मकाण्णाचे सोने - जलजला

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
13 Dec 2021 - 6:09 am

भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघ्डला तर त्यातून निघणार्‍या अग्निज्वाळांनी संपूर्ण सृष्टी भस्मसात होईल हे लहानपणी वाचलेलं बहुतेकांना आठवत असेल. परंतु विनोद शहा आणि हरीश शहा या दोन महान विभूतींनी पूर्वापार चालत आलेली ही समजूत खोटी आहे आणि शंकराच्या तिसर्‍या डोळ्यातून अग्निज्वाला न निघता फक्त लेसरबीमच निघतो, या लेसरबीममुळे फक्त भूकंप होतो आणि त्यात फक्त खलप्रवृत्तीचे व्हिलन लोकच मरतात आणि सत्प्रवृत्तीचे हिरो लोक सुखरुप निसटून जातात हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं आहे! स्वत:च्या मूर्तीकडून करुन घेतलेले हे चमत्कार पाहून साक्षात शिवशंकरालाही संतापाने तांडव करावसं वाटलं असेल. ग्रेगरी पेक आणि ओमर शरीफ यांच्या मॅकेनाज गोल्ड सिनेमाची शंकराच्या तिसर्‍या डोळ्यातून निघणार्‍या लेसरबीमशी सांगड घालणारा अभूतपूर्व सिनेमा म्हणजे निर्माता विनोद शहा आणि दिग्दर्शक हरीश शहा यांचा १९८८ सालचा 'जलजला'! हा सिनेमा अचाट आणि अतर्क्यपणाने इतका ठासून भरलेला आहे की त्यावर सीन बाय सीन न लिहीणं हा या सिनेमावर घोर अन्याय आहे.

पहिल्याच सीनमध्ये रझा मुरादच्या आवाजात 'ये बहोत पुरानी कहानी है...' असं बजावून पुढे येणार्‍या संकटांची जाणिव करुन दिली जाते. कोणा हर्षवर्धन नामक महाराजाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात शंकराने त्याला दर्शन दिलं आणि राजाने आपला 'सारा खजाना लगाकर' एक सोन्याचं शिवमंदीर बनवलं. त्यानंतर खजिन्यात खडखडाट झाल्याने बहुतेक राज्य लयाला गेलं असावं. अस्ताव्यस्त पसरलेल्या डोंगर-दर्‍यांचे शॉट्स दाखवून - नामू परटाच्या शब्दांत सांगायचं तर "डोंगरदर्‍यांवरुन ट्राली नुसती गारगार फिरवली आहे" - आजही ते मंदीर इथेच आहे आणि आजही दर महाशिवरात्रीला तिथे पूजा होते आणि आता त्या मंदीराचा रस्ता फक्त एकाच माणसाला ठाऊक आहे हे ज्ञान आपल्याला दिलं जातं. हा एकमेव माणूस कोणीतरी टिपीकल पुजारी कॅटॅगरीतला माणूस असणार हा आपला अंदाज अचूक निघतो आणि अपेक्षेप्रमाणे सुधीर दळवी दिसतात. ते अद्यापही ११ वर्षांपूर्वी - १९७७ सालच्या साईबाबांच्या रोलमधून बाहेर पडायला तयार नाहीत. जंगलातल्या एका देवळात शिवलिंगासमोर "सोन्याच्या मंदीराचा रस्ता माहित असलेला मी एकटाच आहे, आता म्हातारा झालो आणि माझेच सगेसोयरे माझे दुष्मन झालेत" थोडक्यात "रिटायरमेंटला आलोय पण क्लायंटकडे बॅकअप प्लानच नाही आणि एम्प्लॉयर एक्स्प्लॉईट करतोय" अशी टिपीकल कंप्लेंट करतात. आपली पोझिशन सेफ राहवी म्हणून दळवीबुवा प्रोजेक्ट प्लॅन असलेला मंदीराचा नकाशा पेटवून देतात. म्हातारे असले तरी कान भलतेच तिखट असल्याने त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज बरोबर ऐकायला येतो आणि येणारे घोडे बघून पुन्हा एकदा ॐ नम: शिवाय' करुन ते कलटी मारतात.

दळवींना सटकण्याइतका पुरेसा वेळ दिल्यावर पुनित इस्सर तीन ज्युनियर गुंडांना घेऊन धावत येतो. एकंदर वेशभूषेवरुन ते कोणत्यातरी कबिला टाईप जमातीतले दिसतात. पुनित इस्सर आणि दोघांच्या कपाळाला ती टिपीकल बंजारा स्टाईल पट्टी आहे पण तिसर्‍याच्या डोक्याला मात्रं नाही. कदाचित पट्टीचा कपडा संपला असावा. पुनित 'दादाजी' असा उल्लेख करतो त्यावरुन हा दळवीबुवांचा नातू असावा. जलजला आणि महाभारत दोन्हीचं शूटींग एकाच वेळी सुरू असावं कारण हा दुर्योधनाच्याच बेअरींगमध्ये दिसतो. म्हातारा निसटल्याने वैतागून झाल्यावर त्याला जळणारा कागद दिसतो. लगेच तो हा 'सोने के मंदीर का नक्शा' असल्याचं डिक्लेअर करतो. त्याच्या तीन ज्युनियर आर्टीस्ट गुंडांपैकी एकजण जळणार्‍या नकाशाची आग रुमालाने विझवताना पाहून मी कपाळाला हात लावला. एक्स्ट्रासप्लायरने प्रत्येकाला एक डायलॉग या बोलीवर हे एक्स्ट्रा सप्लाय केलेले असावेत, कारण तिघांनाही माणशी एक डायलॉग दिल्यावर 'दादाजी अजून जास्त दूर गेलेले नसतील' असं अनुमान काढून दुर्योधन तिघा कौरवांना घेऊन शोधाशोध करायला निघतो. शेजारीच असलेल्या तंबूत शोध घेतानाच तंबूचं कापड टर्रकन फाटतं आणि पलीकडून रेश्मा उर्फ किमी कपडे काटकसरकर अवतरते. हिचा गेटप हिंदी सिनेमातला बंजारा स्टँडर्ड, पण आपल्या नावाला जागून तिने कपड्यांत आवश्यक ती काटकसर केलेली दिसते. समोर पुनित इस्सर असल्याने मयसभेत फजिती झालेल्या दुर्योधनाला द्रौपदीने टोमणे मारावेत त्याच टोनमध्ये दळवीबुवा सटकल्याबद्दल टाँटींग करते. पुनितचं नाव शेरा आहे आणि तो रेश्माच्या मागे आहे हे आपल्याला कळतं. यांची रेश्मा आणि शेरा ही नावं कळल्यावर वहिदा रेहमान आणि सुनिल दत्त यांनी नक्कीच शिव्या घातल्या असणार यात शंका नाही. रेश्माचा फंडा मात्रं एकदम क्लीअर आहे. 'जो कोणी मला डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढवून काढेल, मी त्याची!' पुनितला जमत नसेल तर आपल्या ब्लाऊज कम् ब्रा सदृष्य टीचभर कपड्यांतून एक मेडल बाहेर काढून त्या मेडलवाल्यालाच शोधावं लागेल असंही सुनावते. रेश्माच्या बोलण्यातून डाकू सोनासिंग हा देखिल सोन्याचं शिवमंदीर शोधण्याच्या मागे आहे आणि दादाजी सापडले तर तो ते शोधून काढेल असाही उलगडा होतो.

घोड्यावरुन पळून पळून थकलेभागलेल्या दळवीकाकांच्या मागे डाकूंची टोळी लागते. ही डाकूंची टोळी सोनासिंगचीच असणार हे उघड आहे. हा सोनासिंग आहे डॅनी. रावसाहेब दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घालतात, तसं हा प्रत्येक डायलॉगला "ऐसा क्या?" असं विचारत असतो आणि अगदीच एक्साईट झाला की 'झपाटा SS' अशी आरोळी ठोकतो. 'मेरे दांत भी सोणेके है' असं एंट्रीलाच सांगून तो आपले इंटेन्शन्स अगदी क्लीअर करतो आणि स्वत:बरोबरच आपल्या दोन भावांचीही इंट्रोडक्शन देतो. एक हिरासिंग झालेला गुलशन ग्रोवर आणि दुसरा मोतीसिंग झालेला डॅन धनोआ. सोना, हिरा, मोती यांच्यानंतर एकतर यांचा बाप गचकला असावा किंवा त्याने 'ढगाला लागली कळ' या गाण्यातली 'पिकवू माणिक मोती' ही ओळ अर्धवटच ऐकली असावी, कारण त्याने मोती पिकवला आहे पण माणिक गायब आहे. गुलशन ग्रोवरच्या डोक्यामागे लाल रंगाचं शिंग का दाखवलं आहे हे मात्रं विचार करुनही मला समजू शकलं नाही. डॅनीला अर्थातच सोन्याच्या मंदीराचा पत्ता हवा आहे. दळवीबुवा डॅनीला मंदीरात गेलास तर 'जलजला येईल' अशी भिती घालू बघतात, पण आईने त्याला लहानपणी 'बुवा येईल' अशी खोटी भिती दाखवून घाबरवलेलं असल्याने आणि नंतर बुवा वगैरे काही येत नाही हे अनुभवाने माहित असल्याने तो ती धमकी सिरीयसली घेत नाहीच आणि वर "रक्षकके भक्षक बननाही हमारी जिंदगी है!" असा डायलॉग मारतो. दळवीबुवा अर्थातच त्याला दाद देत नाहीत, पण डॅनी त्यांना टॉर्चर करणार त्यापूर्वीच डॅनीच्या नावाने 'ढाई किलो का हाथ'च्या तीर्थरुपांच्या आवाजातली "सोनासिंग" अशी हाक येते आणि पोलीस इन्स्पेक्टर शिव उर्फ धरमपाजी अवतरतात. इथे हा सिनेमा ९० च्या दशकातल्या टिपीकल सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो कारण एकतर इथे हिरोची एंट्री रजनीकांतच्या 'ए से एक्का, ए से अकबर खान, अभी आता हूं मेरी जान' अशा कोणत्याही ड्रामा पद्धतीत न होता अगदीच साध्या पद्धतीने होते आणि धरमपाजी एकटे न येता पोलीसांची टीम घेऊन आलेले आहेत, थोडक्यात ते अद्यापही नॉर्मल मॅन आहेत, ही-मॅन झालेले नाहीत.

दोन-चार डायलॉग मारल्यावर लगेच गोळागोळीला सुरवात होते. 'पुलीस ठीक वक्त पर पहुंची और डाकुओंको भागना पडा और मै गब्बर के पीछे लग गया' या शोलेमधल्या सिद्धांतानुसार धरमपाजी डॅनीच्या मागे लागतात आणि यथावकाश त्याला पकडतात. आपल्याला पकडण्यासाठी आपल्या स्टेटसला साजेशी मोठी गाडी न आणल्याचा डॅनीला राग येतो आणि तो तसं बोलूनही दाखवतो, पण धरमपाजी काही दाद देत नाहीत आणि त्याला जीपमध्ये कोंबतात. तेवढ्यात दोन कॉन्स्टेबल दळवीबुवांना घेऊन धरमपाजीकडे येतात. वास्तविक पाच-दहा मिनिटांपूर्वी ते घोड्यावरुन दौडत होते आणि त्याना टॉर्चर करायला डॅनीला वेळही मिळालेला नाही, पण तरीही पाजींसमोर येतात तेव्हा दळवीबुवा मनापासून कण्हत आहेत. पाजी लगेच 'ये बहोत जखमी है' असं डिक्लेअर करुन टाकतात. स्त्यावर सापडलेल्या कोणत्याही म्हातार्‍याची काळजी घेणं हे हिरोचं आद्यकर्तव्य असल्याने धरमपाजी दळवीबुवाना आपल्या घरी न्या अशी हवालदारांना ऑर्डर देतात आणि वर यांची नीट काळजी घे असा बायकोला मेसेजही पाठवतात!

धरमपाजींच्या घरी त्यांची अगदी आदर्श भारतीय नारी असलेली बायको आहे राधा उर्फ रती अग्निहोत्री. इथे एक लॉजिकल फ्लॉ म्हणजे सगळा सिनेमा शंकराच्या सोन्याच्या मंदीरावर, हिरोचं नाव शिव पण शिव असलेल्या धरमच्या बायकोचं नाव राधा? निदान पार्वती, उमा असंतरी ठेवायचं, पण तसं काही न करता बीबीसीआयला जीआयपीचा डब्बा जोडलेला! उद्या श्रीकृष्णाला राग आला तर उषा-अनिरुद्ध विवाहप्रसंगी झाली तशी पुन्हा शैव-वैष्णव लढाई झाली तर सिनेमाचं काय होईल अशी मला भीती वाटलीच! तरी शिवचं शीव करुन तिचं नाव धारावी ठेवलं नाही हे आपलं नशीबच म्हणायचं! तर ही राधा देवाजी पूजा आटपून दळवीबुवांसमोर आरतीचं ताट घेऊन येते. दळवीबुवा आरती घेत असतानाच तिला रीतसर हुकुमी चक्कर येते. धरमपाजींचे श्रम सत्कारणी!. पाजी घरी येतात तो राधा बेडवर आणि दळवीबुवा शेजारी उभे! हा ट्रान्स्फर सीन पाहून पाजी एकदम नॉनप्लस! आईजीच्या जीवावर बायजी उदार या थाटात "वो खुशखबरी मै सुनाता हूं!" करुन दळवीबुवा त्याला तू बाप बनणार आहेस ही ब्रेकींग न्यूज देतात, आणि वर "हिला काही काम करु देऊ नकोस!" असा कोणीही न मागता फुकटचा सल्लाही देतात, पण ट्रकड्रायव्हर नसल्याने खंडीभर धुरळा न चारता निघून जातात.

सिनेमात एकापेक्षा जास्त हिरो असतील तर एका हिरोचा सेटप झाल्याबरोबर दुसर्‍याची एंट्री झाली नाही तर तो फाऊल धरला जातो. त्यामुळे पुढच्या सीनमध्ये शॉटगन सिन्हांची एंट्री होते. शॉटगन बारटेंडर असलेल्या अमृत पटेलला व्हिस्कीची ऑर्डर देतो. बाटली समोर आल्यावर ती ग्लासमध्ये ओततो आणि फर्रकन काडी ओढून पेटवून देतो. अरे लेका, तुला प्यायची नव्हती तर ऑर्डर कशाला दिली? उगाच एक खंबा फुकट! शॉटगनकडे एक वॉन्टेड पोस्टर आहे. आता हे पोस्टर कोणत्याही अँगलने गोगा कपूरसारखं दिसत नाही, पण ते गोगा कपूरचं आहे असं आपण मानायचं. गोगा कपूर आपल्या चमच्यांसह दारु पीत बसलेला आहे. त्याने फेकलेलं रुपयाचं नाणं गोळीने अचूक उडवून ते वेटरच्या हाती जातं यावरुन शॉटगन शार्प शूटर आहे हे आपल्याला दाखवलं जातं. पुढे तो 'मुझे सिक्के उडानेका बहोत शौक है' असा डायलॉगही मारतो. गोगा कपूरची व्यवस्थित धुलाई करुन झाल्यावर शॉटगन त्याला एक लॉकेट मधला फोटो दाखवतो आणि तिची चौकशी करतो, पण आपण या मुलीला पाहिलेलं नाही असं तो हातापाया पडून त्याला सांगतो.

गोगा कपूर वॉन्टेड असल्याने शॉटगन त्याला धरमपाजींकडे आणतो आणि रीतसर पाच हजाराचं इनाम वसूल करतो. शॉटगनची पैसे मोजण्याची पद्धत म्हणजे तो नोटांचं बंडल कानाशी धरुन आवाज घेतो आणि पैसे बरोबर असल्याचं डिक्लेअर करतो! बहुतेक बँकेत असतं ते नोटा मोजण्याचं मशीन त्याने कानात बसवलेलं असावं! इथे शॉटगन बेनाम या नावाने गुंडांना पकडून देत असल्याचं कळतं. शॉटगनला बेनाम म्हटल्यावर मागून अमिताभ आणि प्रेम चोप्राने घातलेल्या शिव्याही ऐकायला येतात. धरमपाजी त्याला पोलीसांत जॉईन व्हायची ऑफर देतात, पण "'मेरी तलाश मुझे नौकरी करने की इजाजत नहीं देती" असा डायलॉग मारुन शॉटगन ती ऑफर नाकारतो. आता शॉटगनला तलाश आहे ती रती अग्निहोत्रीची कारण गोगा कपूरला दाखवलेल्या लॉकेटमध्ये तिचा फोटो होता. त्याने रीतसर पोलीस कंप्लेंट केली आणि फोटो दाखवला तर दोन मिनिटांत धर्मेंद्र सांगेल अरे ये तो शीव की धारावी... चुकलं चुकलं माझी राधा हय! मग दोघं 'मेव्हणे-मेव्हणे मेव्हण्यांचे पाव्हणे' करत रात्री बॅगपायपर प्यायला मोकळे! पण इतक्या चुटकीसरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं हे हिंदी सिनेमाला मंजूर नसल्याने शॉटगन ते लॉकेट धरमपाजीना दाखवत नाही. इतक्या सिनेमांमध्ये व्हिलनगिरी केल्यामुळे मेन व्हिलनशिवाय स्टोरी पुढे जात नाही हे डॅनीला माहीत आहे त्यामुळे आपल्याला पळून जाण्याचा चान्स मिळणारच हा कॉन्फीडन्स असलेला डॅनी लॉकपमधून पळून गेल्यावर आपल्याला पकडण्याचं चॅलेंज शॉटगनला देतो. शॉटगन अर्थातच चॅलेंज स्वीकारतो.

धर्मेंद्र आणि शॉटगन यांची एंट्री अगदीच साधी दाखवल्याने तिसर्‍या हिरोची एंट्री जरा नाट्यमय दाखवावी असा बहुतेक दिग्दर्शकाने विचार केला असावा. त्यानुसार पुढच्या सीनमध्ये एक घोडा स्ट्रेचरसदृष्य काहीतरी ओढत नेत असलेला दिसतो. स्ट्रेचरवरुन खाली लोंबणारे बूट आणि काऊबॉय स्टाईल हॅटने झाकून घेतलेला चेहरा या सगळ्या लक्षणांवरुन हा मिथुन चक्रवर्ती असणार ही जवळपास खात्री पटत असतानाच टोपीखालून राज कपूरचे धाकटे चिरंजीव राजीव कपूर बाहेर येतात आणि आपल्याला करायला गेलो गणपती आणि झाला मारुती या म्हणीचं प्रत्यंतर येतं. घोडा राजीव कपूरपेक्षाही हुशार असल्याने आणि मुख्य म्हणजे त्याला वाचता येत असल्याने तो दारु की दुकान अशी पाटी लावलेलं दुकान पाहून बरोबर थांबलेला असतो. मग राजीव कपूर आणि तो घोडा - तुफान - यांच्यातल्या प्रेमळ संवादांनंतर राजीव कपूर दारु आणायला दुकानात जातो. दारु ढोसून झाल्यावर पुन्हा एकदा राजीव कपूर स्ट्रेचरवर आणि बिचार्‍या घोड्याने त्याला ओढायचं! असल्या गाढवाचं वजन वाहवं लागत असल्याने घोड्यालाही दारुची गरज भासते यात आश्चर्य ते काय? कुणाच्य खांद्यावर कुणाचे ओझे! या सगळ्या सीनमध्ये राजीव कपूरपेक्षा घोड्याची अ‍ॅक्टींग जास्तं चांगली आणि नैसर्गिक आहे हे वेगळं सांगायला नकोच!

मल्टीस्टारर सिनेमा असेल तर एका हिरोच्या दारु ढोसण्याच्या सीननंतर साधारण तसाच सीन दुसर्‍या हिरोचा येणार ही सेफ बेट असते. आता धरमपाजींना प्रेग्नंट बायको दिल्याने हा दारु पिणारा हिरो शॉटगन असणार. त्याच्याकडे कानातल्या मशीनने बरोबर मोजून घेतलेले पाच हजार आहेत. शॉटगन बारमध्ये दारु ढोसत असताना व्हिस्कीच्या बाटलीत त्याला नृत्य करणारं कपल दिसतं. एव्हाना बावीस मिनिटं झाली तरीही एकही गाणं झालेलं नाही हे दिग्दर्शकाच्या लक्षात आल्यामुळे शॉटगनच्या फ्लॅशबॅकमध्ये आशाताईंच्या आवाजात गाणं सुरु होतं - दिल है कब किसपे आ जाएगा. हे गाणं पुनित इस्सरच्या बंजारा कबिल्यात दाखवलं आहे. गाण्यात किमीतै काटकसर केलेल्या कपड्यांता नाचताना दिसल्यावर त्यांचा तो मेडलवाला शॉटगन आहे ही लिंक लागते. गाण्याच्या सुरवातीलाच एक मुद्दाम तयार केलेला धबधबा दिसल्यावर किमीतै याचा योग्य तो सदुपयोग करणार हे उघड होतं आणि त्याप्रमाणे त्या धबधब्यात मनसोक्त भिजून घेतात. बिचार्‍या पुनितला किमीतैंबरोबर नाचताना पाहून आणि त्याच्या स्टेप्स पाहून त्याची अगदीच कीव येते. एका शॉटमध्ये तर किमीतै कबड्डी कबड्डी करत विरुद्ध पार्टीत गेल्या आहेत आणि विरुद्ध पार्टीचे खेळाडू मागे मागे सरकत त्यांना बोनस लाईनपर्यंत आत येऊन देत आहेत असा भास होतो. आर डी बर्मनने पैशासाठी पाट्या टाकल्याचं उत्तम उदाहरण म्हणून या सिनेमाचं संगीत आहे.

गाणं संपल्यावर शॉटगन किमीतैना आपल्याला लढाईत मिळालेलं मेडल गिफ्ट म्हणून देतो. इथे रोमँटीक डायलॉगच्या निमित्ताने दिग्दर्शक शॉटतन आणि किमीतैंचा एक किसिंग सीन अलगद काढून घेतो. किमीतै एका मेडलवर समाधान मानण्यातल्या नाहीत हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. लग्नामध्ये मला अंगभर सोन्याने मढवून काढायचं अशी त्यांची अगदी क्लीअर प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन आहे. शॉटगन बिचारा अगदी साधासरळ डेव्हलपर असल्याने हे सगळं आपल्याला जमणार नाही असं स्पष्ट सांगून टाकतो. किमीतै मात्रं मला राजमहलकी जिंदगी आणि ताजमहल की मौत पाहिजे असं बोलून दाखवतात तेव्हा प्रोजेक्ट मॅनेजरच्या अवास्तव वैतागलेला डेव्हलपर पेपर्स टाकतो अगदी तसाच शॉटगन ब्रेकप करुन निघून जातो आणि इथे त्याचा फ्लॅशबॅक संपतो.

दारु पिऊनही उपाशी असलेला राजीव कपूर तोंडावर झोरो स्टाईलचा मास्क लावून एका घरात घुसला आहे. चेहर्‍यावर एक मस लावला की हिरोचं वेशांतर झालं हे स्टँडर्ड असल्याने मास्क लावलेल्या हिरोला ओळखण्याचा प्रश्नच नाही. तो खोलीत शोधाशोध करत असताना कोणाची तरी चाहूल लागल्याने लगेच पडद्याआड लपतो तोच दार उघडून विजयेता पंडीत आत येते आणि हिंदी सिनेमाची हिरॉईन होण्यासाठीचं मिनिमम क्वालिफिकेशन - धाडकन बेडवर अंग झोकून मुसमुसायला लागते. राजीवबाळ पडद्याआडून डोकावतो पण तोपर्यंत रडं आवरुन विजयेता साडी सोडायला लागलेली! चोर असला तरी हिरो असल्याने त्याला सभ्य दाखवणं भाग आहे त्यामुळे पुढच्या सीनच्या कल्पनेने तो परत पडदानशीन होतो. इथे गुलशन ग्रोवर किंवा शक्ती कपूर असते तर त्यांनी विजयेताला साडी सोडायला सक्रीय मदत केली असती. अर्थात राजीवबाळाला पडद्याआडून डोकावण्याचा मोह आवरत नाहीच! एव्हाना विजयेताने साडी पंख्याला बांधून आत्महत्या करायची तयारी केलेली आहे. इथे दिग्दर्शक चलाखीने तिचा एक नेव्हल शॉट काढून घेतो. आता ही लटकली तर उद्या हे लफडं आपल्या गळ्यात येईल त्यापेक्षा हिला वाचवावी या विचाराने राजीवबाळ बाहेर येतो आणि त्याला पाहून विजयेता दचकण्याचा अभिनय करायचा प्रयत्न करते. आपल्या मनाविरुद्ध आपलं लग्न ठरवण्यात आहे पळून जायला मदत करायची ती त्याला गळ घालते. मग आधी कशाला मरायला निघाली होती? राजीवबाळ तिला आधीच माझे खायचे वांधे, त्यात तुला कुठे पळवून नेऊ असा लुक देतो पण पहले नजरमे तिच्यावर फिदा पण झालेला असल्याने शेवटी दुसर्‍या दिवशी दागिन्यांसह पळून जायचा प्लॅन पक्का होतो.

या विजयेताचा लग्नं कोणाशी ठरलंय तर जगदीपशी! जगदीपचा बाप कोण तर टिकू तलसानिया! तो आपला पेटंट डायलॉग 'ये क्या हो रहा है' मारुन घेतो. बिचार्‍या टिकूला १५ वर्ष मोठा असलेल्या जगदीपचा बाप बनवलेला पाहून त्याची खरंतर दया येते कारण तो जगदीपपेक्षा लहान दिसतोही. दोन-चार पाचकळ डायलॉग मारल्यावर राजीव कपूर त्याला आपल्या घोड्यावर बसवतो. घोडा राजीवबाळापेक्षाही हुशार असल्याने पुढे काय करायचं हे त्याला व्यवस्थित माहीत असतं. इकडे विजयेताला पिकअप करायला आलेला राजीवबाळ तिच्याबरोबर आंखमटक्का करत बसलाय. मध्येच त्याला ती दुल्हनच्या वेशात आपल्याला हार घालते असं दिवास्वप्नही पडतं! दगडाला दगडाचंच स्वप्न पडणार यात काय आश्चर्य? विजयेता त्याला पळून जाण्याची आठवण करुन देते तेव्हा तो तिच्याकडे दागिने मागतो, पण ती त्याच्याइतकी मूर्ख नसल्याने त्याला पळून गेल्यावर दागिने देईन असं बजावते. तिला कडेवर घेऊन शिडी उतरताना पाहून मला राजीवबाळाची दया आली! दगडाने दगड उचलल्याचं हे दुर्मिळ उदाहरण! त्या लाकडी शिडीने या दोन दगडांचं वजन कसं काय पेललं देव जाणे! एव्हाना जगदीपला नदीत बुचकळून टाकून तो हुशार घोडा योग्य ठिकाणी परत आलेला आहे. विजयेता घोड्यावर बसल्यावर राजीवबाळ बसणार तोच तिची काकी-मामी-आत्या अशा कॅटॅगरीतली बाई नेमक्या वेळेला कुठे जातेस असं विचारायला टपकते. विजयेताचं नाव पारो असल्याचं इथे आपल्याला कळतं. राजीवबाळ घोड्याला तिला पळवून नेण्याची इन्स्ट्रक्शन देतात तेव्हा 'लेका, तुझ्या भानगडी तू निस्तर, मला कशाला कामाला लावतो?' असा भाव घोड्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतो. पण एवढ्यावरच आपली सुटका होत नाही. एव्हाना धड्पडत परत आलेल्या जगदीपला टीकू तलसानिया परत दुसर्‍या घोड्यावर चढवतो, का तर जोपर्यंत विजयेता घेऊन पळालेले खानदानी दागिने जगदीप परत आणत नाही तोपर्यंत त्याचं लग्न होणार नाही! 'झक् मारली आणि तुझ्या पोटी जन्म घेतला' असे एक्स्प्रेशन्स देऊन जगदीप दागिने शोधायला निघतो. एवढं सगळं करुनही राजीवबाळाचा पोपट होतो कारण विजयेता घोड्याला टांग मारुन कधीच पसार झालेली असते.

इकडे इन्स्पेक्टर असलेल्या धरमपाजींच्या लॉकअपमधून डॅनीला दुसरीकडे शिफ्ट करण्याची जबाबदारी त्याचा सिनीअर ऑफीसर असलेला सत्येन कप्पूवर येते. पाजी कप्पूकाकांना डॅनीबद्दल वॉर्न करतात पण कप्पूकाका आपल्या सिनिऑरीटीचा आधार घेत "धर्मू, तुला माझ्यावर भरवसा नाय काय?" असं उलट विचारुन त्याला गप्प करतात. डॅनी सिनीयर व्हिलन आणि मोठा भाऊ असल्याने गुलशन ग्रोव्हर - डॅन धनोआ त्याला सोडवण्यासाठी कप्पू आणि कंपनीवर अ‍ॅटॅक करतात आणि त्याला सोडवतात. मोकळा झालेला सोनासिंग ओव्हर एक्साईट झाल्याने झपाटा SSS अशी आरोळी ठोकून आपल्या टोळीसह तिथून गुल होतो. इतका वेळ फक्त सेटप करण्यात घेतला असला तरी आता व्हिलन मोकळा झाल्याने स्टोरी पुढे जाणार आहे!

पोलीसांच्या तावडीतून पळालेला सोनासिंग आपल्या अड्ड्यावर आल्यावर अपेक्षेप्रमाणे नाचगाण्यात मग्न आहे. हा डान्स भर जंगलातल्या तळ्यावर तराफा उभारुन त्यावर चाललेला आहे. सोनासिंगचा आदर्श बहुतेक शोलेतला गब्बरसिंग असावा कारण हा डान्स हेलनच्या मेहबूबा मेहबूबाची आठवण करुन देण्यासाठीच घुसवलेला आहे अशी दाट शक्यता आहे. नाहीतरी गब्बरचा रोल आधी डॅनीलाच दिलेला होता, ती हौस तो इथे भागवून घेताना दिसतो. जेमतेम अर्ध्या मिनिटाचा हा डॅन्स संपण्यापूर्वीच डॅन धनोआ त्याला ट्रेनमधून चाललेल्या लाखोंच्या सोन्याबद्दल खबर देतो, पण डॅनीच्या दृष्टीने लाखोंचं सोनं आता चिल्लर आहे. त्याला आता फक्त सोन्याच्या शिवमंदीरातच इंट्रेस्ट आहे. इतक्या वेळानंतर दळवीबुवांचं नाव उदयसिंग आहे हे ज्ञान आपल्याला दिलं जातं! दळवीबुवा फक्त धर्मेंद्रला भेटलेले असल्याने आणि डॅनीलाही त्याचा बदला घेण्याचा मोटीव्ह असल्याने पुन्हा दोघांची जुंपणार हे उघड आहे.

अपेक्षेप्रमाणे डॅनी आपली टोळी घेऊन धरमपाजींच्या घरी येतो. गुलशन ग्रोव्हर - डॅन धनोआ यांना कधी नव्हे ते धर्मेंद्रला फटकावण्याचा चान्स मिळतो. तो सोहळा यथासांग आटपल्यावर रती अग्निहोत्रीला होल्डअप करुन डॅनी धरमला उदयसिंगचा पत्ता विचारतो. धरमपाजीना दळवीबुवा कुठे गेले माहीत नसतं, त्यामुळे ते डॅनीला तसं सांगून टाकतात पण तो अनुभवी व्हिलन असल्याने आणि हिरोलोकांकडून अनेकदा गंडवलं गेल्याचा अनुभव असल्याने त्याला ते पटत नाही. त्याच्या कन्सेप्ट्स स्पष्ट आहेत - ते सोन्याचं मंदीर माझं आहे आणि त्याच्यासाठी मला उदयसिंग पाहिजे म्हणजे पाहिजे! रती अग्निहोत्री आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्रातलं सोनं देऊन बार्गेन करु बघते तेव्हा डॅनी "हाथी के मूंह मे चना? इससे ज्यादा सोना हमारे दातों मे है!" असला हुच्च डायलॉग मारतो. रतीला नाईफपॉईंटवर घेऊन तो धरमपाजीला वॉर्न करतो पण धरम आपल्याला कायबी ठाव न्हाय याच मोडमध्ये आहेत. शेवटी डॅनीचा पेशन्स संपल्याने तो चाकू भोसकून रतीचा गेम करतो. इतक्यावरच समाधान न मानता धरमला घोड्याच्या मागे बांधून जंगलात फरफटत नेलं जातं, पण गुलशन ग्रोवर त्याचा गेम करणार तोच आयत्या वेळेस शॉटगन तिथे टपकतो आणि धरमला वाचवतो. शॉटगन त्याला घरापर्यंत लिफ्ट देण्याची ऑफर देतो पण पोलीसमॅनचा ही-मॅन बनण्याचा प्रोटोकॉल अ‍ॅक्टीव झालेला धरम ती ऑफर नाकारतो आणि पोट सावरत घराकडे धावत निघतो.

धर्मेंद्र घरी येतो तो रती गचकलेली असते. इथे हिंदी सिनेमातल्या माणसं मरताना गप मरत नाहीत तर काहीतरी सांगून मरतात या नियमाला छेद दिल्याने या सिनेमाचं वेगळेपण आणखीन उठून दिसतं. रतीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या सत्येन कप्पूला पाहून धरमपाजीची सटकते. सत्येनची गचांडी धरुन रागाच्या भरात दोन-चार डायलॉग मारल्यावर धरमपाजी पोलीसाची नोकरी सोडण्याचं डिक्लेअर करतात. स्मशानात पेपर्स टाकणारा माणूस पहिल्यांदाच बघितल्याने सत्येन (आणि मी पण) टोटली शॉक्ड! धरमला स्मशानातून बाहेर पडायलाही वेळ न देता सोनासिंगची खबर त्याला देणारा गंगापूरचा म्हातारा मुखिया त्याला गाठतो. हा म्हातारा मुखिया दाखवला आहे सी. एस. दुबे! हा दुबेजी म्हणजे रेपिस्ट, दलाल, मुनिम असले निगेटीव्ह रोल करण्यात माहिर त्यामुळे मुखियाच्या रोलमध्ये त्याला बघून मला शॉकच बसला. अंगूरमधला छेदीलाल वगळता हा एकमेव पॉझिटीव्ह रोल त्याने केला असावा. धरमपाजी डॅनीचा बंदोबस्त करायला आपण गंगापूरला येणार असल्याचं डिक्लेअर करुन टाकतात. नोटीस पिरेड, एक्झिट फॉरमॅलिटीज, हॅन्डओवर असल्या फालतू गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अर्थात स्मशानात पेपर्स टाकणार्‍याकडून या अपेक्षा करणं म्हणजे फारच झालं! गंगापूरला जाण्यापूर्वी ते ओळखीच्या लोहाराला गाठून रती अग्निहोत्रीच्या मंगळसूत्रातल्या सोन्याची गोळी बनवण्याची ऑर्डर देतात! सगळा सिनेमा एकतर शंकराशी किंवा सोन्याशी संबंधीत असल्याने सोनासिंगला मारण्यासाठी सोन्याची गोळी असं त्यामागचं लॉजिक असावं!

मल्टीस्टारर सिनेमात एखादा हिरो किंवा हिरॉईन निम्म्यातच गचकले की क्लायमॅक्समध्ये उरलेला दुसरा गचकणार असा अलिखित नियम आहे. या नियमाला अपवाद असलेल्या सिनेमात जर बजेट कमी असेल किंवा कहानी की मांग चाणाक्षपणे तयार केली असेल तर गचकलेल्याचा डबलरोल असतो (उदा. - कहो ना प्यार है), पण जर खर्चा किएला है अशी सिच्युएशन असेल तर हमखास हिरो किंवा हिरॉईनच्या गळ्यात गचकलेल्याची रिप्लेसमेंट म्हणून दुसर्‍याला बांधलं जातं. इथे धरमपाजी मेन हिरो असल्याने आणि पुरेसं बजेट असल्याने त्यांच्या गळ्यात दुसरी हिरॉईन बांधण्याचं ठरवलं जातं आणि या क्लूवर अनिता राजची एंट्री होते. ही गंगापूर गावात आपल्या आईबरोबर हॉटेल कम बार चालवत असते. हिच्या आईच्या रोलमध्ये ललिता पवारला बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. ललिताबाईंच्या मोजक्याच पॉझिटीव्ह रोलपैकी (आनंद मधली मेट्रन, श्री ४२० मधली केळेवाली, अनाडीतली मिसेस डिसा) हा एक असावा. अनिताच्या हॉटेलमध्ये गुंडगिरी करणार्‍या चिल्लर गुंडांची धरमपाजी धुलाई करतात ते पाहून ललिताबाई त्याना नोकरीची ऑफर देतात. पोलिसाची नोकरी सोडल्याने धरमपाजी असेही रिकामटेकडेच असतात त्यामुळे बसल्याजागी मिळालेली नोकरी ते कशाला सोडणारेत? त्यांच्या नोकरीच्या पर्क्समध्ये लॉजिंग - बोर्डींग आणि दारु असं पॅकेज पाहून मलाही तिथे एखादी व्हेकन्सी आहे का हे पाहण्याचा मोह झाला.

धर्मेंद्रच्या रुममध्ये भग्वदगीतेचं कव्हर असलेल्या पुस्तकात रिव्हॉल्वर आणि खास बनवून घेतलेली सोन्याची गोळी ठेवलेली आहे आणि डॅनीचं पोस्टर लावलेलं आहे. धरमपाजी त्या पोस्टरकडे पाहून कुत्ते... असा आपला पेटंट डायलॉग मारुन अर्धी भरलेली बाटली त्या पोस्टरवर फेकून मारतात. फुकट गेलेली दारु पाहून इथे माझा जीव हळहळला. सकाळी उठून आपलं रिव्हॉल्वर गायब झालेलं पाहून धर्मेंद्र टोटल नॉनप्लस, पण ती गन अनिता राजकडे असते. धरमने मागितल्यावर ती आपल्या फ्रॉकच्या खिशातून काढून गुपचूप त्याच्या हातात देऊन टाकते. एवढावेळ ही बाई ती गन आपल्या फ्रॉकच्या खिशात घेऊन कशाला फिरत होती? अर्थात असल्या लॉजिकल गोष्टी या सिनेमाला अ‍ॅप्लीकेबल नाहीत.

डॅनीसाठी वाँटेड पोस्टर आणि त्यावरचं दहा हजाराचं बक्षीस पाहून शॉटगन त्याला पकडायला निघतो. राजीवबाळ 'मला बी जत्रंला येऊद्या की' करत त्याच्या गळ्यात पडायला बघतो. इथे राजीवबाळाचं नाव भोले असल्याचं आपल्याला कळतं. शॉटगन त्याला 'सडेले छोले' म्हणून पाण्यात बुचकळून काढतो आणि पाल झटकल्यासारखा झटकून निघून जातो. पुढच्याच सीनमध्ये शॉटगन ढाब्यावर जेवताना गुलशन ग्रोव्हर आणि डॅन धनोआ शॉटगनने धरमपाजीना वाचवल्याचा बदला घ्यायला म्हणून प्रगट होतात. शॉटगनला मागून फटका मारुन बेशुद्ध केल्यावर आतापर्यंत तासभर झाला तरीही कोणताही मोटीव्ह नसलेला अन्याय झालेला नाही हा दिग्दर्शकाला साक्षात्कार होतो आणि शॉटगनला मारण्यासाठी सगळा ढाबा जाळण्याचा शीन आपल्याला दाखवला जातो. नेमक्या वेळेस कुठेही पोहोचण्याचं टायमिंग मल्टीस्टारर सिनेमातल्या हिरोंना अवगत असल्याने राजीवबाळ वेळेवर पोहोचतो आणि आपल्याकडचा हँडग्रेनेड टाकून पाण्याची टाकी फोडतो. थोड्याफार गोळागोळीनंतर गुलशन आणि कंपनी माघार घेते आणि शॉटगन आणि राजीवबाळ डॅनीला पकडण्याच्या प्रोजेक्टमध्ये फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशीपचं डील फायनल करतात. हे दोघं गंगापुरात येतात तेव्हा गावकरी त्यांना सोनासिंगचे लोक समजून धान्य आणि फळं वगैरे गोष्टी आणून देतात. हा सीन अर्थातच शोलेमधल्या कालिया अ‍ॅन्ड कंपनीच्या सीनवरुन घेतलेला आहे. इथे शॉटगन आपला 'खामोश!' हा पेटंट डायलॉग मारुन घेतो आणि आपण डॅनीला पकडायला आल्याचं डिक्लेअर करतो आणि गावकरी सगळं सामान घेऊन परत गेल्यावर वैतागलेल्या राजीवबाळाला इमानदारीचे धडेही देतो. राजीवबाळ घोड्याच्या निमित्ताने दारु ढोसण्यासाठी धरमपाजीच्या हॉटेलमध्ये येतो. धरमपाजी त्याची अपेक्षेप्रमाणे गाढवांत संभावना करतो हाकलून देतो.

गंगापुरात एका बाप - बेट्यामध्ये लग्नावरुन वाद सुरु असलेला दिसतो आणि त्यासाठी दोघं तलवारी घेऊन एकमेकाशी लढायला उभे ठाकतात! आता या दोघांमधला वादविषय असलेली वधू कोण तर विजयेता पंडीत! विजयेता वरुन दोन लग्नाळू पुरुषांमध्ये लढाई होणं हे अनिल कुंबळेने वकार युनुसला लागोपाठ दोन बाऊंड्री मारल्यावर टोनी ग्रेगने कुंबली इज प्लेईंग अ ब्लाईंडर अशी कॉमेंट करण्याइतकंच दुर्मिळ आणि अविश्वसनीय दृष्यं आपल्याला दाखवलं जातं! विजयेताला या दोघांपैकी कोणाशीच लग्न करण्यात इंट्रेस्ट नसल्याने ती पुन्हा एकदा रोप, फॅन ही ट्रीक वापरुन आत्महत्या करायच्या प्रयत्नात असतानाच राजीवबाळ तिथे टपकतो. "च्यायला ही दरवेळेस लटकायला बघणार आणि मी हिला का वाचवायचं" असं राजीवबाळाने दिग्दर्शकाला नक्कीच विचारलं असणार. या खेपेला पळून न जाता तलवारबाजी करणार्‍या बाप-बेट्याचा फाईटला चिअर-अप करण्यासाठी दोघं एकदम गाणं म्हणायला लागतात.

गाण्याचं वर्णन तर काय करावं.... किशोरकुमारच्या आवाजात 'चक्कू चले तेरे लिए बाजारोंमे' ही पहिली ओळच मला अवाक् करुन गेली होती आणि विजयेताच्या जवानीने दिलवाल्यांच्या दुनियेत जलजला आल्याचं पुढे गाण्यातून सूचित केलेलं पाहून मी पूर्ण गार झालो! विजयेताच्या जवानीने जलजला येणं म्हणजे अळवाचं फदफदं प्यायल्यामुळे जॅक डॅनियल्सची नशा चढण्यासारखं आहे! किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातलं हे गाणं म्हणजे आरडीने पाट्या टाकल्याचा आणखीन एक पुरावा! राजीव कपूरचा डॅन्स म्हणजे शम्मी कपूरची ७१ वी वाईटातली वाईट कॉपी करण्याचा प्रयत्न आहे आणि विजयेताबद्दल तर मी काही बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये! त्यात तिला लग्नाचा सुहागचा जोडा म्हणून हिंदी सिनेमातला अप्सरा स्टँडर्ड ड्रेस दिला आहे. गाण्यात एका कडव्यात आदिवासींच्या अवतारातल्या लोकांच्या पार्श्वभागात राजीवबाळाने बाण मारल्याचा शीनही आपल्याला दाखवला जातो. पुढच्या कडव्यात जंगलातल्या आदिवासींच्या ऐकजी डायरेक्ट कोळी आणलेले आहेत! राजीवबाळ आणि विजयेता यांच्या कोळीनृत्याच्या कल्पनेनेच मला धडकी भरली पण संपूर्ण गाण्यात दोघांचेही कपडे बदललेले नाहीत हे आपलं नशीब!

इकडे धरमपाजी आणि शॉटगन यांची डॅनीला पकडण्यावरुन डायलॉगबाजी सुरु असतानाच डॅनीची टोळी गावावर हल्ला करते. डॅनी मुखिया असलेल्या दुबेजीचा बदला घेण्यासाठी आणि धरमपाजीचा पत्ता विचारायला आलेला आहे. डॅनीचा एक चिल्लर गुंड हॉटेलमधून अनिता राजला पकडून आणतो आणि दोघांना बाहेर येण्याची धमकी देतो. तेवढ्यात राजीवबाळ येऊन त्याचं लक्ष विचलीत करतो. हा अर्थातच त्यांचा प्लॅन आहे हे उघड आहे पण डॅनी या साध्या ट्रिकला फसतो. गोळागोळीत डॅनी दुबेजीला गोळी घालून घेतो. या गोळागोळीतही राजीवबाळ स्वत: कोणालाच गोळी मारत नाही पण त्याचा तो घोडा तुफान ज्या पद्धतीने लाकडं उडवून गुंडांची डोकी सडकवून काढतो, त्यावरुन तो राजीवबाळापेक्षा हुशार असल्याची दिग्दर्शकालाही खात्री असल्याचं सिद्धच होतं. आपले बरेच डाकू मारले गेलेले पाहून डॅनी बग्गीतून सटकतो आणि धरमपाजी घोड्यावरुन त्याच्या मागे लागतात, पण डॅनी सटकण्यात यशस्वी होतो. वैतागलेला धरम परत येताना पाणी पिण्यासाठी नदीवर जातो तो त्याला नदीच्या पाण्यात दिसलेल्या रक्तावरुन जखमी अवस्थेतल्या दळवीबुवांचा ट्रेस लागतो. माणसं मरताना गप मरत नाहीत तर काहीतरी सांगूनच मरतात हा नियम रती अग्निहोत्रीने पाळलेला नसला तरी दळवीबुवा मात्रं पाळतात आणि धरमपाजीला मंदिरात पोहोचण्याचा मार्ग सांगून एक शंख त्याच्याकडे देतात आणि महाशिवरात्रीला तिथे पूजा करण्याचं त्याच्याकडून वचन घेऊन एकदाचे गचकतात.

धरमपाजी दळवीबुवांची चिता रचत असतानाच पुनित इस्सर आपल्या बंजारा टोळीबरोबर तिथे टपकतो. इथे जाणवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे पुनितच्या टोळीतल्या सगळ्यांच्या डोक्यांना त्या बंजारा स्टाईल पट्ट्या बांधलेल्या दिसतात. दळवीबुवानी सोन्याच्या मंदीराचा रस्ता धरमपाजीना सांगितलेला असणार हे पुनित गेस करतो, पण पाजी काही त्याला दाद देत नाहीत. थोडीफार मारामारी झाल्यावर पुनित पाजीना टॉर्चर करायला सुरवात करणार तोच एवढावेळ गायब असलेल्या किमीतै तिथे उगवतात आणि पुनितला सिड्यूस करुन त्याला धरमपाजीना सोडायला लावतात. पाजीना सोन्याच्या देवळाचा पत्ता माहित आहे याची पक्की खात्री असलेल्या किमीतै दुसर्‍या दिवशी थेट हॉटेलमध्ये उगवतात आणि त्याना सिड्यूस करुन फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशीपची ऑफर देतात. धरमला सोन्यात अजिबात इंट्रेस्ट नसल्याने तो तिला अर्थातच वाटेला लावतो. वैतागलेल्या किमीतै शॉटगनला गाठतात आणि धरमपाजींप्रमाणे त्यालाही सिड्यूस करुन सोन्याचं मंदीर शोधण्याची गळ घालतात. भडकलेला शॉटगन तिला हाकलून देतो.

पुणेरी जाहीर मराठीत व्यासपीठावरच्या वक्त्याने दर तिसर्‍या वाक्याला टाळ्या मिळवल्या नाहीत तर तो फाऊल धरला जातो त्याचप्रमाणे मल्टीस्टारर सिनेमात दोन प्रमुख हिरो असतील आणि त्यांची एकही फाईट झाली नाही तर तो फाऊल धरला जातो. हिरोलोक एकमेकाचे दुष्मन असतील तर प्रश्नच मिटला, पण ते एकमेकाचे दोस्त असतील तर दुष्मनी निर्माण करण्याची जबाबदारी व्हिलनवर येऊन पडते. याचं उदाहरण म्हणजे धरम-वीर. इथे किमीतैना हाकलून दिल्यावर वैतागलेला शॉटगन दारु ढोसण्यासाठी धरमपाजींच्या हॉटेलमध्ये जातो तो दारातच आधीच्या सीनमध्ये धरमच्या खिशातून पडलेलं पाकिट आणि त्यातला रती अग्निहोत्रीचा फोटो दिसतो. शॉटगन तो फोटो घेऊन हॉटेलमध्ये शिरतो आणि धरमपाजीकडे चौकशी करतो. पाजीनी हे आपलं पाकिट असल्याचं सांगितल्यावर डायरेक्ट मारामारीला सुरवात! रतीचा फोटो तुझ्याकडे कसा आला, ती तुझी कोण लागते वगैरे चौकशी वगैरे काही नाही. तिरंगातला पहले लात, फिर बात वाला नाना पाटेकर त्याचा आदर्श असावा. दोघांची पुरेशी मारामारी झाल्यावर शॉटगनचं लॉकेट धरमच्या हाती लागल्यावर दोघं मेव्हणे असल्याचं क्लीअर होतं. आता हेच आधीही करता आलं असतं, पण वर सांगितलेला नियम पूर्ण करण्यासाठी ही मारामारी केली जाते. रती अग्निहोत्री गचकल्याचं कळल्यावर शॉट्गनने "आता मला भैय्या कोण म्हणणार?" असं विचारल्याबरोबर मी म्हणेन म्हणायला अनिता राज लगेच हजर! थोडक्यात रती अग्निहोत्रीची रिप्लेसमेंट म्हणून हिला धरमपाजींच्या गळ्यात मारली जाणार हे जवळपास कन्फर्म होतं.

धरमपाजीना अनिता राजमध्ये अजिबात इंट्रेस्ट नसल्याने तो गाव सोडून जायला निघतो. तो स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असतानाच पर्फेक्ट टायमिंग साधून अनिता राज स्टेशनवर येते. इथे कंटीन्यूटीतला एक जाणवण्यासारखा जर्क आहे. अनिता राजच्या एंट्रीपासून आधीच्या सीनपर्यंत तिचे केस बॉबकट केलेले आहेत आणि ती कायम फ्रॉकमध्ये वावरत असते, पण या सीनमध्ये मात्रं ती लांबसडक झिपर्‍या घेऊन आणि गुलाबी साडी नेसून स्टेशनवर आलेली आहे! तिला बघून धरमपाजीना रती अग्निहोत्रीची आठवण व्हावी हा त्यातला हेतू शेंबडं पोरही ओळखेल. धरमपाजीही तिला बघून पाघळतात आणि गांव छोडके जाना कॅन्सल! ट्रेन गेल्यावर लगेच अनुराधा पौडवाल बाईंच्या आवाजात होळीचं गाणं सुरु! या सीनच्या आधी डॅनीला होली कब है, कब है होली, कब? असं विचारण्याचा सिन घातला असता तर शोलेचा फील तरी आला असता असं मला उगाच आपलं वाटलं.

रती अग्निहोत्रीचा अपवाद वगळता प्रत्येक हिरॉईनला एक तरी गाणं देण्याचं कॉन्ट्रॅक्ट असावं त्यामुळे या गाण्यात अनिताबाई केसांचा लांब शेपटा उडवत साडीत भिजून आणि नाचून घेतात. धरमपाजींचा डॅन्सच्या बाबतीत आनंदी आनंदच असल्याने नाचताना एकटं वाटू नये म्हणून तिच्या जोडीला राजीवबाळ आणि विजयेता हे लिंबूटिंबूही दिले आहेत. राजीवबाळाचा डॅन्स म्हणजे शम्मी कपूरच्या गोविंदा आला रे गाण्याची नक्कल करत लोळणं किंवा विजयेताला पाठीवर बसवून आपण गाढव आहोत हे दाखवत फिरणं इतकंच! विजयेताला शोलेतल्या होळीच्या गाण्यातला हेमा मालिनीचा गेटप दिलेला आहे. त्यांना बघून अचानक नाचायची सुरसुरी आलेला शॉटगनही आपली हौस पूर्ण करुन घेतो. आता हे सगळं कमी म्हणून की काय जगदीपही तिथे प्रगटतो आणि आपला आचरटपणा करुन घेतो. तरी शॉटगनच्या खयालोंमें किमीतैना गाण्यात नाचायला आणलं नाही हे आपलं नशीबच म्हणायचं!

होळीच्या गाण्यात लांब केस आणि साडीची हौस भागवून घेतलेली अनिता राज पुढच्याच सीनमध्ये परत आपल्या बॉबकट आणि फ्रॉक या ट्रेडमार्क युनिफॉर्ममध्ये दिसते आणि कंटीन्यूटीचा पुन्हा एकदा खून पाडला जातो. गुलशन ग्रोव्हर आणि डॅन धनोआ तिला किडनॅप करुन नेतात आणि जाताजाता ललिता पवारला गोळी घालून जातात. इथे ललिताबाई कळा काढत जी काही डायलॉग डिलेव्हरी करतात ती निव्वळ अवर्णनीय आहे. धरमपाजीना अनिताला पळवून नेल्याचं शुभवर्तमान सांगून मरताना गप मरायचं नाही हा नियम पूर्ण करतात आणि वर धरमकडून अनिता राजला वाचवण्याचं वचन घेतल्यावरच एकदाच्या गचकतात. राजीवबाळ स्वत:ला धरमपाजींच्या गळ्यात मारुन त्याच्याबरोबर जायला बघतो, पण धरमपाजी या लिंबूटिंबूला खोलीत बंद करुन निघून जातात. आपला घोडा आपल्यापेक्षा हुशार असल्याचं एव्हाना राजीवबाळालाही मान्य झालेलं असतं त्यामुळे तो त्याला पाजींच्या मागे सोडतो.

डॅनीच्या अड्ड्यावर धरमकडचं भगवदगीतेचं पुस्तक डॅनीला मिळतं आणि धरमपाजीनी त्यात तुझी मौत आहे हे सांगितल्यावरही वाचता येत नसल्याने तो ते उघडून बघत नाही त्यामुळे पाजींनी आत दडवलेलं रिव्हॉल्वर आणि सोन्याची गोळी काही त्याला मिळत नाही. 'वाचाल तर वाचाल' हा सटल मेसेज यातून दिलेला आहे. पण तो हौसेने ते स्वत:कडे ठेवून घेतो. त्याची एकच मागणी असते ती म्हणजे सोन्याच्या मंदीराचा रस्ता. डॅनीच्या अड्ड्यावर किमीतै हजर असल्याने धरमपाजीना तो रस्ता माहित असल्याची पीन त्याला किमीतैनी मारलेली आहे हे कळून येतं. हे सगळं राजीवबाळाचा हुशार घोडा बघून येतो. शॉटगन आणि राजीवबाळ त्याच्या मागे जायला निघतात तेव्हा विजयेता मी पण येणार असा हट्ट करते तेव्हा शॉटगनच्या चेहर्‍यावर इतकं रिकाम डोकं असलेली गर्लफ्रेंड घेऊन कशाला फिरतो असे भाव स्पष्टपणे वाचता येतात.

डॅनीची टोळी रात्रीच्या मुक्कामाला थांबलेली असतानाच शॉटगन राजीवबाळ आणि विजयेता यांच्यासह त्यांना जॉईन होण्याची डॅनीला ऑफर देतो. पोलीसांची भीती घालून तो डॅनीला पटवतो पण दोघांचाही एकमेकावर विश्वास नसल्याने बंदूका डॅनीकडे तर गोळ्या हिरो लोकांकडे असं अफलातून डील केलं जातं. इथे राजीवबाळ रायफल छत्रीसारखी टाकून उभा आहे तर विजयेता हातात गिटार घेतल्याच्या अत्यंत विनोदी पोझमध्ये बंदूक घेऊन उभी आहे. डॅनीच्या टोळीत किमीतैना पाहिल्यावर तिनेच डॅनीला धरमपाजींच्या मागे सोडलेलं असणार हा अंदाज शॉटगनला येतो.

डॅनी, धरम आणि कंपनी दळवीबुवांनी सांगितलेल्या चंडी घाटीच्या मार्गावर असताना त्याना वाटेत दोराचा पूल लागतो. घोड्यांसह हा पूल पार करणं धोकादायक आहे हे धरमपाजीनी वॉर्न करुनही डॅनी पूल पार करण्याचा हट्ट धरतोच. पुलावरुन जाताना पाजींचा घोडा उधळल्याने ते पुलाच्या एका दोरीला पकडून लटकतात. पाजी पडले तर सोन्याचं मंदीर बोंबबलं याची कल्पना असल्याने डॅनी त्याला वाचवायला धावतो आणि यथावकाश वर खेचून घेतो. त्यापेक्षा धरमपाजीनी त्यालाच खाली खेचून दरीत का फेकलं असतं तर सिनेमा लवकर आटपला तरी असता, पण मग क्लायमॅक्सच्या गमतीजमती आपल्याला दाखवता आल्या नसत्या त्यामुळे पाजी गुपचूप वर येतात. पण वर आल्यावर तेवढ्यात चान्स घेऊन डॅनीला एक भडकवून देतात. एव्हाना सत्येन कप्पू आणि पोलीस कंपनीला यांचा पत्ता लागल्याने ते यांच्या मागावर येतात, पण पूल ओलांडून गेल्यावर डॅनी पुलाचा दोर तोडून टाकतो आणि 'झपाटाSS' करुन ओरडतो आणि कप्पूकाका हात चोळत बसतात.

सिनेमा सुरु झाल्यापासून दोन तास होत आले तरी अद्यापही एकही बलात्कार न झाल्याने एव्हाना जागा झालेला दिग्दर्शक हा पॉईंटदेखिल स्कोअर करायचा राहू नये याची काळजी घेतो. रात्रीच्या मुक्कामाला पोहोचल्यावर गुलशन ग्रोव्हर आपल्या दोन माणसांकरवी विजयेताला उचलतो आणि व्हिलनचं आद्यकर्तव्य पार पाडण्याची तयारी करतो. विजयेताला गोळ्या उचलताना पाहून गुलशन ग्रोवर तिच्याकडे ज्या नजरेने बघतो त्यावरुन ही जबाबदारी त्याच्यावर आलेली आहे हे आधीच्या सीनमध्ये फोरशॅडोइंग केलं आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या बायकांपैकी अनिता राज ही धरमपाजींची आणि किमीतै शॉटगनची हिरॉईन असल्याने त्यांच्यावर हात टाकल्यास मार खाण्याची प्रोबॅबलिटी बरीच जास्त आहे, राजीवबाळ तसा लिंबूटिंबू असल्याने विजयेता ही गुलशनसाठी तुलनात्मक दृष्ट्या सेफ बेट आहे. गुलशन आणि विजयेता झोंबाझोंबी करत असतानाच राजीवबाळ आणि शॉटगन येतात आणि अर्थातच मारामारीला सुरवात होते. एव्हाना सगळा प्रकार लक्षात आलेला डॅनी गुलशनला त्यांना खतम करायची ऑर्डर देतो पण तेवढ्यात पाजी मध्ये पडतात आणि डॅनीला ब्लॅकमेल करुन त्यांना सोडायला लावतात. दगडाखाली हात अडकलेला डॅनी झक् मारत ते मान्य करतो. दरम्यान किमीतै आपली इमोशनल स्टोरी शॉटगनला सांगून पॅचअप करतात.

चंडी घाटीकडे निघालेल्या डॅनी आणि कंपनीला पुढे पुनीत इस्सरचे बंजारे आडवे येतात आणि किमीतै आणि धरमपाजीना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करतात. पुनीत आणि बंजार्‍यांना निपटणं महत्वाचं असल्याने हिरो आणि व्हिलनमंडळी बंदुका आणि गोळ्यांची अदलाबदली करतात आणि पुनित आणि त्याच्या बंजारा टोळीला उडवतात. पण या भानगडीत डॅनीला उडवायचा हिरोंचा प्लॅन फसतो आणि सगळा गेम त्याच्या हाती येतो. अखेर सर्वजण एकदाचे मूळ मॅकेनाज गोल्डमधल्या शेकींग रॉकचा काऊंटरपार्ट असलेल्या दळवीबुवांनी सांगितलेल्या शेषनाग की चट्टान पाशी पोहोचतात. ही शेषनाग की चट्टान म्हणजे अक्षरश: नागाच्या फण्यासारखा उभाच्या उभा सुळका जमिनीतून उगवल्यासारखा दाखवलेला पाहून हसू आवरत नाही. हा सुळकाच शेषनाग की चट्टान आहे हे ठसवण्यासाठी त्यावर दोन डोळ्यांसारखी भोकंही आहेत. दुसर्‍या दिवशी महाशिवरात्र असल्याने रात्री तिथेच थांबण्यापलीकडे पर्याय नाही हे धरमपाजी डॅनीच्या गळी उतरवतात. इथून पुढची तब्बल पंचवीस-तीस मिनिटं क्लायमॅक्स आहे आणि आतापर्यंत काहीच नाही इतक्या गमतीजमती पुढे आहेत.

पुढच्या सीनमध्ये सकाळी उजाडल्याचा सीन दिसतो. धर्मेंद्रची शंख फुकण्याची शैली वेगवेगळ्या ठिकाणी समारंभात शंख फुंकणार्‍यांनी विशेष अभ्यासण्यासारखी आहे. वाढदिवसाला फुगे फुगवताना लहान मुलं जशी तोंडाने फुग्यात हवा भरतात त्या स्टाईलने धर्मेंद्र शंख फुंकतो. असा शंख फुंकलेला पाहून साक्षात शंकराने तोच शंख त्याच्या डोक्यात हाणला नाही हे नशीब! दिग्दर्शकाच्या मते मात्रं धरमपाजींच्या शंख फुंकण्यात भलतीच ताकद आहे, कारण त्यानंतर शेषनागाच्या सुळक्याच्या मागे असलेल्या कड्याच्या टोकावर गुलाबी, पिवळ्या, निळ्या अशा वेगवेगळ्या रंगाचे डिस्कोलाईट वापरुन हा दैवी प्रकाश असल्याचं आपल्याला सांगितलं जातं. इतकंच पुरेसं नाही म्हणून त्या सुळक्याची सावली पुढे पुढे धावायला लागते. सावलीचा पुढे सरकण्याचा वेग हा घोड्याच्या वेगाशी मिळताजुळता आहे एवढंच ती दैवी सावली आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे. हा सीन सरळसरळ ओरीजनल मॅकेनाज गोल्डवरुन उचललेला आहे. एक लांबलचक मैदान संपूर्ण ओलांडून गेल्यावर अखेर त्या सावलीच्या दोन्ही डोळ्यांमधून निघणार्‍या प्रकाशाच्या दोन रेषा अंधार छेदून जातात आणि समोरच्या डोंगरात एक भुयार तयार होतं! हे भुयारही इतकं मोठं की घोड्यावर बसून त्यातून जाता येतं! या सिनेमानंतर दोनच वर्षांनी आलेल्या शेषनागमधला अघोरी असता, तर त्याने "जय त्रिकालदेव" अशी आरोळी नक्कीच ठोकली असती! सोन्याचं शिवमंदीर दृष्टीस पडल्यावर हुरळलेले डॅनी, गुलशन ग्रोव्हर आणि कंपनी त्या दिशेने दौडत सुटतात. त्यांच्याबरोबर अनिता राजलाही त्या दिशेने दौडताना पाहून 'च्यायला हिने पार्टी बदलली की काय' असा शॉक बसलेले धर्मेंद्र, शॉटगन आणि राजीवबाळ तिघंही एकदम शॉक होतात. हिंदी सिनेमाच्या स्ट्यांडर्डप्रमाणे ललिताबाईना वचन दिलेलं असल्याने आणि बदला घेणं कंपल्सरी असल्याने झक् मारत तिघांनाही डॅनी आणि कंपनीच्या मागोमाग सोन्याच्या मंदीरापर्यंत जाणं भाग पडतं.

हिंदी सिनेमात इतर कुठेही शिवलींग असलेलं चालतं, पण क्लायमॅक्सला जर व्हिलनचा शंकराकडून नाश होणार असेल तर तिथे शंकराची मूर्तीच असली पाहिजे असा नियम आहे. खासकरुन रामसे बंधूंच्या हॉरर सिनेमात सैतान किंवा भूत यांना शंकराच्या मंदीरात आणलं जातं तिथे तर हमखास शिवमूर्तीच असते. इथे सोन्याचं शिवमंदीर हेच फायनल डेस्टीनेशन असल्याने शिवलींग आणि त्यामागे शिवमूर्ती असं अभूतपूर्व डबल कॉम्बिनेशन आहे. एवढंच नाही तर एका कोपर्‍यात बसलेले दोन नागही हजर आहेत! हे नाग इच्छाधारी असतील आणि आयत्यावेळेस मानवी रुप धारण करुन धरम आणि कंपनील मारामारीत मदत करतील अशी शंका मला आली. सोन्याचं मंदीर पाहिल्यावर डॅनी आणि कंपनीने खेळण्याच्या दुकानात गेल्यावर लहान मुलांच्या चेहर्‍यावर जसे भाव उमटतात अगदी तसे भाव दाखवले आहेत. सोन्याचे आणि हिर्‍यामोत्याचे दागिने, सोन्याच्या चीपा म्हणून दाखवलेले दागिने नकली आहेत हे लहान पोरसुद्धा ओळखू शकेल. गुलशन ग्रोव्हरने एक पेटी उघडल्यावर आत सोन्याची नाणी दिसतात ती नाणी तर सोनेरी रंगाचा कागद गुंडाळलेली कॅडबरीची चॉकलेट्स येतात ती चॉकलेट्स आहेत हे सहज ओळखता येतं. डॅनी आणि कंपनीला सोनं उधळताना पाहून तिथे पोहोचलेल्या किमीतै दसरा असल्यासारख्या सोनं लुटायला धावतात तेव्हा शॉटगनच्या चेहर्‍यावर वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये बॉब विलीसला पाच फोर मारल्यावर संदीप पाटीलच्या चेहर्‍यावर जे 'हा अजून सुधारला नाही' भाव उमटले होते अगदी तसेच एक्स्प्रेशन्स दिसतात.

डॅनी आणि कंपनी सोन्यात मश्गूल असतानाच महाशिवरात्रीला शिवमंदीरात पूजा करायची अशी दळवीबुवांनी दिलेली सूचना धरमपाजींना आठवते. त्याप्रमाणे पाजी, शॉटगन आणि राजीवबाळ पुढे सरसावतात. एव्हाना साक्षात शंकरालाही कधी एकदा हे सगळं आटपतंय असं झालं असावं, कारण जोराचा वारा वाहू लागतो, घंटा जोरजोराने वाजू लागतात, हॉरर सिनेमात रात्री दिसतो तसा धूर दिसतो आणि तिघांसमोरच्या पूजेच्या रिकाम्या थाळ्यांमध्ये झेंडूची फुलं प्रगट होतात! 'काय करायचीय ती पूजा करा आणि एकदा टळा इथून' असे भाव शिवमूर्तीच्या चेहर्‍यावर दिसतात. आपणच का मागे राहायचं म्हणून अनिता राज आणि विजयेतापण त्यांना जॉईन होतात. शंकराच्या कृपेने फुलांबरोबर तीन कमंडलूही पाणी भरुन अभिषेकासाठी तिथे प्रगट झालेले आहेत. हे सगळं कमी आहे म्हणून शंकराला प्रसन्न करुन घेण्यासाठी तिघांमध्ये गाण्याचा उत्साह संचारतो - मर जाएंगे हम या तो पापी को मार देंगे! सुरवातीला दाखवलेले दोन नागही रडणार्‍याच्या गळ्यातून एखादी चांगली जागा गेली की म्हैस मान हलवते तितक्याच लक्षपूर्व्क गाणं ऐकताना दिसतात. महाशिवरात्र असल्याने शंकराला दुधाचा अभिषेक दाखवला पाहिजे हा क्लू घेऊन देवळाबाहेर असलेल्या हौदाच्या पाण्यात दूध प्रगट होतं. 'काय हवं ते देतो पण एकदा आटपा' या भावनेने साक्षात शंकरानेच पाण्याचं दूध केलं असणार यात शंका नाही. पाण्याचं दूध होण्याची प्रोसेस पाहताना धर्मेंद्रचे एक्प्रेशन्स बघण्यासारखे आहेत. माझ्याकडेही कधी असं बघितलं नाही असं हेमामालिनी म्हणाली असणार. आयत्याच तयार झालेल्या दुधाने रीतसर अभिषेक केला जातो. एव्हाना दोन नागांपैकी एकाचा गाणं ऐकण्याचा पेशन्स संपतो आणि त्याने घंटा वाजवून 'आवरा' असं इंडीकेशन दिल्याने गाणं संपतं.

हिरो लोकांचं गाणं आटपपेपर्यंत सोन्याच्या पॅकींगमध्ये बिझी असलेला डॅनी आता त्यांना खतम करण्याचा इरादा जाहीर करतो. पण त्यापूर्वी किमीतै एक पिशवीभरुन सोनं जमा करुन घेऊन येत असलेल्या आपल्याला दिसतात. गुलशन ग्रोवर तिची पिशवी उडवतो तेव्हा ती वैतागते. धर्मेंद्रला सोन्याच्या मंदीराचा पत्ता माहित आहे हे मी सांगितलं म्हणून मला हिस्सा पाहिजे असं तिचं आर्ग्युमेंट आहे. डॅनी ते मान्य करतो आणि तिला काऊंटर ऑफर देतो. त्याची नेमकी ऑफर काय आहे हे ऐकायला एक नाग किमीतैंपेक्षाही उत्सुक असलेला दिसतो. जोपर्यंत शॉटगन मार खाऊ शकेल तोपर्यंत जमेल तेवढं सोन भरुन घे अशी डॅनीची ऑफर आहे. ही ऑफर ऐकल्यावर किमीतै शॉटगनला "खा ना रे मार, माझ्यासाठी, प्लीजजज..." असा एकदम सिडक्टीव्ह लूक देतात. असली हावरट गर्लफ्रेंड असल्यापेक्षा नसलेली बरी असं धरमपाजी शॉटगनला बजावतातही, पण शॉटगन मार खायला तयार होतो. त्याचा थोडाफार मार खाऊन झाल्यावर किमीतैना उपरती होते आणि त्या सोनं सोडून शॉटगनकडे धावतात आणि बरोबर त्या समेवर मधूने सुबक ठेंगणीकडे पाहवं तशी गुलशन ग्रोव्हर तिला गोळी घालतो. इथे त्या दोन नागांचा आवरा यार, काय चाललंय अशा नजरेने शंकराच्या पिंडीकडे बघतानाचा एक अफलातून शॉट आहे. शॉटगनच्या जागी मी असतो तर 'एवढं करुन सोनं फेकून दिलंस तर मला फुकटचा मार कशाला खायला लावलास' असं नक्कीच विचारलं असतं. एक दोन इमोशनल डायलॉग मारुन किमीतै एकदाच्या गचकतात.

आधीच मार खायला लावला आणि त्यात स्वत:पण गचकली यामुळे वैतागलेला शॉटगन गुलशन ग्रोव्हरला खलास करणार असं डिक्लेअर करतो. गुलशन थंडपणे त्याला गोळी घालतो. इथे एक अफलातून प्रकार बघायला मिळतो. शॉटगनला गोळी लागल्यावर त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेल्या दगडातून माती गळायला लागते. बहुतेक शॉटगन हा कसा दगड आहे हे त्यातून सूचित करायचं असावं. शेषनागच्या क्लायमॅक्समध्ये इच्छाधारी नाग असलेले जितेंद्र आणि माधवी शंकराच्या पिंडीवर डोकं आपटतात. इथे बजेट वाढल्याने आणखीन दोन कलाकार किंवा एक्स्ट्रा दाखवणं परवडलं नसावं त्यामुळे हे दोन्ही नाग मानवी रुपात न येता नागरुपातच पिंडीवर आपलं डोकं आपटतात पण प्रत्यक्षात ते शिवलींगाला दंश करत आहेत असं दिसतं. शॉटगनला लागलेल्या पहिल्या गोळीनंतर ज्या दगडातून माती गळायला लागली आहे तो दगड दुसर्‍या गोळीनंतर जोरात हलतो. पहिल्या गोळीनंतर एकदा डोकं आपटूनही शंकराला दया येत नाही म्हणून दुसर्‍या गोळीनंतर नागांना दोनदा डोकं आपटावं लागतं. शॉटगनला तिसरी गोळी लागल्यावर दगड पुन्हा एकदा डुगडूगतो. एव्हाना त्या दगडाला मधोमध आडवी चीर गेल्यासारखी तीन-चार ठिकाणाहून माती गळायला लागलेली आहे. शॉटगनसारख्या दगडावर आपटून गोळ्या खर्‍या दगडाला लागल्याने हा परिणाम झालेला असावा. शॉटगनला चौथी गोळी लागल्यावर मात्रं दगडाचाही पेशन्स संपल्यामुळे तो दुभंगतो आणि शॉटगन आणि दगड एकदमच खाली पडतात.

शॉटगन खाली पडल्यावर एव्हाना नागांच्या डसण्यामुळे वैतागलेले शिवशंकर आपली ताकद दाखवायचं अखेर मनावर घेतात. हे दर्शवण्यासाठी देवळातल्या घंटा जोरजोरात वाजायला लागतात. मध्येच वीज चमकते आणि शंकराच्या मूर्तीसमोरचा त्रिशूळ उडून शॉटगनच्या समोर येऊन जमिनीत रुततो! या धक्क्यातून आपण बाहेर येण्यापूर्वीच शॉटगन उठून बसतो आणि बसल्याबसल्याच त्रिशूळ फेकून गुलशनचा गेम करतो. नीरज यादवच्या ऐवजी यालाच ऑलींपिकला का नाही पाठवला एक तो शंकरच जाणे! हा क्लू घेऊन अखेरची मारामारी सुरु होते. क्लायमॅक्सला व्हिलन लोकांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी हिरोला एकही गोळी लागत नाही हे त्रिकालाबाधीत सत्य पुन्हा एकदा आपल्यापुढे मांडलं जातं. राजीवबाळाच्या बुटांना स्प्रिंग बसवलेली असावी किंवा हे बूट त्याने मिथुनदांकडून उधार आणलेले असावेत कारण एका शॉटमध्ये बेडूकउडीच्या पोझमध्ये मागे उडी मारताना दाखवला आहे. एव्हाना शिवलींगावर डोकं आपटून किंवा दंश करुन शिवशंकराला जागृत करण्याचं कान आटपलं असल्याने दोन्ही नाग डॅनीच्या टोळीतल्या लोकांना डसायच्या कामाला लागतात. आम्हीतरी का मागे राहायचं म्हणून अनिता राज आणि विजयेता पण गोळ्या झाडल्याचा आव आणतात. त्या हिरोपार्टीतल्या असल्याने त्यांनी बंदूक रोखून ट्रिगर दाबल्याची अ‍ॅक्शन केली की व्हिलन लोकांनी मेलंच पाहिजे, तिथे अपील नाही. एव्हाना यांच्या गोळागोळीमुळे दगड कोसळायला सुरवात झालेली असते. दरम्यान डॅन धनोआचा गळा आवळून धरमपाजी त्याचा गेम करतात. आता एकटा डॅनीच तेवढा बाकी आहे. तो आपलं जमा केलेलं सोनं घेऊन घोड्यावरुन पळ काढायला बघतो. राजीवबाळ त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो लिंबूटिंबू असल्याने डॅनी त्याला सहज बाजूला करतो आणि गुहेच्या दिशेला दौडत सुटतो.

आपण त्रिशूळ दिला, नाग पाठवले पण इतकं सगळं करुनही या तिघांच्याने काही होत नाही हे लक्षात आल्यामुळे साक्षात शंकरालाच आता पुढे येण्यावाचून इलाज उरत नाही. शंकराची मूर्ती शिवलींगासह मंदीराचा कळस फोडून बाहेर येते आणि हे दृष्य याची देही याची डोळा पाहून मी धन्य होतो! शिवमूर्ती आपला तिसरा डोळा उघडते. इथेच शंकराने तिसरा डोळा उघडला तर सर्व जग भस्मभात होईल हे आपण लहानपणापासून वाचत आलेलं वचन चुकीचं असल्याचं चाखवलं जातं कारण तसं झालं तर हिरो लोकही मारले जातील आणि तसं तर करुन चालणार नाही. त्यामुळे शंकराच्या तिसर्‍या डोळ्यातून फक्त एक लेसरबीम निघतो आणि घोड्यावरुन पळून चाललेल्या डॅनीच्या बरोबर समोरच्या दगडावर आदळतो! लेसरबीमच्या या एकाच शॉटमुळे डॅनी थेट पुन्हा देवळाच्या समोर येऊन पडतो आणि धरमपाजींनी रिव्हॉल्वर आणि सोन्याची गोळी दडवलेली असते ती डॅनीच्या पट्ट्याला खोचलेली भगवदगीता अचूकपणे धरमपाजींच्या हाती येते! जय शिवशंभो!

आता धरममाजी आणि डॅनी यांची फायनल फाईट सुरू होते. धरम डॅनीला त्याच हौदात फेकतो. शंकराला अभिषेक झाल्यावर हौदातल्या दुधाचं पुन्हा पाणी झालेलं आहेत. हौदातल्या डॅनीवर धरमपाजी सोन्याच्या मोहरा, दागिने फेकतात आणि त्याला छातीपर्यंत बुडवतात. "तू माझा हिरो असूनही सोन्याने मढवून काढलं नाहीस पण तो धरम बघ व्हिलन असून डॅनीला सोन्यात बुडवतोय!" असं किमीतै नक्कीच शॉटगनला म्हणाल्या असणार. डॅनीला भरपूर सोनं घालून झाल्यावर अखेर एकदाचे धरमपाजी त्याला सोन्याची गोळी घालतात. लगेच आपल्या तिसर्‍या डोळ्यातून लेसरबीम फेकून शिवमूर्ती डॅनीच्या मृतदेहाचा स्फोट करुन टाकते. उगाच गोळी लागूनही वाचला तर कोणी सिक्वेल बनवेल ही साक्षात शंकरालाही भीती वाटली असावी!

सोनासिंगचा सोनेरी अवतार संपल्यानंतरही सगळ्यांनी मिळून आतापर्यंत मांडलेला छळवाद असह्य झालेली ती शिवमूर्ती आपल्या तिसर्‍या डोळ्यातून लेसरबीम सोडून सगळीकडचे दगड पाडत सुटते! 'पुन्हा माझं मंदीर नको, यांचं गाणं सहन करायला नको आणि नागांकडून दंश करुन घ्यायला नको!' लेसरबीमच्या करामतीमुळे सगळीकडचे कडे कोसळायला लागतात आणि भूकंपाला सुरवात होते. शॉटगन धरमपाजी आणि इतरांना निघून आपला जीव वाचवायला सांगतो, पण ऐकतील तर ते धरमपाजी कसले. शॉटगनला घोड्यावर घालून सगळे धूम ठोकतात. आता काही हे लोक आपल्याला छळायला परत येणार नाहीत याची पक्की खात्री झाल्याने शिवमूर्ती आणि शिवलींग दोन्ही अदृष्य होतं. सगळ्यांना पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यावर आणि पुरेसे दगड कोसळल्यावर अखेरीस जमिन खचून शिवमंदीरही गडप होतं. शिवमंदीर जमिनीत गाडलं गेल्यावर अ‍ॅटीकचं ट्रॅपडोअर बंद व्हावं तसा एक दगड ती गॅप बंद करताना पाहून मी पुन्हा एकदा धन्य झालो! इकडे धरमपाजी आणि कंपनी गुहेतून बाहेर पडून सुरक्षित अंतरावर पोहोचल्यावर अखेर तो शेषनागाच्या फण्यासारखा सुळकाही कोसळून एकदाचा उध्वस्त होतो. एवढ्या सगळ्या रॉकफॉलमधून बाहेर आणल्यानंतरही शेवटच्या शॉटमध्ये शॉटगन मेलेला पाहून त्याला वाहून आणणार्‍या घोड्याची मला दया आली. बिचार्‍याची मेहनत फुकट वाया!

या सिनेमात काम करताना शिवशंकराचे इतके चमत्कार अनुभवल्याने उपरती होऊन डॅनी शिवभक्त झाला आणि म्हणूनच दोन वर्षांनी आलेल्या शेषनागमध्ये त्याने अघोरीचा रोल केला असावा अशी दाट शक्यता आहे! जय त्रिकालदेव!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2021 - 9:48 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या पेशन्स ला पुन्हा एकदा सलाम. असले सिनेमा काढायला धाडस लागते आणि ते पहायला ही धाडसच लागते.

ललिता पवारांवर केलेल्या टिपण्णी बाबत मात्र असहमत, त्यांनी अनेक सिनेमात चांगल्या स्त्रीचे रोल सुध्दा केलेले आहेत. पण त्यांचा सर्वात जास्त लक्षात राहिलेला रोल "बाँबे टु गोवा" मधला आहे.

आता पुढची सुपारी कोणाची?

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

13 Dec 2021 - 11:44 am | तुषार काळभोर

आनंद - मॅट्रन डि'सा

अनुस्वार's picture

14 Dec 2021 - 11:33 pm | अनुस्वार

खूप छान निभावली आहे ती भूमिका.

सिनेमा पहिला नसताच, लेख मात्र पूर्ण वाचला.
खूप हसलो. और आने दो बॉस :-)

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 11:39 am | मुक्त विहारि

दंडवत

king_of_net's picture

13 Dec 2021 - 12:20 pm | king_of_net

हा हा हा!!!
मस्तच!!

कपिलमुनी's picture

13 Dec 2021 - 12:29 pm | कपिलमुनी

फक्त नीरज यादव नव्हे नीरज चोप्रा हवे

मुजरा स्वीकारा स्पार्टाकस मालक.. _/\__/\_
पूर्ण वाचून झालं..! हा लेख म्हणजे एक उत्तम साहित्यिक ऐवज आहे .. ! लय हसलो..! तुम्ही तर ठिकठिकाणी बारूदच पेरून ठेवले आहेत...
सगळे पंचेस आवडले.. काही फारच आवडले.. उदाहरणार्थ

मंदीरात गेलास तर 'जलजला येईल' अशी भिती घालू बघतात, पण आईने त्याला लहानपणी 'बुवा येईल' अशी खोटी भिती दाखवून घाबरवलेलं असल्याने आणि नंतर बुवा वगैरे काही येत नाही हे अनुभवाने माहित असल्याने..

आपल्या स्टेटसला साजेशी मोठी गाडी न आणल्याचा डॅनीला राग येतो आणि तो तसं बोलूनही दाखवतो..

लग्नामध्ये मला अंगभर सोन्याने मढवून काढायचं अशी त्यांची अगदी क्लीअर प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन आहे..

इथे गुलशन ग्रोवर किंवा शक्ती कपूर असते तर त्यांनी विजयेताला साडी सोडायला सक्रीय मदत केली असती.

:-) :-)

पिच्चरचे पो.मा. अजुन पूर्ण वाचून झालेले नाही, तरी एवढी उत्सुकता दाटली की आधी बघून घ्यावा म्हणून यूट्यूबीवर सर्चिता मिळाला नाही. कुठे मिळेल ?

त्याचं खरं नाव झलझला आहे. त्या नावाने शोधा, मिळेल
:)

बाकी लेख आवडला हेवेंसांनलगे..

सोत्रि's picture

14 Dec 2021 - 6:08 am | सोत्रि

https://youtu.be/tyZwEPgQOVY

- (स्पार्टाकस फॅन) सोकाजी

सोत्रि's picture

14 Dec 2021 - 6:23 am | सोत्रि

https://www.zee5.com/global/movies/details/zalzala/0-0-zalzala

वरची युट्यूब लिंक उपयोगी नाही, झी५ च्या लिंकवर सिनेमा दिसतोय.

-(धांदरट) सोकाजी

रंगीला रतन's picture

13 Dec 2021 - 2:11 pm | रंगीला रतन

झपाटाSS
भारीच एकदम :=)

आंद्रे वडापाव's picture

13 Dec 2021 - 3:53 pm | आंद्रे वडापाव

लेख मस्तच !

पण आता काय झालंय, की आता पिक्चर शोधून पाहावा लागणार , आणि परत येऊन हा लेख वाचावा लागणार ... मला ...

नि३सोलपुरकर's picture

13 Dec 2021 - 4:43 pm | नि३सोलपुरकर

मॅकेनाज गोल्ड = मकाण्णाचे सोने ..

बस यही काफी है ._/\_

बाकी लेख आवडला हेवेंसांनलगे.

बबन ताम्बे's picture

13 Dec 2021 - 5:10 pm | बबन ताम्बे

टायटल आवडले :-)
आणि लेख तर झकासच . जबरदस्त विनोदी. असेच मनमोहन देसाई यांच्या चित्रपटांबद्द्ल खुस्खुशित लेख येउ द्या. भरपूर मसाला आहे.कदाचित तुम्ही लिहिलेहि असेल. डायरेक्ट सप्लाय टु लाईन (अमर अक्बर अंथिनी तील निरुपा रॉयला तिच्या तिन्ही पुत्रांना तिन नळ्या जोडुन डायरेक्ट रक्त देणे वगैरे) :-)

विजुभाऊ's picture

13 Dec 2021 - 6:32 pm | विजुभाऊ

तुमच्या पेशन्स ला सलाम.
आणि त्याही पेक्षा मोठ्ठा सलाम तुमच्या लेखणीला.
न कंटाळता तीने डोक्यातला वैत्ताग इथे आणून ओतला म्हणून.
मस्त मजा आली साहेब

चौकस२१२'s picture

14 Dec 2021 - 7:33 am | चौकस२१२

यापुढे असली मापं काढतांना हसून हसून पोट दुखल्यावर कोणते औषध घ्यायचे ते पण लिवा ..

स्क्रोल करुन बोट दुखले ! मधे मधे वाचले... पूर्ण वाचण्याचा संयम नाही बाँ. :)

मॅकेनाज गोल्ड = मकाण्णाचे सोने ..
च्यामारी हे समजलेच नव्हते ! मॅकेनाज गोल्ड बालपणी पाहिला होता आणि आता परत पाहणार आहे. [ डाऊनलोड मारुन ठेवला आहे. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video

रंगीला रतन's picture

14 Dec 2021 - 9:46 pm | रंगीला रतन

हल्ली तुमचे प्रतिसाद वाचून वय सरकल्याचे वाटू लागलंय :=) ६०+ का साहेब?
कृ.ह.घ्या.

हल्ली तुमचे प्रतिसाद वाचून वय सरकल्याचे वाटू लागलंय :=)
नक्की कसे आणि कोणत्या पद्धतीने प्रतिसाद दिल्यास वय कमी झाल्याचे भासेल किंवा भासवता येइल ते सांगा ! :))) खवा-मावा टाईप प्रतिसाद सुद्धा देउन झाले आहेत. [ अगदी फोटो सकट ] :)))

कृ.ह.घ्या.
अर्थातच... :) वय कमी झालेला मनुष्य प्राणी माझ्या अजुन तरी पाहण्यात आलेला नाही. :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jhimma - Title Song

नीलस्वप्निल's picture

15 Dec 2021 - 11:48 am | नीलस्वप्निल

राजीवबाळाचा डॅन्स म्हणजे शम्मी कपूरच्या गोविंदा आला रे गाण्याची नक्कल करत लोळणं किंवा विजयेताला पाठीवर बसवून आपण गाढव आहोत हे दाखवत फिरणं इतकंच :)) :))

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2021 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आधी कुठेतरी वाचल्या सारखा वाटतोय.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2021 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आधी कुठेतरी वाचल्या सारखा वाटतोय.