शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली!
महाराष्ट्र संस्कृतीचा बनाव होतांना जे अनेक धर्मपंथ वा सांप्रदाय उदयास आले त्यांपैकी नाथसांप्रदाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वास्तविकपणे हा आदिनाथ सांप्रदाय वैष्णव सांप्रदायांपैकीच एक आहे. शंकरांनी पार्वतीस क्षीरसमुद्रांत जे ब्रह्मज्ञान सांगितले ते श्रीविष्णूंनी मत्स्याचे रूप घेऊन ऐकलें, शंकरांना हे समजल्याबरोबर ' अलक्ष ' असा त्यांनी उच्चार केला, तेव्हां मत्स्योदरांतून बाहेर येणाऱ्या कुमाररूपी विष्णूने 'आदेश' असा प्रतिशब्द दिला. हाच कुमार मत्स्येंद्रनाथ. प्रसिद्ध गोरखनाथ हा याच मत्स्यद्रनाथाचा शिष्य होय. याने योगविद्येवर “ मत्स्येंद्रसंहिता" नांवाचा ग्रंथ लिहून हठयोग व शाबरी मंत्रतंत्र विद्येचा सर्वत्र प्रसार केला. नेपाळमध्ये मत्स्येंद्रांचा उत्सव सात दिवस होत असतो. या नाथासांप्रादायी लोकांचा बाह्यवेष असा आहे.
“शैली शृंगी कंथा झोली विभूत लगाया तनमो
कोटि चंद्रका तेज झुलत है चली आपने गतमो॥"
महाराष्ट्रांतील भागवतधर्माचे संघटक श्रीज्ञानदेव यांचे घरी विठ्ठलाची भक्ति असली तरी त्यांची गुरुपरंपरा मात्र नाथ पंथामधीलच होती. अंजनी पर्वताच्या गुहेमध्ये तपश्चर्या करणा-या श्रीगैनीनाथांचा उपदेश श्रीनिवृत्तिनाथांना होता. याचा उल्लेख श्रीज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या उपसंहारांत करून आपल्या
या नाथसांप्रदायासंबंधी लिहिले आहे :---
"क्षीरसिंधू परिसरी । शक्तीच्या कर्णकुहरी ।
नेणों के श्रीत्रिपुरारी । सांगितले जें।
तें क्षीरकल्लोळा आंत । मकरोदरी गुप्त ।
होतां तयाचा हात । पैठे जालें।
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावया चौरंगी।
भेटला की तो सर्वांगी। संपूर्ण जाला ॥
१७ मार्च १२१०