.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
.photo img {
max-width: 400px;
}
श्रीगणेश लेखमाला २०२१
क्रिस्पी खाजे / चिरोटे
नाजूक तोंडांत विरघळणारे खाजे किंवा चिरोटे न आवडणारे प्राणी विरळाच !
खाण्यास जितके अप्रतिम, तितकेच बनवायला कठीण असतील, असं बऱ्याच लोकांना वाटतं पण तसं अजिबात नाहीये. हाताशी थोडा निवांत वेळ ,सोबतीला आवडतं संगीत असेल तर हा पदार्थ कधी तयार झाला, तुम्हाला देखील कळणार नाही!
चला मग करुया सुरवात..
कृती:
एका परातीत २ वाट्या मैदा घ्यायचा.
मधोमध गोल करायचा. त्यात घालायचं चिमूट भर मीठ, आणि सोबतीला घालायचं ५-६ चमचे खाण्याचे तेल (चमचे आपले कांदेपोह्यांचे).
आता हे तेल सर्व मैद्याला हाताने चोळून घ्यायचं, पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. मूठ नसेल होत तर एकदोन चमचे तेल अजुन घाला. मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन!
आता थोडं थोडं पाणी घालून पोळ्यांसाठी जशी कणीक मळतो तशीच मऊ मळून घेणे.
आता तयार गोळा २० ते २५ मिनिटांसाठी रेस्ट करायला झाकून ठेवा.
तोपर्यंत पाक बनवून घेऊ. पाक पण सोप्पाच आहे.
ज्या वाटीने मैदा घेतलाय तीच वाटी गच्च भरून साखर घ्या. ती एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात ओता. त्यात तीच वाटी भरून पाणी घाला. गॅस चालू करून पहिली उकळी आली की त्यात लिंबाची चतकोर फोड पिळून घेणे. २-३ हिरव्या वेलची आणि खायचा केशरी कलर अगदी चिमुट भर( ऑप्शनल) टाका.
तीन ते चार मिनिटांनी पाक बोटाच्या चिमटीत घेऊन चेक करा. मधासारखा घट्ट आणि चिकट लागला की लगेच गॅस बंद! एकतारी, दोनतारी पाकची कटकट नाही बघा!
आता पिठानी भरपूर आराम केलाय. त्याला जरा व्यवस्थित मळून तेलाचा हात लावून समान असे ५ गोळे किंवा उंडे तयार करून घ्या.
आता आपण २ मिनिटात याला लावायचा साटा तयार करून घेऊ.
२ चमचे भरून तूप(वितळले ले नाही) आणि २ चमचे मैदा एका मोठ्या वाटीत घेऊन फेटायचं. इतकं फेटायचं की ते हलकं आणि शुभ्र झालं पाहिजे मलई सारखं. झाला आपला साटा तयार!
आता एक लाटलेली पोळी घेऊन त्यावर हातानेच नीट साटा पसरवून घ्यायचा.
अशा प्रकारे साटा लावून त्यावर दूसरी पोळी ठेवायची. पुन्हा साटा लावायचा. मग परत सेम कृती.
सर्व पोळ्यांना साटा लावुन झाला की मग त्याची गुंडाळी(रोल) करायची.
मग त्याच्या समान लाट्या कापून घ्यायच्या.
आता एक-एक लाटी घेऊन तिला बोटांनी हलकेच दाब द्यावा.
आणी एकदाच त्यावर अगदी अलगद लाटणं फिरवावं, म्हणजे लेअर्स दाबले जात नाहीत.
आता तेल तापत ठेवायचं. अगदी कडकडीत नको साधारण तेल गरम झाले की गॅस कमी करायचा.
तेलात छोटी गोळी टाकायची. ती गोळी वर आली की चिरोटे/ खाजे सोडायचे. तेलात मंद आचेवर छान तळून घ्यायचे.
एकेक पदर मस्त सुटतात -
सर्व खाजे तळून झाले, पण तोपर्यंत आपला पाक गार झाला असेल. तर तो थोडा गरम करून घ्या आणि हे गरम गरम खाजे त्यात साधारण अर्धा मिनिट ( एका बाजूने १५-२० सेकंद) मुरत ठेवा.
बघता बघता झाले की राव! क्रिस्पी खाजे म्हणा किंवा चिरोटे म्हणा..
आता लाळ गाळत बसू नका, रेसिपी लगेच करायला घ्या!
-पियुषा.
प्रतिक्रिया
14 Sep 2021 - 5:18 pm | स्मिताके
पियुशा दोन्ही पाककृती मस्त. फोटोही किती सुंदर. (कधीतरी) प्रयत्न करण्याच्या यादीत दोन्ही घातल्या आहेत :) :)
14 Sep 2021 - 5:24 pm | गॉडजिला
ओ माय फेवरीट लेखक पिउशा तुम लिखते रेहना हमेशा…
14 Sep 2021 - 5:28 pm | चौथा कोनाडा
भारी दोन्ही पाकॄ !
वॉव ! कसले ब्युटीफुल !
कधी एकदा खायला मिळतात असे झाले !
14 Sep 2021 - 5:35 pm | Bhakti
वॉव !पियुशा पाकृ नक्की करणारं!
14 Sep 2021 - 8:59 pm | मदनबाण
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watch
14 Sep 2021 - 9:50 pm | सुक्या
मस्त !! तोंपासु हे वेगळे सांगायला नको ....
15 Sep 2021 - 7:22 am | सुधीर कांदळकर
अशा मस्त सूचना. सोबतीला मस्त प्रकाशचित्रे. आवडले. धन्यवाद.
15 Sep 2021 - 8:12 am | कपिलमुनी
रेसिपी उत्तम आणि तोंपासू !
गोड न खाण्याच्या बंधनामुळे हे तिखट बनवता येतील का ?
15 Sep 2021 - 2:44 pm | पियुशा
तिखट तर अजुन सोप्प काम , पाक बनवायला नको, मैदा मळताणाच त्यात चवीनुसार मीठ , लाल तिखट add करा हव तर थोडे जिरे , ओवा, कसुरी मेथी घालावी, मस्त चहा बरोबर कुरकुरीत लेर्स वाली खारी म्हणून सहज खपून जाईल
15 Sep 2021 - 11:05 pm | कपिलमुनी
विकांतास प्रयोग करण्यात येईल
16 Sep 2021 - 11:47 am | अनिंद्य
ही तर भारी आयडियाची कल्पना, करून बघणेत येईल :-)
(मूळ कृती पण छानच आहे, फक्त सध्या गोडावर बंदीहुकूम लागू केलाय मला)
15 Sep 2021 - 9:05 am | प्रचेतस
खल्लास....!!!
15 Sep 2021 - 9:29 am | कंजूस
कोपऱ्या कोपऱ्यावर मिळतात तिकडे ते असे घरी करता येतात?
15 Sep 2021 - 2:13 pm | सरिता बांदेकर
छान. रेसीपी वाचल्यावर वाटतंय आपल्याला पण जमेल करायला.खूप महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत.
धन्यवाद.
15 Sep 2021 - 5:57 pm | सस्नेह
कातिल फोटो !
15 Sep 2021 - 9:15 pm | तुषार काळभोर
इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय की 'ह्या! त्यात काय एवढं!' असं वाटेल एखाद्याला.
15 Sep 2021 - 11:06 pm | कपिलमुनी
तळणे टाळून एयर फ्रायरमध्ये होतील का हो हे?
कॅलरीमुनी
16 Sep 2021 - 5:04 am | चौकस२१२
एयर फ्रायरमध्ये
" त्यात जे साटे म्हणजे तूप आहे त्यामुळे थोडा खुशखुशीत पणा येईल बहुतेक " तुका म्हणे त्यातल्या त्यात " अप्लाय येथे जर ग्रीक फिलो पेस्ट्री ( भारतातातील पेस्ट्री नव्हे ) तर अनेक पापुद्रे असलेली मैद्याची पोळी सारखी मिळत असेल तर ... आधी करून बघा म्हणजे मी काय म्हणतो त्याची कल्पना येईल
16 Sep 2021 - 5:55 am | पियुशा
काही कल्पना नाही कारण मी कधी ट्राय केले नाही एअर फ्रायर मध्ये,चौकस म्हणताहेत तसे प्रयोग(थोड्या प्रमाणात) करून बघायला हरकत नाही
15 Sep 2021 - 11:44 pm | आग्या१९९०
मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन!
एक शंका. तेल गरम करून पिठात टाकले जाते त्याला मोहन म्हणतात. पाकृ मध्ये पिठात गरम तेल टाकायचे का?
16 Sep 2021 - 12:34 am | पियुशा
नाही तेल गरम वैगरे नाही करायचं ,गारच वापरायचं आहे
16 Sep 2021 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! नंबर एक दिसत आहेते. आपल्याला आवडतात चिरोटे.
कुरीयरने पाठवून देणे. धन्यवाद. :)
-दिलीप बिरुटे
17 Sep 2021 - 8:27 am | ज्ञानोबाचे पैजार
या चिरोट्यां करता मी कुरीयर बॉय व्हायला तयार आहे.
चिरोट्यांचा डबा विनामुल्य बिरुटेसरांपर्यंत पोचवण्याचे काम मी आनंदाने करेन.
पैजारबुवा,
18 Sep 2021 - 9:29 pm | गुल्लू दादा
फोटो सुद्धा छान आहेत.
29 Sep 2021 - 12:19 am | जुइ
काय ते कातिल फोटो काढले आहेत दोन्ही पाकृसाठी. आवडले!
1 Oct 2021 - 9:53 pm | रुपी
भारीच! शेवटचा फोटो तर बेस्ट!
पाकृ नीट समजेल अशी दिली आहेस. धाडस करेन लवकरच :)