" ते झाड मागे टाकून अर्धा तास झाला पुढे आलो आपण तु म्हणतोस तसा रस्ता कुठे दिसलाय? आपण पुढे तर नाही ना आलो?
नाही रे . झाड मागे गेलं हे खरं, पण तुला वाटतं तसं ते वळण झाड गेल्यावर लगेच येणार नव्हतं तर थोड्या वेळाने नंतर म्हणजे थोडे आणखी चालल्यावर.
आम्ही इतकं बोलतोय तोच समोरून कोणीतरी येताना दिसतय. लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी,हातात पिशवी.
"कोण असेल रे?" हळू हळू तो माणूस आमच्या जवळ येतोय.
मागील दुवा ध्रांगध्रा-२ http://misalpav.com/node/49721
"रामराम दादा " तो जवळ आला तशी महेशने त्याला हाक मारली.
आमच्या रामरामचा त्याच्यावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. तो चालतच राहीला.
नमस्कार दादा. पांढरीला कसे जायचे हो?
पांढरी गावात जायचंय? पांढरी गावाचा उल्लेख झाल्यामुळे की काय तो दचकला.
त्याने मान वर केली. त्याचा चेहेरा दिसला. आता दचकायची पाळी आमची होती. आम्हीच काय पण आमच्या जागी इतर कोणीही असता तरी दचकला असता.
तो मानूस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते चहावाले आजोबा होते.
"अरे चहावाले आजोबा, तुम्ही इथे?" महेश जवळजवळ किंचाळलाच. महेशच्या किंचाळण्याने तो माणुसही जरा बावचळला.
"अहो तुम्ही चहावाले आजोबा ना!"
कोण मी? चहावाले आजोबा? अहो काय म्हनताय तुम्ही.
"अहो तुम्हीच ना !आम्हाला पायथ्याला भेटला होतात. चहाच्या टपरीवर. आम्हाला पुढे जाउ नका म्हणून सांगत होतात." महेश त्या माणसाला खाणाखुणा ओळख सांगतोय. " ते नाही का तिथे एक छोटे दुकान आहे."
"ते होय.... ते झेले आण्णा." त्या आजोबांसारखा दिसणारा माणूस हसून बोलतो.
त्याच्या आवाजाने दचाकयला होतय. डग्ग्यावर "धिन्न्न्न" आवाज घुमवल्यावर जसा खर्ज का कय लागतो ना तितक्या खर्जातला आवाज. गुहेतून यावा तसा. त्या आजोबांचा आवाज असा नव्हता. म्हणजे "हा माणूस" ते आजोबा नाहीये.वेगळा आहे.
पण ते तर अगदी हुबेहूब ...... नाही ते जरा म्हातारे होते. दाढी मिशा केस पिकलेले होते.हा माणूस त्या मानाने तरूण आहे.
"काय म्हणाले झेले आण्णा? तोच तो मस्त गुहेतला आवाज. हा असा आवाज एखाद्या लेक्चररचा असता ना तर आख्खा क्लास आवाजानेच गुंगी येऊन झोपला असता लेक्चरमधे.
आम्ही त्यांना पांढरीचा रस्ता विचारला.
सांगितला नसेल ना त्यानी?
"हो ना. जाउ नका तिकडे असे म्हणाले." मघाच्या दचकण्यातून महेश बाहेर आलाय . " असे का म्हणाले असतील हो ते?"
" काय माहीत . त्यानाच काय पण आमच्या गावच्या कुणालाही तुम्ही विचारलत तर असे म्हणतात त्या जागेवर. तशी पद्धतच हाय" या खर्जातल्या आवाजाचं एक असतं ऐकत असताना कानाला आत गुदगुल्या होतातच पण तो माणूस काय बोलतोय ते नीट कान देवून ऐकायला लागतं.
"म्हणजे आम्ही तुम्हाला विचारलंत तर तुम्हीही तेच सांगणार?"
हो जिथे ते आजोबा तुम्हाला भेटले तिथे विचारलं असतं तर असेच साम्गितलं असतं" हा बाबा कोड्यात बोलायला लागलाय.
"एक विचारू का दादा." महेशला गम्मत वाटायला लागलीये आणि मला उत्सुकता.
" नका विचारू" महेशच्या प्रश्नाला दादाचे थेट उत्तर.
मायला. मॅडच की. हे असलं भन्नाट उत्तर फक्त कॉलेजच्या कट्ट्यावरच मिळतं.असला मॅडपणा तिथेच चालतो.
एक झालं या मॅड उत्तरामुळे मघाशी डोंगर चढताना लागलेला दम एखाद्याने दमदाटी केल्यावर पळून जावे तसा गायब झालाय. झोपेतून उठल्यावर तोम्डावर ओंजळीने पाण्याचा हबकारा मारल्यावर वाटतं तसं फ्रेश वाटायला लागलय.
कॉलेजच्या कट्ट्यावर होतं असं. या प्रकाराचा जनक पक्या. त्याला कोणी म्हंटलं की जरा ही पुस्तके हातात ठेवतोस का दोन मिनीटे. ...पठ्ठ्या घड्याळात बघत दोन मिनीटे झाली की सरळ हातात घेतलेली पुस्तके खाली ठेवणार. ... आणि वर साम्गणार. झाली हो दोन मिनीटे. म्हात्रे सरांची ती विद्यार्थ्यांना " एक प्रश्न विचारू का!" असे कुजकटपणे विचारायची सवय पक्यामुळे मोडली. सरांनी असे विचारलं की पक्या सरळ मोठ्याने नाही" म्हणायचा.
ह्याने असे उत्तर दिल्यावर पुढचा प्रश्न विचारायचा प्रश्नच येत नाही.
" मला माहीत आहे तुम्हाला मला काय विचारायचं आहे ते. चहावाले झेले आण्णा माझे कोण लागतात म्हणून. मी त्यांच्यासारखा कसा दिसतो! अहो सगळे हाच प्रश्न विचारतात.
"असू शकतं..... जगात म्हणे एकसारख्या दिसणारी सात माणसे असतात." त्याची समजूत घालायला मला हेच वाक्य सापडते.
"पांढरीला तुम्हाला कुणाकडं जायचंय?" त्याने आमच्या प्रश्नाला बगल दिली.
" तसं कुणाकडं नाही. पण....." मुळात पांढरी नावाचं गाव आहे तेही इथे सातमाळ्याच्या डोंगरी भागात हेच मला काल महेश येईपर्यंत माहीत नव्हतं. इथलं कोणी ओळखीचे निघायचा प्रश्नच नव्हता.
आम्हाला तिथे कोणाकडे जायच्म नाहिये. पण तिथे एक देउळ आहे. ते पहायचंय. खूप जुने आहे म्हणे.
"देऊळ! कसलं देऊळ? न्या बा.असं काहीच नाही आमच्या गावात. एक म्हसोबाचं की कायसे होतं देऊळ . देऊळ कसलं राव... पत्र्याचं खोपट म्हणा. पण तिथे तर कुणी जात नाही. पाऊस पाण्याचा आडोसा होतो. शेळ्या मेंढ्याना. इतकेच."
त्याला बहुतेक सांगायचं नाहिय्ये . त्या झेलेआण्णा आजोबांनीही आम्हाला असेच वाटेला लावलं होतं वाटेला लावलं कसलं... सरळ जाऊच नका म्हणत होते.
याला वाट विचारण्यात काही अर्थ नाही. चुकीच्या वाटेला लावायचा.
या पांढरीचे काहीतरी गौड बंगाल आहे.हे नक्की. त्या शिवाय हे लोक असं लपवणार नाहीत.
"तिथे कसं जायचं ते...... " मी महेशला डोळ्यानी खुणा करत हे विचारू नको असे सांगतोय. पण त्याचे लक्ष्यच नाहिय्ये माझ्याकडे.
" मला खोटं बोलता येणार नाही . हा प्रश्न मला विचारू नका" त्याच्या या उत्तराने माझ्या डोक्यातली शंका भिंतीत खिळा ठोकावा तशी ठोकून घट्ट बसली.
" ठीक आहे. तुमची मर्जी. पण समजा मला पांढरीला जायचे नसेल तर कोणता रस्ता पकडू?" वा रे.... वा. महेशनं कोर्टात साक्षीदाराची उलट तपासणी घेताना विचारावा तसा प्रश्न फिरवून विचारलाय.
आर्ट्सला तर्कशास्त्र , लॉजिक शिकल्याचा हा फायदा. अर्थात जिथे फक्त दोनच रस्ते असतील तिथेच हे लॉजिक उपयोगी ठरते. तिसरी शक्यता आली की एक शक्यता बाद झाल्यानंतरही दोन शक्यता उरतातच की. म्हणजे रात्री अंधार पडतो. आत्ता अंधार आहे. म्हणजे लॉजिक नुसार " आत्ता रात्र आहे" असा होतो. पण मदाचित मी सिनेमा थेटरमधे असू शकतो. जी शक्यता लॉजिक विचारात घेत नाही.तिथे तर दिवसाही अंधारच असतो की. अर्थात हे माझ्या मनात बोलतोय. त्या समोरच्या घनगंभीर आवाजाच्या डग्ग्याला नाही.
" हां हे उत्तर देऊ शकेन. इथून सरल गेलात की त्या कोपर्यावर रस्ता डावीकडे वळतो. तिथे पुढे दोन फाटे फुटतील. उजवी कडची चढत जाणारी वाट तुम्हाला थेट डोंगराच्या माथ्यावर घेऊन जाईल." आमच्या नको असणार्या प्रश्नातून डग्गा भाऊची सुटका झाली असावी. खोटे बोलायला लागले नाही. याचा आनंद त्याच्या चेहेर्यावर दिसतोय.
"धन्यवाद.. दादा राम राम" त्याला तिथेच सोडून आम्ही पुढे आलो.आपण आडमार्गाने का होईना मार्ग विचारला याचा महेशला आनंद झाला. आता आम्हाला दुप्पट उत्साह आला. मघाशी आलेला थकवा कुठच्याकुठे पळालाय.
जिंदगी का क्या पता .. राहे किस ओर मुडेंगी.
हाल हो ... बेहाल हो ....चलना अपना काम है...
क्रमशः
प्रतिक्रिया
2 Jan 2022 - 8:18 am | गवि
उत्कंठावर्धक. पुभाप्र..
2 Jan 2022 - 11:26 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
4 Jan 2022 - 6:21 am | नगरी
मस्त
4 Jan 2022 - 7:00 am | विजुभाऊ
ध्रांगध्रा-४ http://misalpav.com/node/49734
8 Jan 2022 - 1:21 pm | चौथा कोनाडा
अ ति शय उत्कंठावर्धक आणि थरारक ! भारी !
30 Jan 2022 - 12:08 pm | सुखी
झकास