स्मरण चांदणे १
दक्षिणेस पसरलेल्या छोट्या माळाच्या आड दडलेले गाव,म्हणून आडगाव.पाचवी पर्यंतचे शिक्षण गावी झाले.
नंतरचे बीडला.त्या काळात,केव्हा सुट्टी मिळेल अन केव्हा गावी जाईन असे व्हायचे.शिक्षण संपून पुढे वकील,सरकारी वकील होतो तेव्हा ही ओढ कायमच होती.आई वडील गावी होते.तिथे आमचे घर होते.एकोणीसशे एकोण्णवदला वडील गेले. तिथले घर बंद झाले.बत्तीस वर्षे झाली.पण अजूनही गाव,तिथली देवळे ,उत्सव,जत्रा,माणसे अन ते दिवस,आठवतात.
तिथल्या देवळांशी जोडलेले सण,उत्सव ,जत्रा आठवतात.
माळाच्या पायथ्याशी ग्रामदेवता महालक्ष्मी देवीचे दगडी मंदिर आहे.पंधरा सोळा पायरी चढून गेल्यावर मुख्य पण छोटे प्रवेशद्वार.त्याला जोडून छोटी माडी.पूर्वी कधीतरी तिथे नगारा असावा.म्हणून नगारखाना.त्याला लागूनच उजवीकडे मोठी दिपमाळ व डावीकडे छोटी देवळी.त्यात शेंदुर लावलेले देव.दिपमाळे समोर आणखी एका छोट्या देवळीत पण काही शेंदुराच्छादित देव.सभोवती प्रशस्त दगडी पटांगण. तिन्ही बाजूला प्रशस्त ओवर्या.त्यावर पत्र्याचे छप्पर.फार पूर्वी तिथे शाळा भरतअसे. पटांगणाचे मधोमध मुख्य मंदिर.त्यात पाषाणाची देवीची मुर्ती.अडीच तीन फुट उंचीची.छोट्या,तीन फुट उंचीच्या दरवाजामधून प्रवेश करायचा .वाकून.देवीसमोर आपोआप नतमस्तक व्हायचे.
मंगळवारी,शुक्रवारी,संध्याकाळी दर्शनाला येणारे स्त्रीया,पुरुषांची वर्दळ.एरवी शांत शांत .नवरात्रात मात्र मंदिर गजबजलेले.ते नऊ दिवस,काही भाविक,नवस म्हणून मंदिरात घटी बसत,म्हणजे देवळात मुक्कामी राहात. लोकांची वर्दळ असे.देवी घटी बसते.देवीचे चेहर्यावर हळदीचा लेप लावला जातो.विधीपूर्वक घट स्थापना केली जाते.शेतातील माती आणून त्यात विधीपूर्वक धान्य पेरले जाते.नवमी पर्यंत त्याची चांगलीच वाढ होते.छताला लटकवलेला लाकडी चौक सजवला जातो.त्याला दर दिवशी एक माळ लावली जाते .नऊ दिवसाच्या नऊ माळा.मंदिरात सप्तशितीचा पाठ होतो.पूर्वी नवरात्रात ,कुठल्यातरी गावचे गोंधळी येत.नऊ दिवस देवळात रोज दुपारी गोंधळाचा कार्यक्रम होई.'आई उदे ग अंबाबाई 'चा घोष होई.देवीच्या गाण्यांसोबत पुराणातील कथा सादर होत.मुख्य गोंधळ्याची वेशभूषा प्रेक्षणीय असे.पायघोळ झगा,
गळ्यात कवड्याची माळ,त्यात देवीच्या प्रतिमेचे टाक,पायात घुंगरू,
डोक्यावर लाल पगडी,असा त्याचा थाट असे.कथा सांगतानाच त्याकथेतील मुख्य भुमिकाही तो करायचा.साथीदार तुणतुणे,संबळ,टाळ वाजवितअन सहाय्यक भुमिकाही करत.कुठलेही नेपथ्य,वा वेशभुषे शिवाय,कथेतले नाट्य अचुक रितीने सादर करीत, गुंगवून ठेवण्याचे,करुण प्रसंगी रडविण्याचे ,सामर्थ्य त्या गोंधळात होते.त्यातील करपल्लवी हा प्रकार सर्वांना फार आवडे.प्रेक्षक दहा पैसे देऊन कुठला तरी शब्द वा वाक्य एका गोंधळ्याच्या कानात सांगे.त्याने केलेल्या बोटांच्या हालचाली वरून दूर अंतरावर असलेला त्याचा साथीदार तो शब्द वा वाक्य अचूक ओळखे.लोक टाळ्या वाजवत.बक्षीसी देत.गोंधळ संपता संपता संध्याकाळ होई.दिपमाळ पेटवली जाई .गाभार्यातील समयांच्या उजेडात देवीचा चेहरा तेजाने आणखी उजळून निघे.सामुदायिक आरती होई.संबळाचे सोबतीने त्यास आणखी रंगत येई.
आरती सुरू असताना कांही पुरुष व स्त्रियांच्या 'अंगात देवी येई'.
ते घुमु लागत.लोक त्यांना जागा करून देत.ते बेभान पुरुष आणि केस विस्कटलेल्या बायका देवीसमोर लोटांगण घालत.कांही वेळाने आवेग सरून ते भानावर येत.लोक त्यांच्या पाया पडत.देवीचे"भुते" ,
जळता काकडा (पोत) हातात घेऊन नाचत.तो अंगावर फिरवीत. बॅंडवाले अशावेळी ठराविक धुन वाजवत.ती अजूनही कानात घुमते.अद्भूत वातावरण तयार होई.
कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री पण भूते ,देवीपुढे नाचत.नंतर त्यांची गावात मिरवणूक निघे.बॅंड हालगी वाजत असे.जळते काकडे हाती घेऊन भुते मिरवत. काकडा विझू नये म्हणून त्यावर तेल टाकत.काकड्याची गरम गरम राख लोकांच्या कपाळावर लावत.लोक त्यांना दक्षिणा देत. पाच किंवा दहा पैसे!काकड्याचे तेलात भिजलेल्या,जळालेल्या कापडाचा वेगळाच वास येई.तो वास आणि राखेचा गरम स्पर्श मला आवडे.
अजूनही तो स्पर्श आणि वास ध्यानात,मनात आहे.
कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिकी पोर्णिमेपर्यंत कार्तिकस्नान असे.
स्त्रिया,मुली सूर्योदयाचेआधी,आंघोळी करून आवळी साठी पुजेचे साहित्य,फुले,नैवेद्य पितळी परडीत घालून, देवीच्या देवळात जात.दगडी फरशीवर सूर्य नारायणाची रांगोळी काढून त्याची पुजा करायची.
रांगोळी साठी गुळगुळीत मोठा दगड मिळविण्यासाठी मुली धावपळ अन भांडणेही करीत.कधी 'झिंजोटी' रागाची जुगलबंदी पण होई. रांगोळी नीट काढता येत नसेल तर दगडच वाईट ही सबब असे.कांही मुली तयार साचे वापरत.पण त्यातूनही रांगोळी तर नीट पडायला हवी.काही जणी मात्र छान रंग वापरून सुबक रांगोळ्या काढत.पण एकंदरीत आनंदी आनंद असे.सूर्य देवाची रागीट,हसरे,दुःखी,गरीब,चिडके,रोडके अशी विविध रुपे दिसत.रांगोळी काढणारांपेक्षा पाहणारांची छान करमणूक होई. ( क्रमशः )
नीलकंठ देशमुख .
प्रतिक्रिया
30 Jul 2021 - 3:53 pm | Bhakti
छान सुरुवात!
30 Jul 2021 - 8:29 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
30 Jul 2021 - 4:57 pm | मराठी_माणूस
'झिंजोटी' रागाची जुगलबंदी "ऐकणीय" पेक्षा "प्रेक्षणीय" जास्त असणार नाही का ? :)
30 Jul 2021 - 8:34 pm | नीलकंठ देशमुख
अर्थातच. पण दुरूनच. जवळपास गेलो तर आपल्याला सहभागी व्हावे लागणार.
झिंजोटी साठी वि.द.घाटे यांच्या 'दिवस असे होते' चे ऋण व्यक्त करतो.
30 Jul 2021 - 5:36 pm | गॉडजिला
डॉ. द. ता. भोसले यांचे संस्कृतीच्या पाऊलखुणापुस्तक वाचत असल्याचा फिल आला...
सुरेख लिखाण.
30 Jul 2021 - 8:30 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. पुस्तक वाचले नाही. आता मिळवून वाचणार आहे. माझ्या जावायाकडे नक्कीच असणार.
30 Jul 2021 - 10:06 pm | गॉडजिला
एका विशीष्ठ मानसिकतेमधे (ज्यात आपण सध्या आहात असा माझा कयास) हे पुस्तक वाचणे एक सुखद स्वप्न पाहिल्याची अनुभुती देते... दशकभरापुर्वी मी दिवाळीच्या दहा दिवस आधी हे पुस्तक वाचताना एका वेगळ्याच काळात हरवुन अन हरखुन गेलो होतो.... चतुर्मासात (म्हनजे सणासुदीच्या काळात हे पुस्तक मनात तरल लहरी नक्किच निर्माण करते)आपण हे पुस्तक अवश्य वाचावे.
नोटः- हे पुस्तक टिकटॉक जनरेशनसाठी नाही, त्यांच्यासाठी डीजिटल संस्कृतीच्या पाउलखुणा अजुन भविश्यात तयार होते आहे, त्यांनी कृपया ३५ वर्षे धीर धरावा ;)
30 Jul 2021 - 9:19 pm | तुषार काळभोर
नाव आवडलं.
खरं तर अजूनही गावं अशीच आहेत. पुणे शहराला खेटून असलेलं माझं गाव, आता आधुनिक इमारती, उद्योग व्यवसायाने गजबजलेलं असलं, तरी 'गावात' अजूनही बऱ्यापैकी तेच गावपण आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशात असं गावपण जास्त टिकून असेल.
असो, अवांतर होईल, पण २०१९ च्या यात्रेच्या वेळी (चैत्र पौर्णिमा - हनुमान जयंती) काढलेले फोटो:
ग्रामदैवत अंबरनाथ मंदीर
श्रीमंत अंबरनाथ
देवाच्या चैत्री नवरात्रात घरातून दिलेली समई
31 Jul 2021 - 4:45 pm | नीलकंठ देशमुख
शहराला लागून असल्याने काही चांगल्या तर काही वाईट, अशा दोन्ही गोष्टी असू शकतात. परंतु गावपण टिकवण्याचा प्रयत्न छान.
30 Jul 2021 - 11:19 pm | सौन्दर्य
माझा जन्म, शिक्षण व ५० वर्षेंपर्यंतचे आयुष्य शहरातच गेले. जन्म, शिक्षण मुंबई नंतर नोकरीनिमित्ते गुजरातमधली विविध शहरे व आता ह्युस्टन, टेक्सास. त्यामुळे गावाकडची वर्णनं वाचताना आपण काहीतरी नेहमीच मिस करत आलो हीच भावना मनात येते व थोडंसं वाईट वाटते. निदान पुढचा जन्म तरी एखाद्या टुमदार गावात व्हावा ही देवाजीच्या चरणी प्रार्थना.
31 Jul 2021 - 4:49 pm | नीलकंठ देशमुख
किसीको जमीन किसीको आसमां नही मिलता. मोठ्या शहरात जन्मलो वाढलो असतो तर खूप संधी मिळाल्या असत्या, खूप पुढे गेलो असते असे मला वाटायचे. हा मानवी स्वभाव.
जे आहे ते छान आहे ते स्विकारणे उत्तम हे शेवटी महत्त्वाचे.
31 Jul 2021 - 7:57 am | कंजूस
गावाकडे जन्म आणि वाढलो नाही पण सुटीत दोन महिने सांगली जिल्ह्यातील गावात जायला मिळायचे. त्या वयात फक्त उदंड भटकणे आणि दोन वेळ जेवणे एवढेच काम असे. लेख वाचताना दृष्ये समोर येतात. सुपीक माती असल्याने शेती फार . बाजार, देवळं, शाळा गावात कशा ऐसपैस मोठ्या असतात. आणि हो त्या जत्राही पाहिल्यात.
खेळणी वगैरे अगदी लहानांसाठी. बाकीच्यांना खारे दाणे, डाळ कुरमुरे आणि चिक्की. धमाल.
31 Jul 2021 - 4:50 pm | नीलकंठ देशमुख
छान वाटले वाचून. धन्यवाद