आप मुझे अच्छे लगने लगे.

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
22 Oct 2021 - 11:28 am

आप मुझे अच्छे लगने लगे.
इसवी सन २००२.
हृतिक= रोहित, अमिषा= सपना,
किरण कुमार= ढोलकिया (सिनियर),
मुकेश तिवारी= रमन ढोलकिया (ज्युनिअर),
निशिगंधा वाड= सपनाची भाभी,
आलोकनाथ= रोहितचा बाप.

सपनाचा बाप ढोलकिया (सिनियर) हा शहरातला मोठा डॉन. रमन ऊर्फ ज्युनिअर ढोलकिया हा सपनाचा भाऊ असून तोही गॅंगस्टर किंवा तत्सम डॉन.
साधारण सुरूवात अशी की सिनीयर ढोलकिया
अंबामातेसमोर भजन करतो आहे, तेवढ्यात त्याचा एक ॲसिस्टंट येऊन सांगतो की 'प्रकाशचा मर्डर झालाss'

शहरातील कालिया नावाच्या दुसऱ्या एका गॅंगच्या सदस्यांनी प्रकाशचा मर्डर केला असावा निष्कर्ष निघतो.
कारण रमन ढोलकिया किंचाळताना दिसतो की प्रकाशचा मर्डर कालियाने केला असून त्यासंबंधीचे डिटेल्स मला
ताबडतोब द्या.
परंतु सिनियर ढोलकिया ॲसिस्टंटला म्हणतो की पोलिस कमिशनरला फोन लाव, म्हणजे प्रकाशची बॉडी आपल्याला मिळेल.

हे ऐकताच तो माठ ॲसिस्टंट, काहीतरी तांत्रिक अडचणी सांगत टोलवाटोलवी करायला लागतो की बॉडी ताब्यात घेणं ही फारच किचकट प्रोसीजर वगैरे आहे.
यावर सिनीयर ढोलकिया म्हणतो की प्रकाशशी माझं
भावनिक अंगाने फारच जवळचं नातं असल्यामुळे त्याची बॉडी ताब्यात घेणं, हे मला तरी बुवा फारच महत्त्वाचं वाटतं.

तेवढ्यात आरतीचं ताट वगैरे घेऊन सपनाची एंट्री.
सपनाचा बाप मोठा गॅंगस्टर असला तरी सपना ही गरीब गाय आहे आणि तिचे काळीजही फारच हरिणीचे आहे.

ह्या प्रकाश नामक इसमाचा खून झाल्याचं सपनाच्या
कानावर पडतं आणि ती ताट फेकून पळत सुटते आणि
शेवटी अचूकपणे निशिगंधा भाभीच्या मायाळू गळ्यात
पडून हंबरडे फोडायला लागते.

पुढचा सीन:
मग रमन ढोलकिया बदला घेण्याच्या मोहिमेवर.
अंधारात एका घरापाशी गाडी थांबवतो. खुन्याला घराबाहेर बोलावण्यासाठी रमनकडे सोपी आयडिया आहे, गाडीतली म्युझिक सिस्टिम चालू करणे. खुनी वाटच बघत असल्यामुळे लगेचच घराच्या दारातूनच विचारतो की
कुणाची हिंमत झाली की माझ्या दारात येऊन असे लाऊड
म्युझिक लावतो वगैरे.
ह्यावर रमन ढोलकिया म्युझिकचा आवाज आणखी वाढवतो. खुनी अरसिक आहे. त्याला संगीत सहन होत नाही. तो गाडीजवळ येऊन खिडकीतून डोके आत घालतो आणि हा मौका अचूक साधून रमन
ढोलकिया खुन्याला गाडीसोबत फरफटत नेऊन मारतो.
इथे पहा . खुन्याच्या पाचपट आवाजात रमन ढोलकियाच
किंचाळताना दिसतो.

ह्या रमन मनुष्याचा एक प्रॉब्लेम आहे.
त्याला साधे साधे संवादही शांतपणे म्हणता येत नाहीत.
म्हणजे कधीकधी सुरूवात शांतपणे होते पण अचानक
कुठल्यातरी अज्ञात क्षणी त्याच्याकडून किंचाळणे आणि
हातवारे आदी क्रिया आपोआपच व्हायला लागतात.
निशिगंधाभाभीला मात्र नवऱ्याच्या किंचाळण्याचा काहीच त्रास होत नाही..! सवय असणार..! दुसरं काय..!

त्यापुढचा सीन :
पांढरी साडी घातलेली प्रकाशची बायको ढोलकीयाच्या घरी येऊन रडारड करते की, कुठं गेला माजा प्रकाssश? सकाळी भेटला तवा तर
चांगला होता कीss असा कसा मला सोडून गेला ओss माजा प्रकाश वगैरे वगैरे भावनांचा उद्रेक. आकांत. स्फोट. कल्लोळ. इत्यादी.इत्यादी.
तिचे सांत्वन करण्याची रमनची पद्धत वेगळी आहे. त्याचं म्हणणं असं पडतं की, 'मी प्रकाशच्या खुन्याला फरपटत नेऊन मारल्यामुळे तू आनंदी व्हायला हवेस. परंतु तू तर उगाचच पिरपिर करायला लागली आहेस. दुःख वगैरे असतं, हे मान्य आहे समजा. पण तरीही तू जरा जास्तच करते आहेस, असं मला वाटतं.'

हा सगळा आक्रोश वगैरे ऐकून सपना आणखी एकदा निशिगंधाभाभीच्या गळ्यात पडून हमसायला लागते की, 'माझे बाप-भाऊ फारच
हिंसाचारी आहेत. हे दुष्ट लोक मलाही घराबाहेर
कुठे जाऊ देत नाहीत. हे असं कधीपर्यंत चालणार?
मला तर बाई ही छळवणूक आता सहनच होत नाही.'

निशिगंधाभाभी म्हणते की 'अगं वेडे.. तुझ्या एवढंही कसं लक्षात येत नाही?... दोन वर्षे झाली तुला आता इंडस्ट्रीत येऊन..! इथं आपल्या हातात काय आहे..!
डायरेक्टरनं सांगितलं तसं करत रहायचं.. आता उगीच
रडू बिडू नको बाई.. तुझी सुटका
करण्यासाठी एका राजकुमाराचे नियोजन केले गेले आहे....
तो येईपर्यंत कळ काढ..!'

पुढच्या सीनमध्ये राजकुमार रोहित.
रोहितचे स्नायू वगैरे दिसावेत या एकाच उद्देशाने तब्बल पाच मिनिटे वेगवेगळ्या ॲंगल्सने एक फुटबॉलची मॅच दाखवली गेलेली आहे.
क्रिकेट किंवा इतर कसलीही मॅच चालली असती पण त्यात हे पिळदार स्नायू कसे बरे दिसणार ?
शिवाय रोहित हा कॉलेजकुमार असल्यामुळे एकटा कसा असणार? म्हणून चार मित्र.
हे सगळे मिळून अधूनमधून काहीही कारण नसताना नाचतात. सवय.

इकडे सपना मैत्रीणीकडे निघालेली असताना दुष्मन टोळीचे सभासद तिच्या गाडीवर गोळीबार करतात.
नाचून झालेला रोहित नेमका घटनास्थळावरून जात असतो.
गोळीबार सुरू आहे. दुष्मनांची संख्या जास्त आहे. रोहितला काहीच अडचण नाही. तो त्याच्या दुचाकीची पेट्रोलची नळी खुली करतो आणि वेगाने घसरणारी दुचाकी दुष्मनांवर
सोडून देतो. घसरत जाणारी दुचाकी बॉंबमध्ये रूपांतरित
होतेय. त्यातून स्फोट होतोय. आणि मग दुष्मन उताणे
पडतायत. सगळं स्मूथ. काहीच अडचण नाही. इथे पहा

इकडे रोहितला प्रेमाचा दंश होतो. तो मुग्ध होतो आणि पुन्हा एकदा नाचायला लागतो.
तिकडे सपनाला प्रेमाचा दंश होतो. तिला मुग्ध वगैरे होणे
झेपणारे नाही. ती उसासे टाकायला लागते.

आनंद दु:ख संताप आश्चर्य लज्जा अशा विविध भावनांना वाट खुली करून देण्यासाठी जोरजोराने धापा टाकणे, हे एकच माध्यम सपनाकडे आहे.

रोहित घरी जातो. आलोकनाथ मिठी मारून पोराचे स्वागत करतो. आलोकनाथ टुकार जोक मारतो. रोहितला हसावं
लागतं.
रोहित जायला निघतो.
त्याची माऊली त्याला होस्टेलमध्ये खाण्यासाठी बेसनाचे लाडू, लोणचे, मध वगैरे भरून देते.

आलोकनाथ म्हणतो की मी तुझा बाप असल्यामुळे आणि मी तुला गोदमध्ये वगैरे खेळवलं असल्यामुळे तुझ्या मनात
काहीतरी प्रेमरूपी खळबळ चाललीय हे मला लगेच समजले आहे. तुला समजून घ्यायला मला शब्दांची काहीच गरज नाही. त्यामुळे तू मला सांग की त्या मुलीचे नाव काय आहे वगैरे.
रोहित लाजत मुरकत सांगतो की सपना वगैरे.
मग आलोकनाथ रोहितच्या फुग्यात आणखी हवा भरत सल्ला देतो की प्रेमात कितीही अडचणी आल्या तरीही प्रेम हे दैवी असल्यामुळे अंतिमतः तूच जिंकशील.
त्यामुळे तू प्रेमाच्या मैदानात बिनधास्त उडी मार. इथे पहा

ह्याचा दृश्य परिणाम म्हणजे रोहित दांडीया खेळत सपनाच्या घरी. त्याच सुमारास नेमका नवरात्रीचा उत्सव आल्यामुळे हा योग जुळून आला. काहीच अडचण नाही.
ह्या सीनसाठी डायरेक्टरने खूप साऱ्या बायका आणि माणसे धरून आणले आहेत आणि त्या सर्वांना सगळीकडे हसऱ्या चेहऱ्याने वावरत फिरण्याची सूचना दिलेली आहे.. त्यांचाही काही इलाज नाही. पोटासाठी करावं लागतं.

सपना रोहितची ढोलकियाशी ओळख करून देते की ह्याने माझा जीव वाचवला वगैरे. रोहित लगेच ढोलकियाला काही टुकार जोक्स सांगून वातावरण कंटाळवाणं करतो.
तरीही ढोलकिया लगेच हसत हसत 'कमाल का लडका है' वगैरे अभिप्राय व्यक्त करू लागतो...!
आलोकनाथने असे टुकार जोक्स सांगत सांगतच रोहितला लहानाचा मोठा वगैरे केलेला असल्यामुळे रोहितकडे अशा जोक्सचा कोटा अपरंपार आहे. बापकमाई..!
इथे सपना रोहितकडे बघत लाजणे किंवा घायाळ
झाल्यासारखे बघणे प्लस उसासे टाकणे, ह्या गोष्टी तिला जमेल तशा पद्धतीने करते आहे.

रोहितच्या मित्रांचा बॅंड वगैरे असणे. त्यामुळे नवरात्रीत नऊ दिवस ढोलकियाच्या घरी रोहितचे येणे जाणे..
रोहितचे सपनाला म्हणणे की मी तुला ह्या पिंजऱ्यातून बाहेर उडायला शिकवेन वगैरे.
आणि लगेच तिला घेऊन रोहितचे स्वतःच्या घरी जाणे.

रोहितच्या आईला आणि आलोकनाथला, घरात धूर किंवा अंधार करून, मेणबत्त्या घेऊन फिरायची सवय आहे.
सपनाला बघताच रोहितची मायमाऊली आलोकनाथला
म्हणते की 'अहो ऐकलंत का.. बघा आज माझ्या घरात
कायमचा उजेड आलाय.!'
मग सपना आलोकनाथच्या पाया वगैरे पडायला लागते,
तेवढ्यात आलोकनाथ म्हणतो की, 'अगं वेडे पाया वगैरे पडू नकोस. आमच्या घरी मिठ्या मारायची पद्धत आहे.'

मग रोहितची माऊली सपनाला बांगड्या वगैरे घालते आणि म्हणते की, 'आता माझी जबाबदारी संपली गं बाई..!' इथे पहा

सपना निशिगंधाभाभीच्याच गळ्यात शेवटी किती वेळा
पडणार..! कंटाळली असणार..! आणि आता तिला हा नवीन खांदा मिळालाय. ती चान्स सोडत नाही. लगेच भावी
सासूच्या गळ्यात पडून हंबरते की, 'आप मेरी माँ हो..!' वगैरे.
धन्य ती सासू..! साधू! साधू! साधू!

इथे आलोकनाथ आता काय करावं, कोणती रिअक्शन चेहऱ्यावर दाखवावी या कन्फ्युजनमध्ये असतानाच त्यांना जे जमतं तेच करतात..! म्हणजे गदगद व्हायला लागतात..!
बापाचं पाहून रोहितही गदगद होतो.
आपला दिवटा अजून शिकतो आहे. कामाधंद्याचा कशाचा कशाला पत्ता नाही. ही कोण मुलगी घरी घेऊन आला आहे माहित नाही. तरीही सगळे गदगद होतात. हे थोर आहे.

(आमच्या गावातले टणक म्हातारे किमान दोन-तीन
पिढ्यांचा पदर जुळतोय ह्याची खात्री करून घेतल्याशिवाय टिळा-सुपारी वगैरेसारख्या प्राथमिक गोष्टीचंही
नाव काढू देत नाहीत.
परंतु इथे हे आई-बाप एका वेगळ्याच टॅंजंटवरून दुनियेचा अनुभव घेताना दिसून येतात..!)

कालिया गॅंगला दुसरा काहीच उद्योग नसल्याने ते सपनावर आणखी एकदा हल्ला करतील, अशा एका तीव्र चिंतेने
ढोलकीया सिनीयरचा जीव पोखरतोय.
ह्यावर उपाय काय असा विचार करत असतानाच त्यास आठवते की आपला बचपनका दोस्त हसमुख हा लंडनला असतो. शिवाय त्याला एक पोरगा आहे आणि तो अजून
बिनलग्नाचा आहे, हे ओघाने आलेच.
लगेच ढोलकियाकडून ॲसिस्टंटला आदेश की माझ्या हस्सूला बोलवा.
हसमुख मित्र लगेच पोराला घेऊन ढोलकियाच्या घरी.
रोहितच्या संपर्कात आल्यामुळे ढोलकियालाही
टुकार जोक्स मारण्याची बाधा झालेली आहे.
हसमुखचा मुलगा ढोलकियाच्या पाया पडतो. इथे ढोलकिया आपण स्वतः गॅंगस्टर आहोत हे विसरलेला दिसतो. कारण तो हसमुखला म्हणतो की, 'तू उत्तम संस्कार केले आहेत मुलावर..!'

सपनाला हे कळतं. आणि कालचक्र स्तब्ध होतं..!
आता ही पोरगी हमसायला लागणार आणि आपल्या गळ्यात झेप घेणार, हे निशिगंधाभाभीला आधीच कळल्यामुळे ती पोज घेऊन तयारच असते.
ह्या सपनाला श्वसनासंबंधी काहीतरी जुनाट विकार असावा, अशी शंका सुरूवातीला येते... परंतु ह्या सीनमध्ये तिला बहुधा दम्याचा तीव्र ॲटॅक आला आहे.. एक वाक्य बोलतेय... मग खोल श्वास घेतेय.. मग दुसरं वाक्य... पुन्हा खोल श्वास..

अधूनमधून आमच्या गावातल्या काही म्हाताऱ्यांच्या अंगात येतं. त्या घुमायला लागतात. पाहणारे भाविक विनवणी
करतात की "काय चुकलं देवा.. फुडं चाला.. काय झालं देवा.. फुडं चाला... देव का कोपला.. बोला देवा.."
पण म्हातारी घुमायचं थांबत नाही. सपनाही घुमायचं थांबत नाही. इथे पहा

काही वेळानंतर सपना निशिगंधाभाभीला बांगड्या देते आणि सांगते की,'रोहितच्या माऊलीमध्ये मला पहिल्यांदाच आईचं प्रेम मिळालं. त्यामुळे आता ह्या बांगड्या तू रोहितला नेऊन दे आणि सांग की मला विसरून जा.'

इथे भावनेच्या भरात असलेल्या सपनाच्या तोंडी एक डायलॉग आहे, "आपको पता नहीं भाभी, रोहित ने इन दिनों में ‌मुझे क्या क्या दिया है"
सदर डायलॉग सरळ सरळ चावटपणाकडे झुकणारा आहे, असा आमचा विनम्र खाजगी अभिप्राय आहे. पण ते एक असो.

मग निशिगंधाभाभी तडक होस्टेलवर..!
प्रसंग निर्वाणीचा आहे..!
आईच्या बांगड्या रोहितपर्यंत पोचवल्याच पाहिजेत..!
भावनेचा प्रश्न आहे..!
त्यामुळेच तर निशिगंधाभाभी पोरांच्या होस्टेलवर एवढ्या
रात्री बिनबोभाट जाऊ शकते..
उगाच ते वॉचमेन, नियम आणि रेक्टर वगैरे भानगडी कशाला...!

(तिकीट काढून पिच्चर बघायला आलो आहे, आता कशाला
निम्म्यातून उठून जायचं, पैसे काही परत मिळणार नाहीत. त्यामुळे जे दाखवतील ते बघत राहिलं पाहिजे, अशी अडचण त्यावेळच्या प्रेक्षकांची असणार..! मला आज ती
समस्या नाही. हा सगळा खेळ एका टिचकीत थांबवण्याची आज माझ्यात ताकद आहे..)

चित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

चावटमेला's picture

22 Oct 2021 - 12:51 pm | चावटमेला

एक नंबर!!!

(आमच्या गावातले टणक म्हातारे किमान दोन-तीन
पिढ्यांचा पदर जुळतोय ह्याची खात्री करून घेतल्याशिवाय टिळा-सुपारी वगैरेसारख्या प्राथमिक गोष्टीचंही
नाव काढू देत नाहीत.
परंतु इथे हे आई-बाप एका वेगळ्याच टॅंजंटवरून दुनियेचा अनुभव घेताना दिसून येतात..!)

ठार उडालो!!

पाटिल साहेब, क्रमशः टाकायचे विसरलात वाटतं, येवूदे अजून चिरफाड

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा

खुन्याला घराबाहेर बोलावण्यासाठी रमनकडे सोपी आयडिया आहे, गाडीतली म्युझिक सिस्टिम चालू करणे

हा .... हा .... हा ... हे आणि इतर अनेक वाक्यं

😃

मस्त चिरफाड, मजा आली !

तुषार काळभोर's picture

22 Oct 2021 - 1:22 pm | तुषार काळभोर

त्यावेळी रुतिक अन् अमिषा दोघे सुपरस्टार असून हा पिच्चर बघायची इच्छा झाली नव्हती.
२००२-२००३ काळात त्याने निव्वळ पाट्या टाकल्यात.
यादें
आप मुझे.................
मैं प्रेम की दिवानी हुं
ना तुम जानो ना हम
मुझसे दोस्ती करोगे

श्वेता व्यास's picture

22 Oct 2021 - 1:31 pm | श्वेता व्यास

चित्रपट पाहीला नाहीये (सुदैवाने). अफलातून परीक्षण !

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Oct 2021 - 1:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त परीक्षण, एकदम फार एन्ड ह्यांच्या लिखाणाची आठवण करुन देणारी शैली. पुलेशु

यश राज's picture

22 Oct 2021 - 1:57 pm | यश राज

भारीये परीक्षण.
आम्ही हा अखखा चित्रपट मोठ्या पडद्यावर झेलला होता त्याची आठवण आली.

आनंद दु:ख संताप आश्चर्य लज्जा अशा विविध भावनांना वाट खुली करून देण्यासाठी जोरजोराने धापा टाकणे, हे एकच माध्यम सपनाकडे आहे.

ही लाइन कहर आहे. पुर्ण चित्रपटात या बयेने फक्त जोरजोरात उसासे टाकले आहेत.

आपला दिवटा अजून शिकतो आहे. कामाधंद्याचा कशाचा कशाला पत्ता नाही. ही कोण मुलगी घरी घेऊन आला आहे माहित नाही. तरीही सगळे गदगद होतात. हे थोर आहे.

(आमच्या गावातले टणक म्हातारे किमान दोन-तीन
पिढ्यांचा पदर जुळतोय ह्याची खात्री करून घेतल्याशिवाय टिळा-सुपारी वगैरेसारख्या प्राथमिक गोष्टीचंही
नाव काढू देत नाहीत.
परंतु इथे हे आई-बाप एका वेगळ्याच टॅंजंटवरून दुनियेचा अनुभव घेताना दिसून येतात..!)

सगळे पंचेस खतरनाक आहेत आणखी येवु द्यात.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

22 Oct 2021 - 2:06 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मस्त.

सुखी's picture

22 Oct 2021 - 3:49 pm | सुखी

लै भारी running commentary

पाटिल's picture

22 Oct 2021 - 6:28 pm | पाटिल

@ चावट मेला, चौथा कोनाडा, राजेंद्र मेहेंदळे, ॲबसेंट माईंडेड,सुखी, यशराज,श्वेता आणि तुषार..
चित्रपटासंबंधी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे..
आपण सर्वांनी हे सगळं वाचून आवर्जून प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. :-)

अभिजीत अवलिया's picture

22 Oct 2021 - 7:51 pm | अभिजीत अवलिया

छान लिहीलयं.

तर्कवादी's picture

22 Oct 2021 - 8:45 pm | तर्कवादी

पाटिल साहेब
छान लिहिलंय.. वाचून मजा आली.

एका टुकार सिनेमाची केलेली चिरफाड आवडली!
त्यावेळी ऑडिओ सीडी घेतली होती ह्याच्या गाण्यांची, पण फक्त दोनच गाणी चांगली होती 😀