उत्तर दे पण...

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 Oct 2021 - 9:19 am

इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून.
इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
* शेवटचं कडवं मूळ कवितेतील तसंच ठेवलंय.

उत्तर दे पण संदेशातुन
नको पाठवू बदाम रक्तिम,
रुक्ष कोरड्या जगण्यामध्ये
कसा साठवू पाउस रिमझिम?

नको पाठवू इमोजीतले
लाजाळू अन् सुमुख हासरे,
खुलता हासू ओठांवरती
प्रश्न विचारत बसती सारे.

नको पाठवू लाल चेहरे,
लटके रुसवे, रागही खोटे
समजुत काढुन मनवायाला
धावत यावे असेच वाटे.

नको पाठवू भिरभिरणारे
ओठांचे ते खट्याळ चंबू,
अशक्य आहे माहित तरीही
मनात वादळ, कसे थांबवू?

अधोमुख तू पाठवतो ते
हिरमुसले पण किती गोजिरे,
कळते सगळी गम्मत तरीही
जगणे होते सुखद साजिरे.

*पाठविशी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमधेच मिळते,
त्या नंतर तू जे जे लिहिशी
वाचायाचे राहून जाते.....

भावकविताकविता

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2021 - 9:20 am | प्राची अश्विनी

मूळ कविता
पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे,
लिपिरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे.
चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतुन,
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतुन.
शब्दामधुनी नको पाठवू
अक्षरामधले अधिरे स्पंदन,
नको पाठवू कागदातुनी
स्पर्शामधला कंप विलक्षण.
नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतुन,
नको पाठवू असे कितिकदा
सांगितले मी, तू हट्टी पण !
पाठविशी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमधेच मिळते,
पत्र त्या नंतरचे मग
वाचायाचे राहून जाते.....

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Oct 2021 - 6:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

जुन्या कवितेला नवा आधुनिक साज चढवण्याचा प्रयत्न केलेला आवडला.

पण आपल्या माणसाने हाताने शाई किंवा रक्त (जे उपलब्ध असेल ते) वापरुन लिहिलेल्या पत्रात जी मजा आहे ती मजा या व्हर्च्युअल दुनियेत नाही.

इथे एकच मेसेज अनेक जणांना / जणींना फॉर्वर्ड / कॉपी करुन पाठवणारे महाभाग आहेत. कितिही लपवले तरी ओरीजनल आणि कॉपी पेस्ट मधला फरक लपता लपत नाही.

दोन्ही कवितांच्या काळात झालेला हा जबरदस्त बदल आणि कविते मधल्या भावना यांचा मेळ बसत नाही.... म्हणून प्रयत्न आवडला असे म्हटले

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2021 - 11:31 am | प्राची अश्विनी

खरंय ती पत्र आणि हस्ताक्षराची सर इमोजीत नाही. पण आता जी भाजी भाकरी पदरी पडली ती गोड मानण्याशिवाय पर्याय नाही ना पैजारबुवा?

शानबा५१२'s picture

16 Oct 2021 - 8:31 pm | शानबा५१२

शब्दामधुनी नको पाठवू
अक्षरामधले अधिरे स्पंदन,

व्वा!!

नको पाठवू इमोजीतले
लाजाळू अन् सुमुख हासरे,
खुलता हासू ओठांवरती
प्रश्न विचारत बसती सारे.हे 'मॉडीफीकेशन' खुप आवडले. कवितांमध्ये मुड फ्रेश करायची जी क्षमता असते, ती लेखात नसते. खुप काही, खुप कमी शब्दात फक्त कविता सांगु शकते.
ही कविता वाचताना 'अनु मलिक' हे नाव मधेच आठवले. :-)

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2021 - 11:31 am | प्राची अश्विनी

टोमणा पोचला हो:)

प्रचेतस's picture

17 Oct 2021 - 6:08 am | प्रचेतस

मस्त एकदम.

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2021 - 11:31 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2021 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2021 - 9:23 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर!

सुंदर गुंफण झाली आहे,शेवट तोच ठेवला . मस्त केले :)
जरा अजून डिजिटल,सहजच!

नको पाठवू फुले हळूच
गुलाब ,चमेली अनामिक अजूनी
सुवासिक स्पर्शाचा भासच
मनवेल अलगद तुझ्या अंगणी!

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2021 - 9:22 am | प्राची अश्विनी

वा!

श्रीगणेशा's picture

18 Oct 2021 - 8:29 pm | श्रीगणेशा

छान!

थोडंसं अजून डिजिटल (आपली कविता वाचल्या-वाचल्या सुचलं :-))

नको पाठवू शब्दकोडे ते
इंग्रजी लिपीतील मराठीचे
अबोल्यातही सोबत असते माझ्या
तू 'शेवटचे पाहिलेले'

शेवटचे पाहिलेले -- last seen :-)

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2021 - 9:23 am | प्राची अश्विनी

अबोल्यातही सोबत असते .....
वाह!
शब्दकोड्याचा कुठला इमोजी? कळला नाही.

श्रीगणेशा's picture

19 Oct 2021 - 1:55 pm | श्रीगणेशा

Ingraji lipit lihilele मराठी वाचणे म्हणजे शब्दकोडे सोडवण्यासारखेच आहे.
त्या अर्थाने "शब्दकोडे" शब्द वापरला आहे :-)

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2021 - 12:55 pm | प्राची अश्विनी

ओह. ओके. :)

कुमार१'s picture

19 Oct 2021 - 8:54 am | कुमार१

आवडली.

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2021 - 9:23 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!:)

कर्नलतपस्वी's picture

21 Oct 2021 - 10:18 am | कर्नलतपस्वी

प्रसंग तोच पण कालानुरूप पोशाख(शब्द) बदली होतात हे बा भ बोरकर आणी संदिप खरे याच्या खालील कवितेतून प्रकर्षाने जाणवले. दोघेही आवडते पण तुलना नाही. बोरकरांची कविता माला जास्त जवळची वाटते खरे यांच्या,"नसतेस " पेक्षा.

तू गेल्यावर फिके चांदणे...

तू गेल्यावर फिके चांदणे
घरपरसू हि सुने सुके
मुले मांजरापरी मुकी अन
दर दोघांच्या मध्ये धुके

तू गेल्यावर या वाटेने
चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक, झाले नकळे
अवघे जग परके-परके

नसतेस घरी तू जेव्हा,
नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो