आज काय घडले .... चैत्र व. ६ भारताचार्य चि वि वैद्यांचा स्वर्गवास !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
12 Jun 2021 - 9:47 am

वैद्य ची वि
शके १८६० च्या चैत्र व. ६ रोजी सुप्रसिद्ध विद्वान् , मार्मिक संशोधक, मराठी व इंग्रजी भाषेचे विख्यात अभ्यासक भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचे निधन झाले.

शिक्षणक्रम पुरा झाल्यावर चिंतामणरावांनी प्रथम कोल्हापूर व ग्वाल्हेर संस्थानांत न्यायाधिशाचे काम केले. त्या वेळेपासून त्यांचा विद्याव्यासंग सतत चालू राहून त्यांनी संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी व उर्दू या भाषांचा चांगला अभ्यास केला. त्यांनी लिहिलेली श्रीकृष्णचरित्र व श्रीरामचरित्र ही पुस्तके आबालवृद्धांना अजूनहि वाचनीय वाटतात. महाभारताचा व्यासंग दांडगा असल्यामुळे त्यांचे 'महाभारताचा उपसंहार' हे पुस्तक अत्यंत संशोधनात्मक व विचारपूर्ण झाले आहे. रामायणावर परीक्षणात्मक लिखाणहि त्यांनी थोडे लिहिले आहे. शिलालेख, ताम्रपट, दानपत्रे, इत्यादींच्या साहाय्याने व पेशावरपर्यंत स्वतः प्रवास करून वैद्य यांनी ' मध्ययुगीन भारत' या नांवाची तीन पुस्तके लिहून.जुन्या इतिहासांत बहुमोल भर घातली. इतिहासाचार्य कै. वि. का. राजवाडे यांच्या 'ज्ञानेश्वरीचे मराठी व्याकरणावर यांनी लिहिलेले पांच टीकालेख' व 'निबंध आणि भाषणे, ' या त्यांच्या पुस्तकांतील लेख पाहून यांच्या भाषाशास्त्राच्या अभ्यासाचीहि चांगलीच कल्पना येते. 'माझा प्रवास' नांवाचे, १८५७ च्या क्रांतियुद्धाची हकीकत सांगणारे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. पानपत-प्रकरणावर आधारलेली “दुर्दैवी रंगू” ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी सुप्रसिद्ध आहे. टिळक विद्यापीठाचे कुलपति म्हणून त्यांनी काम केल्यावर विद्यापीठाने त्यांना विद्वत्कुलशेखर ही पदवी दिली होती. ते पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि संस्थापक होते. 'History of Sanskirt Literature', 'Riddle of the Ramayan', ' Epic India', ' Shivaji-the Maratha Swaraj' आदि त्यांचे इंग्रजी ग्रंथहि मान्यता पावले आहेत. १९०८ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी विभूषित केलेले होते.
---२० एप्रिल १९३८

इतिहास

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jun 2021 - 6:00 pm | प्रकाश घाटपांडे

चिं.वि. वैद्य १९२१ साली जुलै च्या 'चित्रमय जगत` अंकातील 'फलज्योतिषाचे निष्फळत्व` या लेखात लिहितात - म. गांधींची कुंडली एका राजकीय चळवळीतल्या सुशिक्षिताने भृगूसंहितेतून मिळवून आणली. त्याने असे सांगितले, ''त्यात असे सापडले की हिंदुस्थानास स्वराज्य १९२१ साली जरी मिळाले नाही तरी १९२५ साली मिळेल आणि महात्मा गांधी हे पहिले प्रेसिडेंट होतील, परंतु ते ती जागा पत्करणार नाहीत.`` वगैरे. तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले. भृगूसंहिता अमुक वर्षी हिंदुस्थानास स्वातंत्रय मिळणार म्हणून सांगणार आणि त्या प्रोत्साहनाने आमचे लोक स्वराज्याचा प्रयत्न करणार! भृगूसंहिता हे एक प्रचण्ड थोतांड असून त्याचा आमच्या सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष मंडळींवर अजून पगडा आहे हे आश्चर्य आहे.

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 6:04 pm | गॉडजिला

पॅराडॉक्स... होतो कारण...

सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष

म्हणजे विवेकी न्हवे. सुशिक्षित हे लेबल अशिक्षित लेबलच्या फार मोठ्या समुहापासुन आपणास वेगळे करते या उपर त्यातुन विवेकात्मक उपलब्धीमधे फार निष्पन्नता नाही.