सिलींडर ३
( विशेष सूचना: या कथेतील मी ,सिलिंडर व टेम्पो वगळता,इतर पात्रे व प्रसंग पूर्णपणे काल्पनिकआहेत)
सरळ चाललेला टेम्पो ,अचानकतालखेड गावाकडे वळला.'अरे हे काय'?इकडे कशाला,सरळ जायचंय नं?'मी विचारले.' "तालखेडला सामान खाली करायचंय आणि एक भाडं आहे वकील साहेब,जास्त वेळ नाही,दहा पंधरा मिनिटं लागतील.''दात विचकत त्याने टेम्पो पुढे दामटला.मी दात खात बसलो. टेम्पो गावात शिरला.
आधी एका दुकानावर सामान उतरवले.आता फक्त सिलिंडर राहिले. थोडे पुढे गेल्यावर एका हॉटेलजवळ टेम्पो थांबवून.ड्रायव्हरने हॉटेलवाल्याकडे बापूसाहेब तलाठ्याची चौकशी केली.हॉटेलवाल्याने हाताने खाणाखुणा करून काहीतरी सांगितले.ड्रायव्हरने क्लिनरला बोलावून तशाच खाणाखुणा केल्या.मग क्लिनर त्या दिशेने गेला.काय चाललंय काही कळत नव्हते.टेम्पोतून ड्रायव्हरला विचारल्यावर कळले की तालखेडच्या बापूसाहेब नावाचे तलाठ्याच्या मुलाचे लग्न माजलगावला होते.आणि लग्नाचे व-हाड नेण्यासाठी बापूसाहेबानी हा टेम्पो बुक केला होता.'अरे मग आधी का सांगीतले नाही '-मी.ड्रायव्हर गप्प.गाव फक्त सातआठ किलोमीटर दूर असताना ही व-हाडाची भानगड उपटली. संताप अनावर होत होता.पण काय करणार?टेम्पो सोडून जाणार कुठे,अन कसे?'आलिया भोगासी असावे सादर' संत वचन आठवले. क्लिनर गेला त्या दिशेकडे सारखे लक्ष जात होते.माणसांची येजा सुरू होती.पण तो मात्र येत नव्हता. 'जरासी आहटे होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नही?'अशा अवस्थेत पंधरा वीस मिनीटे गेल्यावर एकदाचा 'वो' दिसला .सोबत आणखी दोघे.एक पंचविशीतला अन दुसरा अंदाजे पन्नाशीचा.दोघांनी टेम्पोची बारकाईने पाहाणी केली.'मामा टेम्पोत मावतेल का सगळे?'
त्यातल्या तरुणाने,प्रौढाला प्रश्न केला.'' न मावायला काय झालं?लहान मोठे धरून तीसपस्तीस तर आहेत,बसतेल दाटीवाटीनं.राह्यले दोन चार तर येतील सकाळी मुक्कामी यष्टीनं!''मामाने भाच्याचे शंका निरसन करत तोडगा काढला.''काय हो ,जमंल नं?''हे ड्रायवरला उद्देशून.
''आमचं काही नाही,बशविता येतेल,पण पोलीसांनी आडवलं तर तुमचं तुम्हाला निस्तरावं लागंल ".'त्याने खुलासा केला.मामा गालातल्या गालात हसू लागले.
''त्याची काळजी नाही.मामा कानस्टेबल आहेत शिरसाळ्याला .''भाच्च्याने अभिमानाने सांगितले.''मग काय हरकत नाही''ड्रायव्हर .हा सगळा संवाद केबीन मधे माझ्या कानी पडत होता. एवढ्यात भाच्याचे लक्ष टेम्पो मधल्या सिलिंडर कडे गेले.''ते वकील साहेबाचे गॅस सिलिंडर आहे.घरी घेऊन जात आहेत आडगावला.''
क्लिनरने माहिती पुरवली.मामा पोलीस आहेत हे
कळल्यापासून माझी धाकधूक वाढली.माझी गॅस सिलिंडरची बेकायदा वाहतूक ,या पोलीसाचे निदर्शनास आले तर काय होईल,याची चिंता सुरू झाली होती.प्रकरण कसे मिटवायचे हा विचार सुरू झाला.
आता त्या दोघांचे लक्ष माझ्याकडे गेले.मी पुरता हादरलो होतो. पण भाच्चा माझ्या कडे कौतुकाने पाहू लागला.मी वकील आहे आणि माझ्या खेड्यातले घरी गॅस कनेक्शन आहे याचे त्याला फार अप्रुप वाटले असावे.
कदाचित,ड्युटीवर नव्हते म्हणून की काय,मामांनी
सिलिंडरचे मनावर घेतलेले दिसले नाही.मी आडगावचा आहे हे कळल्यावर मामांनी चौकशी सुरू केली.''ते देशमुख गल्लीतले आण्णासाहेब माहिती आहेत का?."अहो ते तर आमच्या भावकीतलेच,चुलत चुलत काका लागतेत'' -मी.या आण्णासाहेबाचे आणि आमचे फारसे पटत नव्हते.पण ते पोलीस मामाच्या ओळखीचे आहेत हे कळल्यावर मी माझे त्यांच्याशी नाते जास्तीतजास्त घट्ट करून सांगितले.''काय सांगता ?ते तर चुलत साडू लागतेत माझे!म्हणजे तुम्ही आमचे पाव्हणेच झाले की !''.मामाचे डोळे लकाकले.त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार चक्र सुरू झाले असावे,असे वाटले.
''बरं व-हाड निघायला थोडा वेळ लागंल,घरी चला,दोन दोन घास खाऊन घ्या'.मामाने आमंत्रण दिले.भुकेची वेळ होती. ड्रायव्हर, क्लिनर लगेच निघाले.मी मात्र जावे की नाही या विचारात.मामांनी पुन्हा आग्रह केला.शेवटी भुक ती भुक.निघालो मी ही.पण सिलिंडरची काळजी होती. ड्रायव्हरने ती ओळखून,हॉटेलवाल्याला लक्ष ठेवायला सांगितले.'कुणी काळं कुत्रंबी जाणार नाही तिकडं'अशा आशयाची नजर आमच्याकडे टाकत,हॉटेलवाला समोरच्या गि-हाईकाशी ,आज 'ओपनला"कल्याण मटक्याचा कुठला आकडा येणार याविषयी गहन चर्चा करू लागला.
चार पाच नागमोडी गल्ल्या ओलांडून गेल्यावर आम्ही लग्नघरी पोहचलो.घरासमोर बॅंड वाजत होता.एक कलाट(क्लेरिनेट),एक भोंपू,एक ड्रम आणि एक ढोल एवढ्या सामुग्रीसह बॅंड वर कुठलेतरी लोकप्रिय हिंदी गाणे वाजवण्याचे प्रयत्न सुरू होते.डोक्याला ताण देऊन गाणे ओळखायचा अयशस्वी प्रयत्न केला.बाहेर मुलांचा गोंधळ सुरू होता.त्या गोंधळात गाण्याचा नाद सोडून, मामाभाच्या सोबत आम्ही घरात प्रवेश केला.बाहेरचा गोंधळ बरा म्हणावा अशी आत परिस्थिती होती.
उघड्या अंगणात जेवणाची पंगत बसली होती.कुणीतरी कुणावर तरी खेकसत होते.'मठ्ठा संपत आला' अशी वाढपी तक्रार करत होता.'पाणी ओत की मग'असा अनुभवी सल्ला कुणी तरी दिला.
'जेवणे लवकर लवकर आटपा,टेम्पो आलाय,'मामाने गेल्या गेल्या पुकारा केला.मग गडबड आणखीच वाढली. तशातही मामाने बापूसाहेबाची माझी ओळख करुन दिली.दोघांमधे काही कानगोष्टी झाल्या.बापुसाहेब
माझ्या कडे निरखून पाहू लागले. मामाने त्यांच्या बहिणीला,बाहेर बोलावले.नवे कोरे लुगडे,अंगावर दागिने,मळवट भरले कपाळावर घामाचे ओघळ,अशा आवारातील वरमाय बाहेर आल्या.एवढ्या गडबडघाईत कशाला बोलावले असा भाव त्यांचे चेह-यावर होता.मामानी त्यांचे कानात काहीतरी सांगितले.त्यांनी माझ्याकडे नजर टाकली आणि आत गेल्या.आमची पाने वाढली होती.आम्ही जेवायला बसलो.मामा,भाच्चा,
विशेष करुन मला आगत्याने,आग्रहाने वाढू लागले.खुद्द बापूसाहेब पण जातीने लक्ष घालू लागले.महिलामंडळीही एक एक करून डोकावून मला पाहून जाऊ लागली. काय चाललंय कळेना?पण कांही शंका डोकाऊ लागल्या.तेवढ्यात मामाने ''कमे लाडू आण वाढायला" 'असा आवाज दिला.नवी कोरी लाल साडी, मॅचिंग लाल रीबीन बांधलेल्या दोन वेण्यां,भाळी मळवट,हाती हिरव्या बांगड्या,या अवतारातली,सुमी का कमी नावाची विशीतील दाट सावळी,'सुदृढ' मुलगी ओसरीवर उभी होती.करवली असावी.तीला पाहून का कोण जाणे टेम्पोतल्या भरल्या सिलींडरची आठवणआली.लाडवाचे ताट हातात घेऊन ती लाजत लाजत बाहेर आली.बाकीच्या बायका तीला,'जा वाढ',असे म्हणत पुढे ढकलू लागल्या.'ही आमची कमी बरं का!'दोन वर्षापूर्वीच दहावीला होती.'मामानी ओळख करून दिली.दहावी पास झाली की नाही हे सांगायचे मात्र खुबीने टाळले.'यंदा पण दहावीची परीक्षा दिलीय की!'एका आगाऊ पोराने उगीच माहिती पुरवली. मामानी त्याच्यावर तिखट दृष्टीक्षेप टाकत,मला गोड वाढण्याचा आग्रह तीला केला,''कमे वाढ लाडू वकीलसाहेबांना !".कमीने लाजत लाजत लाडू वाढला,आणि घरात पळाली.आता डोक्यात लख्ख प्रकाश पडला.वाटेत मामांनी,माझी व माझ्या घरच्यांची सखोल चौकशी केली होती.बोलण्याचे ओघात मी लग्न झाले नाही असे सांगितले होते.यालगीनघाईतसुध्दा,जमल्यास भाच्चीचे जमवावे असा विचार मामांनी केला होता.मला काहीच कळेनासे झाले.पण एक निश्चित कळले की तिथे मी व्ही.आय.पी झालो होतो.उगीच बरे वाटले.ती पोझिशन,गावी पोहचेपर्यत कायम राहाणे गरजेचे वाटले. म्हणून मोठ्या मुत्सद्देगिरीने,लाडू सोबत मुग गिळून मी गप्प बसलो.जेवणोत्तर हात धुवायला मागे गेलो,तर दोन बायकांमध्ये चाललेला संवाद कानी आला."चांगलाच काळा दिसतोय की,गव्हाळ कुठला?"-एक."कमी तरी कोणती लागुन गेलीय?बरंय की,म्हसोबाला सटवाई अन सटवाई ला म्हसोबा!"पाठोपाठ हसण्याचा आवाज.काय नग लोक होते! एक तर जसा काही त्या दाट सावल्या मुलीला मागणी घातली,आणि त्यांनी उदार अंतःकरणाने ती मान्य केली ,असेच गृहीत धरून सारे चालले होते.अन वरती हे! मी म्हसोबा काय? अंगाचा तीळपापड झाला होता.पण काय करणार?
निमुटपणे बाहेर येऊन चपलांच्या ढिगा-यात चपला हुडकू लागलो.पण काही मेळ लागेना.मग शोध मोहीमेत इतर काही जण सामिल झाले.थोड्या वेळाने,माझी पादत्राणे,बाहेर सुरू असलेल्या मुलांचे क्रिकेट सामन्यात स्टंपच्या भुमिकेत होती,हे कळले.सामन्यात व्यत्यय येईल म्हणून मुले चप्पलजोड सोडायला तयार नव्हती.मामा वगैरे मंडळी,मला वराती सोबतच जाऊ असा प्रेमळ आग्रह करत होती.मला मात्र इथून केव्हा निघेन असे झाले होते.व-हाडी निघायचे तयारीत गुंतलेले पाहून,
गुपचूप बाहेर पडलो. तेव्हा क्रिकेटचे दोन्ही संघात एक टप्पा आऊट की नॉट आऊट ,या विषयावर वादावादी सुरू होती.ती संधी साधून मी माझीच पादत्राणे पळवून टेम्पोकडे पळालो.
क्रमश:
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
21 Jul 2021 - 9:15 am | सौंदाळा
कहर भाग आणि पंचेस
एकदम वेगळंच वळण घेतलं की कथेने.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
21 Jul 2021 - 9:53 am | गुल्लू दादा
मस्त झालाय हा भाग. धन्यवाद. लवकर उडवा पुढचा बार.
21 Jul 2021 - 9:09 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
21 Jul 2021 - 9:54 am | बापूसाहेब
Hahaha... हा हि मस्त भाग.. कधी संपला ते समजलंच नाही..
मुलगी पाहण्याचा किस्सा जबरदस्त....
21 Jul 2021 - 9:09 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार
21 Jul 2021 - 10:16 am | श्रीगुरुजी
मस्त लिहिलंय. मजा येतेय.
21 Jul 2021 - 9:08 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद. मजा येतेय हे वाचून आनंद झाला.
21 Jul 2021 - 10:33 am | योगेश कोलेश्वर
आवडल.........
21 Jul 2021 - 9:04 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
21 Jul 2021 - 10:52 am | कंजूस
पुढचं कसं?
मला वाटतं 'घडलेले प्रसंग' कथा विभाग ताबडतोब चालू करावा मिपावर आणि शंभर शब्दांत न मावणाऱ्या कथा पुढे ढकलाव्या.
21 Jul 2021 - 12:07 pm | योगी९००
बर्याच दिवसांनी एक मस्त खुशखूशीत लिखाण वाचायला मिळतेय. छान..
हिरव्या बांगड्या,या अवतारातली,सुमी का कमी नावाची विशीतील दाट सावळी,'सुदृढ' मुलगी ओसरीवर उभी होती.करवली असावी.तीला पाहून का कोण जाणे टेम्पोतल्या भरल्या सिलींडरची आठवणआली.
या वाक्यावर सॉलिड हसलो.
पुढचा भाग लवकर टाका.
21 Jul 2021 - 9:05 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. यामुळे उत्साह वाढतो.
21 Jul 2021 - 1:20 pm | वामन देशमुख
हा हा हा !!!
हहपुवा!
21 Jul 2021 - 9:05 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. छान वाटले
21 Jul 2021 - 1:53 pm | तुषार काळभोर
इतके दिवस कुठं होता?
अशा दर्जेदार आणि खुमासदार कथा लई दिवस मिस करत होतो.
21 Jul 2021 - 9:06 pm | नीलकंठ देशमुख
तुम्हाला आवडले, हे कळल्यावर आनंद झाला.
21 Jul 2021 - 9:07 pm | नीलकंठ देशमुख
तुम्हाला आवडले, हे कळल्यावर आनंद झाला.
21 Jul 2021 - 2:39 pm | गॉडजिला
क लीवलय क लिवलय
_/\_
21 Jul 2021 - 9:06 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
23 Jul 2021 - 12:37 pm | रंगीला रतन
झक्कास! सगळे भाग वाचतोय. मजा येतेय.
23 Jul 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा
एकदम ओरिजनल लेखन !
कमीचा किस्सा आन क्रिकेट स्टंम्प म्हंजे तर धमालच !
सिलेंडर लै मजा आणायलाय !
23 Jul 2021 - 6:18 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. आपण लिहित असलेलं इतरांना आवडतयं ही भावना खूप समाधान देऊन जाते
23 Jul 2021 - 6:19 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. आपण लिहित असलेलं इतरांना आवडतयं ही भावना खूप समाधान देऊन जाते