त्या आमच्या मॅनेजर आहेत.मिस् कुमुदिनी .”रिसेप्शनीस्टनी सांगितल्यावर मी जरा उडालोच.
“मिस् कुमुदिनी?ती अजून अनमॅरिड आहे?”मी जवळ जवळ किंचाळलोच.
“”सर,आम्ही तुम्हाला आमच्या स्टाफची पर्सनल माहिती नाही देऊ शकत.”रिसेप्शनीस्टनी सांगितलं आणि ती दुसऱ्या कामाकडे वळली.
“मिस्,ती माझी कॅालेजमधली क्लासमेट आहे.प्लीज् तुम्ही तिला माझं हे कार्ड द्याल का ?”
मी माझं कार्ड काढलं आणि त्यावर लिहिलं 2002 बॅच् ,एस्.पी.कॅालेज आणि रिसेप्शनीस्टला सांगितलं
“तुम्ही प्लीज माझं हे कार्ड द्या आणि त्यांना सांगा मला कॅाण्टॅक्ट करायला सांगा.मी आहे दिल्लीत दोन दिवस.”
“देते मी मॅडमना ,पण त्या कुणा बरोबर मिक्स होत नाहीत.त्यामुळे त्या कॅाण्टॅक्ट करतील की नाही सांगता येत नाही.”
मी आता हवेत तरंगत होतो.इतक्या वर्षानी मी कुमुदिनीला बघितलं आणि ती अजून अविवाहित आहे.माझा माझ्या नशीबावर विश्वास बसत नव्हता.आता मी कॅालेज मधील तो लाजाळू ,मुखदुर्बळ राहिलो नव्हतो.नोकरी निमित्ताने अनोळखी लोकांबरोबर बोलायची सवय झाली होती.आणि कुमुदिनी काय अनोळखी नव्हती,त्यामुळे मी आरामात तिला डिनरसाठी किंवा कमीत कमी कॅाफीसाठी निश्चित विचारलं असतं.
माझी कॅान्फरन्स संपत आली पण मला कुमुदिनीचा कॅाल आला नाही.
मग मी एका हाऊसकीपींग स्टाफला पटवून कुमुदिनीच्या केबीनजवळ गेलो.दारावर टक् टक् केलं.
“कोण आहे?”
“मी राहूल.तुमचा एस् पी कॅालेजचा बॅचमेट.”
माझा आवाज ऐकून तिने आत या म्हटलं नाही तर दारं उघडून सरळ बाहेर आली.
माझा विश्वास बसेना.मी विचार करत होतो.
‘ ओ वॅाव! किती दिवसांनी कॅालेजमधलं कुणीतरी भेटलं.’असं म्हणून कुमुदिनी मला हाताला धरून केबीनमध्ये नेणार.पण पण माझा भ्रमनिरास झाला.
“ कोण तुम्ही?मी ओळखत नाही तुम्हाला.” कुमुदिनीचा स्वर कोरडा होता आणि ती दारातच उभी राहिली.
“मी तुमच्याच वर्गात होतो.तुम्हाला नाही आठवणार कारण मी मुखदुर्बळ होतो कॅालेजमध्ये असताना.आपण तुमच्या केबिनमध्ये बसून बोलूया का?पुष्कळ गोष्टी आठवतायत.तुम्हाला काही आठवतंय का?”माझ्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
“ सॅारी,मला कॅालेज बद्दल बोलायला नाही आवडत.” कुमुदिनी चा स्वर जरा त्रासिक झाला.
“तुमचा मित्र विवेक कसा आहे?काय करतो तो आता?इथे दिल्लीत आहे का?” मी माझी चिकाटी सोडली नाही.पण आता तिचा चेहरा हळूहळू रागाने लाल व्हायला होता.तरीपण रागावर कंट्रोल करून तिने म्हटलं,
“विवेक नांवाचा माझा नव्हता आणि नसेल.”
अरे वा म्हणजे खरंच यांचे ब्रेकअप झालेलं दिसतंय.म्हणजे मला संधी आहे तर.
‘ देवा तुझे आभार कसे मानू?’
“ओ,माझा काही तरी गैरसमज झाला असेल. सॅारी.” मी सारवासारव केली.खरं तर मनांत मोर थुई थुई नाचत होते.
मी तिचा निरोप घेऊन निघालो.मनांत विचार आला ‘ठीक आहे ब्रेक अप झालं म्हणून काय झालं ही एव्हढी कठोर कशी झाली.हिला तर आजू बाजूला तर मित्र मैत्रीणींचा घोळका लागायचा.पण हिला बोलतं करावंच लागेल.तरच आपल्याला ती भाव देईल.
मी परत मुंबईत आल्या आल्या पहिलं काम केलं ते रम्या म्हणजे रमाकांतला फोन करून भेटायला गेलो.
त्याला सगळा वृत्तांत सांगितला तर त्याचा विश्वास बसत नव्हता.तो म्हणाला तिच्यासारखी दिसणारी दुसरी कुणीतरी असेल.
मग काय सेकंड सॅटरडे,संडेला दोघांनी जायचं ठरवलं.त्याच्या बायकोनी थोडी कटकट केली पण मी सगळा खर्च करणार म्हटल्यावर तिने ओके म्हटलं.
सेकंड सॅटर्डे म्हणजे एअर टिकेट,हॅाटेल रूम सगळंच महाग पण काय करणार ,गरज होती मला.गुपचुप सर्व खर्च केला.नशीब चांगलं होतं.कुमुदिनीचा ॲाफ नव्हता.आम्ही रिसेप्शन एरियात बसून राहिलो.कुमुदिनी आली ,तिला बघितल्यावर रम्या उडालाच पण मी त्याला गप्प केलं.
आम्ही त्यादिवशी तिचा पाठलाग केला.तेव्हा समजलं ती एकटीच रहात होती.आजूबाजूला विचारलं,
“ मॅडम तो अकेली रहती है.कोई कभी मिलने भी नही आता.”
रम्या आणि मला कळतच नव्हतं ही एव्हढी कशी बदलली?
दुसऱ्या दिवशी मी आणि रम्याने तिची भेट घ्यायचं ठरवलं..
आम्ही केबीनवर टकटक केलं तेव्हा ‘कम् ईन् ‘ असा आवाज आला.
आम्ही आत शिरल्यावर तिने या वेळी मला ओळखलं आणि ,”तुम्ही परत का आलात?मी सांगितलं ना तुम्हाला मला कॅालेजमधल्या कुणाशीही संपर्क करायचा नाहीय.”असं जरा रागातच मला सांगितलं.
तेव्हढ्यात माझ्या मागे उभा राहिलेला रम्या पुढे झाला आणि त्याने शेक हॅंड करायला आपला हात पुढे केला.
“ हाय,ओळखलंस का मला ? मी रमाकांत,रम्या हे नांव तूच मला दिले होतंस.”
“हं आठवतंय अंधूकसं.” कुमुदिनी जरा मवाळपणे म्हणाली.
“अगं या राहुलने मला सांगितलं तुला इकडे बघितल्याचं.पण तू काही कॅालेज फ्रेंड्सना भेटायला तयार नाहीस.मग काय फ्लाईट पकडलं आणि आलो तुला भेटायला.दर वर्षी आमचं गेट टुगेदर होतं पण तुझा काही कॅाण्टॅक्ट नाहीय कुणा बरोबर.तुझी हरकत नसेल तर आपण डिनर ला भेटून गप्पा मारूया का?”रम्याची टकळी चालू झाली की कधी थांबत नाही.मी त्याला थांब थांब म्हणून खूणा करत होतो,पण त्याचं लक्षच नव्हतं.
“हे बघ रम्या मी हल्ली कुणामध्ये मिसळत नाही.नंतर कधी तरी बघूया.” कुमुदिनी मंद स्मित करत म्हणाली.
तिच्या बोलण्याने माझ्या जीवात जीव आला.निदान कुमुदिनीने रम्याला,रम्या म्हणून संबोधलं होतं.
“अहो पण आमची ऊद्या सकाळी अकरा वाजता फ्लाईट आहे.” मी जरा घाई घाईनेच म्हटलं.
“मग तुम्ही नंतर याल तेव्हा बघू.” कुमुदिनीने डिनरला येण्यासाठी साफ शब्दात नाही पण नकारच दिला.
“अगं कुमुदिनी,आम्ही नेहमी नेहमी दिल्लीला येत नाही.यावेळी आलोय ते इतक्या वर्षांनी तुझा पत्ता लागल्यामुळे आलोय.परत कधी येऊ माहित नाही.नाहीतर असं करूया या वर्षीचं गेट टुगेदर तुझ्याच हॅाटेलमध्ये ठेवतो.सगळ्यांची दिल्ली पण बघून होईल आणि तुझी भेट होईल.सगळे जण तुझी खूप आठवण काढतात.प्लीज हो म्हण ना.” नेहमी प्रमाणे रम्या आपलं म्हणणं पटवण्यात यशस्वी होईल अशी आशा वाटू लागली.
कुमुदिनीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.सगळ्या बॅचमेट ना भेटण्यापेक्षा या दोघांना भेटलेलं बरं असा भाव कुमुदिनीच्या चेहऱ्यावर दिसत होता.ती थोडी विचारात पडली होती.
“बरं चालेल,आपण संध्याकाळी सात वाजता लॅाबीमध्ये भेटूया” कुमुदिनी तयार झाली.
इतका वेळ रोखून धरलेला श्वास मी सोडला.
डिनरच्या वेळी कॅालेजमधल्या आठवणींना उजाळा दिला पण विवेकचा विषय तिघांनी पण टाळला.
डिनर झाल्यावर गाडीत बसताना कुमुदिनी जरा गंभीर झाली होती.
“आपण परत नको भेटूया.प्लीज तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा आहे.मी खूप लांब निघून आलेय.मला परत त्या आठवणी नकोयत. आणि हो तुमच्या डोळ्यातल्या प्रश्नाचं ऊत्तर ‘ विवेकनी लग्न केलं.त्याच्या वडिलांनी एका श्रीमंत एन् आर आय् मुलीचे स्थळ आणलं.आणि विवेक ते स्थळ नाकारू शकला नाही.तो लग्न करून लंडनला रहायला गेला.’हे फारसं कुणाला माहित नाही.कारण सगळं झटपट झालं.मला तेव्हा डिप्रेशन आलं होतं.पण ट्रीटमेंट नंतर मी बरी झाले आणि ही नोकरीची ॲाफर स्वीकारली.” सगळं एका दमात बोलून तिने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेली.
आम्ही दोघं हॅाटेलमधून निघताना कुमुदिनीची चौकशी केली पण ऊत्तर मिळालं ‘ ती आज उशीरा येणार आहे’
आम्ही काय ते समजून गेलो.
“आता तू काय करायचं ठरवलं आहेस? मी तुला सांगतो तू आता लग्न कर म्हणजे तुला इकडे तिकडे करायला वेळ मिळणार नाही.अरे विसर तिला आता.” रम्या मला सांगत होता पण मी विचार करत होतो कुमुदिनीला यातून कसं बाहेर काढायचं.
“ मी लग्न करीन तर कुमुदिनीशीच.आता तर माझा विचार पक्का झालाय.मी तिला तिचा इतिहास विसरायला भाग पाडेल.कॅालेजमध्ये मी तिच्या मागे तिची सावली होऊन फिरायचो पण आता तिला माझ्या प्रेमाची दखल घ्यावीच लागेल. “ मी मोठ्या आवेशात रम्याला सांगितलं.
“अरे पण कसं? ती तर तुझ्याकडे बघायला पण तयार नाहीय.” रम्या विचारत होता.
“माहित नाही मी काय करणार आहे.पण काही तरी करावंच लागेल.”
नंतर माझ्या दिल्लीच्या फेऱ्या सुरू झाल्या.आईला मी सांगून टाकलं ‘माझ्यासाठी मुली बघू नकोस.’
“मग काय भगवी वस्त्रं घालून संन्यास घेणार आहेस?” आईच्या प्रश्नाला माझ्याकडे ऊत्तर नव्हतं.
पहिल्या चार पाच वेळा कुमुदिनीला दिसेल अशा जागी मी रिसेप्शन एरियात बसून रहायचो.मला काही दिल्ली फिरायची नव्हती.त्यामुळे हॅाटेलच्या दोन दिवसाच्या मुक्कामात मी हॅाटेल बाहेर तेव्हाच जाई जेव्हा कुमुदिनी ॲाफ ड्युटि असे.
नंतर एकदा तिने मला केबीनमध्ये बोलवून घेतले.
“काय हो तुम्ही काय ठरवलंय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही असं केल्याने मी तुम्हाला माझा मित्र मानेन?”
कुमुदिनीने जरा रागातच विचारलं.
“”अहो मी कामानिमित्त येतो दिल्लीला.आता आमची कंपनी हेच हॅाटेल बूक करते त्याला मी काय करणार?”
मी खांदे उडवत बेफिकीर ऊत्तर द्यायचा प्रयत्न केला.पण मनातून खूप घाबरलो.आता ही स्टाफला माझं नांव ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला सांगून मी हॅाटेल बूकींगची इन्कायरी केली तर हॅाटेल फूल्ल आहे सांगायला लावते की काय.
पण तिने रम्याची चौकशी केली माझ्यासाठी कॅाफी पण मागवली.
“माझी कॅाफीची वेळ झालीच आहे” म्हणत हे तुमच्यासाठी काही स्पेशल करत नाहीय हे दाखवण्याचा तिने प्रयत्न केला.पण तरीही मी खूष होतो.कॅाफी पिता पिता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
मी असा वेळ मिळेल तेव्हा जातच होतो.मग विचार केला,’आता शेवटचा उपाय म्हणजे दिल्लीतच नाही या हॅाटेलमध्येच नोकरी बघायची.अगदी वेटर म्हणून मिळाली तरी चालेल.
इथे माझा मार्केटींगचा अनुभव माझ्या मदतीला आला आणि मला त्या हॅाटेलमध्ये मार्केटींग हेडची जॅाब ॲाफर आली.मला विश्वासच बसत नव्हता,मार्केटींग हेड म्हणजे माझी वारंवार कुमुदिनीशी भेट होणार.
जेव्हा कुमुदिनीला ही गोष्ट कळली तेव्हा तिने काहीच रिॲक्ट केलं नाही.
आता सुरू झाली कसरत.होय कसरत.मला दाखवून द्यायचं होतं मी प्रोफेशनल आहे. आणि पर्सनली तिच्या जवळ रहायला मी ही नोकरी स्वीकारली नाहीय.जरी ही गोष्ट खरी होती की मी ही नोकरी तिच्या जवळ रहाण्यासाठी स्वीकारलीय तरी तिला ते जाणवलं तर तिने नोकरी बदलली असती.मी हा धोका पत्करायला तयार होतो.
जरी मी माझ्या मनाची समजूत घालत होतो की आपला उद्देश तिला कळणार नाही तरी तसं नव्हतं.
कुमुदिनी एक दिवस माझ्या केबिनमध्ये आली आणि मी बघतच राहिलो,काय बोलावे कळतच नव्हतं.
“तुमच्याशी जरा बोलायचं होतं.थोडा वेळ देऊ शकाल का?” तिनेच सुरूवात केली आणि मी भानावर आलो.
“ हो हो या ना.बोला काय काम काढलंत आज.आणि आधी सांगा कॅाफी घेणार का चहा ?” मी जरा भानावर येत माझ्या उतावीळपणावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत होतो.
“कॅाफी चालेल मला “ कुमुदिनीनी सांगितल्यावर मी इंटरकॅामवर दोन कॅाफी पाठवायला सांगितलं आणि मी सांगे पर्यंत नो फोन कॅाल्स हे सांगायला विसरलो नाही.
“मला माहित आहे तुम्ही हा जॅाब का घेतलाय,पण काहीही उपयोग होणार नाही.माझा सगळ्या नात्यांवरचा विश्वास उडालाय.मैत्रीची पण भीती वाटतेय मला कारण प्रथम मैत्री होते आणि मग आपण प्रेमात पडतो.”
बोलता बोलता कुमुदिनी थबकली.आणि रूममध्ये थोडा वेळ शांतता होती.
मी पण तिच्या भावनांचा आदर करत फक्त मान डोलावली.
“मी पण मैत्रीच्या शोधात नाहीय.फक्त मला ही चांगली संधी वाटली म्हणून मी ही नोकरी स्वीकारली.” मी आता धडधडीत खोटं बोलत होतो.मग मीच विषय बदलला आणि कामाबद्दल बोलायला सुरूवात केली.
मला माहित आहे कुमुदिनीनी जो कोष स्वत:भोवती विणलाय तो अलगद सोडवायला लागणार.
माझ्याकडे भरपूर वेळ आणि संयम पण भरपूर होता.तिला विश्वास देणं गरजेचं होतं कि मी तिची साथ देणार आहे.काहीही झालं,कितीही चांगली संधी आली तरी.
एकत्र काम करून आता सहा महिने झाले आणि माझ्या बोलण्यावर कुमुदिनी खळखळून हसली आणि मी अनिमिष नेत्रांनी बघत राहिलो.तिचं ते हसणं मी कानात साठवून ठेवलं.त्या रात्री मी रम्याला मेल केला.’आज कुमुदिनी खळखळून हसली.’
हळू हळू कुमुदिनी पूर्वीसारखी होईल याची मला आता खात्री ,नाही नाही थोडी थोडी आशा वाटू लागली.
कधी तरी आम्ही दोघं डिस्कशनच्या नांवाखाली एकत्र डिनर घ्यायला लागलो.
एकदा डिनर घेताना मी तिला विचारलं,”आपण या रविवारी लॅांग ड्राईव्हला जाऊ या काय?”
तिने सरळ सरळ नकार दिला.मी विषय तिथेच सोडून दिला……..
असा तीन चार वेळा नकार पचवला तरी मी चिकाटी सोडत नव्हती.
आणि आश्चर्य म्हणजे कुमुदिनी विचारत होती,”मला जरा शॅापिंग करायचं आहे.भाऊबीज आलीय ना जवळ भावाला काही तरी गिफ्ट घ्यावी म्हणतेय.नेहमी पैसे देते यावेळी तुम्ही मला मदत कराल का ?”
खरं तर मनांत मोर थुई थुई नाचत होते पण मी थोडा भाव खायचं ठरवलं.
“ अच्छा बघतो प्रयत्न करतो.मला शॅापिंगला जायला अजिबात आवडत नाही.पण वेळ मिळतो का बघतो.कधी जायचं आहे?”
“ तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जाऊ.” कुमुदिनी म्हणाली,मी लगेच तयार होईन असं तिला वाटलं होतं त्यामुळे ती थोडी हिरमुसली झाली.
मी रम्याला रिपोर्ट केलं ‘आज स्वत:हून शॅापिंगला विचारलं तिनी मला.’
दोन ,तीन दिवसांनी मी तिला सांगितलं “जाऊया ऊद्या.”
शॅापिंग,खादाडी मस्त झाली.कुमुदिनी खूप खूष होती.हसत होती,मध्येच माझा हात धरत होती.त्यावेळी अगदी कॅालेजमधली मुलगी वाटत होती.भानावर आल्यावर लगेच हात सोडत पण होती.असं वाटत होतं कि ती स्वत: च स्वत:शी भांडत होती.पण कधी तरी तिचं हे द्वंद संपेल आणि ती माझा स्वीकार करेल.एक मित्र,सखा,किंवा जीवनसाथी म्हणून.
सगळं व्यवस्थित चालू होतं,आणि माझे आई,बाबा अचानक दिल्लीला आले.त्यांना ती मुलगी बघायची होती जिच्यासाठी मी मुंबईतली नोकरी सोडून एव्हढ्या लांब आलोय.
ते हॅाटेल बघायला आले आणि त्यांची कुमुदिनीशी ओळख झाली.आईने उत्साहात तिला सांगून टाकले
“ हा आलाय एका मुलीच्या मागे इकडे दिल्लीत.आम्हाला बघायचं आहे कोण मुलगी आहे ती.बरं झालं बाई एक तरी महाराष्ट्रियन भेटली.जरा लक्ष ठेव याच्यावर आणि तुला कळलं की आम्हाला सांग, कोण आहे ती मुलगी.”
“अरे व्वा!! म्हणजे तुमचे चिरंजीव प्रेमवीर आहेत वाटतं.मला माहितच नव्हतं.पण तुमचं यावर काय मत आहे.त्यांनी पसंत केलेली मुलगी तुम्हाला पसंत पडेल का?” कुमुदिनीनी डोळे मिचकावत विचारलं.
मी एकीकडे गोरा मोरा होत होतो तर एकी कडे कुमुदिनीचा आविर्भाव बघून मनांत आशा पण वाटत होती.
खरोखर हिच्या मनाची तयारी होतेय की काय?
“अगं आमचं काय घेऊन बसलीस.आम्ही आमच्या मुलांच्या प्रेमात कधी आडवे येत नाही.याच्या बहिणीचा पण प्रेम विवाह झालाय.फक्त मराठी सून असली तर बरी ,म्हणजे मला तू तू मै मै करायला आपलं बरं.माझं हिंदी ,इंग्लिश तू तू मै मै करण्या एव्हढं चांगलं नाही गं.त्यामुळे मराठी मुलगी असावी एव्हढीच इच्छा आहे बघ.”
आई अगदी खूप वर्षांची ओळख असल्यासारखी गप्पा मारत होती.
मग तुला काय आवडतं,मला काय आवडतं,नवऱ्याची गाऱ्हाणी म्हणजे आईने ,बाबांच्या तक्रारी सर्व विषय झाले.दोघींची चांगलीच गट्टी जमली.
नंतर मी नेहमी प्रमाणे आईला चांगलीच फायरींग दिली.” तुला काही कळतं की नाही? सगळ्यांना सगळं काय सांगत बसतेस?”
“अरे असू दे रे गोड आहे बघ मुलगी.तू तिलाच का विचारत नाहीस ?” आईच्या बोलण्यावर मी कपाळाला हात लावला.
आता मला दुसरी नोकरी शोधायला पाहिजे.आता पर्यंत जरा जरा कुमुदिनीचा सहवास मिळत होता.आता तिला सगळं समजलंय म्हणजे आपलं काही खरं नाही आता.तिचा तिरस्कार कसा सहन करायचा?
असेच पंधरा दिवस गेले,दिवाळी आली आणि गेली मी मात्र गप्प गप्प होतो.
आईची कुमुदिनी बरोबर चांगली गट्टी झाली होती.ती सुट्टीच्या दिवशी आई,बाबांना दिल्ली दाखवायला घेऊन जात होती.आमचं दोघांचं कामानिमित्त पण बोलणं होत नव्हतं.मला कुमुदिनीचं दर्शन पण दुर्मिळ झालं होतं.
आणि एक दिवस माझ्या टेबलवर एक इन्व्हिटेशन ठेवलेलं बघितलं.ते माझ्यासाठी लंचचं आमंत्रण होतं.पत्ता बघितला तर उडालोच.कुमुदिनीच्या घरचा पत्ता होता त्यावर.आता हिने मला कशाला लंचला बोलावलंय आणि ते पण एकट्याला.आई,बाबांशी मैत्री झालीय पण त्यांना नाही बोलावलं.म्हणजे ही माझी बिनपाण्यानी करणार असं दिसतंय.आईला पण ना काहीच कळत नाही कुणाशी काय बोलावं.
मी विचार करत होतो काही तरी कारण काढून आयत्या वेळी जायचं टाळूया.
पण मला फोन करायला वेळच मिळाला नाही.आणि मला लंचला जावं लागलं नाईलाजानी.
मी जेव्हा कुमुदिनीच्या घरी पोचलो तेव्हा कुमुदिनीने साडी नेसली होती.खरं म्हणजे मी फूलं न्यायला पाहिजे होती.पण फायरिंग मिळणार आहे हे वाटल्यामुळे मी हात हलवतच गेलो होतो.
‘गेल्या गेल्या सरबत आणि स्टार्टर आणि थोड्या गप्पा झाल्यावर मेन कोर्स’ व्वा प्लॅन तर छान वाटला.आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.मी अजून मोकळेपणानी बोलत नव्हतोच.मेन मुद्दा कधी सुरू होईल?आपण स्वसंरक्षणासाठी काय सांगावं बरं ,याचाच विचार मनांत चालू होता.
“तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय का?” कुमुदिनीनी विचारलं
मी नाही नाही म्हणून मान हलवली.
जेवून झाल्यावर डेझर्ट द्यायच्या वेळी कुमुदिनीने तिच्या मेडला सांगितलं आता तू गेलीस तरी चालेल.
मी तिच्या मेडकडे केविलवाणेपणे बघत होतो.’थांब गं थोडा वेळ,अगं तू गेल्यावर माझी धुलाई होणार आहे.त्याआधी मला खाऊ पीऊ घालत आहे तुझी मालकीण”
पण मेड गेल्यावर कुमुदिनी रूममधून काही तरी घेऊन आली.
“हे बघा स्वीटच्या आधी मला तुम्हाला काही तरी विचारायचे आहे.”कुमुदिनीच्या बोलण्यावर मी दीनवाणे पणे
“अहो तसं काही नाहीय.ते आई मला लग्नासाठी मागे लागत होती म्हणून मी तिला थाप मारली होती.तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका प्लीज.”
माझ्या बोलण्यावर कुमुदिनी जोरात हसली.
“तू जसा कॅालेजमध्ये मुखदुर्बळ होतास तसाच अजून आहेस.माझ्यावर प्रेम करत होतास पण कधी सांगितलं नाहीस.आणि मग विवेक माझ्या आयुष्यात आला.त्याचे खोटे खोटे प्रेम मला खरे वाटले पण ते फक्त कॅालेजमधलं टाईमपाससाठी होतं.हे मला कळलं तेव्हा फार उशीर झाला होता.तुझं प्रेम तेव्हाही अबोल होतं आणि आताही अबोलच आहे.”
कुमुदिनीचं बोलणं ऐकून मी युरेका ,युरेका म्हणून ओरडणार होतो.पण स्वत: ला थांबवलं.
“पण आता झालंय काय माहित आहे का तुला?मला ना मालतीबाईंची म्हणजेच तुझ्या आईची सून होऊन तू तू मै मै करायला आवडेल.यावर तुझं काय म्हणणं आहे?”
कुमुदिनीचं बोलणं मला समजतच नव्हतं.
“मी तुम्हाला सांगितलं ना माझी आई काहीही बोलत असते.तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.मी माफी मागतो तिच्या वतीने.”मी गयावया करायचंच बाकी ठेवलं होतं.
परत कुमुदिनी जोर जोरात हसायला लागली.
“अरे बुद्दू ,मला तुझ्या आईची सून व्हायचंय म्हणजे तू माझ्याशी लग्न करशील का?”
“अच्छा,म्हणजे तुला , तुम्हाला राग नाही आला?”मी परत चाचरत विचारलं.
“आता तू जर मला हो म्हटलं नाहीस तर नक्कीच रागवेन.” कुमुदिनीने लटक्या रागात म्हटलं.
“मला जरा वेळ पाहिजे विचार करायला.”अजून माझा विश्वास बसत नव्हता हे सगळं खरंच घडतंय.
इतक्यात कुमुदिनीचा फोन वाजला.
“हो हो या तुम्ही लवकर.अजून त्यांनी हो म्हटलं नाहीय.पण कदाचित तुम्ही आल्यावर होकार मिळेल.”
पंधरा मिनीटांत आई,बाबा हजर झाले.
“ काय झाले हा आता भाव कशाला खातोय?” बाबांनी गर्जना केली.
“मी कधी नाही म्हटलं ?मला पण हिच्या बरोबर लग्न करायचंच आहे.”मी बाबांना तितक्याच जोरात सांगितलं.
माझं बोलणं संपेपर्यंत कुमुदिनी रडायला लागली.
“ए वेडाबाई,रडायला काय झालं?” आईने कुमुदिनीचे डोळे पुसत विचारलं.
“विवेकनी दिलेल्या धोक्यामुळे माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता.” कुमुदिनीने रडत रडत सांगितलं.
“आता विवेकला विसरून जा.आणि डोळे पुसून आधी आईला फोन कर जा.ती बिचारी फोन जवळ बसली असेल.” बाबांनी कुमुदिनीला सांगितलं तेव्हा तिचा ,माझा दोघांचाही आ वासला , तो बघून आई म्हणाली,
“अरे,तुम्हा दोघांबद्दल आम्हाला रमाकांतनी सांगितलं.तो म्हणाला काही तरी करायला पाहिजे.नाही तर मुखदुर्बळ राहूल काही कुमुदिनीला लग्नाबद्दल विचारणार नाही.मग आम्ही दोघं आणि हिचे आई,दादा भेटलो.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं.त्यांना फोटोतला जावई आवडला आणि मला काय तू लग्न करणार हेच मोठं सुख आहे.आम्ही तर तुमच्या लग्नाचा मुहूर्त ठरवून हॅाल पण बूक केलाय.” आई नी हसत हसत सांगितलं.
कुमुदिनीने सर्वांना स्वीट डिश दिली पण त्याआधी आईला फोन केला.
फोनवर दोघी रडत होत्या,कुमुदिनीने आईला सांगितलं,”आई ,या वेड्या राहूलनी मला कधी सांगितलंच नाही गं त्याचं माझ्यावर प्रेम आहे.त्याचं माझ्यावरचं प्रेम कधी कमी पण झालं नाही.खरंच मी खूप भाग्यवान आहे.”
सर्व काही ठरवून आई,बाबा परत मुंबईला गेले.
आणि ठरलेल्या मुहूर्तावर कुमुदिनी माझी झाली.
माझा तर विश्वासच बसत नव्हता मग काय स्वत:च स्वत:ला चिमटे काढत बसलो होतो
आणि मीच काढलेल्या चिमट्यांनी अंग हुळहुळतंय म्हणून कोल्ड क्रीम लावत बसलोय आता.
आणि कुमुदिनी ? ती बसलीय तिकडे माझी वाट बघत…………………
सौ सरिता सुभाष बांदेकर
प्रतिक्रिया
15 Feb 2022 - 7:18 pm | विजुभाऊ
:)
17 Feb 2022 - 10:14 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
15 Feb 2022 - 8:55 pm | स्मिताके
हलकीफुलकी आणि सुखांत कथा आवडली.
17 Feb 2022 - 10:14 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
15 Feb 2022 - 10:39 pm | सौंदाळा
छान कथा
काही काही गोष्टी तुम्ही स्पष्ट करुन सांगितल्या आहेत त्यापेक्षा त्या कथेच्या प्रवाहात वेगवेगळ्या प्रसंगातून पुढे आल्या असत्या तर अजून मजा आली असती.
17 Feb 2022 - 10:13 am | सरिता बांदेकर
धन्यवाद.
मी पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन.
आणि अशा त्रुटी दाखवत जा.
17 Feb 2022 - 10:13 am | सरिता बांदेकर
धन्यवाद.
मी पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन.
आणि अशा त्रुटी दाखवत जा.
16 Feb 2022 - 7:39 am | जेम्स वांड
हलकीफुलकी, तरल , भावुक पण ओव्हर द बोर्ड न गेलेली अशी खरीखुरी "कथा" म्हणजे "गोष्ट" वाटावी अशी कथा आवडली !.
कथानायक राहुल ह्याच्यात चिकाटी थोडी जास्तच आहे पण आत्मविश्वास (खासकरून कुमुदिनीच्या बाबतीत) थोडा कमी असे एकंदरीत जाणवले
17 Feb 2022 - 10:15 am | सरिता बांदेकर
धन्यवाद.
16 Feb 2022 - 8:34 am | बबन ताम्बे
लेखनशैली छान. कथा आवडली.
17 Feb 2022 - 10:15 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
16 Feb 2022 - 9:16 am | प्रचेतस
सुरेख लिहित आहात.
17 Feb 2022 - 10:16 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
16 Feb 2022 - 9:23 am | धर्मराजमुटके
छान कथा ! मुखदुर्बळ माणसाच्या आयुष्यात अशी घटना घडणे बहुधा गोष्टितच शक्य होते.
17 Feb 2022 - 10:16 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
16 Feb 2022 - 9:45 am | श्रीगणेशा
छान कथा!
17 Feb 2022 - 10:17 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
16 Feb 2022 - 10:00 am | Bhakti
सुखांत :)
17 Feb 2022 - 10:17 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
16 Feb 2022 - 12:14 pm | श्वेता व्यास
कथा आवडली :)
17 Feb 2022 - 10:18 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
16 Feb 2022 - 12:47 pm | चौथा कोनाडा
झका sss स !
आवडली व्हॅलेण्टाईन स्टुरी !
इस्को बोलत्येय कॉन्फीडन्स !
ये हुई ना बात ....... राहूल वेडस् कुमिदिनी !
राहूलच शेवटी तो ! इ त का निरागस असायचाच !
त्या राहुलचं कधी होणार काय माहित !
😌
17 Feb 2022 - 10:18 am | सरिता बांदेकर
धन्यवाद. मी म्हणजेच राहूल आहे.
16 Feb 2022 - 1:11 pm | टर्मीनेटर
कथा आवडली 👍
17 Feb 2022 - 10:19 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
17 Feb 2022 - 4:54 pm | कर्नलतपस्वी
असे क्वचितच घडते. सगळे सत्यात उतरले तर काय, पण कथा आवडली.
18 Feb 2022 - 2:07 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद.
होय बरोबर आहे.
18 Feb 2022 - 11:07 pm | सौ मृदुला धनंजय...
कथा आवडली.
19 Feb 2022 - 12:09 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद