श्री गणेश लेखमाला २०२१- जीवनसाथी

आजी's picture
आजी in लेखमाला
11 Sep 2021 - 12:40 pm

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

माझा एक वर्गमित्र.तिसरी ते अकरावी एकाच वर्गात आम्ही शिकलो. त्यानं माझ्यासारखीच सत्तरी पार केलेली. बरेच दिवसात त्याचा फोन नव्हता. मेसेज नव्हता.ग्रुपवर पण मेसेज नाही. मला थोडी काळजी वाटली. मग मीच फोन केला. दोन,तीनदा. वेगवेगळ्या वेळी. तर त्यानं उचललाच नाही. मग मेसेजेस केले. त्यालाही उत्तर दिले नाही. माझी काळजी वाढली. वाटलं,तो आजारी आहे की काय! इतर वर्गमित्र,मैत्रीणींपैकी एक दोघांकडं चौकशी केली. ते म्हणाले की,आमचाही फोन तो उचलत नाहीये.

आता फोनच उचलत नाहीयै म्हटल्यावर काय घडलंय ते कसं कळणार? मी शांतपणे बसून राहिले. एके दिवशी त्याचाच फोन आला. तो फोनवर रडत होता. म्हणाला,"साॅरी,तुझा फोन मी उचलला नाही. 'ही' गेली ग! मी भानावर नाहीयै. कुठंच लक्ष नाहीयै माझं." आता तो स्फुंदून,स्फुंदून रडायला लागला.

मी म्हटलं,"अरे बापरे! आजारी होत्या का?"हार्ट अटॅक नं गेली शेवटी. आठ दिवस हाॅस्पिटलमधे होती. मला शाॅक बसलाय. वाटलं होतं,बरी होईल. मला काही सुचत नाहीये. अर्धांगी माझी ती! माझं अर्ध अंग लुळं झाल्यासारखं वाटतंय."
"केव्हा गेल्या?"
"पंधरा दिवस झाले."
पंधरा दिवसानंतरही अजूनही इतका रडतोय हा!
"खूप चांगली होती. सगळं माझ्या हातात आणून द्यायची. माझं सगळं काही करायची. कपडे इस्त्रीला टाकायची. बुटांना पाॅलीश करायची. दाढीचं सामान धुवायची. मला घरातलं काहीही बघायला लागायचं नाही. प्लंबर,इलेक्ट्रिशियन, सुतारकाम सगळं तीच माणसं बोलावून करुन घ्यायची. मला घरात चहा,साखर कुठल्या डब्यात भरून ठेवलंय तेही माहीत नव्हते. मग कणिक, डाळ, तांदूळ कुठून माहीत असायला? तिचे दिवस व्यवस्थित केले मी. काही कसर ठेवली नाही."त्याचं रडणं थांबतच नव्हतं.मी त्याला धीर दिला.

म्हटलं," कशात तरी मन गुंतव. दोन-चार दिवस कुठल्या तरी गावाला जाऊन ये. किंवा मुलाकडं जा. नातवंडांना भेट. तुझी तुझ्या महाराजांवर श्रद्धा आहे ना? त्यांची पोथी वाच. ध्यानधारणा कर. जप कर. पुस्तकं वाच. टीव्ही बघ. त्यावरच्या तर्कशून्य मालिका बघताना तुला हसू येईल. न्यूज म्हणजे तर करमणुकीचा खजिनाच. फिरायला जा सकाळचा. ओळखीचे लोक भेटतील. गप्पा होतील. स्वयंपाकाला, घरकामासाठी नोकर ठेव. व्यवस्थित जेव. तुझा संसार सुखाचा झालाय. चांगलं वैवाहिक जीवन तू जगलायस. आता मन शांत ठेव. काळ सगळ्या दुःखांवरचं औषध आहे असं म्हणतात ते खोटं नाही. धीर धर. आनंदात राहा. मला अधुनमधून फोन कर. मन मोकळं कर."वगैरे बोलून मी फोन ठेवला.
मनात आलं,त्याच्या बायकोनं किती परावलंबी,म्हणजे तिच्यावर अवलंबी केलं होतं त्याला! लाडावलेलं मूलच जणु! ती नसल्यामुळे त्याच्या सेवेत खंड पडला होता. तो खरंच लुळापांगळा झाला होता. त्याच्या दुःखात विरहापेक्षाही गैरसोय होत असल्यामुळे आलेली हताशा होती.
माझी एक मैत्रीण आहे. तिचा नवरा तिच्या तरुणपणीच गेला. रडली. रडली. गोंधळली. बावचळली. पण थोड्याच दिवसात ठाम उभी राहिली. पदरी मूल होतं. तिनं नोकरी धरली. घर चालवलं. सासूसासऱ्यांचं केलं. मुलाचं तर केलंच केलं. कधी आयुष्य व्यतीत झालं कळलंच नाही. ती म्हणते,"हे गेल्यावर मी कणखर बनले. मॅच्युअर झाले. खंबीर बनले. स्वावलंबी झाले. माझी निर्णयक्षमता वाढली. मी 'परिपूर्ण माणूस' बनले.

माझ्याकडं कामाला एक सोळा वर्षांची मुलगी होती. तिचा बाप दारुडा होता. तिची आई माझ्याकडं काही जास्तीचं काम असेल तर मदतीला यायची. नवरा काहीच मिळवायचा नाही. हीच दिवसभर धुणंभांडी करायची, कमवायची.नवऱ्याला दारुसाठी पैसे पुरवायची. आणि रोज त्याच्या हातचा गुरासारखा मार खायची. अंगावर फक्त हाडं आणि कातडं शिल्लक होतं तिच्या!एके दिवशी तो नवरा मेला. त्यानंतर जवळजवळ महिन्यानंतर ती मला दिसली. मी तिला ओळखलंच नाही. तिची तब्येत खूपच सुधारली होती. अंगावर मांस चढलं होतं. गाल वर आले होते. गळ्याजवळचे दोन्ही खळगे भरले होते. तिला नवऱ्याचा मृत्यू मानवला होता..

मी ज्या महिला मंडळात जायची, तिथल्या एका बाईचा नवरा गेला. त्यानंतर लगेचच ती मंडळात यायला लागली. सगळ्या बायका कुजबुजल्या. "इतक्या लगेच काय मंडळात यायचं!थोडे दिवस घरीच थांबायचं. बरं दिसतं का?" ती बाई ही अजबच. नवरा गेल्यावर ती आमूलाग्र बदलली. थोडयाच दिवसांत तिनं बाॅयकट केला. लिपस्टिक लावायला सुरुवात केली. साडीऐवजी तंग ड्रेसेस घालायला सुरुवात केली. म्हणाली," हे असताना ह्यांनी मला अगदी काकूबाई सारखं राहायला लावलं. काहीही हौसमौज करु दिली नाही. आता मी माझ्या मनाप्रमाणे लागणार. पार्लरला जाणार. सुंदर,तरुण दिसणार."

अशीच एकाची बायको गेली. तो आठ दिवसांत कामावर जायला लागला. त्याच्या आसपासच्या बायका म्हणाल्या,"जाऊ दे कामावर. कुठंतरी मन रमवायलाच पाहिजे ना बिचाऱ्यानं?" हेच विधवा आठव्या दिवशी कामाला गेली तर?ह्या नवविधुर पुरुषाला आसपासच्या घरातल्या स्त्रिया चहा नेऊन द्यायच्या.जेवणाचे डबे जायचे. नाश्ता जायचा. खायचे पदार्थ जायचे. त्याला बिचाऱ्याला कोण करुन घालणार? त्या"बिचाऱ्यानं" लवकरच दुसरं लग्न केलं.
माझी एक विधवा मैत्रीण आहे. तिला सगळे विचारतात,"तुझे मिस्टर गेले. आता तुला एकटीनं झोपायची भीती नाही वाटत?"
आणि माझ्या विधुर मित्राला विचारतात,"तुझी मिसेस गेली. आता तू तुझ्या जेवणाचं काय करतोस?"
म्हणजे स्वयंपाक करायला बायको आणि रक्षण करायला नवरा. हे फिट बसलंय. डोक्यातून जात नाही.

असं असलं तरी जगात असंख्य नवरा-बायको चे संसार सुरळीत चालू आहेत. कुणाचा/कुणाची जीवनसाथी जातो/जाते तर कुणाचा/कुणाची म्हातारपणापर्यंत टिकतो/टिकते. थोड्या फार कुरबुरी, भांडणतंटे होत, काही प्रेमाचे ,सुखाचे क्षण अनुभवत दोन जीवनसाथी परस्परांबरोबर सहजीवन जगतात.
माझे सासरे गेले. सासूबाई एकट्या झाल्या. म्हणाल्या, तरुणपणी जोडीदार गेला तर आयुष्य जगायला इतर व्यवधानं असतात. म्हातारपणी रितेपण येतं. त्या दोघांत मतभेद होते. भांडणं व्हायची पण ती लगेच मिटायची. दोघं एकमेकांची काळजी घ्यायचे. एकत्र घरकाम करायचे. त्यांच्यात हास्यविनोद चालायचे. पण सासरे गेल्यावर सासूबाई लवकर सावरल्या. म्हणायच्या,"अग म्हातारपण आलं की कुणीतरी एक आधी जाणार, कुणीतरी एक नंतर जाणार हे ठरलेलेच असते. ते दोघांनाही माहीत असतं. मनाची तयारी झालेली असते. पण एक सांगू? कसाही असला तरी एक नवरा हवा आयुष्यात!कडाकडा भांडायला, रुसवेफुगवे करायला, अबोला धरायला कुणीतरी एक "आपलं असं," "हक्काचं माणूस "हवं. परका तो परकाच! तो बरा आपण बोललेलं ऐकून घेईल?"

-आजी.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Sep 2021 - 10:22 am | प्रचेतस

सुरेख लेख.

रंगीला रतन's picture

11 Sep 2021 - 10:45 am | रंगीला रतन

छान!

तुषार काळभोर's picture

11 Sep 2021 - 11:14 am | तुषार काळभोर

खूप छान.

कसाही असला तरी एक नवरा हवा आयुष्यात!कडाकडा भांडायला, रुसवेफुगवे करायला, अबोला धरायला कुणीतरी एक "आपलं असं," "हक्काचं माणूस "हवं. परका तो परकाच! तो बरा आपण बोललेलं ऐकून घेईल?"

वा!!

हे गेल्या नंतर त्यांचे जगणे होते... कुंकवाला आधार लागतोच.

बरे ही परिस्थिती बदलली तरी संस्कृती बुडाल्याची टूम सुरू होते नाहीं बदलली तर संस्कृती टिकून राहते ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2021 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीना इसीका नाम है, आजी लेखन वाचलं आणि विचार करु लागलो की आपण आयुष्यात आप्त, स्वकीय यांचे किती कोष गुंडाळून घेतो.
अतिशय अनुभव संपन्न आणि वास्तवाचं योग्य भान देणारं लेखन. आवडलं ग आजी लेखन. थँक यू सो मच.

-दिलीप बिरुटे

छान लिहिलंय, आवडला लेख.

चांदणे संदीप's picture

11 Sep 2021 - 4:11 pm | चांदणे संदीप

आजींची लेखणी कधीही निराश करत नाही. धन्यवाद आजी!

सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Sep 2021 - 4:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडले,
पैजारबुवा,

सस्नेह's picture

11 Sep 2021 - 5:04 pm | सस्नेह

अगदी खरं...!
लेखन आवडले.
स्नेहा

टर्मीनेटर's picture

11 Sep 2021 - 8:23 pm | टर्मीनेटर

नेहमीप्रमाणेच छान लेखन आजी 👍

स्मिताके's picture

12 Sep 2021 - 5:13 pm | स्मिताके

नेहमीप्रमाणे छान लेख. आवडला.

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 10:58 am | प्राची अश्विनी

नेहमीप्रमाणे हलकाफुलका छान लेख.

इंद्रधनू's picture

13 Sep 2021 - 4:51 pm | इंद्रधनू

अगदी बारीक निरीक्षण ,मस्त लिहिलंय

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Sep 2021 - 5:47 pm | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला.

आपलं लेखन नेहमीच ताजं आणि वेगळा विचार करायला भाग पाडणारं असतं. आवडलं तर आहेच! :-)

चित्रगुप्त's picture

14 Sep 2021 - 8:31 am | चित्रगुप्त

विविध उदाहरणे दिल्याने लेखाची खुमारी आणखीनच वाढली आहे. सुंदर लेखन.

सुधीर कांदळकर's picture

15 Sep 2021 - 6:58 am | सुधीर कांदळकर

असेच नमुने माझ्या पण पाहण्यात आलेले आहेत. छान.

निरीक्षणातले अनुभव समृद्ध, सुंदर ओघवती मांडणी, मस्त सकस लेखन.

आवडले.

धन्यवाद.

अनिंद्य's picture

16 Sep 2021 - 12:02 pm | अनिंद्य

तुमचं लक्ष चौफेर आहे आजी, तुमचे लेखनविषय वाचून लक्षात येतंच. टिपकागद जणू.

लेख आवडला.

गोरगावलेकर's picture

18 Sep 2021 - 11:33 am | गोरगावलेकर

आपले निरीक्षण व ते सांगायची पद्धत नेहमीच आवडते.

गुल्लू दादा's picture

18 Sep 2021 - 8:00 pm | गुल्लू दादा

हलका फुलका लेख आवडला. अजून लग्न बाकिये तरी बायकोच्या आधी मी गेलो तर कसं असा प्रश्न मनात आला आणि काळजी वाटली.

आजी's picture

20 Sep 2021 - 1:48 pm | आजी

प्रचेतस-धन्यवाद.

रंगीला रतन-थॅंक्स.
तुषार काळभोर-वा! तुम्ही तर माझ्या लेखाचं सारसूत्रच मांडून दाखवलंंत.
गाॅडजिला-खरंय तुमचं म्हणणं.

प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-"आवडलं ग आजी लेखन"या तुमच्या अभिप्रायातली आपुलकी मनाला स्पर्शून गेली.

ननि-थॅंक्स.
चांदणे संदीप-तुम्हांला मी निराश करणार नाही.प्राॅमिस.
ज्ञानोबाचे पैजार-एका शब्दाचा सुंदर प्रतिसाद.

सस्नेह-आभार.
टर्मीनेटर-आभारी आहे.
स्मिताके-थॅंक्स अ लाॅट.
प्राची अश्विनी-धन्यवाद.
इंद्रधनु-माझ्या बारीक निरीक्षण शक्तीचं तुम्ही कौतुक केले आहे. वा! बरं वाटलं.

ॲबसेंट माईंडेड-तुम्हांला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.
राघव-तुमचा अभिप्राय माझा उत्साह वाढविणारा आहे.
चित्रगुप्त-समाधान वाटलं.

सुधीर कांदळकर-तुमच्याही बघण्यात असेच नमुने? द्या टाळी.
अनिंद्य-माझ्या लेखनाला टिपकागदाची उपमा! बरं वाटलं.
गोरगावलेकर-थॅंक्यू.

गुल्लूदादा-तुमचं लवकरच लग्न होऊ दे.आशीर्वाद.काळजी करु नका.

सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

सिरुसेरि's picture

20 Sep 2021 - 10:40 pm | सिरुसेरि

सुरेख निरिक्षण कथन . +१

अथांग आकाश's picture

21 Sep 2021 - 4:28 pm | अथांग आकाश

छान लेख! आवडला!!
0

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2021 - 5:37 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिहिलं आहे.
+१
वाचता वाचता जवळच्या काही घटना आठवल्या !
आणि ... अर्थातच स्वतःबद्दलचा विचार येऊन गेलाच !

सौंदाळा's picture

22 Sep 2021 - 5:50 pm | सौंदाळा

आजी, समर्पक लेख.
लग्न झाल्यावर क्षुल्लक कारणावरुन झालेले आमचं पहिलं भांडण आठवलं. २ दिवस अबोला, नंतर धुसफुस आणि सगळे सुरळीत व्हायला ८-१० दिवस गेले.
आता (क्वचित) कितीही कडाक्याचे भांडण झाले तरी काही वेळातच सगळं सुरळीत हा अलिखीत नियमच बनला आहे.
नवरा बायकोचे नातं हळुहळुच मुरत जातं.