रोज किती पाणी प्यावे?

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
6 Oct 2021 - 5:57 am
गाभा: 

पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.

प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस.

(मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी).

सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात :
१. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते.
२. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो.

वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते.

रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते.

आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते.
आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही.

जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते :
१. हवामान
२. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी
३. श्रम बंद जागेत की रस्त्यावर मोकळ्या हवेत
४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि
५. मूत्रपिंडांचे कार्य.

पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते.

आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते.

आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न.
सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो.

समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे.

समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते.

'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल.

आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही.

पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे.

पुन्हा एकदा महत्त्वाचे :
ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.
……………

मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे:
https://www.misalpav.com/node/41739

.

प्रतिक्रिया

hrkorde's picture

6 Oct 2021 - 8:15 am | hrkorde

दिवसभरात ५०० मिलिच्या चार बाटल्या ( पाणी बिस्लेरीचे नव्हे, घरातच किण्वा ऑफिसातले टॅप वॉटर) व्यवस्थीत मोजुन संपतात

मार्कस ऑरेलियस's picture

6 Oct 2021 - 9:13 am | मार्कस ऑरेलियस

रोज किती पाणी प्यावे?

>>> तहान लागली की तहान शमेल इतके पाणी प्यावे ,

भूक लागली की पोट भरेल इतके जेवण करावे ,

झोप झाली की रीफ्रेश वाटेल इतकी झोप घ्यावी ,

इंद्रियाचे आवेग आले की "आहाहा, आता बास" इतके तृप्त वाटेल एवढे सेक्स करावे ,

बँकेच्या कर्जाचे टेन्शन येणार नाही इतका पगार देणारी नोकरी / स्वतःचा व्यवसाय करावी

आजारी पडल्यास बरें वाटेल इतकीच औषधे घ्यावीत

आजारी पडूच नये ह्यासाठी जितका व्यायाम करावा लागतो तितकाच नित्यनेमाने करावा.

चार लोकांत बावळट दिसणार नाही अन स्वतःलाच अभिमान वाटेल इतकेच शिक्षण घ्यावे

आयुष्य खुप सोप्पं आहे - फक्त हा बॅलन्स , हा योग साधता आला पाहिजे , बस्स प्रमाणामध्ये सर्व काही असावे

:)

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 12:09 pm | कुमार१

तुम्ही दुवा दिलेली कविता चांगली आहे.
फक्त अतिलांब वाटली; कडवी प्रमाणातच असती तर अधिक छान झाले असते !

उन्मेष दिक्षीत's picture

8 Oct 2021 - 1:30 pm | उन्मेष दिक्षीत

आणि एक

रोज किती पाणी प्यावे ? असले विचार करत बसू नये :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Oct 2021 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार

त्यामूळे एकाच मापात सगळ्यांना तोलता येणार नाही हे खरे आहे.
प्रत्येकाने आपापले डॉक्टर व्हायचे आणि आपल्याला कोणत्या पदार्थाची किती गरज आहे हे ठरवायचे.
पाण्याचेही तसेच आहे.

हा मुद्दा पटला

आपले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात आणि विचार करायला भाग पाडतात.

पैजारबुवा,

आग्या१९९०'s picture

6 Oct 2021 - 9:18 am | आग्या१९९०

आजारी पडल्यास बरें वाटेल इतकीच औषधे घ्यावीत
चुकीचा सल्ला. डॉक्टरांनी दिलेला औषधाचा संपूर्ण कोर्स पूरा करावा. अर्धवट कोर्स धोकादायक.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 9:27 am | Rajesh188

नेहमी प्रमाणेच क्लिष्ट माहिती सोप्या शब्दात तुम्ही दिली आहे.उत्तम माहिती.

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 9:46 am | कुमार१

उत्साही प्रतिसादकांचे आभार आणि सर्वांच्या मतांशी सहमती !

फुटूवाला's picture

6 Oct 2021 - 10:03 am | फुटूवाला

कायप्पा वर जेवणाआधी अमुक वेळेपूर्वी इतके अन जेवणानंतर ठरावीक वेळानंतर इतके पाणी पिलेच पाहिजे असं वाचायला मिळतं. हे सगळं या सोडून मन भरेल इतकं पाणी मी पितोच.

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 10:19 am | कुमार१

ज्यांची पचनसंस्थेची कुठलीही तक्रार नाही, त्यांनी जेवणापूर्वी, जेवताना किंवा जेवल्यावर लगेच पाणी प्यावे किंवा पिऊ नये यासंबंधी काहीही शिफारस नाही .
मात्र,
ज्यांना जठराम्लतेचा आणि अन्न उलट्या दिशेने वर येण्याचा त्रास आहे त्यांनी जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे टाळलेले बरे असते.

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 10:22 am | सुबोध खरे

डॉक्टर कुमार

you are spot on

कंजूस's picture

6 Oct 2021 - 10:51 am | कंजूस

उन्हात भटकले की dehydration होते. मग भरपूर पाणी प्यायल्यावरच समाधान होते. एकदा साडे सात लिटर्स प्यायलो होतो.

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 11:02 am | कुमार१

डॉ. सुबोध धन्यवाद.

कंजूस बरोबर.
अशा प्रसंगी शरीरच आतून भरपूर पाण्याची मागणी करत असते.

नेहमीप्रमाणेच नेमका आणि माहितीपूर्ण लेख...

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 11:13 am | गॉडजिला

पाणी. आणि दारू याचे नेमके प्रमाण नाही हेचं खरे..

hrkorde's picture

6 Oct 2021 - 11:14 am | hrkorde

दारू सोडा

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 12:26 pm | गॉडजिला

पण तरीही व्हिस्कीमधे पाणी घ्यावेच लागते.

खरंय. सोड्यावर करून करून किती खर्च करणार ? उगाच गॅसने पोट भरून जाते ते वेगळेच.

hrkorde's picture

6 Oct 2021 - 12:51 pm | hrkorde

फक्त बीअर पितो
वर्षातून 1 किंवा 2 दा फक्त

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 12:52 pm | गॉडजिला

...

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 1:39 pm | कुमार१

बाकी…

पाण्याच्या या धाग्यावरील रंगीत पाण्याची उपचर्चा रंगली आहे खरी :)

चौथा कोनाडा's picture

8 Oct 2021 - 5:42 pm | चौथा कोनाडा

उत्तम मुद्दा. वेगळा चर्चाधागा निघण्याची गरज.

अनिंद्य's picture

6 Oct 2021 - 11:22 am | अनिंद्य

छान लेख डॉक्टर.

ह्या विषयावर कायप्पा विद्वानांनी वात आणलाय :-) खूप पाणी प्या ते जास्त पाणी मुळीच पिऊ नका अशी फुल रेंज आहे.

स्वतःचे पाणी पिण्याचे प्रमाण पूर्ण वर्षभर साधारण सारखेच असते माझे. मला हिवाळ्यातही एवढी तहान का लागते असे प्रश्न विचारले जातात :-)

अमर विश्वास's picture

6 Oct 2021 - 11:30 am | अमर विश्वास

उत्तम माहितीपूर्ण लेख ...

तहान व भुकेच्या बाबतीत शरीर आपल्याला नेहमीच संदेश देत असते ... तो ऎकणेच श्रेयस्कर

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 11:39 am | कुमार१

व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !

सारांश :
आपल्या शरीराचे 'ऐका ';
समाजमाध्यमांवरील अनधिकृत सल्लागारांचे अजिबात नको !!

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2021 - 12:03 pm | प्रकाश घाटपांडे

मला गाउटसाठी तहान फारशी नसली तरी नेहमीच पाणी थोडे थोडे पीत राहा असा सल्ला डॉ नी दिला आहे.

सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायचे.हा प्रकार पण समाज मध्यामवरील माहिती मुळेच समाजात पसरला आहे.

रामदास२९'s picture

6 Oct 2021 - 3:40 pm | रामदास२९

सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायचे.हा प्रकार पण समाज मध्यामवरील माहिती मुळेच समाजात पसरला आहे.

.. खर आहे.. लिम्बूपाणी चान्गल पण कोणतीही गोष्ट अती नको..समाज माध्यमान्वरच सगळच खर नसते..

तर्कवादी's picture

6 Oct 2021 - 4:45 pm | तर्कवादी

पाणी पिण्याबद्दल इतरही काही मुद्दे चर्चिले जातात
जसे की
१) उभे राहून पाणी पिवू नये, बसूनच प्यावे. उभ्याने पाणी पिल्यास पुढे गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. अर्थात बसून शांतपणे पाणी पिणे चांगलेच आणि त्यात काही तोटाही नाही पण उभ्याने पाणी पिण्याचा गुडघेदुखीशी संबंध कितपत खरा आहे ?
२) अगदी थोडे थोडे पाणि पिवू नये एका वेळी बरेच (किमान २००-४०० मिली वगैरे) पाणी प्यावे. यात कितपत तथ्य आहे. अर्थात एखाद्या तासाच्या मिटींगकरिता मिटींगरुममध्ये येताना बाटली सोबत आणून दर पाच दहा मिनटांनी बाटली तोंडाला लावणारी काही मंडळी बघून मला वीट येतो.
३) काही लोक तोंडात पाणी चूळ भरताना घुळवावे तसे घुळवून मग पितात कारण त्यांच्या मते त्याचा आरोग्याला काही फायदा असतो (समोर बसलेल्याला हा फार इरिटेटींग प्रकार वाटू शकतो)

माझे एक निरीक्षण आहे - जेवणानंतर पान खाल्ल्याने तहान वाढते. त्यामुळे कधी जास्त जेवण झाल्याने फारसे पाणी पिण्याची इच्छा होत नाही अशी समस्या असेल तर हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 6:57 pm | कुमार१

तर्कवादी
चांगले प्रश्न. दोन टप्प्यात उत्तरे देतो.

१. पाणी उभ्याने न पिता बसून प्यावे >>
खाणे पिणे बसून केले असता चित्तवृत्ती स्थिर असते हा महत्वाचा मुद्दा. उभ्याने अथवा चालत्या वाहनात 'वरून ' पाणी पिल्यास ठसक्याची शक्यता वाढते. मात्र याचा गुडघेदुखीची संबंध असल्याचे आधुनिक वैद्यकीय संशोधन संदर्भ माझ्या वाचनात नाहीत.

२. घोटाघोटाने पाणी पिणे काय किंवा दोन भांडी भरून एकदम पिणे काय, हा सवयीचा किंवा आवडीचा भाग आहे. याचा आरोग्याशी संबंध नाही.

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 7:06 pm | कुमार१

३. तोंडात पाणी घुळवून पिणे >>>

आपल्या तोंडात उपयुक्त व घातक अशा दोन्ही सूक्ष्मजंतूंचा सहवास (सिम्बायोसिस) असतो. अशाप्रकारे पाणी पिल्याने तोंडातील उपयुक्त सूक्ष्मजीव शरीरातच राहतात. त्यांचे राहणे हे मौखिक आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर आहे. अर्थात हा विषय गहन असून त्यावर दंतवैद्याने भाष्य केल्यास बरे.

४. विड्याचे पानात जे विशिष्ट अल्कलॉइड असते त्यामुळे तोंडाला कोरड पडते. याबाबतीत माझा दुहेरी अनुभव सांगतो:

* सणाच्या दिवशी आपण घरी जे कामचलाऊ पान बनवतो त्याने कोरड जास्त पडते.
* मात्र चांगल्या टपरीवरील शिस्तीत बनवलेले मसाला पान खाल्ल्यास तुलनेने कोरड कमी राहते. याचे कारण कदाचित, ते लोक कात, चुना व इतर जे काही घटक मुबलकपणे वापरतात त्यामध्ये असावे. मात्र याचा माझा पुरेसा अभ्यास नाही.

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:00 pm | सुबोध खरे

उभ्याने पाणी पिण्याचा आणि गुढघेदुखीचा काहीही संबंध नाही. आपण प्यायलेले पाणी जठरात उतरते आणि तेथून आतड्यात जेथे ते संपूर्णपणे रक्तात शोषले जाते तेंव्हा हे पाणी गुढघ्यापर्यंत पोचणे शक्य नाही. कुणी तारि गुढघ्यात मेंदू असलेल्याने हा गैरसमज पसरवलेला असावा.

एकदम आणि हळूहळू पाही पिण्याने काय फरक पडेल?
जंगलात प्राणी दिवसात एकच वेळेस पाणी पितात आणि बहुतेक प्राणी उभ्या नेच पाणी पितात त्यांचं काही नुकसान झाल्याचा किंवा गुढघेदुखी झाल्याचा कोणताही पुरावा नाही.

काही लोक तोंडात पाणी चूळ भरताना घुळवावे तसे घुळवून मग पितात.
त्याने दातात अडकलेले कण साफ होतात एवढं सोडलं तर फार काही फायदा नाही. मुळात काहीही खाल्लं कि तोंड भरपूर पाण्याने धुवावे म्हणजे दातातील अन्नकण अडकून राहणार नाहीत.

जेवणानंतर पान खाल्ल्याने तहान वाढते.
पानात चुना आणि काथ/ कात हे पदार्थ astringent सारखे आहेत. त्यामुळे आपले तोंड आणि घसा कोरडा पडतो आणि आपल्याला तहान लागल्याची संप्रेरणा( sensation) होते. मग आपण पान खाण्याच्या अगोदर चार ग्लास पाणी प्यायला असलात तरी.

अशीच भावना आपल्याला बेसनाचा लाडू खाल्ल्याने होते कारण बेसन तोंडातील लाळ आणि तेलकट पदार्थ शोषून घेते आणि तोंड कोरडे पडते.

चांगला लेख आणि उपयुक्त माहिती मिळाली.

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 5:23 pm | गॉडजिला

माझे एक निरीक्षण आहे - जेवणानंतर पान खाल्ल्याने तहान वाढते. त्यामुळे कधी जास्त जेवण झाल्याने फारसे पाणी पिण्याची इच्छा होत नाही अशी समस्या असेल तर हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही

याला आम्ही ऑक्सिजन युक्त पाणी असे गमतीने म्हणतो... तुम्ही बराच वेळ पाणी न पिता पान अथवा विशेषतः विमल गुटखा खाल्ला व नंतर पाणी पिले की त्या पाण्याची चव अन् तृप्ती एकदम भंनाट लागते अगदी सर्व गात्रे तृप्त होऊन जातात.. त्यावेळी पाणी अक्षरशः अधाशासारखे घटाघटा व शोषून पिले जाते जणू काही एखाद्या वंपायरने रक्त प्राशन करावे असे...

तर्कवादी's picture

6 Oct 2021 - 6:45 pm | तर्कवादी

जणू काही एखाद्या वंपायरने रक्त प्राशन करावे असे.

अरे बापरे...आता पुढच्या वेळी पान खावून पाणी पिताना वॅम्पायर असल्याचा भास होईल

आवळा खल्यावर प्यालेले पाणी पण गोड लागते व तृप्ती देणारे असते.

दीपक११७७'s picture

6 Oct 2021 - 5:24 pm | दीपक११७७

खूप सुंदर माहिती!

दोन प्रश्न
1. आधुनिक व्यायाम पद्धति -बॉडी बिल्डिंग मध्ये पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो हे खरे आहे का? असेल तर का?
2. सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याची सुद्धा पध्दत आहे, त्याचा काही फायदा आहे का?

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:13 pm | सुबोध खरे

आधुनिक व्यायाम पद्धति -बॉडी बिल्डिंग मध्ये पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो

असा सल्ला दिला जात असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. उलट व्यायामानंतर शरीराला घामावाटे बाहेर पडलेल्या पाण्याची भरपाई करणे आवश्यक आहे तेंव्हा भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याची सुद्धा पध्दत आहे

सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याने रात्रभरात आपल्या तोंडात वाढलेले जिवाणू आणि दातात अडकलेले आणि रात्रभरात सडलेले अन्नकण पोटात जातील तेंव्हा तोंड न धुता पाणीच काय पण चहा पिणे हे आरोग्याला अजिबात हितकारी नाही.
रात्री झोपल्यावर आपल्या तोंडात लाळनिर्मिती बरीच कमी होते.कारण झोपेत आपले शरीराचे सगळे स्नायू शिथिल पडतात त्यामुळे लाळ घशात जाऊन ठसका लागण्याचे प्रमाण नगण्य असते. काही जणांना थोडी जास्त लाळ निर्माण झाल्याने तोंडातून लाळ बाहेर पडून उशी ओली होऊ शकते.पण तरीही हे प्रमाण दिवस निर्माण होणाऱ्या लाळेपेक्षा खूप कमी असते. लाळेत जंतुघ्न पदार्थ असल्याने आणि सतत तयार होणाऱ्या लाळेबरोबर आपले तोंड स्वच्छ राहते त्यामुळे तोंडात सहसा जिवाणू आणि बुरशीची अनिर्बंध वाढ होऊ शकत नाही.
झोपेत सात तास एकंदर तोंडात लाळ कमी झाल्याने तोंडात जिवाणूंची वाढ जास्त होते ते जिवाणू पोटात ढकलणे कितपत योग्य आहे.
तोंड न धुता "बेड टी घेणे" हि इंग्रजी पद्धत अत्यंत चुकीची आहे.

दीपक११७७'s picture

12 Oct 2021 - 11:43 am | दीपक११७७

धन्यवाद

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 7:34 pm | कुमार१

व्यायामशाळेतील स्नायूवर्धक व्यायाम आणि पाणी कमी पिणे यांचा संबंध नाही. परंतु, मॅरेथॉन सारख्या शर्यतपटुंनी किती आणि कशा पद्धतीने पाणी प्यायचे याचे शास्त्रशुद्ध अभ्यास आहेत. काही क्रीडावैद्यकीय संदर्भ चाळले असता ते वाचायला मिळतात.

अशा शर्यतपटुंनी शर्यतीपूर्वी, शर्यतीदरम्यान आणि शर्यतीनंतर कसे पाणी प्यायचे याच्या सूचना तज्ञांकडून दिल्या जातात.

या खेळाडूंनी एकदम गटागटा पाणी पिऊन चालत नाही. त्याऐवजी शर्यतीदरम्यान दर वीस मिनिटांनी कपभर पाणी पिणे यासारख्या सूचना त्यांना दिल्या जातात.
अर्थात हा प्रांत क्रीडावैद्यक तज्ञांचा आहे.

दीपक११७७'s picture

12 Oct 2021 - 11:44 am | दीपक११७७

धन्यवाद

कुमार१'s picture

6 Oct 2021 - 5:35 pm | कुमार१

व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !

वरील काही प्रतिसादांमध्ये ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्यांचे सवडीने व यथाशक्ति निरसन करतो.

टर्मीनेटर's picture

6 Oct 2021 - 9:49 pm | टर्मीनेटर

चांगला लेख आणि रोचक चर्चा!
खाण्या-पिण्याच्या काही चांगल्या(?) सवयींमुळे आधी डिहायड्रेशनचा त्रास बरेचवेळा व्हायचा पण नंतर तद्न्य मंडळींनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण आणि सोबतच्या फराळी पदार्थांमध्ये योग्य ते बदल केल्यावर तो त्रास बंद झाला 😀

आपले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात
सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणे ही पण अंधश्रद्धा च आहे का यावर माहिती द्यावी

लिंबामध्ये क जीवनसत्व आहे. त्याचा शरीराला कधीही पिले तर फायदा होईल. परंतु लिंबू हे आम्लधर्मी सुद्धा आहे.
सकाळी उठल्याबरोबर त्याचे पाणी पिणे याचा मला तरी काही विशेष फायदा दिसत नाही. उलट, ज्यांना जठरातील आम्लतेचा त्रास आहे त्यांनी ते रिकाम्या पोटी पिऊ नये असे माझे मत आहे.

सकाळी उठल्यानंतर साधे पाणी पिणे पुरेसे आहे.

दररोज सकाळी लिंबूपाणी पिल्यास लिंबातील आम्लामुळे टूथ एनॅमलची हानी होते असे ऐकलंय, हे खरे आहे का?

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 8:26 am | कुमार१

चामुंडराय
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे.

मी स्वतः या गटातच मोडतो आणि त्यासंदर्भात माझ्या दंत वैद्याने मला सल्ला दिलेला आहे की शुद्ध स्वरूपातील लिंबू थेट दातांना लागू देऊ नका.

आता यातले काही बारकावे बघू.
तारुण्यात दात बळकट असतात आणि जठराच्या आम्लतेचा काही त्रास नसेल तर मग लिंबू पाणी पिल्याने दातांवर तसा परिणाम होणार नाही. अर्थात ते पिल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरणे केव्हाही उत्तम.

ज्येष्ठ वयामध्ये एकंदरीत दातांची झीज चालू होते. त्याच्या जोडीला आम्लतेचा त्रास असेल तर जठरातील आम्ल काही प्रमाणात वर येऊन दातांच्या एनामलची झीज वाढवते. अशा व्यक्तीने जर लिंबू वारंवार थेट दातांना लागू दिले तर मग त्या झिजेमध्ये भर पडत राहते.

मी अशी काळजी घेतो :
जेवणात मी रसयुक्त भाजी किंवा आमटीमध्ये लिंबू पिळतो. अशा तऱ्हेने ते माझ्या पोटात जाते.

सुधीर कांदळकर's picture

7 Oct 2021 - 6:30 am | सुधीर कांदळकर

झाले. छान नीटनेटका सोप्या भाषेतला लेख. अवघड विषयावर आपण इतक्या सोप्या भाषेत लिहिले आहे त्याबद्दल सलाम. धन्यवाद.

लई भारी's picture

7 Oct 2021 - 9:03 am | लई भारी

नेहमीप्रमाणेच चांगला लेख आणि प्रतिसादात चर्चिलेले मुद्दे एकदम उपयुक्त!

अभिजीत अवलिया's picture

7 Oct 2021 - 9:31 am | अभिजीत अवलिया

माझा एक मित्र तहान लागली नसली तरी विनाकारण पाणी पीत असे. कार्यालयीन अंदाजे ९ तासात जवळपास ४ लिटर व घरचे धरुन ७-८ लिटर रोजचे. एके दिवशी काहीतरी त्रास झाला व ३ दिवस अॅडमिट करावे लागले. अति पाणी पिल्याने शरीरातिल सोडियम कमी झाले होते असे डाॅक्टर म्हणाले. मग इथे मूत्रपिंडानी अतिरिक्त पाणी बाहेर का टाकले नसावे?

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 9:41 am | कुमार१

हे पहा

"जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही".
...
तुमच्या मित्राच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. वरील तीन पैकी कुठलीही यंत्रणा नीट काम करत नसेल किंवा काही स्वरूपाचा मनोविकार असेल तर ते पाहिल्यानंतरच उत्तर देता येईल.

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 9:48 am | कुमार१

काही मनोविकारात, विशेषता विशिष्ट औषधे चालू असतील, तर लेखात उल्लेख केलेल्या ADH या हार्मोनच्या नियंत्रणात बिघाड होतो.
त्यामुळे ते हॉर्मोन अतिरिक्त स्त्रवते व रक्तात अधिक पाणी साठवू देते.
रक्तातील पाण्याचे प्रमाण खूप वाढले तर मग सोडियमचे तुलनात्मक प्रमाण कमी होते.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Oct 2021 - 10:10 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान माहिती.

मला सकाळी आवळा खाण्याची सवय आहे .कच्चा आवळा मीठ टाकून.त्या मध्ये क जीवनसत्व असते.आणि लिंबसारखा आंबट पना पण असतो.
त्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे माझी acidity ची समस्या पूर्ण नष्ट झाली आहे.तिखट खाल्ले की उचकी लागण्याचा प्रकार आणि बाकी avidity च त्रास बंद झालं आहे.
पण दातांसाठी आवळा कच्चा खाणे योग्य आहे की अयोग्य .
ह्याची माहिती द्यावी.

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 10:29 am | कुमार१

वर चामुंडराय यांना जे लिंबासंबंधी उत्तर दिले आहे तेच तत्त्व आवळ्याच्या बाबतीत लागू होईल.

दात मुळात दणकट असतील तर खा बिंदास्त.
दातांची झीज झाली असेल तर आवळा चूर्ण स्वरूपात खाऊन पटकन पाणी पिऊन टाकायचे

सुबक ठेंगणी's picture

7 Oct 2021 - 12:45 pm | सुबक ठेंगणी

महत्त्वाच्या प्रश्नावरची उत्तम चर्चा. माझे काही प्रश्न आहेत.
मागे एकदा वाचनात आले होते की मेंदूमधले तहान आणि भुकेचे केंद्र एकच असते.
त्यामुळे बऱ्याचदा भूक लागल्याची भावना होते पण खरं म्हणजे शरीराला पाण्याची गरज असते. हे कितपत खरे आहे? सतत जर अश्याप्रकारे तहान आणि भुकेची गल्लत केली गेली तर शरीराला काही अपाय होईल का ? (वजन वाढणे ही गोष्ट अलाहिदा!)
दुसरा प्रश्न असा की मधुमेहींना जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे हे प्रकार का होतात?
लेखाच्या मूळ विषयाला थोडे tangent प्रश्न आहेत. पण डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे.

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 12:51 pm | कुमार१

मधुमेहींना जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे हे प्रकार का होतात?>>>

या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. परिणामी त्यांना लघवीला जास्त प्रमाणात होते. (ग्लुकोज मूत्रमार्गातून जाताना त्याच्या बरोबर अधिक पाणी खेचतो)
अशा अतिरिक्त झालेल्या लघवीमुळे शरीरातील पाणी कमी होते. ते भरून काढण्यासाठी तहान केंद्राला संदेश जातात.

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 4:06 pm | कुमार१

मेंदूमध्ये भूक व तहान यांची नियंत्रण केंद्रे हायपोथॅलॅमस नावाच्या भागात असतात. परंतु या भागामध्ये दोन वेगळ्या प्रकारची विशिष्ट उपकेंद्रे पण असतात. या दोन संवेदनासाठी वेगवेगळे receptorsआहेत.

भुकेचे नियंत्रण ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ती खालील घटकांवर अवलंबून असते :
१.मानसिक अवस्था
२. अनुवंशिकता आणि
३. सुमारे डझनभर हॉर्मोनस

भूक व तहान यांची चेतातंतूंची नेटवर्क वेगवेगळीअसल्यामुळे त्यांच्या समजण्यात गल्लत होत नाही.

बापूसाहेब's picture

7 Oct 2021 - 12:58 pm | बापूसाहेब

माझा एक प्रश्न..

मला कधीकधी पूर्ण दिवस तहान च लागत नाही. पूर्ण दिवस मी जेवणाव्यातिरिक्त पाणी पीत पण नाही.. चहा आणि जेवणादर्म्यान घेतलेले पाणी याशिवाय एक्स्ट्रा पाणी प्यावे असं वाटतं नाही. सगळं मिळून फारतर १-१.२५ लिटर... त्यामूळे लघवी ला सुध्दा एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा जावे लागते.

आत्ता प्रश्न - जर तहानच लागत नाही हे नॉर्मल आहे का ?? ईतर कोणाला असा अनुभव आला आहे का ???
आणि मग शरीर पाणी मागत नाही तर दिवसातून x लिटर पाणी पिलेच पाहिजे असं म्हणणारे लोकांचं ऐकून विनाकारण पाणी पिणे योग्य आहे का??

टीप - मी सध्या WFH आहे. घरातून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर पडतो. जेव्हा बाहेर जातो त्यावेळी तहान नॉर्मल लागते, आणि त्यावेळी दिवसभरात ३-४ लिटर पाणी पोटात जाते ..

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 2:09 pm | कुमार१

**आणि मग शरीर पाणी मागत नाही तर दिवसातून x लिटर पाणी पिलेच पाहिजे असं म्हणणारे लोकांचं ऐकून विनाकारण पाणी पिणे योग्य आहे का??>>>

नाही. लोकांचे ऐकायची गरज नाही.

**आता शरीराची पाण्याची गरज समजून घेऊ. यात जमेच्या बाजूला खालील गोष्टी असतात :
१. प्रत्यक्ष पाणी पिणे
२.अन्नपदार्थमधूनही बर्‍यापैकी पाणी पोटात जाते आणि
३.शरीरातील चयापचय प्रक्रियेमुळे शरीरातही पाणी निर्माण होते.

याउलट पाणी उत्सर्जन हे लेखात दिल्याप्रमाणे तीन मार्गांनी होते.
जेव्हा तुम्ही घरात बसूनच बराच काळ काम करीत आहात तेव्हा घामाचा भाग बराच कमी होतो. लघवी एक ठराविक प्रमाणात तर 24 तासात होतच राहते.
तुमच्या बाबतीत अशी शक्यता आहे की

अन्नपदार्थात अंतर्भूत असलेले पाणी + शरीरात निर्माण झालेले पाणी + थोडे पिलेले पाणी
आणि
लघवी वाटे उत्सर्जन यांचा आपोआप समतोल साधला जात आहे.
तुम्हाला जरी तहान लागत नसली तरी लेखात दिलेले हे ADH हे हॉर्मोन तुमच्या नकळत शरीरात पाणी टिकवण्याचे काम करतच असते.

हे वेगवेगळे प्रकार असावेत असे अनुभवाने वाटत.
डोंगर चढायला continue सुरुवात केली ,किंवा खूप धावले की पाणी पिण्याची तीव्र भावना होते.ती भावना थांबवू शकत नाही.
कधी जोरात मार लागला,उदा . पाय जोरात मुरगळला तरी अशी तीव्र पाणी पिण्याची भावना निर्माण होते.
नॉर्मल तहान लागणे आणि पाणी पिण्याची तीव्र भावना निर्माण होणे है नक्की कशा मुळे घडते.
आणि तीव्र पाणी पिण्याची भावना झाल्यावर पाणी नाही मिळाले तर शरीरावर काय परिणाम होतो.

नॉर्मल तहान लागणे आणि पाणी पिण्याची तीव्र भावना निर्माण होणे है नक्की कशा मुळे घडते.>> हे लेखात दिले आहे रक्ताच्या विशिष्ट घनतेमुळे.

...
पाणी नाही मिळाले तर शरीरावर काय परिणाम होतो.
>>>
डिहायड्रेशन व त्याचे पुढे मेंदू कार्यावर परिणाम

रविकिरण फडके's picture

7 Oct 2021 - 2:28 pm | रविकिरण फडके

डॉक्टर,

सकाळी उठून रिकाम्या पोटी अमुक इतके - पाऊण लिटर, एक लिटर, इ. - पाणी प्यायचे, असे जे खूप लोक करतात, त्यावर तुमचे काय मत आहे ते एकदा लिहावे (किंवा हा विषय पूर्वी घेतला असेल तर लिंक द्यावी) ही विनंती.

मी असले काही कधी केलेले नाही परंतु ही पृच्छा अशासाठी, की असे करणे चूक आहे असे मत एका डॉक्टरांनी (वैद्य) दिले होते. त्यांचे म्हणणे असे होते, की ह्यामुळे फायदा तर काहीच होत नाही, उलट अन्नपचनासाठी जे रस जठरात निर्माण झालेले असतात ते अतिरिक्त पाणी प्यायल्याने dilute होतात, सबब पचनावर अनिष्ट परिणाम होतो.

धन्यवाद.

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 3:07 pm | कुमार१

रवी

वर मी बापूसाहेबांच्या प्रश्न -उत्तरामध्ये दिल्यानुसार पाण्याचा दैनंदिन( चोवीस तासांचा ) समतोल साधला गेला म्हणजे झाले.
त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच एक लिटर पाणी पिणे अनावश्यक आहे.
माझे मत हे आधुनिक वैद्यकानुसार आहे.

( पारंपरिक आरोग्यशास्त्रांच्या नुसार जर कोणाचे काही वेगळे मत असेल तर ते संबंधित तज्ञाने सांगावे).

वामन देशमुख's picture

7 Oct 2021 - 2:58 pm | वामन देशमुख

लेख आवडला कुमार१! पाणी पिण्याबद्धलचे-न पिण्याबद्धलचे अनेक समज-गैरसमज दुरुस्त झाले. काही प्रतिसादही माहितीवर्धक आहेत.

मी साधारणपणे दर तासाला दीड दोन ग्लास पाणी पितो. जेवणाआधी-जेवताना-जेवणानंतर शक्यतो पाणी पीत नाही, पिले तरी अगदी घोटभर पितो.

चहा-कॉफी घेत नाही, सोबतचे कुणी घेत असतील तर त्यावेळी पाणी पितो.

पाणी हे माझे आवडते पेय आहे!

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 3:10 pm | कुमार१

पाणी हे माझे आवडते पेय आहे!
>>>
माझेही !
एवढेच नाही तर पाणी हे पृथ्वीतलावरील सर्वात उत्तम पेय आहे हे वेगळे सांगणे न लगे. :))
........

व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व उत्साही प्रतिसादकांचे आभार !

उगा काहितरीच's picture

7 Oct 2021 - 2:59 pm | उगा काहितरीच

चांगला धागा. खूप उपयुक्त माहिती मिळाली.
एक प्रश्न आहे, पाण्याच्या शुद्धतेचा आणि लघवीचा काही संबंध आहे का? पाण्याचं TDS कमी झालं की लघवी जास्त वेळेस होते असं observation आहे. खूप कमी वा खूप जास्त स्वच्छ पाणी नसावं असं वाचलेलं आहे यात काही तथ्य आहे का?

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 3:28 pm | कुमार१

अशुद्ध पाण्यामध्ये विरघळलेले जे घनपदार्थ असतात (TDS) त्यांच्यामुळे अनारोग्याच्या काही समस्या उद्भवतील.

परंतु दैनंदिन लघवीचे प्रमाणशी त्यांचा काही संबंध नाही.
पाण्याचे प्रमाण (amount) हेच लघवीचे प्रमाण ठरवेल.
…..
अशी अनारोग्य समस्या उद्भवायला खूप वर्षे जावी लागतील. त्यातून जर मूत्रपिंडावर परिणाम झाला तर लघवीच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकेल.

हे सर्व पाहता हे फारच ताणलेले किंवा बादरायण संबंध वाटतो.

Rajesh188's picture

7 Oct 2021 - 3:02 pm | Rajesh188

जोरात पाय मुरगळला की तीव्र पाणी पिण्याची इच्छा निर्माण होते .अचानक शरीरात काय बदल घडतो?

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 4:54 pm | कुमार१

प्रत्येक वेदनेच्या वेळी तहान लागेलच असे नाही. त्या वेदनेमुळे एखादा माणूस किती घाबरला आहे यावर ते अवलंबून असेल.

जेव्हा माणूस खूप घाबरतो तेव्हा शरीरातील विशिष्ट चेतासंस्था उद्दीपित होते. तिच्या प्रभावामुळे तोंडाला कोरड पडू शकते. ती खऱ्या अर्थाने शरीराकडून मागणी झालेली तहान नसते.

म्हणजेच, या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. ते व्यक्तिसापेक्ष राहील

आग्या१९९०'s picture

7 Oct 2021 - 7:10 pm | आग्या१९९०

चर्चेतून छान माहिती मिळतेय.
माझे अनुभव
१) तहान लागली असताना पूर्ण तांब्याभर पाणी प्यायले जाते परंतू थोड्याच वेळात डोकं दुखते. हेच जर घोट घोट पाणी पिले तर एक ग्लास २००ml पेक्षा थोडे अधिक पाण्याने तहान भागली जाते आणि त्रासही होत नाही.
२) सकाळी उपाशीपोटी पेलाभर पाणी प्यायले तरी डोकं दुखते. लिंबूपाणी घेतले तरी डोकं दुखते.
३) तहान लागली असता सामान्य तापमानाचे पाणी एक ग्लास पित असेल तर माठातले पाणी दीड ते दोन ग्लास पिले जाते, परंतू काहीही त्रास होत नाही.
४) जेवल्या नंतर पाणी जास्त प्यायले जाते. अर्ध्या तासाने पाणी निम्याने प्यायले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पितो.
५) झोपताना पाणी प्यायची इच्छा होते.एक ग्लास पाणी पितो. रात्री फक्त एकदाच लघवीला जातो. जागरण झाल्यास दर अर्ध्या तासाने लघवीला जावे लागते. असे का होते?
६) IBS आणि Stetorhoea ( फॅटयुक्त मल ) ची समस्या आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले असता दोन्हींचा त्रास होतो. पाणी प्रमाणात पिले असता त्रास खूप नियंत्रणात येतो. पाणी पिण्याचा आणि माझ्या समस्येचा काहीही संबंध नाही असे डॉक्टर आणि आयुर्वेदिक वैद्य म्हणतात. मानसिक असावे. असंही IBS आणि मानसिक स्वास्थ ह्याचा जवळचा संबंध आहे.
७) फ्रिजचे पाणी पितच नाही, कधी पिले तर हमखास बद्धकोष्टता होते.
पाण्याचे प्रयोग चालूच आहे. जसे आठवेल तसे लिहीन.

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 8:04 pm | कुमार१

*जागरण झाल्यास दर अर्ध्या तासाने लघवीला जावे लागते. असे का होते?

>>>याचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.

जागरणाचे कारण जर अति विचार किंवा काही समस्या असेल तर मग मनाला एक अस्वस्थता असते. त्यातून मग थोडासा चाळा सुरू होतो
प्रत्यक्षात मूत्राशय नेहमी इतके भरलेले नसते. पण अस्वस्थ भावनेमुळे माणूस वारंवार जाऊ लागतो.

रात्री च्या गाडी नी जेव्हा गावी जायच असते तेव्हा बस मध्ये बसायच्या अगोदर दोन तीन वेळा लघवी झाल्याची भावना निर्माण होते आणि तेवढ्या वेळा जातो पण.
गाडीत बसल्या वर पण हाच विचार मध्येच लघवी ल लागणार नाही ना.
आणि हमखास लघवी ला तीव्र लागते मग बस थांबे पर्यंत घालमेल.
असा मी रात्री झोपल्यावर सकाळ पर्यंत एकदा पण लघवी ला उठत नाही.वारंवार मला लघवी होत नाही.
भीती मुळे बस प्रवासात तसे वर्तन होते.
मानसिक स्थिती चा संबंध नक्की आहे त्या मध्ये.

आग्या१९९०'s picture

7 Oct 2021 - 9:32 pm | आग्या१९९०

जागरणाचे कारण जर अति विचार किंवा काही समस्या असेल तर मग मनाला एक अस्वस्थता असते. त्यातून मग थोडासा चाळा सुरू होतो
जागरणाची दोन्हीही कारणे नाहीत.
१) सिनेमे किंवा OTT वर मालिका एका बैठकीत बघणे.
२) एखादी नवीन कल्पना सुचली की ती जागून सलगपणे करून बघणे.
३) पाहुणे घरी आल्यास गप्पा रंगल्या की जागरण होते.

तर्कवादी's picture

7 Oct 2021 - 7:30 pm | तर्कवादी

डॉक्टर,
मी आधी विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तर दिलेत याकरिता धन्यवाद,
आणखी एक आठवले.
सध्या अल्कलाईन पाण्याची लोकप्रियता वाढत आहे असे दिसते. मध्यंतरी विराट कोहली असंच काहीस तीन की चार हजार रु लिटर किमतीचं पाणी पितो असं वाचलं (बातमी कितपत खरी ते माहित नाही). पण एकंदरीत याविषयावर तुमचे मत काय ? खेळाडूंना अत्युच्च प्रतीचा फिटनेस हवा असतो पण सामान्य माणसाला अशा पाण्याचा फायदा होवू शकतो का ?

कुमार१'s picture

7 Oct 2021 - 8:44 pm | कुमार१

अल्कलाईन पाण्याची>>>>>

असे पाणी पिऊन आरोग्याला खरंच काही फायदे होतात का हा वादग्रस्त प्रश्न आहे.

मुळात यासंदर्भात शास्त्रशुद्ध संशोधन झालेले फारसे आढळत नाही. काही तुरळक गोष्टी वाचायला मिळतात पण त्यांची अधिकृतता संशयास्पद वाटते.
माझ्या मते सामान्य माणसांनी सामान्य पाणीच प्यावे हे उत्तम.

खेळाडू का पितात याचे कारण माहित नाही.

सुबोध खरे's picture

8 Oct 2021 - 10:47 am | सुबोध खरे

तीन की चार हजार रु लिटर किमतीचं पाणी
हायला

लोकांना च्यू बनवायचे काय काय धंदे लोक शोधून काढतील?

अल्कलाईन पाणीच प्यायचे तर दोन पैशाचा कणभर खायचा सोडा टाका पाण्यात. पाणी अल्कलाईन होईल

८ वि चे रसायनशास्त्र आहे हे.

हा का ना का

चिऊताईगीरी आहे हे खरेच पण ब्लॅ़क वॉटर नावाने हे अ‍ॅमेझॉनवर मिळते. नुसते अल्कलाईन नव्हे तर ७० हून अधिक नैसर्गिक खनिजे आहेत म्हणे ह्यामध्ये. अर्धा लि. बाटली २१६० रु. ला आहे. कोहली हेच पितो म्हणे पाणी. इतर काही जिम स्पेशालिस्ट नायिका, शेलेब्रिटी आहेत म्हणे फक्त हेच पाणी पिणारे.
BW
आपण इनो घ्यायचे. आणि काय? ;)

कुमार१'s picture

8 Oct 2021 - 11:03 am | कुमार१

आपल्याला साधे नळाचे पाणीच आवडते बुवा...

सुबोध खरे's picture

8 Oct 2021 - 11:27 am | सुबोध खरे

२१६० ला २४ अर्ध्या लिटरच्या बाटल्या आहेत म्हणजे १२ लिटर साठी २१६०

फुकट मिळणाऱ्या पाण्यासाठी ?

हे ७० खनिजं वगैरे सगळं भंपक आहे.

कुमार१'s picture

8 Oct 2021 - 11:33 am | कुमार१

बाटलीबंद महागड्या पाण्यावरून एकदाच परदेशात गंडलो होतो तो किस्सा :
माझ्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक फ्रिज होता. गेल्यावर उघडून पाहिले तर त्यात अनेकविध मद्याच्या बाटल्या आणि एकच पाण्याची बाटली होती. सर्व सीलबंद.

मला मद्याशी कर्तव्य नव्हते. पाण्याची बाटली हातात घेऊन निरखून पाहिली. 'मेड इन फ्रान्स', अमुक-तमुक झऱ्याचे सुमधुर पाणी असे त्याचं वर्णन ! कुतूहल वाटलं म्हणून ती उघडली व थोडे प्यालो. नंतर हॉटेल सोडताना त्या माणसाने येऊन फ्रिजची व्यवस्थित पाहणी केली आणि पाण्याच्या बाटलीचे सील तोंडल्याची नोंद केली.

मग खाली काऊंटरवर मस्त बांबू बसला. त्यांनी पाण्याच्या बाटलीचे अंदाजे साडेचारशे रुपये लावले होते !

तुषार काळभोर's picture

7 Oct 2021 - 9:31 pm | तुषार काळभोर

प्रतिसाद, त्यावरील दोन्ही डॉक्टरांची अत्यंत उपयुक्त मते वाचत आहे.

दोघांनाही धन्यवाद.

Nitin Palkar's picture

7 Oct 2021 - 9:31 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर लेख... नेहमीप्रमाणेच. सर्व प्रतिसादकांच्या शंकांना दिलेल्या सविस्तर उत्तरांमुळे खूपच उपयुक्त माहिती मिळाली. विशेष म्हणजे 'कायप्पा विद्यपीठा'द्वारे मिळणाऱ्या अ मूल्य ज्ञानासंबंधी योग्य माहिती मिळाली. खूप खूप लिहा हा आग्रह.

नचिकेत जवखेडकर's picture

8 Oct 2021 - 8:21 am | नचिकेत जवखेडकर

खूप छान लेख. ऑफिसमध्ये वातानुकूलन सतत चालू असल्यामुळे पण तहान लागत नाही. त्यावेळेला ठरवून पाणी पिणे आवश्यक असते का?

कुमार१'s picture

8 Oct 2021 - 8:26 am | कुमार१

आपल्या लघवीचा रंग बघत राहायचे
तो कायम फिकट पिवळसर राहील अशा बेताने पाणी प्यायचे
हाच उत्तम निर्देशक

नचिकेत जवखेडकर's picture

8 Oct 2021 - 8:33 am | नचिकेत जवखेडकर

धन्यवाद !

कुमार१'s picture

8 Oct 2021 - 8:34 am | कुमार१

जर वातानुकूलनमुळे लघवी भरपूर होत राहिली तर तहानेची भावना होईल.

यामध्ये व्यक्तीभिन्नता राहील

Rajesh188's picture

8 Oct 2021 - 1:30 pm | Rajesh188

कधी कधी पूर्ण व्हाइट आणि क्वचित डार्क पिवळा असतो ह्याचा अर्थ काय

कुमार१'s picture

8 Oct 2021 - 1:37 pm | कुमार१

कधी कधी पूर्ण व्हाइट आणि क्वचित डार्क पिवळा असतो ह्याचा अर्थ काय
>>
जेव्हा भरपूर पाणी पिलेले असते आणि घामाद्वारे विशेष बाहेर पडत नाही तेव्हा लघवीचा रंग पूर्ण सफेद राहू शकेल. हे चांगलेच आहे

क्वचित गडद पिवळा दिसला तर >>>
( कुठलाही आजार नाही अथवा औषधोपचार चालू नाहीत हे गृहीत धरून) :

म्हणजे पिण्याच्या पाण्याचे प्रमाण तुलनेने कमी पडत आहे किंवा
खूप उन्हाळा आहे किंवा

आपण बाह्य वातावरणात बराच घाम गाळून आलेलो आहे.

प्रचेतस's picture

8 Oct 2021 - 9:10 am | प्रचेतस

धागा आणि प्रतिसाद दोन्ही उत्तम.

गॉडजिला's picture

8 Oct 2021 - 11:14 am | गॉडजिला

या धाग्यात इतके विवीधरंगी प्रतिसाद, प्रश्न अन उत्तरे वाचायला मिळाली की पाण्यासारखी जिवनावश्यक बाब व त्यानुशंगाने लोकांचे वीवीध समज, गैरसमज, प्रश्न व शंकासमाधान ज्याकडे एरवी आपले दुर्लक्ष होते त्याची चांगलीच उजळणी झाली.

सुबोध खरे's picture

8 Oct 2021 - 12:29 pm | सुबोध खरे

प्रथम लिंबाचा रस आणि लिंबू सरबत आणि लिंबू पाणी यातील फरक जाणून घ्या

लिंबाच्या रसाची पी एच २ असते. बॅटरीच्या ऍसिडची आणि पोटातील आम्लाची पी एच १ असते आणि लिंबू सरबताची साधारण ५ ते ६ असते.

सकाळी एक लिटर पाणी त्यात १ लिंबाचा रस आणि १ चमचा मध घालून घेतल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. मी १९८७ साली एम बी बी एस झाल्यावर माझ्या आजोबांची अनेक वर्षांची रेचक ( कायम चूर्ण किंवा गंधर्व हरितकी) घेण्याची सवय वरील साध्या घरगुती उपायाने घालवली होती.

रात्री वारंवार लघवीला लागू नये म्हणून आपली मूत्रपिंडे लघवी जास्त संतृप्त (concentrated) करत असतात यामुळे आपल्याला तरुणपणात रात्री लघवीसाठी उठण्याची गरज पडत नाही. आपण रात्री कॉफी किंवा अतिरिक्त पाणी घेतले तर गोष्ट वेगळी.

तेंव्हा रात्रभरात घट्ट झालेली (concentrated) लघवी साफ होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सकाळी भरपूर पाणी पिणे हे नक्कीच फायदेशीर आहे. याशिवाय ज्यांना बद्धकोष्ठाची सवय आहे त्यांनी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून घेतल्याने नक्कीच फायदा होतो.
वृद्धापकाळामुळे आपली आतडी मंद होतात त्यामुळे अन्न जास्त काळ पोटात राहतात यामुळे त्यातील पाणी शोषून घेतले जाते आणि त्यांना शौचास खडा होतो याशिवाय बहुसंख्य लोकांना प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीचा त्रास असल्याने वारंवार लघवीची भवन होते हा त्रास वाचवण्यासाठी ते पाणीकामी पितात यामुळे बद्धकोष्ठता वाढते. रात्री पाणी प्यायल्यास वारंवार लघवीची उठावे लागते आणि त्याने झोपेत व्यत्यय येतो आणि वयानुसार परत झोप लागण्यास वेळ लागतो.
या सर्व त्रासातून वाचण्यासाठी सकाळी उठल्यावर १ लिटर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घेणे श्रेयस्कर आहे.

एक लिटर पाण्यात एक लिंबाचा रस घातल्याने पाण्याची आम्लता फारशी वाढत नाही आणि त्याने दात खराब होतील याला कोणताही शास्त्राधार नाही.
आपण कधीही एक ग्लास भरून लिंबाचा रस पीत नाही. एक चमचा लिंबाचा रस घेतल्याने त्यातील आम्लते मुळे इनॅमल चे कॅल्शियमचे खनिज (हायड्रॉक्सीपेटाईट) थोडेसे खडबडीत होते. हे इनॅमल आपल्या लाळेतील खनिजांमुळे परत रिपेअर केले जाते. त्यामुळे आपण आहारात खातो तेवढया लिंबाने दात खराब होतात याला फारसा शास्त्रीय आधार नाही.
The role of salivary contents and modern technologies in the remineralization of dental enamel https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7076334/

लहानपणी आपल्यापैकी कित्येकांनी भरपूर आवळे चिंचा कैऱ्या खाल्ल्या आहेत. त्यात भरपूर आम्ल असते त्यामुळे दात आंबत असत पण त्यामुळे कुणाचे दात खराब झालेले ऐकले नाहीत.

कुमार१'s picture

8 Oct 2021 - 12:57 pm | कुमार१

एक लिटर पाण्यात एक लिंबाचा रस घातल्याने पाण्याची आम्लता फारशी वाढत नाही
>>+१
चांगला मुद्दा

विषय काय तुम्ही लिहता आहात काय.
Dr कुमार ह्यांनी अगोदर च हे स्पष्ट केले आहे दात मजबुत असतील,दातांची झीज झाली नसेल तर आवळा,लिंबू नी दातावर काहीच विपरीत परिणाम होत नाही
उतार वयात जेव्हा दात झिजू लागतात तेव्हा मात्र विपरीत परिणाम .
खरे साहेब नेहमीच तुमचा रेडा गाबना कसा काय राहतो.

सुबोध खरे's picture

9 Oct 2021 - 9:17 am | सुबोध खरे

जिथे तिथे आपली अक्कल पाजळलीच पाहीजे असा आपला दंडकच आहे का?

दाताच्या इनॅमल बद्दल मी १५ जून २०२१ चा संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे तो अगोदर वाचून घ्या त्याचे संदर्भ निबंध वाचून घ्या त्यावर मनन आणि चिंतन करा आणि मग त्यातून काही समजून आलं तर लिहा.

Rajesh188's picture

9 Oct 2021 - 3:19 pm | Rajesh188

तुम्ही डॉक्टर आहात तुमचे मत ध्या .इंटरनेट वर जावून आम्ही स्वतः पण माहिती घेवू शकतो.
1760 मत असतात तिथे.
तुम्ही स्वतःचे ज्ञान वाटा.
लिंक कशाला देताय.आम्हला काय गूगल search कसे करतात ते माहीत नाही काय.

सुबोध खरे's picture

11 Oct 2021 - 11:47 am | सुबोध खरे

.इंटरनेट वर जावून आम्ही स्वतः पण माहिती घेवू शकतो.

मग तुम्ही इंटरनेट वर जावून स्वतः माहिती घ्या कि कोण नको म्हणतंय?

आपली अक्कल पाजळण्यापेक्षा ते बरं नाही का?

जिथे तिथे राजेश उवाच कशाला?

बोअर चे पाणी पिण्यास अयोग्य असते का ?

सुबोध खरे's picture

9 Oct 2021 - 9:20 am | सुबोध खरे

मोगा खान

एम बी बी एस ला प्रतिबंधक तथा सामाजिक वैद्यकशास्त्र(preventive and social medicine) असा विषय असतो.

त्यात बोअर वेल आणि पाण्यात विरघळलेले घन पदार्थ याबद्दल बराच उहापोह आहे.

जुनी पुस्तके चाळुन पहा.

hrkorde's picture

9 Oct 2021 - 1:56 pm | hrkorde

मला फर्स्ट इअरला बायोकेमिस्ट्रीत ४५ , सेकण्ड इअरला फोरेन्सिकमध्ये ४५ आणि थर्ड इअरला पी एस एम मध्ये ४५ मार्क आहेत. प्रत्येक वर्षी कंडोलवर पास आहे.

सुबोध खरे's picture

11 Oct 2021 - 6:26 pm | सुबोध खरे

प्रत्येक वर्षी कंडोलवर पास आहे.

एम बी बी एस पास कसे झालात यापेक्षा त्यानंतर आपण काहीही वाचायचेच नाही असे ठरवले तर कोणीही काहीही मदत करू शकत नाही.

कायदा आणि वैद्यकशास्त्र यात आपल्याला आयुष्यभर सतत वाचन करत राहणे आवश्यक आहे

अन्यथा आपण फार लवकर कालबाह्य होण्याचा धोका असतो.

मुळात कोणत्याही विषयात आपल्याला ५० गुण मिळाले याचाच अर्थ आपल्याला त्या विषयाचे सखोल ज्ञान झाले असा होत नाहि.

यास्तव परीक्षा झाल्यावर आपल्याला परीक्षेत काय आले नाही याचा विचार केला पाहिजे.

शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात सोडून द्या

परंतु ज्या विषयात आपण करियर करता त्या विषयांचे मूलभूत ज्ञान आपल्याला जितके जास्त असेल तितके पुढे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो.

उगा काहितरीच's picture

11 Oct 2021 - 9:33 pm | उगा काहितरीच

कायदा आणि वैद्यकशास्त्र यात आपल्याला आयुष्यभर सतत वाचन करत राहणे आवश्यक आहे

आम्हा आयटी वाल्यांना पण हो डॉक्टर साहेब ! मला तर वाटते आमच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त update राहावं लागतं असेल कदाचित् !

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 10:44 am | सुबोध खरे

मला आय टी क्षेत्राबद्दल काहीही माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही याबद्दल क्षमस्व.

परंतु वरील वस्तुस्थिती खरं तर कोणत्याही क्षेत्रासाठी लागू पडते असे माझे नम्र मत आहे.

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 9:20 am | कुमार१

संक्षिप्त व तात्पुरते उत्तर :

बोरिंगचे पाणी हे जड पाणी असते तर आपल्याला नगरपालिकेकडून जे पिण्याचे पाणी मिळते ते 'हलके' (सॉफ्ट) पाणी असते. जड पाण्यामध्ये अनेक खनिजे बऱ्यापैकी प्रमाणात असतात. त्यापैकी कॅल्शियम व मॅग्नेशियम ही महत्त्वाची आहेत. तसेच हे पाणी तुलनेने अधिक आम्लधर्मी असते.

पिण्यासाठी कोणते पाणी उत्तम हा लाखमोलाचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा प्रश्न आहे ! यावर गेली पन्नास वर्षे संशोधन होऊनही सरसकटीकरण करता येतील असे निष्कर्ष नाहीत.
या विषयाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्यावर एका परिच्छेदात लिहिणे अवघड आहे. सवडीने स्वतंत्र काही लिहावे असे म्हणतो.

जड पाण्यात असणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमुळे हे पाणी काही जनतेसाठी उपकारकच ठरेल असा एक मतप्रवाह आहे. विशेषता जिथे गरिबीमुळे सकस आहार मिळत नाही अशा भागांमध्ये जनतेला या पाण्यातूनच ती खनिजे आपसूक मिळतील असे काहींचे मत आहे.

जड पाण्यामुळे मूत्रपिंडातील खडे, कर्करोग इत्यादी गोष्टी होण्याची शक्यता वाढते का, यावर अद्याप समाधानकारक उत्तर नाही.
तसेच जड पाणी पिल्यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण मिळते का हाही वादग्रस्त प्रश्न आहे.

सुबोध खरे's picture

9 Oct 2021 - 9:59 am | सुबोध खरे

जागतिक आरोग्य संघटनेचे वार्तापत्र आहे ज्यात बऱ्यापैकी विस्तृत माहिती आहे
https://www.who.int/water_sanitation_health/dwq/chemicals/hardness.pdf

तर्कवादी's picture

10 Oct 2021 - 12:35 am | तर्कवादी

मला वाटते हे स्थानिक भैगोलिक परिस्थितीवरही अवलंबून असावे.
कोकणात विहिरीचे पाणी बहुतांश चांगले व पिण्यायोग्य असते असे ऐकून आहे.

Ground water .
म्हणजेच बोअर चे पाणी.
ते जड पाणी च असते,पिण्यास योग्य नसते हा विचार चुकीचा आहे.
पाण्यात कोणते क्षार आहेत ,त्या मधील शरीराला आवशकया कोणते आहेत ,शरीरास अयोग्य कोणते आहेत .हे महत्वाचे असते.
स्थान नुसार हे सर्व क्षारांचे प्रमाण बदलत असते.
पाणी किती खोली वरून येत आहे ते पण महत्वाचे असते.
अगदी काही वर्ष पूर्वी प्रतेक घरात आड (लहान विहीर तीन चार फूट व्यासाची) प्रतेक घरात असे .
आणि तेच पाणी लोक पित असतं.
ते बिलकुल जड पाणी नव्हते.ना शरीरास अयोग्य होते.
Ground water अहितकारक आणि surface water खूप चांगले असा भेदभाव सरळ कधीच करता येत नाही.
Who काही ही सांगत असू ध्या रिॲलिटी काय आहे प्रतेक स्थानाची हेच महत्वाचे असते.
असे क्षार जे मानवी शरीर पचवू शकत नाही असे क्षार पाण्यात असतील तर ते पाणी माणसाला पिण्यास अयोग्य असे एका वाक्यात स्पष्ट करता येईल.
Who चे ऐकून सरसकट तेच सत्य आहे असे समजणे बुद्धिहीन पणाचे लक्षण आहे.

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 6:01 am | कुमार१

+१
उदा. खालील मजकूर माझ्या फ्लुओराइडच्या धाग्यावरून इथे पुन्हा डकवत आहे :
...
फ्लुओराइडच्या दीर्घकालीन अतिरिक्त सेवनाचे प्रमुख कारण म्हणजे पिण्याच्या नैसर्गिक साठ्यांत असलेले त्याचे भरपूर प्रमाण. हा प्रश्न भारत व चीनमधील अनेक भागांत दिसतो.

भारतातील सुमारे अडीच कोटी लोक याने बाधित आहेत. अलीकडे असे दिसले आहे की मोठ्या धरणांच्या मागील भागातील जलसाठे (backwaters) फ्लूओराइडने अतिसंपन्न असतात. तसेच जगभरात ग्रामीण भागांतील काही विहीरींच्या पाण्यातही हे प्रमाण जास्त असल्याचे दिसते.

अशा पाण्यांवर योग्य ती प्रक्रिया करून अतिरिक्त फ्लुओराइड काढून टाकायचे असते. अशी यंत्रणा सर्वत्र उपलब्ध नसल्याने तेथील लोक फ़्लुओरोसिसला बळी पडतात.

सुबोध खरे's picture

9 Oct 2021 - 10:05 am | सुबोध खरे
कुमार१'s picture

9 Oct 2021 - 11:39 am | कुमार१

पूरक माहिती, उत्तम प्रश्न, व्यक्तिगत अनुभव आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार !

या चर्चेमधून आपणा सर्वांची या विषयाबद्दलची उत्सुकता आणि जागरूकता दिसून आली हे महत्त्वाचे आहे.

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 11:39 am | कुमार१

पूरक माहिती, उत्तम प्रश्न, व्यक्तिगत अनुभव आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार !

या चर्चेमधून आपणा सर्वांची या विषयाबद्दलची उत्सुकता आणि जागरूकता दिसून आली हे महत्त्वाचे आहे.

दोन्ही डॉक्टरसाहेबांचे आभार.. कायप्पा मेसेजेसवर तसाही विश्वास नव्हताच, आणि तो तसा ठेऊही नये हे पुन्हा एकदा कळाले.

Rajesh188's picture

9 Oct 2021 - 8:41 pm | Rajesh188

आणि तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे हे उत्तम असे मला वाटतं.
कोणी तरी सांगितले म्हणून ठरवून ठराविक वेळेला ltr च पाणी पिले पाहिजे हा हट्ट हास नसावा.
असे माझे वैयतिक मत झाले आहे.

अपूर्व कात्रे's picture

9 Oct 2021 - 11:54 pm | अपूर्व कात्रे

नेहमीप्रमाणे तुमचा हाही लेख आवडला. लेख आणि त्याखालील चर्चा वाचून पाणी पिण्याबाबतच्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन झाले.
असेच लिहीत जा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 8:40 am | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

काही वाचक इथे प्रथमच आलेले आहेत. त्यांचे नेहमीच स्वागत असेल. या धाग्याचा विषय किती पाणी प्यावे, तहान, लघवीचे प्रमाण इत्यादी मुद्द्यांची निगडित आहे.
चर्चेच्या ओघात दोन उपविषय ऐरणीवर आले आहेत.

१. पिण्याच्या पाण्याचा दर्जा आणि आरोग्य : याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यावर सावकाशीने वाचून कालांतराने स्वतंत्र लिहिण्याचा मानस आहे. तरी सर्वांनी यासंदर्भातील मुद्दे तेव्हाच्या स्वतंत्र चर्चेसाठी राखून ठेवावेत. तूर्त इथे या मुद्द्यावर शेपटाकडे प्रतिसाद वाढवण्यात मजा नाही.

२. खाण्यापिण्याचे पदार्थ आणि दातांचे आरोग्य हा दुसरा विषय. याची चर्चा दंतवैद्याच्या मार्गदर्शनाखाली झाल्यात ते सर्वोत्तम. निव्वळ जालवाचनापेक्षा अनुभवाचे बोल इथे महत्त्वाचे ठरतील. तसे कोणी इथे असल्यास त्यांना माझी विनंती.

अथांग आकाश's picture

10 Oct 2021 - 10:44 am | अथांग आकाश

छान लेख व चर्चा!
1
तात्पर्य: तहान भागेल एवढे पाणि प्यावे! इतरांचे अनुकरण करु नये!!

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 12:10 pm | कुमार१

चित्र आवडलेच...

चित्रातल्या माणसाप्रमाणे अजिबात अनुकरण करणार नाही !
तो सारखाच पीत बसला आहे :)

मित्रहो's picture

11 Oct 2021 - 5:01 pm | मित्रहो

हा धागा आज वाचण्यात आला. धाग्यातून आणि प्रतिसादातून छान माहिती मिळाली.

सायकलींग करताना सतत थोडे थोडे पाणी पित रहा असे सांगतात नाहीतर क्रॅम्प्स येतील. काय संबंध आहे माहित नाही. प्रयत्न करुनही हिवाळ्यात शक्य होत नाही आणि उन्हाळ्यात आपोआप होते. त्रास कधी झाला नाही.

कुमार१'s picture

11 Oct 2021 - 6:34 pm | कुमार१

धन्यवाद
दीर्घकाळ पळणे असो किंवा सायकल मारणे असो घामाचे प्रमाण जास्त राहतेच. थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे हा योग्य सल्ला आहे.
याचा अंतिम हेतू रक्तातील सोडिअम व पाणी यांचे तुलनात्मक प्रमाण कायम स्थिर ठेवणे हा आहे.

मित्रहो's picture

12 Oct 2021 - 3:44 pm | मित्रहो

माहिती बद्दल धन्यवाद

कुमार१'s picture

21 Oct 2021 - 10:44 am | कुमार१

हे पहा माध्यमांची कशी फेकाफेकी चालू असते:

"पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात"

https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/l...

नेहमीप्रमाणे छान आणि माहितीपूर्ण लेख. बऱ्याच शनका लेखातून आणि प्रतिसादाना दिलेल्या उत्तरातून फिटल्या. धन्यवाद डॉ.