✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रोज किती पाणी प्यावे?

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 10/06/2021 - 05:57  ·  लेख
लेख
पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे. प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस. (मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी). सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात : १. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते. २. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो. वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते. रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते. आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते. आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही. जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते : १. हवामान २. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी ३. श्रम बंद जागेत की रस्त्यावर मोकळ्या हवेत ४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि ५. मूत्रपिंडांचे कार्य. पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते. आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते. आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न. सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो. समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे. समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते. 'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल. आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही. पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे. पुन्हा एकदा महत्त्वाचे : ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत. …………… मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे: https://www.misalpav.com/node/41739 .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56166 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

अ अ ,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 09:41 नवीन
हे पहा "जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही". ... तुमच्या मित्राच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. वरील तीन पैकी कुठलीही यंत्रणा नीट काम करत नसेल किंवा काही स्वरूपाचा मनोविकार असेल तर ते पाहिल्यानंतरच उत्तर देता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

भर ...

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 09:48 नवीन
काही मनोविकारात, विशेषता विशिष्ट औषधे चालू असतील, तर लेखात उल्लेख केलेल्या ADH या हार्मोनच्या नियंत्रणात बिघाड होतो. त्यामुळे ते हॉर्मोन अतिरिक्त स्त्रवते व रक्तात अधिक पाणी साठवू देते. रक्तातील पाण्याचे प्रमाण खूप वाढले तर मग सोडियमचे तुलनात्मक प्रमाण कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

छान माहिती.

ॲबसेंट माइंडेड…
गुरुवार, 10/07/2021 - 10:10 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments

लिंबू पाण्यावरून पडलेला प्रश्न

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 10:25 नवीन
मला सकाळी आवळा खाण्याची सवय आहे .कच्चा आवळा मीठ टाकून.त्या मध्ये क जीवनसत्व असते.आणि लिंबसारखा आंबट पना पण असतो. त्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे माझी acidity ची समस्या पूर्ण नष्ट झाली आहे.तिखट खाल्ले की उचकी लागण्याचा प्रकार आणि बाकी avidity च त्रास बंद झालं आहे. पण दातांसाठी आवळा कच्चा खाणे योग्य आहे की अयोग्य . ह्याची माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

राजेश

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 10:29 नवीन
वर चामुंडराय यांना जे लिंबासंबंधी उत्तर दिले आहे तेच तत्त्व आवळ्याच्या बाबतीत लागू होईल. दात मुळात दणकट असतील तर खा बिंदास्त. दातांची झीज झाली असेल तर आवळा चूर्ण स्वरूपात खाऊन पटकन पाणी पिऊन टाकायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

काही प्रश्न!

सुबक ठेंगणी
गुरुवार, 10/07/2021 - 12:45 नवीन
महत्त्वाच्या प्रश्नावरची उत्तम चर्चा. माझे काही प्रश्न आहेत. मागे एकदा वाचनात आले होते की मेंदूमधले तहान आणि भुकेचे केंद्र एकच असते. त्यामुळे बऱ्याचदा भूक लागल्याची भावना होते पण खरं म्हणजे शरीराला पाण्याची गरज असते. हे कितपत खरे आहे? सतत जर अश्याप्रकारे तहान आणि भुकेची गल्लत केली गेली तर शरीराला काही अपाय होईल का ? (वजन वाढणे ही गोष्ट अलाहिदा!) दुसरा प्रश्न असा की मधुमेहींना जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे हे प्रकार का होतात? लेखाच्या मूळ विषयाला थोडे tangent प्रश्न आहेत. पण डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

सु ठे,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 12:51 नवीन
मधुमेहींना जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे हे प्रकार का होतात?>>> या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. परिणामी त्यांना लघवीला जास्त प्रमाणात होते. (ग्लुकोज मूत्रमार्गातून जाताना त्याच्या बरोबर अधिक पाणी खेचतो) अशा अतिरिक्त झालेल्या लघवीमुळे शरीरातील पाणी कमी होते. ते भरून काढण्यासाठी तहान केंद्राला संदेश जातात.
  • Log in or register to post comments

सु ठे : २

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 16:06 नवीन
मेंदूमध्ये भूक व तहान यांची नियंत्रण केंद्रे हायपोथॅलॅमस नावाच्या भागात असतात. परंतु या भागामध्ये दोन वेगळ्या प्रकारची विशिष्ट उपकेंद्रे पण असतात. या दोन संवेदनासाठी वेगवेगळे receptorsआहेत. भुकेचे नियंत्रण ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ती खालील घटकांवर अवलंबून असते : १.मानसिक अवस्था २. अनुवंशिकता आणि ३. सुमारे डझनभर हॉर्मोनस भूक व तहान यांची चेतातंतूंची नेटवर्क वेगवेगळीअसल्यामुळे त्यांच्या समजण्यात गल्लत होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

माझा एक प्रश्न..

बापूसाहेब
गुरुवार, 10/07/2021 - 12:58 नवीन
माझा एक प्रश्न.. मला कधीकधी पूर्ण दिवस तहान च लागत नाही. पूर्ण दिवस मी जेवणाव्यातिरिक्त पाणी पीत पण नाही.. चहा आणि जेवणादर्म्यान घेतलेले पाणी याशिवाय एक्स्ट्रा पाणी प्यावे असं वाटतं नाही. सगळं मिळून फारतर १-१.२५ लिटर... त्यामूळे लघवी ला सुध्दा एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा जावे लागते. आत्ता प्रश्न - जर तहानच लागत नाही हे नॉर्मल आहे का ?? ईतर कोणाला असा अनुभव आला आहे का ??? आणि मग शरीर पाणी मागत नाही तर दिवसातून x लिटर पाणी पिलेच पाहिजे असं म्हणणारे लोकांचं ऐकून विनाकारण पाणी पिणे योग्य आहे का?? टीप - मी सध्या WFH आहे. घरातून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर पडतो. जेव्हा बाहेर जातो त्यावेळी तहान नॉर्मल लागते, आणि त्यावेळी दिवसभरात ३-४ लिटर पाणी पोटात जाते ..
  • Log in or register to post comments

बापूसाहेब,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 14:09 नवीन
**आणि मग शरीर पाणी मागत नाही तर दिवसातून x लिटर पाणी पिलेच पाहिजे असं म्हणणारे लोकांचं ऐकून विनाकारण पाणी पिणे योग्य आहे का??>>> नाही. लोकांचे ऐकायची गरज नाही. **आता शरीराची पाण्याची गरज समजून घेऊ. यात जमेच्या बाजूला खालील गोष्टी असतात : १. प्रत्यक्ष पाणी पिणे २.अन्नपदार्थमधूनही बर्‍यापैकी पाणी पोटात जाते आणि ३.शरीरातील चयापचय प्रक्रियेमुळे शरीरातही पाणी निर्माण होते. याउलट पाणी उत्सर्जन हे लेखात दिल्याप्रमाणे तीन मार्गांनी होते. जेव्हा तुम्ही घरात बसूनच बराच काळ काम करीत आहात तेव्हा घामाचा भाग बराच कमी होतो. लघवी एक ठराविक प्रमाणात तर 24 तासात होतच राहते. तुमच्या बाबतीत अशी शक्यता आहे की अन्नपदार्थात अंतर्भूत असलेले पाणी + शरीरात निर्माण झालेले पाणी + थोडे पिलेले पाणी आणि लघवी वाटे उत्सर्जन यांचा आपोआप समतोल साधला जात आहे. तुम्हाला जरी तहान लागत नसली तरी लेखात दिलेले हे ADH हे हॉर्मोन तुमच्या नकळत शरीरात पाणी टिकवण्याचे काम करतच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

तहान लागणे आणि घश्याला कोरड पडणे

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 13:06 नवीन
हे वेगवेगळे प्रकार असावेत असे अनुभवाने वाटत. डोंगर चढायला continue सुरुवात केली ,किंवा खूप धावले की पाणी पिण्याची तीव्र भावना होते.ती भावना थांबवू शकत नाही. कधी जोरात मार लागला,उदा . पाय जोरात मुरगळला तरी अशी तीव्र पाणी पिण्याची भावना निर्माण होते. नॉर्मल तहान लागणे आणि पाणी पिण्याची तीव्र भावना निर्माण होणे है नक्की कशा मुळे घडते. आणि तीव्र पाणी पिण्याची भावना झाल्यावर पाणी नाही मिळाले तर शरीरावर काय परिणाम होतो.
  • Log in or register to post comments

नॉर्मल तहान लागणे आणि पाणी

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 14:28 नवीन
नॉर्मल तहान लागणे आणि पाणी पिण्याची तीव्र भावना निर्माण होणे है नक्की कशा मुळे घडते.>> हे लेखात दिले आहे रक्ताच्या विशिष्ट घनतेमुळे. ... पाणी नाही मिळाले तर शरीरावर काय परिणाम होतो. >>> डिहायड्रेशन व त्याचे पुढे मेंदू कार्यावर परिणाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

रिकाम्या पोटी अमुक इतके पाणी

रविकिरण फडके
गुरुवार, 10/07/2021 - 14:28 नवीन
डॉक्टर, सकाळी उठून रिकाम्या पोटी अमुक इतके - पाऊण लिटर, एक लिटर, इ. - पाणी प्यायचे, असे जे खूप लोक करतात, त्यावर तुमचे काय मत आहे ते एकदा लिहावे (किंवा हा विषय पूर्वी घेतला असेल तर लिंक द्यावी) ही विनंती. मी असले काही कधी केलेले नाही परंतु ही पृच्छा अशासाठी, की असे करणे चूक आहे असे मत एका डॉक्टरांनी (वैद्य) दिले होते. त्यांचे म्हणणे असे होते, की ह्यामुळे फायदा तर काहीच होत नाही, उलट अन्नपचनासाठी जे रस जठरात निर्माण झालेले असतात ते अतिरिक्त पाणी प्यायल्याने dilute होतात, सबब पचनावर अनिष्ट परिणाम होतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

रवी

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 15:07 नवीन
रवी वर मी बापूसाहेबांच्या प्रश्न -उत्तरामध्ये दिल्यानुसार पाण्याचा दैनंदिन( चोवीस तासांचा ) समतोल साधला गेला म्हणजे झाले. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच एक लिटर पाणी पिणे अनावश्यक आहे. माझे मत हे आधुनिक वैद्यकानुसार आहे. ( पारंपरिक आरोग्यशास्त्रांच्या नुसार जर कोणाचे काही वेगळे मत असेल तर ते संबंधित तज्ञाने सांगावे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

+१

वामन देशमुख
गुरुवार, 10/07/2021 - 14:58 नवीन
लेख आवडला कुमार१! पाणी पिण्याबद्धलचे-न पिण्याबद्धलचे अनेक समज-गैरसमज दुरुस्त झाले. काही प्रतिसादही माहितीवर्धक आहेत. मी साधारणपणे दर तासाला दीड दोन ग्लास पाणी पितो. जेवणाआधी-जेवताना-जेवणानंतर शक्यतो पाणी पीत नाही, पिले तरी अगदी घोटभर पितो. चहा-कॉफी घेत नाही, सोबतचे कुणी घेत असतील तर त्यावेळी पाणी पितो. पाणी हे माझे आवडते पेय आहे!
  • Log in or register to post comments

वा दे,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 15:10 नवीन
पाणी हे माझे आवडते पेय आहे! >>> माझेही ! एवढेच नाही तर पाणी हे पृथ्वीतलावरील सर्वात उत्तम पेय आहे हे वेगळे सांगणे न लगे. :)) ........ व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व उत्साही प्रतिसादकांचे आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

चांगला धागा. खूप उपयुक्त

उगा काहितरीच
गुरुवार, 10/07/2021 - 14:59 नवीन
चांगला धागा. खूप उपयुक्त माहिती मिळाली. एक प्रश्न आहे, पाण्याच्या शुद्धतेचा आणि लघवीचा काही संबंध आहे का? पाण्याचं TDS कमी झालं की लघवी जास्त वेळेस होते असं observation आहे. खूप कमी वा खूप जास्त स्वच्छ पाणी नसावं असं वाचलेलं आहे यात काही तथ्य आहे का?
  • Log in or register to post comments

उ का

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 15:28 नवीन
अशुद्ध पाण्यामध्ये विरघळलेले जे घनपदार्थ असतात (TDS) त्यांच्यामुळे अनारोग्याच्या काही समस्या उद्भवतील. परंतु दैनंदिन लघवीचे प्रमाणशी त्यांचा काही संबंध नाही. पाण्याचे प्रमाण (amount) हेच लघवीचे प्रमाण ठरवेल. ….. अशी अनारोग्य समस्या उद्भवायला खूप वर्षे जावी लागतील. त्यातून जर मूत्रपिंडावर परिणाम झाला तर लघवीच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकेल. हे सर्व पाहता हे फारच ताणलेले किंवा बादरायण संबंध वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

दुखापत झाली की

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 15:02 नवीन
जोरात पाय मुरगळला की तीव्र पाणी पिण्याची इच्छा निर्माण होते .अचानक शरीरात काय बदल घडतो?
  • Log in or register to post comments

राजेश,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 16:54 नवीन
प्रत्येक वेदनेच्या वेळी तहान लागेलच असे नाही. त्या वेदनेमुळे एखादा माणूस किती घाबरला आहे यावर ते अवलंबून असेल. जेव्हा माणूस खूप घाबरतो तेव्हा शरीरातील विशिष्ट चेतासंस्था उद्दीपित होते. तिच्या प्रभावामुळे तोंडाला कोरड पडू शकते. ती खऱ्या अर्थाने शरीराकडून मागणी झालेली तहान नसते. म्हणजेच, या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. ते व्यक्तिसापेक्ष राहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

चर्चेतून छान माहिती मिळतेय.

आग्या१९९०
गुरुवार, 10/07/2021 - 19:10 नवीन
चर्चेतून छान माहिती मिळतेय. माझे अनुभव १) तहान लागली असताना पूर्ण तांब्याभर पाणी प्यायले जाते परंतू थोड्याच वेळात डोकं दुखते. हेच जर घोट घोट पाणी पिले तर एक ग्लास २००ml पेक्षा थोडे अधिक पाण्याने तहान भागली जाते आणि त्रासही होत नाही. २) सकाळी उपाशीपोटी पेलाभर पाणी प्यायले तरी डोकं दुखते. लिंबूपाणी घेतले तरी डोकं दुखते. ३) तहान लागली असता सामान्य तापमानाचे पाणी एक ग्लास पित असेल तर माठातले पाणी दीड ते दोन ग्लास पिले जाते, परंतू काहीही त्रास होत नाही. ४) जेवल्या नंतर पाणी जास्त प्यायले जाते. अर्ध्या तासाने पाणी निम्याने प्यायले जाते. त्यामुळे जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पितो. ५) झोपताना पाणी प्यायची इच्छा होते.एक ग्लास पाणी पितो. रात्री फक्त एकदाच लघवीला जातो. जागरण झाल्यास दर अर्ध्या तासाने लघवीला जावे लागते. असे का होते? ६) IBS आणि Stetorhoea ( फॅटयुक्त मल ) ची समस्या आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले असता दोन्हींचा त्रास होतो. पाणी प्रमाणात पिले असता त्रास खूप नियंत्रणात येतो. पाणी पिण्याचा आणि माझ्या समस्येचा काहीही संबंध नाही असे डॉक्टर आणि आयुर्वेदिक वैद्य म्हणतात. मानसिक असावे. असंही IBS आणि मानसिक स्वास्थ ह्याचा जवळचा संबंध आहे. ७) फ्रिजचे पाणी पितच नाही, कधी पिले तर हमखास बद्धकोष्टता होते. पाण्याचे प्रयोग चालूच आहे. जसे आठवेल तसे लिहीन.
  • Log in or register to post comments

आग्या

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 20:04 नवीन
*जागरण झाल्यास दर अर्ध्या तासाने लघवीला जावे लागते. असे का होते? >>>याचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही. जागरणाचे कारण जर अति विचार किंवा काही समस्या असेल तर मग मनाला एक अस्वस्थता असते. त्यातून मग थोडासा चाळा सुरू होतो प्रत्यक्षात मूत्राशय नेहमी इतके भरलेले नसते. पण अस्वस्थ भावनेमुळे माणूस वारंवार जाऊ लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ह्या विषयी एक अनुभव सांगतो

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 21:08 नवीन
रात्री च्या गाडी नी जेव्हा गावी जायच असते तेव्हा बस मध्ये बसायच्या अगोदर दोन तीन वेळा लघवी झाल्याची भावना निर्माण होते आणि तेवढ्या वेळा जातो पण. गाडीत बसल्या वर पण हाच विचार मध्येच लघवी ल लागणार नाही ना. आणि हमखास लघवी ला तीव्र लागते मग बस थांबे पर्यंत घालमेल. असा मी रात्री झोपल्यावर सकाळ पर्यंत एकदा पण लघवी ला उठत नाही.वारंवार मला लघवी होत नाही. भीती मुळे बस प्रवासात तसे वर्तन होते. मानसिक स्थिती चा संबंध नक्की आहे त्या मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जागरणाचे कारण जर अति विचार

आग्या१९९०
गुरुवार, 10/07/2021 - 21:32 नवीन
जागरणाचे कारण जर अति विचार किंवा काही समस्या असेल तर मग मनाला एक अस्वस्थता असते. त्यातून मग थोडासा चाळा सुरू होतो जागरणाची दोन्हीही कारणे नाहीत. १) सिनेमे किंवा OTT वर मालिका एका बैठकीत बघणे. २) एखादी नवीन कल्पना सुचली की ती जागून सलगपणे करून बघणे. ३) पाहुणे घरी आल्यास गप्पा रंगल्या की जागरण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अल्कलाईन वॉटर

तर्कवादी
गुरुवार, 10/07/2021 - 19:30 नवीन
डॉक्टर, मी आधी विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तर दिलेत याकरिता धन्यवाद, आणखी एक आठवले. सध्या अल्कलाईन पाण्याची लोकप्रियता वाढत आहे असे दिसते. मध्यंतरी विराट कोहली असंच काहीस तीन की चार हजार रु लिटर किमतीचं पाणी पितो असं वाचलं (बातमी कितपत खरी ते माहित नाही). पण एकंदरीत याविषयावर तुमचे मत काय ? खेळाडूंना अत्युच्च प्रतीचा फिटनेस हवा असतो पण सामान्य माणसाला अशा पाण्याचा फायदा होवू शकतो का ?
  • Log in or register to post comments

तर्क.

हेमंतकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 20:44 नवीन
अल्कलाईन पाण्याची>>>>> असे पाणी पिऊन आरोग्याला खरंच काही फायदे होतात का हा वादग्रस्त प्रश्न आहे. मुळात यासंदर्भात शास्त्रशुद्ध संशोधन झालेले फारसे आढळत नाही. काही तुरळक गोष्टी वाचायला मिळतात पण त्यांची अधिकृतता संशयास्पद वाटते. माझ्या मते सामान्य माणसांनी सामान्य पाणीच प्यावे हे उत्तम. खेळाडू का पितात याचे कारण माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

तीन की चार हजार रु लिटर

सुबोध खरे
Fri, 10/08/2021 - 10:47 नवीन
तीन की चार हजार रु लिटर किमतीचं पाणी हायला लोकांना च्यू बनवायचे काय काय धंदे लोक शोधून काढतील? अल्कलाईन पाणीच प्यायचे तर दोन पैशाचा कणभर खायचा सोडा टाका पाण्यात. पाणी अल्कलाईन होईल ८ वि चे रसायनशास्त्र आहे हे. हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

लोकाना इनो घ्याला लावणार हे शेलेब्रिटी

सुरिया
Fri, 10/08/2021 - 10:56 नवीन
चिऊताईगीरी आहे हे खरेच पण ब्लॅ़क वॉटर नावाने हे अ‍ॅमेझॉनवर मिळते. नुसते अल्कलाईन नव्हे तर ७० हून अधिक नैसर्गिक खनिजे आहेत म्हणे ह्यामध्ये. अर्धा लि. बाटली २१६० रु. ला आहे. कोहली हेच पितो म्हणे पाणी. इतर काही जिम स्पेशालिस्ट नायिका, शेलेब्रिटी आहेत म्हणे फक्त हेच पाणी पिणारे. Image removed. आपण इनो घ्यायचे. आणि काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भारीच ..

हेमंतकुमार
Fri, 10/08/2021 - 11:03 नवीन
आपल्याला साधे नळाचे पाणीच आवडते बुवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

२१६० ला २४ अर्ध्या लिटरच्या

सुबोध खरे
Fri, 10/08/2021 - 11:27 नवीन
२१६० ला २४ अर्ध्या लिटरच्या बाटल्या आहेत म्हणजे १२ लिटर साठी २१६० फुकट मिळणाऱ्या पाण्यासाठी ? हे ७० खनिजं वगैरे सगळं भंपक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

आयुष्यात एकदा...

हेमंतकुमार
Fri, 10/08/2021 - 11:33 नवीन
बाटलीबंद महागड्या पाण्यावरून एकदाच परदेशात गंडलो होतो तो किस्सा : माझ्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक फ्रिज होता. गेल्यावर उघडून पाहिले तर त्यात अनेकविध मद्याच्या बाटल्या आणि एकच पाण्याची बाटली होती. सर्व सीलबंद. मला मद्याशी कर्तव्य नव्हते. पाण्याची बाटली हातात घेऊन निरखून पाहिली. 'मेड इन फ्रान्स', अमुक-तमुक झऱ्याचे सुमधुर पाणी असे त्याचं वर्णन ! कुतूहल वाटलं म्हणून ती उघडली व थोडे प्यालो. नंतर हॉटेल सोडताना त्या माणसाने येऊन फ्रिजची व्यवस्थित पाहणी केली आणि पाण्याच्या बाटलीचे सील तोंडल्याची नोंद केली. मग खाली काऊंटरवर मस्त बांबू बसला. त्यांनी पाण्याच्या बाटलीचे अंदाजे साडेचारशे रुपये लावले होते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अति महागडे पाणी

हेमंतकुमार
गुरुवार, 03/24/2022 - 15:50 नवीन
वर चर्चा झाली होती त्याहूनही अधिक महागड्या पाण्याच्या बाटल्या जगात उपलब्ध आहेत त्यांची माहिती गम्मत म्हणून वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खूप छान लेख

तुषार काळभोर
गुरुवार, 10/07/2021 - 21:31 नवीन
प्रतिसाद, त्यावरील दोन्ही डॉक्टरांची अत्यंत उपयुक्त मते वाचत आहे. दोघांनाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख

Nitin Palkar
गुरुवार, 10/07/2021 - 21:31 नवीन
अतिशय सुंदर लेख... नेहमीप्रमाणेच. सर्व प्रतिसादकांच्या शंकांना दिलेल्या सविस्तर उत्तरांमुळे खूपच उपयुक्त माहिती मिळाली. विशेष म्हणजे 'कायप्पा विद्यपीठा'द्वारे मिळणाऱ्या अ मूल्य ज्ञानासंबंधी योग्य माहिती मिळाली. खूप खूप लिहा हा आग्रह.
  • Log in or register to post comments

खूप छान लेख. ऑफिसमध्ये

नचिकेत जवखेडकर
Fri, 10/08/2021 - 08:21 नवीन
खूप छान लेख. ऑफिसमध्ये वातानुकूलन सतत चालू असल्यामुळे पण तहान लागत नाही. त्यावेळेला ठरवून पाणी पिणे आवश्यक असते का?
  • Log in or register to post comments

नचिकेत

हेमंतकुमार
Fri, 10/08/2021 - 08:26 नवीन
आपल्या लघवीचा रंग बघत राहायचे तो कायम फिकट पिवळसर राहील अशा बेताने पाणी प्यायचे हाच उत्तम निर्देशक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नचिकेत जवखेडकर

धन्यवाद !

नचिकेत जवखेडकर
Fri, 10/08/2021 - 08:33 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

आणि

हेमंतकुमार
Fri, 10/08/2021 - 08:34 नवीन
जर वातानुकूलनमुळे लघवी भरपूर होत राहिली तर तहानेची भावना होईल. यामध्ये व्यक्तीभिन्नता राहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

कुमार sir

Rajesh188
Fri, 10/08/2021 - 13:30 नवीन
कधी कधी पूर्ण व्हाइट आणि क्वचित डार्क पिवळा असतो ह्याचा अर्थ काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अर्थ..

हेमंतकुमार
Fri, 10/08/2021 - 13:37 नवीन
कधी कधी पूर्ण व्हाइट आणि क्वचित डार्क पिवळा असतो ह्याचा अर्थ काय >> जेव्हा भरपूर पाणी पिलेले असते आणि घामाद्वारे विशेष बाहेर पडत नाही तेव्हा लघवीचा रंग पूर्ण सफेद राहू शकेल. हे चांगलेच आहे क्वचित गडद पिवळा दिसला तर >>> ( कुठलाही आजार नाही अथवा औषधोपचार चालू नाहीत हे गृहीत धरून) : म्हणजे पिण्याच्या पाण्याचे प्रमाण तुलनेने कमी पडत आहे किंवा खूप उन्हाळा आहे किंवा आपण बाह्य वातावरणात बराच घाम गाळून आलेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

धागा आणि प्रतिसाद दोन्ही

प्रचेतस
Fri, 10/08/2021 - 09:10 नवीन
धागा आणि प्रतिसाद दोन्ही उत्तम.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

गॉडजिला
Fri, 10/08/2021 - 11:14 नवीन
या धाग्यात इतके विवीधरंगी प्रतिसाद, प्रश्न अन उत्तरे वाचायला मिळाली की पाण्यासारखी जिवनावश्यक बाब व त्यानुशंगाने लोकांचे वीवीध समज, गैरसमज, प्रश्न व शंकासमाधान ज्याकडे एरवी आपले दुर्लक्ष होते त्याची चांगलीच उजळणी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रथम लिंबाचा रस आणि लिंबू

सुबोध खरे
Fri, 10/08/2021 - 12:29 नवीन
प्रथम लिंबाचा रस आणि लिंबू सरबत आणि लिंबू पाणी यातील फरक जाणून घ्या लिंबाच्या रसाची पी एच २ असते. बॅटरीच्या ऍसिडची आणि पोटातील आम्लाची पी एच १ असते आणि लिंबू सरबताची साधारण ५ ते ६ असते. सकाळी एक लिटर पाणी त्यात १ लिंबाचा रस आणि १ चमचा मध घालून घेतल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. मी १९८७ साली एम बी बी एस झाल्यावर माझ्या आजोबांची अनेक वर्षांची रेचक ( कायम चूर्ण किंवा गंधर्व हरितकी) घेण्याची सवय वरील साध्या घरगुती उपायाने घालवली होती. रात्री वारंवार लघवीला लागू नये म्हणून आपली मूत्रपिंडे लघवी जास्त संतृप्त (concentrated) करत असतात यामुळे आपल्याला तरुणपणात रात्री लघवीसाठी उठण्याची गरज पडत नाही. आपण रात्री कॉफी किंवा अतिरिक्त पाणी घेतले तर गोष्ट वेगळी. तेंव्हा रात्रभरात घट्ट झालेली (concentrated) लघवी साफ होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सकाळी भरपूर पाणी पिणे हे नक्कीच फायदेशीर आहे. याशिवाय ज्यांना बद्धकोष्ठाची सवय आहे त्यांनी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून घेतल्याने नक्कीच फायदा होतो. वृद्धापकाळामुळे आपली आतडी मंद होतात त्यामुळे अन्न जास्त काळ पोटात राहतात यामुळे त्यातील पाणी शोषून घेतले जाते आणि त्यांना शौचास खडा होतो याशिवाय बहुसंख्य लोकांना प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीचा त्रास असल्याने वारंवार लघवीची भवन होते हा त्रास वाचवण्यासाठी ते पाणीकामी पितात यामुळे बद्धकोष्ठता वाढते. रात्री पाणी प्यायल्यास वारंवार लघवीची उठावे लागते आणि त्याने झोपेत व्यत्यय येतो आणि वयानुसार परत झोप लागण्यास वेळ लागतो. या सर्व त्रासातून वाचण्यासाठी सकाळी उठल्यावर १ लिटर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घेणे श्रेयस्कर आहे. एक लिटर पाण्यात एक लिंबाचा रस घातल्याने पाण्याची आम्लता फारशी वाढत नाही आणि त्याने दात खराब होतील याला कोणताही शास्त्राधार नाही. आपण कधीही एक ग्लास भरून लिंबाचा रस पीत नाही. एक चमचा लिंबाचा रस घेतल्याने त्यातील आम्लते मुळे इनॅमल चे कॅल्शियमचे खनिज (हायड्रॉक्सीपेटाईट) थोडेसे खडबडीत होते. हे इनॅमल आपल्या लाळेतील खनिजांमुळे परत रिपेअर केले जाते. त्यामुळे आपण आहारात खातो तेवढया लिंबाने दात खराब होतात याला फारसा शास्त्रीय आधार नाही. The role of salivary contents and modern technologies in the remineralization of dental enamel https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7076334/ लहानपणी आपल्यापैकी कित्येकांनी भरपूर आवळे चिंचा कैऱ्या खाल्ल्या आहेत. त्यात भरपूर आम्ल असते त्यामुळे दात आंबत असत पण त्यामुळे कुणाचे दात खराब झालेले ऐकले नाहीत.
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Fri, 10/08/2021 - 12:57 नवीन
एक लिटर पाण्यात एक लिंबाचा रस घातल्याने पाण्याची आम्लता फारशी वाढत नाही >>+१ चांगला मुद्दा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कुणाचे दात खराब झालेले ऐकले नाहीत.

Rajesh188
Fri, 10/08/2021 - 20:29 नवीन
विषय काय तुम्ही लिहता आहात काय. Dr कुमार ह्यांनी अगोदर च हे स्पष्ट केले आहे दात मजबुत असतील,दातांची झीज झाली नसेल तर आवळा,लिंबू नी दातावर काहीच विपरीत परिणाम होत नाही उतार वयात जेव्हा दात झिजू लागतात तेव्हा मात्र विपरीत परिणाम . खरे साहेब नेहमीच तुमचा रेडा गाबना कसा काय राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जिथे तिथे आपली अक्कल पाजळलीच

सुबोध खरे
Sat, 10/09/2021 - 09:17 नवीन
जिथे तिथे आपली अक्कल पाजळलीच पाहीजे असा आपला दंडकच आहे का? दाताच्या इनॅमल बद्दल मी १५ जून २०२१ चा संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे तो अगोदर वाचून घ्या त्याचे संदर्भ निबंध वाचून घ्या त्यावर मनन आणि चिंतन करा आणि मग त्यातून काही समजून आलं तर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

संदर्भ नका देवू

Rajesh188
Sat, 10/09/2021 - 15:19 नवीन
तुम्ही डॉक्टर आहात तुमचे मत ध्या .इंटरनेट वर जावून आम्ही स्वतः पण माहिती घेवू शकतो. 1760 मत असतात तिथे. तुम्ही स्वतःचे ज्ञान वाटा. लिंक कशाला देताय.आम्हला काय गूगल search कसे करतात ते माहीत नाही काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

.इंटरनेट वर जावून आम्ही स्वतः

सुबोध खरे
Mon, 10/11/2021 - 11:47 नवीन
.इंटरनेट वर जावून आम्ही स्वतः पण माहिती घेवू शकतो. मग तुम्ही इंटरनेट वर जावून स्वतः माहिती घ्या कि कोण नको म्हणतंय? आपली अक्कल पाजळण्यापेक्षा ते बरं नाही का? जिथे तिथे राजेश उवाच कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रतिसादा बद्दल धन्यवाद ....

मुक्त विहारि
Mon, 11/28/2022 - 23:01 नवीन
चांगली माहिती मिळाली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बोअर चे पाणी अयोग्य असते का ?

hrkorde
Sat, 10/09/2021 - 08:26 नवीन
बोअर चे पाणी पिण्यास अयोग्य असते का ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा