सन्नाटा

Primary tabs

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
16 Oct 2021 - 9:48 pm

पक्की दुपारी “ खेळ खल्लास” सिनेमा बघून आला होता. त्याच्या सर्व आवडत्या सुपरहीरोंची झालेली दयनीय अवस्था बघून त्याला वाईट वाटत होते. सन्नाटा नावाच्या खलनायकाने सर्व सुपरहीरोंना पळवून लावून पृथ्वीवर कब्जा केला होता. हवाहवाईने केलेले हवाई हल्ले त्याने परतवून लावले होते. सूर्यकुमारच्या झळाळीला सन्नाटाने झाकोळले होते. सूर्यकुमारच्या तेजस्रोतामागे असणारी अणुप्रक्रिया त्याने ग्राफाईटचे अस्त्र सोडून बंद पाडली होती.त्यामुळे सूर्यकुमार खग्रास ग्रहण लागल्यासारखा निस्तेज झाला होता. मिस्टर इंडिया सन्नाटाच्या समोर जो अदृश्य झाला तो पुन्हा कोणालाही दिसला नाही. अॅग्नेल पहिलवानला तर सन्नाटाने गरगर फिरवून जे हवेत फेकून दिले. ते तो बहुतेक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेला असावा. बाकी सर्व छोटयामोठ्या सुपरहीरोंची म्हणजे काळीकुट्टा, धनुर्धारी, उडता कोळी, जादुगार गरमागरम इत्यादींची ह्याहीपेक्षा वाईट अवस्था झाली होती. ते सर्वजण पळून गेले होते. पण सन्नाटा त्यांना असा सहजासहजी सोडणार नव्हता. सन्नाटाची सत्ता नसलेले काही मोजकेच ग्रह शिल्लक राहिले होते. तेथील राज्यकर्ते पण सन्नाटाशी वैर करायला तयार नव्हते. मग सुपरहीरो पळून पळून जाणार कुठे? सुपरहीरोंच्या पराभवामुळे पृथ्वीवरचे लोक निराश झाले होते. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. उगीच नाही त्याचे नाव सन्नाटा होते. आशादायक अशी एक गोष्ट होती. ती म्हणजे एक लहान मुलगा सन्नाटाचा पराभव करेल अशी भविष्यवाणी होती. त्याची झलक पक्कीने “ खेळ खल्लास”च्या पोस्ट क्रेडीट सीन मध्ये बघितली होती. तो पिक्चर थिएटरमध्ये प्रसारित व्हायला अजून तब्बल आठ महिने लागणार आहेत अश्या अफवा होत्या.
पक्की सुपरहीरोंचा फॅन होता. त्यांचे एकूण एक चित्रपट त्याने पाहिले होते. एकदा बघून समाधान होत नाही म्हणून दुसऱ्यांदा बघितले. पण “ खेळ खल्लास” पुन्हा बघायची त्याची इच्छा नव्हती. सुपरहीरोंचा पराभव झाला ह्याचे त्याला वाईट वाटत होते. चित्रपट बघताना त्याच्याबोबर त्याचा मित्र विनू होता. चित्रपट संपल्यावर चकार शब्द न काढता ते घरी परतले. घर आल्यावर “ बाय सी यु टुमारो ” असे सुद्धा म्हणायचे ते विसरले.
घरी येऊन पक्की उदास होऊन आपल्या खोलीत पलंगावर पडला. त्याच्या नजरेसमोर सर्व सुपरहीरोंचे कोलाज केलेले पोस्टर होते. नुकत्याच झालेल्या कॉमिक कॉन मध्ये कॉमिक क्विझ मध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला होता. त्याचे बक्षीस म्हणून त्याला हे पोस्टर मिळाले होते. आज त्या पोस्टरकडे बघायची इच्छा नव्हती. त्यांच्या सुपरशक्तींचा काय उपयोग? आत्तापर्यंत त्यांनी अनेक खलनायकांना लोळविले होते. आज ते सर्व खलनायक मनातल्या मनांत खुश होऊन हसत असतील. दरवाजा उघडल्याचा आवाज आला. पक्कीची आई बहुतेक ऑफिसमधून परत आली असावी. ती स्वयंपाकघरात चहा करत असावी. पक्कीला माहीत होते की ती आता आपल्याला बोलावणार. तसच झाले.
“ पक्की,छोटया बाळा, चल ये चहा झाला. चहा प्यायला लवकर ये.” आई खुशीत असली की हे असे गाणे गायल्या प्रमाणे त्याच्याशी बोलत असे. “गाणे गायल्या प्रमाणे” हा पार्ट ठीक होता. पण “ पक्की,छोटया बाळा” हे मात्र पक्कीला आवडत नसे. त्याने आईला किती वेळा सांगितले होते,” आई मी छोटं बाळ नाही. मी आता चांगला बारा वर्षांचा झालो आहे.” ते ऐकून त्याच्या आईला हसू येत असे, “ बरं बरं माझे मोठे बाळ ते.”
हे सर्व माहीत असल्याने तो चुपचाप उठला आणि चहा प्यायला गेला.
“कसा होता पिक्चर? आवडला का?” आईने विचारले. पक्की काही बोलत नाही याचे तिला नवल वाटले. नाहीतर सुपेरहीरोंचा चित्रपट बघून आल्यावर त्याची नॉनस्टॉप बडबड चालत असे. “ अरे पक्की, तू काहीच कसा बोलत नाहीस? काय झाले? तब्येत बरी नाही का? ताप आला आहे का?”
आईचा हा एक प्रॉब्लेम होता. असे काही झाले की ती सरळ तापावर घसरते.
“ ठीक होता. एवढा काही खास नव्हता.” त्याने मुकाट्याने चहा संपवला. आई सुद्धा काही जास्त बोलली नाही. चहा संपल्यावर तो न बोलता आपल्या खोलीत निघून गेला.
संध्याकाळचे सात वाजले होते. पक्कीचे बाबा येण्याची वेळ झाली होती. आईची ती तऱ्हा तर बाबांची दुसरी. आई एक टोक तर बाबा दुसरे टोक. बाबा खूप कडक बोलत आणि वागत. ते अर्थात नाटक होते. पक्कीला हे माहीत होते. बाबांना बरं वाटावे म्हणून तो बाबांच्या समोर घाबरायचे नाटक करत असे. त्यामुळे बाबा साधारणपणे त्याच्यावर खूष असत पण कधी दाखवत नसत. नेहमीप्रमाणे ऑफिसमधून आल्यावर आणि चहा पिऊन झाल्यावर बाबा पक्कीच्या खोलीत आले. पक्कीने आधीच भूगोलाचे पुस्तक काढून डोळ्यासमोर धरले होते.
“ व्वा भूगोलाचा अभ्यास चाललाय वाटते. मला सांग खारे वारे आणि मतलई वारे म्हणजे काय?” बाबा नेहमीप्रमाणे पक्कीला उगीचच डिवचत होते.
“ बाबा, एकतर माझे इंग्लिश मिडीअम आहे. दुसरे म्हणजे हा पोर्शन सातवीचा आहे. मी सहावीत आहे. तरीपण मी सांगतो सी ब्रीझ आणि लॅंड ब्रीझ.” पक्की शांतपणे बोलला.उगीच नाही पक्की शाळेत ज्ञानकोश म्हणून प्रसिद्ध होता.
वाऱ्यांच्या निमित्ताने पक्कीला प्रवचन द्यायचा बाबांचा प्लॅन फिसकटला.यशस्वी माघार घेत बाबा म्हणाले “ म्हणजे तुझा अभ्यास ठीक चालला आहे म्हणायचे.” दुसरे काही मिळाले नाही तर मग ते सुपरहीरोच्या पोस्टरवर घसरले, “ आता हे केवढ्याला आणलेस? २००-३०० तरी गेले असतील. आधीच्या पोस्टरनी सगळ्या भिंती भरून गेल्या आहेत. त्यांत ही नवी भर. आता तू मला सांगशील की हे पोस्टर तुला बक्षीस मिळाले आहे. हो ना?”
“ बाबा तुम्ही कालपण मला हेच विचारले होते. तेव्हाच मी तुम्हाला सांगितले होते की हे पोस्टर मला पुणे कॉमिककॅान मध्ये बक्षीस मिळाले.”
“ हो, ऑ, हो, आता आठवले.” बाबांनी काढता पाय घेतला, “ ते काहीही असो. ह्या वर्षी पण पहिला क्रमांक यायला पाहिजे.”
त्या दिवशी खास असे काही झाले नाही. पक्कीला मिसनी रोजच्या सारखे खूप गृहपाठ दिले होते. जेवणानंतरचा वेळ त्याच्यांत गेला. “ मध्ययुगीन जगातल्या स्त्री शिक्षणाचा आढावा ” ह्यावर निबंघ लिहिण्यात त्याचा सर्व वेळ गेला. इंटरनेटवर सुद्धा काही माहिती मिळत नव्हती. शेवटी त्याने मनात येईल तसे लिहून वेळ निभाऊन नेली. मध्येच त्याला विनूचा फोन आला होता. पक्की लवकर निबंध लिही. असा तगादा त्याने लावला होता. त्याला पक्कीची कॉपी मारायची घाई होती ना.
ह्या सगळ्यात झोप केव्हा लागली ते कळले नाही.
++=++++===+++=++=++++++++++++=+++=+==+++++++=++++++===+++=++++

पक्की जेव्हा जागा झाला तेव्हा सगळीकडे लख्ख ऊन पसरले होते. त्याच्या मनात विचार आला, “ बापरे किती उशीर झाला. आई बाबा कुणीच कसं आपल्याला उठवले नाही? कमाल आहे.” त्याने टेबलावरच्या घड्याळांत नजर टाकली. घड्याळ काहीही वेळ दाखवत नव्हते. सेकंद, मिनिट आणि तास ह्यांचा हिशोब करायची वेळ संपली होती. घड्याळाचे डोके ठिकाणावर दिसत नव्हते. गोंधळ झाला की डोके क्लीअर करण्यासाठी माणसे सरळ नाक्यावर जाऊन चहा पितात. बिचाऱ्या घड्याळाला कोण चहा पाजणार! ते फक्त चहा प्यायची वेळ झाली एवढेच दाखवणार!
पक्कीला मोबाईलची आठावण झाली. त्याने काही दिवसापूर्वीच एक अॅप डाउनलोड केले होते. ते पुणे. लंडन , न्यूयार्क, सिगापूरची घड्याळे दाखवत असे. पण म्हणतात ना की ‘ भरवशाचा मोबाईल आणि बॅटरी डाऊन, ‘ अगदी त्याची प्रचीती पक्कीला आली.
त्याच वेळी ती अजब घटना घडली.पक्कीच्या बेडरूमच्या खोलीच्या भिंतीवरचे सुपरहीर्रोंचे पोस्टर सजीव झाले होते. सुपरहीरोंची तिथे गर्दी उसळली होती. पुढे येण्यासाठी सुपरहीरो चक्क धक्का बुक्की करत होते. पक्कीचे लक्ष वेधण्यासाठी त्यांचा गलका चालला होता. कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत नव्हता. शेवटी सुर्यकुमार जोराने ओरडला, “ सगळे शांत व्हा आधी. असा मासळीबाजार कराल तर पक्की गोंधळून जाईल.” गडबड गोंधळ क्षणांत थांबला, “ आता मी बोलणार आहे. तेव्हा कृपाकरून कुणी मध्ये बोलू नये. काळीकुट्टा, तुझे बोलणे झाले का? म्हणजे मी सुरुवात करेन.”
सगळीकडे शांतता पसरली.
“ पक्की आमची ओळख नव्याने करून द्यायची काही गरज आहे असे मला वाटत नाही. तू आम्हा सगळयांना ओळखतोसच. सन्नाटाने आमची काय हालत केली आहे हे तू कालच बघितले आहेस. आता सन्नाटाला हरवून आमचे रक्षण करायची जबाबदारी तुझ्यावर आहे. आम्ही तुझ्या बेडरूममध्ये आश्रय घेण्यासाठी आलो आहोत. आम्ही या पोस्टरमध्ये 2-D होऊन लपून रहाणार आहोत.” सुर्यकुमारने पक्कीला माहिती दिली.
पक्की गोंधळून गेला, “ मला न विचारता माझ्यावर जबाबदारी टाकणारा कोण तो? आधी मिसने दिलेला गृहपाठ करता करता वेळ पुरत नाही. त्यातून ही नवीन प्रोजेक्ट? तुमच्याकडे सुपरपॅावर आहेत तरी तुम्ही इकडे पळून आलात.मी किती वेळा देवाला विनवणी केली की देवा मला पण थोडीशी सुपरपॅावर दे म्हणजे मी गृहपाठ चुटकीसरसा संपवून टाकेन.पण त्याने चुटकीची शक्ति त्या सन्नाटाला दिली.” पक्कीला थोडा राग आला होता. तरीदेखील मिसचा आणि देवाचा राग त्यांच्यावर काढणे बरोबर नव्हते.
सूर्यकुमार काही बोलणार इतक्यांत अॅग्नेल पहिलवान मघ्येच बोलला, “ हे गृहपाठ गृहपाठ म्हणजे नक्की काय? हा काय सन्नाटा सारखा विलन आहे का? “
“ अॅग्नेल, गृहपाठ म्हणजे होमवर्क. पण तो इथे विषय नाही. पक्की तुला प्रभुदेसाई माहीत आहेत ना? ”
सर्व लहान मुलांना प्रभुदेसाई माहीत होते. त्यांनीच मराठीत सुपरहिरो मालिका सुरु केली होती. इथून तिथून मार्वल वरून उचलेगिरी करून त्याला मराठी साज चढविणे हे त्यांचे कौशल्य.
“ तर ते आमचे भाग्यविधाते कर्ताकरविता प्रभुदेसाई! त्यांनीच आम्हाला तुझ्याकडे जायचा संदेश दिला. आता त्यांना पण सन्नाटाने पकडले आहे. त्यांच्यावर जबरदस्ती करून आमच्या सर्व सुपरपॅावर काढायला त्यांना भाग पाडले. नाउ पक्की यु आर द चोझन वन! आता तूच आम्हाला वाचव.”
पक्कीचा स्वतःच्या कानावर, डोळ्यावर विश्वास बसेना. आपण ऐकतो आहोत ,बघतो आहोत ते खरं आहे की खोटे आहे? सुपरहिरो त्याच्या घरांत त्याला “वाचव” अशी विनवणी होते!
सुर्यकुमार पुढे बोलत होता, “ हा सन्नाटा आकार बदलणारा मांत्रिक आहे. तो आमचा शोध करत करत इथपर्यंत येईल. कुठल्याही रूपांत येईल. म्हणून तू कोणालाही आमच्या बद्दल सांगू नकोस. प्रॉमिस. आणि हो, काल तो माणूस येऊन तुला पोस्टर बद्दल विचारत होता तो कोण? आम्हा सगळ्यांना वाटले की सन्नाटाच आला.”
“ सूर्यकुमार ते माझे परमपूजनीय पिताश्री होते. अॅग्नेल, “परमपूजनीय पिताश्री” म्हणजे बाबा बरं का. फॅार युअर इन्फर्मेशन,” पक्कीने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, “ तुम्हाला ते सन्नाटा वाटणे सहाजिक आहे.”
“सॉरी पक्की. आम्ही आपली तुला टिप दिली,” सूर्यकुमार घाई घाईने बोलत होता कारण दरवाज्याबाहेर पावलांचा आवाज येत होता. सगळे हिरो पुन्हा आपापल्या जागी गेले. पोस्टर पुन्हा निर्जीव झाले.
खोलीत बाबा आले होते. “ काय बडबड करत होतास? पक्की घड्याळात किती वाजले बघ. झोप आता नाहीतर उद्या शाळा आहे ना? “
पक्कीने बाहेर बघितले. मगाचचा बाहेर दिसणारा प्रकाश नाहीसा झाला होता. बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरले होते,घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते. म्हणजे घड्याळ पुन्हा वेळ दाखवू लागले होते. पक्कीने डोक्यावरून पांघरूण ओढून घेतले. थोड्याच वेळात तो गाढ झोपी गेला.
सकाळी तो नेहमीप्रमाणे जागा झाला. शाळेत गेला खरा पण त्याचे अभ्यासांत लक्ष लागत नव्हते. मिसने त्याच्या “ मध्ययुगीन जगातल्या स्त्री शिक्षणाचा आढावा ” ह्या निबंधाची खूप स्तुती केली. तो वर्गांत वाचून दाखवला. पक्कीचे त्याकडे अजिबात लक्ष नव्हते. मधली डबा खायची सुट्टी झाली तसा तो त्याच्या नेहमीच्या डबा खायच्या जागी पळत गेला. त्याचा पार्टनर विनू त्याच्या आधीच येऊन बसला होता. शाळेच्या पटांगणाच्या टोकाला बुचाच्या झाडाखाली ते डबा खायला बसत. दोघांनी डबे उघडले. पक्कीच्या डब्यात पोळी भाजी होती. लोणचे होते. पोळीवर तूप सोडलेले होते. भाजी दोडक्याची होती. विनूचा डबा शार्टकट डबा होता. तीन इडल्या आणि चटणी होती. सकाळी नाश्त्याला पण इडली होती. पक्कीच्या डब्यांत शिराळ्याची भाजी होती. पक्कीची आईच्या हाताची चव काही निराळीच. त्याने पक्कीला सांगितले, “ पक्की, अरे हे बघ. तुझी आवडती इडली आणि चटणी आईने दिली आहे. ही घे तू. मी तुझी पोळी भाजी घेतो.” विनू उपकार केल्यासारखे बोलत होता.
पक्कीला विनूची नेहमीची नाटके माहीत होती.त्याला दोडक्याची भाजी खूप आवडते हे त्याला माहीत होते. पण आज त्याचे डबा खाण्यात लक्ष नव्हते. विनूने त्याच्या डब्याचा केव्हाच ताबा घेतला होता. खाऊन झाल्यावर ,पाणी पिऊन झाल्यावर पक्कीने रात्रीचा सगळा किस्सा विनूला सांगितला, “ तुला काय वाटते ? काय करायला पाहिजे? आपली स्ट्रॅटेजी काय ठेवायची?” विनूने खूप विचार केला.गवतांत पिझ्झ्याचा एक कण घेऊन जाणाऱ्या मुंगीकडे त्याचे लक्ष होते. मुंग्यानाही पिझ्झा आवडतो तर.
“ विनू मी तुला विचारतो आहे. तुझे काय मत आहे?”
“ हो हो मला डिस्टर्ब करू नकोस. मी विचार करतो आहे. आधी मला सांग तुला हे स्वप्न रात्री पडले की पहाटे पडले? कारण की माझी आई म्हणते की पहाटेची स्वप्ने अक्सर खरी होतात.” विनूने आपला पॉईंट काढला. पक्कीचा स्वतःवरचा विश्वास डळमळायला लागला. आपण बघितले ते सत्य होते की स्वप्न? विनू म्हणत आहे ते खरं आहे. ते स्वप्नच असणार. आपण चित्रपट बघितला, तेच आपल्या डोक्यांत फिरत होते. मनीं वसे ते स्वप्नीं दिसे.
“ विनू, तू म्हणतोस तेच खरे आहे. ते स्वप्न होते.”
“ पक्की मला आता असे वाटते आहे की सुपरहिरो तुझ्या खोलीत येऊन लपले असणार. तू त्यांचा फॅन आहेस ना.त्यांना वाटले असणार, हा आपल्याला धोका देणार नाही.”
पक्कीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.विनूचे हे नेहमीचे होते. एकदा एक बोलेल तर दुसऱ्या क्षणाला त्याच्या उलट. हा सगळीकडे आपली गादी टाकून ठेवणार. जिथे रात्र होईल तिथे झोपणार.
आता पक्कीचे मन थोडे शांत झाले. आपण उगीचच स्वप्नांच्या दुनियेत जाऊन भरकटत गेलो ह्याची त्याला जाणीव झाली.
त्या रात्री पक्कीला शांत झोप लागली.
मधेच त्याला जाग आली. त्याच्या रूमचा दिवा कुणीतरी लावला होता. आई नाहीतर बाबा चेक करायला आले असणार. झोपला की नाही? का अजूनही काहीतरी फिजिक्सचे पुस्तक घेऊन वाचत बसला आहे. ही पक्कीची (वाईट) सवय होती. असं काही पुस्तक हाती लागलं की संपवल्याशिवाय तो झोपत नसे. जेव्हा आई नाहीतर बाबा येऊन त्याला ओरडायचे तेव्हा नाईलाज होऊन तो झोपायचा. दिवा बंद केल्यावर पुस्तक वाचणार तरी कसा? एकदा काय झाले तो स्टारट्रेक वाचत बसला होता. रात्रीचे दीड वाचले असतील. बाबा आले नि जाम रागावले. आणि दिवा बंद करून गेले. त्याला पुस्तक सोडवेना. गोष्ट रंगांत आली होती. स्टारशिप एन्टरप्राइज अल्फा क्वाड्रंटमध्ये प्रवेश करत होते. वर्महोल क्र. BH12A च्या किनाऱ्यावर पहारा द्यायचा होता. अश्यावेळी तो पुस्तक सोडून कसा झोपू शकणार? त्याने एक युक्ती केली. डोक्यावरून पांघरूण घेऊन पांघरूणाच्या आत मोबाईलच्या प्रकाशांत त्याने पूर्ण पुस्तक वाचून संपवले.
जो कोण त्याच्या खोलीत आला होता तो काही शोधत होता. टेबलाचे खण उघडून बंद झाले. कपड्याचे कपाट उघडून झाले. अजून शोधाशोध चालूच होती. त्याला पाहिजे होते ते सापडत नव्हते. पक्की वैतागला. त्याने पांघरून फेकून दिले आणि तो गादीवर बसला. अर्धवट झोपेतच त्याने विचारले, “ काय शोधता आहात? ”
“ सूर्यकुमार कुठे आहे? मला त्याचा वास येतो आहे. इथेच कोठेतरी लपून बसला आहे. ” हे ऐकताच पक्की खडबडून जागा झाला. हा बाबांचा आवाज नव्हता. तो आवाज फळ्यावर खडूने ओरखडा काढतात तसा होता. ह्याच्या तुलनेत बाबांचा आवाज कितीतरी गोड आहे.जेव्हा पक्कीने त्या कर्णकटू आवाजाच्या धन्याला पाहिले तेव्हा त्याची भीतीने गाळण उडाली. एखाद्या राक्षसासारखे दिसणाऱ्या त्याचे शरीर दगडी शिळेतून कोरलेले होते. त्याचा एकेक हात दहा किलोचा असावा.त्याचे दात दात नव्हते. ते सुळे होते.पक्कीच्या पोटात पावसाळ्यांत रस्त्यावर जसे खोल खड्डे पडतात तसा खड्डा पडला. पायाची हाडे विरघळून त्याऐवजी कापूस भरला गेला. छाती पोकळ झाली. त्याच्या डोक्यांत हजारो वॅटचा प्रकाश पडला. हा तर साक्षात सन्नाटा होता.सगळ्यांत भीतीदायक म्हणजे सन्नाटाला चार हात होते. चारही हातांनी तो सगळी कपाटे उचकटून सूर्यकुमारला शोधत होता.पुस्तकांच्या कपाटातली सगळी पुस्तके खाली कार्पेटवर अस्ताव्यस्त पडली होती. ते पाहून मात्र पक्कीला भयंकर राग आला. त्याची आयुष्यांत सगळ्यात आवडतीची गोष्ट म्हणजे पुस्तके होती. पुस्तकांची “ भीक मागा, उधार घ्या किंवा चोरी करा,” पण वाचा. हा त्याचा गुरुमंत्र होता.ती एवढी कष्टाने जपलेली पुस्तके ह्या धटिंगणाने वाटेल तशी फेकून दिली. सन्नाटाला सूर्यकुमार सापडेना तसा तो बेभान झाला. आता तो पुस्तकांची पाने फाडायला लागला होता. आपला राग तो पुस्तकांवर काढायला लागला.
पक्कीच्या भीतीची जागा आता रागाने घेतली होती, “ खबरदार सन्नाटा, तू पुस्तकांना हात लावलास तर,” पक्की ओरडला, “ इथे कोणीही सुपरहिरो नाहीत. तू खूप शोधाशोध केलीस. माझी झोप डिस्टर्ब केलीस. माझ्याकडे सुपाराहीरोंची फक्त कॉमिक्स आहेत. त्यांची रंगीत चित्रं बघून तुला वाटतंय की सुपेरहीरो इथेच लपले आहेत. पण ती फक्त चित्रे आहेत. मला तुझ्या बुद्धीची कीव येते. तू कधी शळेत गेला नाहीस का? छान छान चित्रांची पुस्तकं बघितली नाहीस का? एवढे अक्राळविक्राळ शरीर पण डोकं मात्र खोकं. आता कुठल्याही पुस्तकाला हात लावशील तर बघ. ------------”
सन्नाटा आश्चर्याने थक्क झाला. सर्व पृथ्वी पादाक्रांत केली त्याने पण एवढ्या उद्धटपणे त्याच्याशी कोणी बोलले नव्हते. “पुस्तकाला हात लावशील तर बघ? म्हणजे? तुझी ही हिम्मत! हे बघ, हे पुस्तक फाडतो. काय करणार आहेस तू.” सन्नाटाने एनिड ब्लायटनचे “फाइव फाईंडर्स” ला हात घातला.
पक्कीला आपण मोठी चूक केल्याची जाणीव झाली. उगीच आपण सन्नाटाला चॅलेंज केले. आता हा आपली सर्व पुस्तके फाडणार ह्याची जाणीव होऊन त्याला वाईट वाटले.
त्यानंतर ते नवल घडले. पक्कीची पुस्तके एकेक करून सन्नाटाच्या डोक्यांत जायला लागली. सन्नाटाने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग नव्हता.कल्पना करा की तुमच्या डोक्यांत कुणी फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. भूगोल, इतिहास, एनिड ब्लायटन, टिनटिन, बाबुराव अर्नाळकर, टारझन, गुप्त खजिना, अॅलिस इन वंडरलॅंड, इव्हा इबॉटसन, हार्डी बॉइज,जुल्स व्हर्न, एच जी वेल्स भरायला लागला तर तुमची काय अवस्था होईल? थांबा पळून जाऊ नका, अजूनही पुस्तके आहेत पक्कीकडे ---ऑ काय सांगताय काय राव? तुम्ही हे सगळे वाचले आहे? नशीबवान आहात. पण सन्नाटा तुमच्याइतका नशीबवान नव्हता. आयुष्यांत त्याने कधी पुस्तकाचे तोंड बघितले नव्हते. त्याला ही प्रकाशाच्या वेगाने डोक्यांत घुसणारी पुस्तके बघून घेरी यायला लागली.ज्ञानाच्या ओवरलोडने त्याचे डोके तापून लाल लाल झाले.
त्याने आपले डोके गच्च दाबून धरायचा प्रयत्न केला. पण आता त्याला ज्ञानाचे चटके बसायला लागले. त्याचे डोके आगीत तापून लाल झालेल्या लोखंडासारखे रेडहॉट झाले होते. अज्ञानात सुख असते हे त्याला कधी कळले नव्हते पण आता वळायला लागले होते. आता त्याचा काही उपयोग नव्हता. ज्या पुस्तकांचा त्याने अपमान केला होता ती पुस्तके त्याचा सूड घेणार होती आणि त्याला शहाणी करून सोडणार होती. आता त्याला आयुष्यभर शहाणपणाचे ओझे वाहायला लावणार होती.
सन्नाटा ओरडला,” ए पक्की, पाय म्हणजे काय? ए+ बी = बी +ए ? पायथागोरस ? बायनोमिअल थेरम, काळ काम वेग? ऋतु आणि ग्रहणे ? अर्कीमेडीस, बाप रे, अरे कुणीतरी मला वाचवा. आता मला सहन होता नाही रे ----”
ओरडता ओरडता त्याची शुद्ध हरपली.सन्नाटा हतबल होऊन जमिनीवर आडवा झाला. ज्याला आतापर्यंत कुणी हरवले नव्हते. त्या अजिक्य सन्नाटाला कागदाच्या पुस्तकांनी आडवे केले होते. सन्नाटाला निपचित पडलेले पाहून पक्की जागेवरून उठला. सन्नाटाच्या डोक्यांत अक्षरे,वाक्ये, क्रियापदे, विशेषणे, नाम ,सर्वनाम इत्यादी काय काय व्याकरण आणि शब्दकोश, समीकरणे, फार्म्युला भरून पुस्तके परत येत होती. सकाळ होईपर्यंत सन्नाटाची सगळी पुस्तके झोपेत वाचून होणार होती. सकाळी जेव्हा तो उठणार होता तेव्हा तो पक्की इतकाच शहाणा होणार होता.
त्याने पुस्तकांना प्रेमाने कुरवाळले. जखमी झालेल्या पुस्तकांना हळूवारपणे गोंजारले. उद्या सकाळी त्यांना मलमपट्टी करू असा विचार करून त्याने पुस्तकांना पुन्हा कपाटांत व्यवस्थित ठवून दिले.
पोस्टर मधून सुपरहिरो ते दृश्य अनिमिष नेत्रांनी बघत होते. तो थरार,ती भीती, ती निराशा, तो आनंद आणि शेवटी सुटकेचा निश्वास असा भावनांचा प्रवास! त्यांच्या आनंदाश्रूंनी पोस्टर ओलेचिंब झाले!
आता पक्कीसुद्धा गाढ झोपी गेला होता.
सकाळ झाली. पक्की जागा झाला. पण त्याआधी सन्नाटा जागा होऊन एक पुस्तक वाचण्यात मग्न झाला होता. त्याचे डोके नेहमीप्रमाणे दिसत होते. पक्कीने हळूच चोरून बघितले. पुस्तकाचे नाव होते ‘ हाउ टू टीच क़्वांटम फिजिक्स टू युअर डॉग. ‘ त्याला हसू फुटले.एकूण एका रात्रीत सन्नाटाने चांगलीच मजल मारली होती.
पक्कीच्या हसण्याच्या आवाजाने सन्नाटा डिस्टर्ब झाला. “ गुड मॉर्निंग डिअर पक्की.” तेवढ्यात खालून आईचा आवाज आला, “ पक्की, छोटं बाळ ते माझे! लवकर ये कांदा पोहे तयार होतील तेवढ्यांत.”
“ ही माझी आई बरका.” पक्कीने विचारायच्या आधीच सन्नाटाला सांगून टाकले.
“ पक्की मी आता जातो. पण जायच्या आधी तुझे आभार ! ह्या एका रात्रीत तू आणि तुझ्या पुस्तकांनी मला बरेच काही शिकवले. इतके दिवस मी मानव जातीचा तिरस्कार करत होतो. चुटकीसरशी मी अर्ध्या लोकांचा संहार केला. मला वाटले होते पृथ्वीवरचे अर्धे ओझे कमी होईल.अर्धे प्रदूषण संपेल. पृथ्वीचा विनाश टळेल. माझ्या ऑफिसने मला पृथ्वीची उपग्रहावरून घेतलेली छायाचित्रे पाठवली. प्रदूषण नक्कीच कमी झाले होते. पण आज तुझ्या पुस्तकांनी मला खरं ज्ञान दिले. अर्ध्या लोकांचा संहार करून हे साध्य करणे हा अन्याय तर होताच . त्याहीपेक्षा जास्त म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा होता.आज ह्या रानटी सन्नाटाला तू माणसांत आणलेस. थॅंक्स. अरे हो, हे पुस्तक घेऊन जातो आहे.वाचून झाले की परत करेन मग दुसरे घेऊन जाईन. बाय बाय ”
बाय बाय सन्नाटा ! दोस्ता सन्नाटा. तू असाच वाचत रहा!

.

कथा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

17 Oct 2021 - 10:45 am | आनन्दा

मस्त एकदम!!

चित्रगुप्त's picture

17 Oct 2021 - 10:19 pm | चित्रगुप्त

मनोरंजक आधुनिक बालकथा छान आहे.

ही मायबोली वर पण वाचलेली.. तुम्ही भन्नाट लि हिता प्रभुदेसाई!
प्लीज लिहित रहा.. आणि काढून टाकू नका कथा :)

भागो's picture

18 Oct 2021 - 1:12 pm | भागो

सध्या नवीन काही लिहिलेले नाही.
तरी पण ही कथा जरूर वाचा. नवीन आहे.
https://aisiakshare.com/node/8148
आणि ही पण
https://aisiakshare.com/node/8177
ह्या कथेचे closure बरोबर नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्याच कथेचा पुढचा भाग लिहिणार आहे.