ती सुंदर? मीही सुंदर ! ( कथा परिचय: ६)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
26 Jul 2021 - 9:05 am

विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:

१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?

४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती
............................

आतापर्यंत वाचकांच्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे या लेखमालेचे पाच भाग प्रकाशित झालेत. सहावा भाग सादर करताना आनंद होत आहे.

या भागासाठी Katherine Mansfield यांच्या कथेची निवड केली आहे. या विदुषी जन्माने न्यूझीलंडच्या. त्या कालांतराने इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. विसाव्या शतकातील एक दमदार इंग्लीश कथालेखिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या लेखनावर रशियन कथालेखक चेकोव्ह यांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो. त्यांनी आपल्या लेखनात पारंपरिक कथातंत्रात बदल करून आधुनिकता आणली. विविध विषय आणि लेखनशैलीचे अभिनव प्रयोग केले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गद्यशैलीत काव्यगुण देखील आहेत. सूक्ष्म निरीक्षण आणि संवादात्मक कथन ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये म्हणता येतील. माणसांची द्विधा मनस्थिती, कुटुंबसंस्था, लैंगिकता, तकलादू नाती आणि मध्यमवर्गाची असंवेदनशीलता असे अनेकविध विषय त्यांनी लीलया हाताळले.

त्यांच्या सशक्त आणि विपुल कथालेखनामुळे लघुकथा या प्रकाराला साहित्यात मानाचे स्थान प्राप्त झाले. कथेव्यतिरिक्त त्यांनी कविता आणि समीक्षालेखनही केलेले आहे. अशा या प्रतिभासंपन्न लेखिकेचा वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी क्षयरोगाने मृत्यू झाला. मृत्युसमयी त्यांचे बरेच साहित्य अप्रकाशित राहिले होते. नंतर ते यथावकाश प्रकाशित करण्यात आले.

आता त्यांच्या प्रस्तुत कथेबद्दल.
कथेचे नाव आहे A cup of tea.

कथानक
ही कथा रोझमेरी नावाच्या एका तरुणीची आहे. मेरी रूढ अर्थाने सुंदर नाही परंतु, ती बुद्धिमान, आधुनिक विचारांची, टापटीप राहणारी आणि उत्तमोत्तम वाचन करणारी स्त्री आहे. विशेषतः Dostoevskyच्या कथांचा तिच्यावर प्रभाव आहे. समाजातील कलाकार व प्रतिष्ठितांमध्ये तिची उठबस असते. तिचे दोन वर्षापूर्वीच फिलिपशी लग्न झालेले आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो व तिचे कोडकौतुक करतो. हे कुटुंब खूप श्रीमंत आहे. मेरीची दुकानांमधून होणारी खरेदी डोळे दिपवून टाकणारी असते.
अशाच एका हिवाळ्यातील दुपारी ती एका पुराणवस्तूंच्या दुकानात खरेदीस जाते. ते तिचे प्रिय दुकान आहे आणि आणि तिथला विक्रेता तिची वारेमाप स्तुती करत असतो. आज तो तिला एक शोभिवंत पेटी दाखवतो. बघताक्षणी ती त्या वस्तूच्या प्रेमात पडते आणि मग तिची किंमत विचारते. तो उत्तरतो, “अठ्ठावीस गिनी” ( गिनी = १.०५ पौंड). किंमत ऐकल्यावर मेरी जरा दचकते आणि इकडे तिकडे बघत ती पेटी बाजूला सारते. श्रीमंत असूनही आज तिला ती पेटी का कोण जाणे महागच वाटते. त्याऐवजी ती दुसरेच काहीतरी थातुरमातुर घेते व दुकानातून बाहेर रस्त्यावर येते.

बाहेर चांगलाच पाऊस पडत होता. हवा कुंद आणि विचित्र होती. मेरीला आतून कसेतरीच वाटू लागले. आता लवकरात लवकर घरी जाऊन छानपैकी स्पेशल चहा प्यावा असे तिला तीव्रतेने वाटले. तेवढ्यात तिच्याजवळ एक तरुणी येऊन उभी राहिली. ती कृश व दीनवाणी होती आणि थरथरत होती. ती चाचरत मेरीला म्हणाली,

“मॅडम, तुम्ही मला एक कप चहा पिण्याइतके पैसे देता का, प्लीज ?”

तिच्या आर्त स्वरावरून मेरीला ती काही भिकारी वाटली नाही. म्हणून तिने तिला विचारले की तिच्याकडे अजिबात पैसे नाहीयेत का? त्यावर ती नाही म्हणाली. मेरीला तिला दूर सारावे काही वाटेना. उलट तिच्या मनात एकदम एक विचार चमकून गेला. तिला बऱ्याच कथा, कादंबऱ्या किंवा चित्रपटातले प्रसंग आठवले, ज्यात एखादा श्रीमंत माणूस किंवा नायक गरिबांना कशी मदत करत असतो ते. आपणही असे काहीतरी करावे असे तिला एकदम वाटले. ‘हिला पैसे देण्याऐवजी आपण तिला घरीच नेले तर किती छान ! तेवढेच आपल्या हातून एक पुण्यकर्म होईल’, असा तिने मनाशी विचार केला. मग ती त्या बाईला म्हणाली,
“अगं, तू माझ्या घरी चल ना चहा प्यायला”.

आता त्या बाईला हे पटकन खरे वाटेना. अविश्वासाने ती एकदम मागे सरू लागली. मग मेरीने तिचा हात धरून, “अगं तू माझ्याकडे आलीस तर मला आनंदच होईल”, असे बोलून विश्वासात घेतले.
तरीसुद्धा त्या बाईला भीतीच वाटू लागली.
“अहो, तुम्ही मला फसवून पोलीस स्टेशनला तर नेऊन टाकणार नाही ना ?’ असे ती म्हणाली.
त्यावर मेरी हसून म्हणाली, “अगं मी काही तशी दुष्ट बाई नाहीये ! खरंच तू माझ्या घरी चल. माझ्याशी तुझे दुःख अगदी मोकळेपणाने बोल”.
अखेरीस ती भुकेली स्त्री मेरी बरोबर कारमधून तिच्या घरी जायला निघाली.

दरम्यान मेरीच्या मनात विचारचक्र चालू झाले. तिने ठरवले की आता आपण हिला मदत करायची आणि त्या कृतीतून जगाला असे दाखवून द्यायचे की :
१. अनपेक्षित व आश्चर्यकारक गोष्टी फक्त कल्पनेत नसून वास्तवात देखील घडतात.
२. एखाद्या गरजू गरीब स्त्रीला तिच्यासारखी कनवाळू स्त्री अगदी बहीण मानून मदत करू शकते.
३. श्रीमंतांच्या मनात देखील दयाभावना असते.

मग मेरी त्या स्त्रीला विश्वासात घेऊन सांगते की मला अगदी बहिणीसारखी समज, घाबरू नकोस. नंतर मेरीचे घर येते. नोकर दार उघडतो. मेरी तिला सरळ तिच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घेऊन येते. ती बाई आता गांगरून जाते. अगदी डोळे विस्फारुन घर पाहते. मेरी तिला अंगावरचा भिजलेला कोट काढायला मदत करते आणि उबदार शेकोटीजवळ बसवते. आता मेरी शांतपणे सिगारेट शिलगावण्याच्या विचारात असते. तेवढ्यात ती बाई म्हणते,
“मॅडम, मला लवकर काहीतरी खायला द्या हो, नाहीतर मी चक्कर येऊन पडेन”.

मग मेरीने नोकरांना तिच्यासाठी ब्रँडी व खायला काहीतरी आणायचे फर्मान सोडले. त्यावर त्या बाईने आपण ब्रँडी घेत नसल्याचे सांगून फक्त एक कप चहा द्यायची विनवणी केली. आता ती एकदम रडू लागली. मेरीने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचे सांत्वन केले. तरीही ती स्फुंदत होती, “नकोसे झालंय मला आयुष्य”, वगैरे.
मेरीने तिला धीर दिला, “रडू नको आता. मी भेटले आहे ना तुला. मी तुझ्यासाठी नक्की काहीतरी करीन बघ”.

त्यानंतर नोकरांनी सँडविचेस, चहा इत्यादी खायचे भरपूर साहित्य आणले. त्या भुकेल्या बाईने त्याचा चट्टामट्टा केला आणि आता ती समाधानी दिसू लागली. मेरीने तिला विचारले की ती याआधी किती वाजता जेवली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली व मेरीचा नवरा फिलिप आत आला. मेरीने त्याची व तिची (मिस स्मिथ) ओळख करून दिली. त्याने त्या परक्या बाईकडे नुसता एक नाराजीचा कटाक्ष टाकला. मग तो मेरीला म्हणाला की जरा दुसऱ्या खोलीत चल. आता ते दोघेही त्या बाईला तिथे एकटी सोडून तिथून बाहेर गेले.

बाजूच्या खोलीत गेल्यावर फिलिपने मेरीला फैलावर घेतले,
“हा सगळा काय प्रकार आहे? कोण ही बाई? इथे कशाला आलीय ?”. मेरीने तिची सर्व कहाणी सांगितली.
फिलिपला हा प्रकार अजिबात आवडला नव्हता. “मग पुढे काय ठरवलेय तू?” त्याने विचारले.
मेरी म्हणाली, “काही नाही, मी तिला मनापासून मदत करणार आहे. आता कशी ते बघू”.
फिलिप उखडला, “वेडी आहेस का तू? हे भलते लचांड गळ्यात नको घेऊ”.
तरीही मेरीने तिच्या कृतीचे समर्थन केले व त्याला म्हणाली, “मग परोपकार वगैरे गोष्टी काय आपण नुसत्या पुस्तकात वाचायच्या ? अरे, खरंच ती चांगली आहे. तिला गरज आहे आपल्या आधाराची”.

आता फिलिप हळूच म्हणाला, “हो, आणि ती खूप सुंदर पण आहे दिसायला !”
हे ऐकल्यावर मात्र मेरी उडाली आणि एकदम लालीलाल झाली. “खरंच, ती सुंदर वाटते तुला ?”
फिलीप उत्तरला, “अर्थात ! माझ्या मते तर ती अगदी अप्सरा आहे. मी खोलीत आलो, तिला पाहिले आणि एकदम मोहित झालो बघ. तरीपण तू तिच्या जास्ती नादी लागू नयेस”.

थोडं थांबून त्याने मेरीला विचारले, “बरं, मग आज ती बाई आपल्याबरोबर जेवणार आहे का ?” त्यावर मेरी म्हणाली, “काय पण विचित्र आहेस रे तू”. मग ती तावातावाने तिथून निघाली. ती एका वेगळ्याच खोलीत गेली. तिथे शांतपणे बसली. पण मनातून धुसफुसत होती, “हा माणूस तिला सुंदर, अप्सरा, मोहित करणारी .. काय काय वाटेल ते म्हणतोय”. तिला ती कल्पना सहन होईना. मग तिने तिरीमिरीत टेबलाचा खण उघडला. त्यातून पौंडाच्या पाच नोटा बाहेर काढल्या अन लगेच दोन परत ठेवल्या. आता त्या तीन नोटा हातात कोंबून ती त्या बाईच्या खोलीत परतली.

... अर्ध्या तासाने ती फिलिपच्या खोलीत आली. तिने त्याला करड्या आवाजात सांगितले की मिस स्मिथ निघून गेली आहे. त्याने आश्चर्याने आ वासला. त्यावर ती म्हणाली,
“अरे ती थांबायलाच तयार नव्हती, जाते म्हणाली. मग तिला इच्छेविरुद्ध थांबून ठेवणे बरं आहे का? जाताना त्या गरीब बिचारीला मी आपले तीन पौंड दिले बघ”.
आता फिलिपिने मेरीकडे निरखून पाहिले. ती अगदी नटून-थटून अंगावर दागिने घालून आली होती. ती फिलिपच्या जवळ आली व लाडिकपणे म्हणाली, “मी आवडते ना रे तुला ?” तो म्हणाला, हो अर्थात खूप आवडतेस. मग त्याने तिला जवळ घेतले आणि चुंबने झाली.

मेरीने हळुवारपणे विचारले, “आज मी दुकानात एक महागडी मखमली पेटी पाहिली आहे. घेऊ का रे मी ती?” तो लगेच हो म्हणाला.
पण तिचा हेतू एवढेच विचारण्याचा नव्हता. आता तिने त्याला अगदी जवळ घेतले व त्याचे डोके आपल्या छातीशी घट्ट दाबून विचारले, “खरंच, मी सुंदर आहे ना रे ?”
….

विवेचन

वरवर पाहता ही एक साधी सरळ कथा आहे. पण पात्रांच्या अंतरंगात जर आपण खोलवर डोकावले तर मग बरंच काही हाती लागते. प्रथम या कथेचा काळ समजून घेऊ. 1921 मध्ये लिहिलेली ही कथा. लेखिका न्यूझीलंडची, जेव्हा तो देश इंग्रजांची एक वसाहत होता. तेव्हा त्याची एकंदरीत अवस्था शोचनीय होती. ब्रिटिश परंपरेतील सामाजिक वर्गजाणीव आणि वर्गभेद तेव्हा अगदी मुरलेले होते. उच्चभ्रू वर्गाचे राजेशाही थाट डोळे दिपवणारे असत. दिखाऊ समाजसेवेचा आव आणणाऱ्या या वर्गाची दांभिकता उघडी पाडणे हा प्रस्तुत लेखिकेचा हेतू दिसतो. असल्या ‘समाजसेवेचे’ एक तत्त्व असते : २५ पैशांची सेवा आणि ७५ पैशांची स्वतःची जाहिरात !
आता कथापात्रांकडे बारकाईने पाहू.

मेरी भरपूर वाचन करते आणि पुस्तकातल्या प्रसंगांचा तिच्यावर प्रभाव आहे. कथानायकांकडून प्रेरणा घेऊन ती भारावलेली आहे. त्यांच्याप्रमाणेच आपणही काहीतरी ‘थोर कृत्य, पुण्यकर्म’ वगैरे करून दाखवले पाहिजे ही तिची आंतरिक इच्छा आहे. त्यानुसार कथेत तिला एक गरीब बाई भेटल्यापासून ते तिला खाऊ-पिऊ घालेपर्यंत मेरीच्या चांगल्या कृतीचा चढता आलेख येतो. खरेतर वास्तवात असे घडते का ? रस्त्यावर एखाद्या अनोळखी भिकाऱ्याने पैसे मागितले असता कुणीही त्याला फारतर पैसे देऊन वाटेला लावेल. इथे मेरीची कृती जगावेगळी दाखवून लेखिका तिला एका तात्पुरत्या उंचीवर नेऊन ठेवते. आता वाचकाच्या मनात मेरी ही उदार व दिलदार कथानायिका म्हणून ठसते.

याच बिंदूवर लेखिका अनपेक्षित धक्का देते. ज्या क्षणी फिलिप त्या यःकश्चित् भिकारी स्त्रीला सुंदर म्हणतो, त्याक्षणी मेरीच्या चांगुलपणाचा डोलारा कोसळतो. आता तिच्या वर्मावरच बोट ठेवले गेल्याने ती दुखावली जाऊन ठराविक उच्चभ्रू स्त्रीच्या भूमिकेत जाते आणि सरळ त्या बाईला हाकलून देते. असा हा मेरीचा मुखवटा उतरवायचे काम लेखिकेने सुरेख केले आहे. कथेच्या अखेरीस मेरी जो स्वसौंदर्याचा कृत्रिम देखावा उभा करते त्यातून तर तिच्यातील तथाकथित ‘बुद्धिमान’ स्त्री अधिकच उघडी पडते. सुंदर ‘दिसणं’ आणि सुंदर ‘असणं’ यात फरक असतो, या विचारापर्यंत ती पोचणेच अशक्य ठरते.

आता फिलिपबद्दल.
तो खानदानी श्रीमंत आहे व त्या श्रीमंतीचा त्याला पुरेसा गर्व आहे. तो बायकोचे भरपूर लाड करतोय. परंतु तिने जे लचांड घरात आणून ठेवलेय त्याने तो भडकला. एकंदरीत परिस्थिती पाहता त्याच्या लक्षात येते की मेरीच्या डोक्यातून समाजसेवेचे खूळ सहजासहजी जाणार नाही. तो विचार करून धूर्त खेळी खेळतो. त्या भिकारणीला हुसकून द्यायची नामी शक्कल त्याला सुचते. आपल्या बायकोसमोर दुसऱ्या स्त्रीच्या सौंदर्याची वारेमाप स्तुती करणे, हे हुकमी अस्त्र तो वापरतो. त्याच्या या कृतीमुळे मेरीला, ‘समाजसेवा मरू दे, आपला नवरा तिच्यावर भाळणे परवडणार नाही’, याची जाणीव होते. एक प्रकारे तिचा ‘सवतीमत्सर’ जागृत होतो. त्यातूनच फिलिपची चाल यशस्वी होते.

ok

कथाप्रेरणा
कथालेखिकेची एक बहीण (कझिन) उमराव घराण्यामधली होती. ही कथा तिच्यावर बेतलेली आहे.

कथा रूपांतर

1986 मध्ये भारतीय दूरदर्शनवर जागतिक कथांची ‘कथासागर’ ही मालिका सादर झाली होती. त्यातील ‘चाय का एक कप’ हा भाग या कथेवर आधारित असून तो श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला होता.

या कथेच्या जन्मशताब्दी निमित्ताने करून दिलेला हा परिचय वाचकांना आवडेल अशी आशा वाटते.
……………………………..
१. मूळ कथा इथे : https://www.katherinemansfieldsociety.org/assets/KM-Stories/A-CUP-OF-TEA...

२. लेखातील चित्र विकीवरून साभार !

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

26 Jul 2021 - 12:27 pm | प्रकाश घाटपांडे

सुंदर ‘दिसणं’ आणि सुंदर ‘असणं’ यात फरक असतो, या विचारापर्यंत ती पोचणेच अशक्य ठरते.>>> ही मनोवस्था खरीच येत असते. कळत पण वळत नाही असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी असेच काहीसे झाले असते. विवेकी व विचारपूर्वक कृती करायची असे आपला मेंदु ठरवतो पण प्रत्यक्षात त्यावेळी मेंदु त्यावेळी भावनेच ऐकतो. अक्षरश: हँग होतो मेंदु.
सुंदर कथा. तुमच्या मुळे या कथा आमच्या पर्यंत पोचतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jul 2021 - 1:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

ही गोष्ट सुध्दा आवडली.
"सुंदर ‘दिसणं’ आणि सुंदर ‘असणं’ यात फरक असतो," हे दाखवुन देण्यासाठीच ही गोष्ट लिहिलेली असावी.

https://www.facebook.com/watch/?v=480072572697889

चाय का एक कप ची लिंक

पैजारबुवा,

कोणीही दूरच सारेल...

मग ती भीती वास्तव असो की भ्रामक

कुमार१'s picture

26 Jul 2021 - 1:24 pm | कुमार१

प्रघा, ज्ञापै, गॉजि,

आपल्या तिघांचेही प्रतिसाद उत्तम माहितीपूर्ण आहेत !
आता कथासागरचा दुवा पाहतो

Bhakti's picture

26 Jul 2021 - 1:25 pm | Bhakti

आणि विवेचन!
कथा वाचून फिलीपविषयी आदर वाटला,मेरीसारखा दिखावा त्याने नाही केला.समतोल दाखविला.

गॉडजिला's picture

26 Jul 2021 - 1:30 pm | गॉडजिला

कथा वाचून फिलीपविषयी आदर वाटला,मेरीसारखा दिखावा त्याने नाही केला.

मला तर फिलीपचे वागणे बघून MEN WILL BE MEN ही म्हण आठवली ;)

Bhakti's picture

26 Jul 2021 - 1:43 pm | Bhakti

हम्म!
म्हणूनच बायकांना सतर्क राहावे लागत.:)

गॉडजिला's picture

26 Jul 2021 - 1:49 pm | गॉडजिला

;)

कुमार१'s picture

26 Jul 2021 - 1:53 pm | कुमार१

फिलीप हा 'चालू' पुरुष आहे खरा !

अन मेरीचा वेगळा होता...

चालु दोघेही निघाले...

सुन्दर परिचय.. तुम्ही थोडी समीक्षकाच्या भूमिकेतून कथेची चिरफाड केलीत असे वाटले. पण कथा फारच भरी आहे. ओळख करून दिल्यबद्दल धन्यवाद!

Bhakti's picture

26 Jul 2021 - 3:14 pm | Bhakti

केवळ संकल्पनेच्या चिरफाडीपेक्षा कलेचे समीक्षकाने प्रमाणात केलेली 'चिरफाड'केव्हाही चांगली!

विजुभाऊ's picture

26 Jul 2021 - 2:25 pm | विजुभाऊ

अशा कथा थोडक्यात बरेच काही सांगून जातात.
परिचय मात्र खूपच छान करुन दिला आहे

कुमार१'s picture

26 Jul 2021 - 6:07 pm | कुमार१

आनंदा, भक्ती, वि भा
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !

चाय का एक कप ची लिंक

>>> पाहिले. शर्मिला टागोर, सुरेश ओबेरॉय, इफ्तेकार .... सुंदर !

अनिंद्य's picture

26 Jul 2021 - 8:41 pm | अनिंद्य

कथा परिचय छान, Katherine Mansfield ची कथा मराठीत-मिपावर वाचायला मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. मालिका छान सजते आहे.

आपल्याकडे हिंदीत कवी तुलसीदासांनीही सनातन सत्य सांगितलेय - नारी न मोहे नारी रूपा - कोठल्याही स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे रूपवान असणे आवडत नाही :-) फिलिप दादानी योग्य उपाय केला.

श्याम बेनेगलांचा चाय प्रयोग उत्तम !

कुमार१'s picture

27 Jul 2021 - 2:29 pm | कुमार१

धन्यवाद !

तुलसीदासांनीही सनातन सत्य सांगितलेय - नारी न मोहे नारी रूपा

छान.

कुमार१'s picture

27 Jul 2021 - 2:29 pm | कुमार१

धन्यवाद !

तुलसीदासांनीही सनातन सत्य सांगितलेय - नारी न मोहे नारी रूपा

छान.

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2021 - 6:01 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !
सुरेख ओळख करून दिली आहे.

आता चाय का एक कप देखील बघावी लागणार !
त्याची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद, ज्ञानोबाचे पैजार !

तुषार काळभोर's picture

29 Jul 2021 - 6:38 pm | तुषार काळभोर

पुर्वार्धात रोझमेरीच्या मनातील सहानुभूतीमध्ये काहीही खोट आहे, असे वाटत नाही. ती जाहिरातबाजीही नाही. तिला कोणाला दाखवायचे नाही, की 'मी हे करतेय'.
पण आपण जिला मदत करतोय, ती आपलीच जागा घ्यायला निघाल्यावर ती तरी काय करेल? त्यामुळे उत्तरार्धात तिच्यात जो बदल झालाय, तोही नैसर्गिकच.
एक गोष्ट नक्की, जगातील कोणत्या स्त्रीचं, एखाद्या गुणाचं, सौंदर्याचं, हुशारीचं कौतूक बायकोसमोर करायचं नाही! (अपवादः बायकोची आई).

मिस स्मिथ इथे पूर्ण तटस्थ आहे. तिला इतकी मदत नकोच आहे. तिला त्यावेळच्या चहापुरते पैसे, किंवा फारतर चहा हवा आहे, तिची स्वतःची कसलीही अधिकची इच्छा-आकांक्षा-आशा नाही.
पण जर फिलिपने खरेच तिला पसंत करून ठेवून घेतली असती तर? तिच्या इच्छा-आकांक्षा-आशा चहापेक्षा जास्त झाल्या असत्या का?
कदाचित हो. आणि तेही नैसर्गिकच!

फिलिपला आधी जो राग आला तो स्वाभाविकच आहे. मुलांनी जर साधं कुत्र्याचं अथवा मांजराचं पिल्लू आणलं तर बहुतेक सगळ्याच घरातील पालक ओरडतील. इथे रोझ ने तर एक जिवंत व्यक्ती घरात आणली आहे. कुणाला आवडेल. पत्नीने स्त्रीला आणलं तर पतीला आवडणार नाही, आणि पतीने एखादा रस्त्यावरील पुरुष आणला तर पत्नीला आवडणार नाही.
पण रागावून, ओरडून तिला बाहेर काढायला न सांगतो, त्याने जी क्लृप्ती योजली ती कमाल! त्याच्या हुशारीची दाद द्यायला हवी.

या कथेवर एखादी मस्त शॉर्टफिल्म बघायला मजा येईल.
तुर्तास 'कपभर चा' बघतो.

चामुंडराय's picture

29 Jul 2021 - 7:30 pm | चामुंडराय

>>> एक गोष्ट नक्की, जगातील कोणत्या स्त्रीचं, एखाद्या गुणाचं, सौंदर्याचं, हुशारीचं कौतूक बायकोसमोर करायचं नाही! (अपवादः बायकोची आई).>>>

हा हा हा ... भारीच तत्वज्ञान कि तुका भाऊ :)

कुमार१'s picture

29 Jul 2021 - 7:27 pm | कुमार१

चौको, तु का ,
धन्यवाद.
सविस्तर विश्लेषण आवडले.

स्मिताके's picture

30 Jul 2021 - 3:25 am | स्मिताके

कथा आणि परिचय दोन्ही छान.

तु का यांचा प्रतिसाद आवडला.