लोगो...

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
17 Nov 2021 - 11:43 pm

लोगो..

'अ' कंपनीला 'ब' कंपनीने टेकओव्हर केलं. 'अ' कंपनी तशी जुनी पण गावठी. 'ब' कंपनी एकदम आंतेर्रराष्ट्रीय! काही तांत्रिक कारणाने 'अ' कंपनीच नाव बदलता येणार नव्हतं. त्यामुळे ती ब कंपनीची ग्रुप कंपनी म्हणून ओळखल्या जाणार होती. कागदी टेकओव्हर पूर्ण झाल्यावर हळूहळू प्रत्यक्षात कब्जा करणं सुरू झालं.रोजच्या रोज पॉलिसी,प्रोसेस, कल्चर, इथिक्स, कॉम्पलायन्स वगैरे शब्दांचा भडिमार सुरू झाला. मग कंपनीचा लोगो या विषयावर गाडी आली.

आता अ कंपनीच नाव बदललं नसल्यामुळे आणि लोगो नावावरूनच बनलेला असल्यामुळे त्यात फार काही बदल करता येणार नव्हते. शिवाय त्या लोगोचा ब्रँडही मार्केटमध्ये ओळखीचा होता. पण आंतेर्रराष्ट्रीय ब कंपनीला ते काही पटेना. "असं कसं असं कसं! आमची भाकरी खाता अन आमचं आडनाव लावत नाही" हे वाक्य ते इंग्रजीतून वेगवेगळ्या प्रकारे सांगत होते. शेवटी लोगो आणि ब्रँडिंगशी निगडित सर्व काम थांबवा असं फर्मान आलं.

मग सर्वसमावेषक लोगो कसा असावा ह्यावर ब्रेनस्टॉर्मिंग सुरू झालं. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे ज्या लोकांचं ब्रेन त्यांच्या लहानपणीच आलेल्या एका स्टॉर्म मध्ये उडून गेलेलं असतं ते लोकं एकत्र बसून एखाद्या विषयावर चर्चा करतात. त्या विषयातलं सखोल अज्ञान हे ब्रेनस्टॉर्मिंग सेशनसाठी खूप आवश्यक असतं. साधारण तीन महिने आणि बेचाळीस ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स झाल्यावर आपण अ आणि ब असे दोन वेगवेगळे लोगो ठेऊ असं प्रपोज करण्यात आलं. मग कोणाचा लोगो वरती कोणाचा खाली, की शेजारी शेजारी ठेवायचे ह्यावर आणखी ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स झालेत. दरम्यान ह्यावर चर्चेसाठी दोन्ही कंपनीतले बिझनेस एक्झिक्युटिव्ह आठ दहावेळा हेड ऑफिस, साईट ऑफिस आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटला विमानाने फिरून आले. त्यांचा साधारण खर्च सात लाखांच्या घरात गेला. शिवाय त्यांचे मॅनअवर्स, पगार वगैरे वेगळंच. ह्या सगळ्यात सहा महिने निघून गेले.

मग एके दिवशी या विषयावर आग लागली. कारण लोगो नसल्यामुळे मार्केटिंग ब्राउचर्स थांबले होते. तिकडे प्लँटवर सेफ्टी ऑडिट थांबलं होतं. त्या ऑडिट नंतरच मिळणार असणारी एक ऑर्डर थांबली होती. बरेचशे फिनिश्ड प्रॉडक्ट्स लोगो ठरला नसल्यामुळे फायनल स्टॅम्पिंगची वाट बघत होते. विशेष नाही पण कंपनीचा चाळीसेक कोटींचा रेव्हेन्यू थांबला होता. मग ब कंपनीच्या हेडऑफिसपर्यंत बातमी गेली. अजूनही लोगो का ठरवण्यात आला नाही ह्यावर इन्कवायरी कमिटी बसवण्यात आली. सखोल चौकशीनंतर कोणत्यातरी एका बिझनेस एक्झिक्युटिव्हने फायनल प्रोपोझल तब्बल दोन दिवस त्याच्या बॉसला फॉरवर्ड न केल्याचे निष्पन्न झाले. मग त्याच्यावरच पूर्ण सहा महिन्याचं खापर फोडण्यात आलं.

शेवटी दोन लोगोंच फायनल प्रोपोझल मॅनेजमेंटला सबमिट करण्यात आलं. आता मॅनेजमेंटच ब्रेनस्टॉर्मिंग सुरू झालं. ब कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी टेकओव्हर केलेलं असल्यामुळे अ आणि ब एकाच पातळीवर असू शकत नाही. म्हणूनच ब चा लोगो वरती असावा आणि अ चा खाली असावा. पण अ च्या म्हणण्यानुसार ब कंपनीला लोकल मार्केटमध्ये कुत्रं ओळखत नसल्याने असं करून चालणार नाही. अर्थात हे वाक्य त्यांनी चांगल्या इंग्रजी शब्दात सांगितलं!

ह्या वादात आणखी तीन चार महिने निघून गेले.

शेवटी एक तोडगा निघाला. आणि त्यानुसार लोगो फायनल करण्यात आला. आणखी साधारण महिन्याभराने नविन लोगोचा लॉंचिंग सेरेमनी करण्यात आला. ह्या सेरेमनीसाठीसुद्धा पंचवीस तीस बिझनेस एक्झिक्युटिव्ह इकडून तिकडे विमानाने वगैरे गेले. खूप गाजावाजा करून कंपनीचा लोगो लाँच करण्यात आला. फायनल लोगोमध्ये दोन्ही कंपनीचे ओरिजिनल लोगो तसेच ठेवण्यात आले होते. आणि त्यात एक अत्यंत महत्त्वाचा शब्द टाकण्यात आला होता. लोगो दिसायला खालीलप्रमाणे होता.


by ब

by या अत्यंत युनिक, लक्षवेधी आणि इनोव्हेटिव्ह शब्दासाठी आंतेर्रराष्ट्रीय कंपनीने एक वर्ष आणि करोडो रुपये खर्च केले होते.

बाकी काहीही असो,

पण by या एका शब्दाने लोगो आणि इगो दोन्ही सुखावले होते.

-- चिनार

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

18 Nov 2021 - 12:25 am | सौन्दर्य

अगदी पटलं, हे असेच होत असते.

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2021 - 12:46 am | श्रीरंग_जोशी

कॉर्पोरेट क्षेत्रात अनावश्यक गोष्टींना दिल्या जाणार्‍या अवाजवी महत्त्वावर भाष्य करणारे मार्मिक निरीक्षण-कथन आवडले.
लेख वाचताना पूर्वी वाचलेले संजय भास्कर जोशी यांचे 'आहे कॉर्पोरेट तरी' या पुस्तकात वर्णिलेले प्रसंग आठवले.

यश राज's picture

18 Nov 2021 - 1:35 am | यश राज

कंपनीने 10 वर्षात 3 लोगो बदलले. त्या ब्रॅण्डिंग मध्ये प्रत्येक वेळेस कोट्यवधी रुपये खर्च केले ते आठवले.

कंजूस's picture

18 Nov 2021 - 6:24 am | कंजूस

बाहेर काढण्यासाठी या आइडिया असतात. जाहिरात कंपन्या, इतर इवेंट म्यानेजमेंट कंपन्या यांच्याच असतील.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Nov 2021 - 8:38 am | ज्ञानोबाचे पैजार

काही वाक्ये तर छप्पर तोड आहेत,

ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे ज्या लोकांचं ब्रेन त्यांच्या लहानपणीच आलेल्या एका स्टॉर्म मध्ये उडून गेलेलं असतं ते लोकं एकत्र बसून एखाद्या विषयावर चर्चा करतात. त्या विषयातलं सखोल अज्ञान हे ब्रेनस्टॉर्मिंग सेशनसाठी खूप आवश्यक असतं.

विशेष नाही पण कंपनीचा चाळीसेक कोटींचा रेव्हेन्यू थांबला होता.

सखोल चौकशीनंतर कोणत्यातरी एका बिझनेस एक्झिक्युटिव्हने फायनल प्रोपोझल तब्बल दोन दिवस त्याच्या बॉसला फॉरवर्ड न केल्याचे निष्पन्न झाले. मग त्याच्यावरच पूर्ण सहा महिन्याचं खापर फोडण्यात आलं.

वाचता वाचता आमच्या दिव्य कंपनितले एक एक अनुभव आठवत होते. मी काही काम केले की नेहमी अडचणीत येतो, त्या पेक्षा काम न करण्याच्या सबबी शोधुन ठेवण्यात तोच वेळ आणि परिश्रम खर्च केले तर आपण सुरक्षित तर रहातोच वर तर दुसर्‍याला बरोब्बर खिंडीतही गाठता येते.

असो.. घरोघरी मातिच्या चुली

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

18 Nov 2021 - 10:58 am | तुषार काळभोर

मी काही काम केले की नेहमी अडचणीत येतो, त्या पेक्षा काम न करण्याच्या सबबी शोधुन ठेवण्यात तोच वेळ आणि परिश्रम खर्च केले तर आपण सुरक्षित तर रहातोच वर तर दुसर्‍याला बरोब्बर खिंडीतही गाठता येते.
>> परफेक्ट!

सौंदाळा's picture

18 Nov 2021 - 10:45 am | सौंदाळा

क्लास
मस्त लिहिले आहे.
आता कोरोनोत्तर काळानंतर तरी या फुकाच्या विमानप्रवासांना आळा बसेल असं वाटतय.

मुक्त विहारि's picture

18 Nov 2021 - 11:07 am | मुक्त विहारि

खाजगी कंपन्या, असे अनावश्यक विमान प्रवास टाळतात ...

क्वचित प्रसंगी ऑडिटला पण तोंड द्यावे लागते ...

अनिंद्य's picture

18 Nov 2021 - 11:35 am | अनिंद्य

झकास !

ऐसेच लोगो-लोगो का गेम खेलते रहते बडी कंपनी के बडे लोगां ;-)

जेम्स वांड's picture

18 Nov 2021 - 11:43 am | जेम्स वांड

विलक्षण कोटीक्रम आणि घटनांचा आढावा

जाताजाता - आपापसात

असं चारचौघात बोलू नये, नाहीतर मग आपण सरकारी कारभाराला शिव्या कश्या घालणार महाराज

बेकार तरुण's picture

18 Nov 2021 - 1:04 pm | बेकार तरुण

लेख आवडला...

पण by या एका शब्दाने लोगो आणि इगो दोन्ही सुखावले होते. >>> हे वाक्य विषेश आवडले..

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2021 - 1:52 pm | चौथा कोनाडा

जबरी लिहिलंय. अगदी साध्या कामासाठी सुद्धा कन्सलट्न्ट नेमुन लाखो करोडो रुपये खाल्ले जातात.
असल्या लुटमारीत कॉर्पोरेट आणि व्यवस्थापन अधिकारी सराईत असतात.
5S कन्सलट्न्सी आणि ऑडीटच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करुन घेतले होते असल्या लोकांनी