'शेतकर्‍याविरुद्ध आरोपपत्र' : आदिम सृष्टीतत्व

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 May 2021 - 1:33 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

तू आधी नुसताच होता
शिकारी; मग बनला गुराखी

पावसापाण्याचे गणित शोधून करीत
राहिलास गाळपेर; वेळ साधून नद्या हटवून
आणि पाडलास मुडदा तू एका
प्राकृतिक व्यवस्थेचा
उगवून आल्या रोपांना तू केली आळी
पडत्या पावसाला घातले सरी- वरंबे
आणि झाली सुरु तुझी
सत्ता निसर्गाच्या चक्राविरुद्ध
तू फोडलेस आपसूक उमलणारे
फुलणारे लयाला जाणारे घड्याळ
आणि लागलास फिरवू काटे मनमानी
तुझे कष्ट सोपे करायला
काढलेस शोधून नांगर वखर जुंपले जुवाला बैल
तू बांधले अंदाज पिकाचे, समृद्धीचे
केलास सुरु सृष्टीवर अनन्वित अत्याचार
की त्याचा झाला नाही अजून कुठल्या ठाण्यात रिपोर्ट
हा तुझा सृजनाच्या मातीवरचा
प्रयोग नाही बलात्कार आहे बलात्कार
तुझा नांगर लिंगाच्या तयारीचा
ज्ञानियाच्या मार्दव असलेल्या
मातीत खसकन घुसतो.
तू काही कोणी पर्यावरणवादी नाही
की निसर्गाचा अभिजात सेवकपण नाही,
कुंडीत रोपे लावून झारीने
पाणी ओतत बसायला
तुला व्यवस्थेने करुन टाकले माफ
कारण तुझ्या भाकरीवरच
इथल्या प्रेषितांचे झाले भरणपोषण,
आणि त्यांनी पण तुझी केली
अन्नदाता म्हणून भरमसाठ स्तुती
राज्य ताब्यात आल्यावर सोनं- नाणं
स्त्रिया यांच्या आधी तुझ्या उपजावू
जमिनीवरच डोळा होता सार्‍यांचा
बुद्धीने तुला केले परावृत्त
यज्ञाला पुरवायला धनधान्य
पुष्ट जनावरांचे खिल्लार मटण
केवढा केला तुझा सन्मान
त्याने पदापदातून
आखरीस तू झालास लुटारुंना सामील
तू नसता झाला सामील या व्यवस्थेला
तर तू काढतोस
भुईमूग मातीतून
तसा तुला
त्यांनी उपटून फेकला असता मुळांसकट
जनावरांचे दूध ‍असते प्रायोरिटी
त्यांच्या करडं वासरु पारडूंसाठी
तू लावलं तिथं शेराचं माप पदरचं पाणी वाढवून
तसं माणसानी कुठं केलं आपल्या
माद्यांच्या दूधाचं मार्केटींग
तुला पासलं पाडून प्याले कोळून ते नीरक्षीरविवेक
कणसं पिकतात पुढच्या कैकपटीनं
फुलण्या फळण्याची अपेक्षा ठेऊन
तू काढलीस त्यांना खुडण्या- भरडण्याची कला
तू लावलेस एका साहजिक परंपरेला नख
असूरी हाव सुटल्याप्रमाणे
लागला वाढवू जीवांना
तू टाकल्या प्रत्येक फळाफुलांवर किंमती
धान्याच्या राशीवर लागले तुझ्यामुळं किंमतींचे बोर्ड
तू लुटलेस भूईला
आणि आता सारे लुटू लागले तुला,
तुझ्याकडचे फुकटात मिळविण्याचा घातला घाट
कुणी आले धर्माच्या नावानी,
कुणी पूर्वजांच्या,
सार्‍यांनी मिळून तुला कोंबले कोपर्‍यात
तुला सांगण्यात आल्या दातृत्वाच्या गोष्टी
वसा दिला तुला मातीत राबून सडायचा
तू घेतलास महारोगाचा चट्टा स्वतःला चिटकवून
आता हा कायमचा रोग
म्हणून रडतो कशापायी?
तु गुलाम केलंस हवा पाण्याला, माणसाला
गाय, बैल, शेळ्या खेचरं, कोंबड्या, घोड्यांना.
या सार्‍यांनी तुलाच जुंपलंय आता घाण्याला
आणि पाडतायेत तुझ्यातून तेल
जे नव्हतंच तुझ्यात कधी
सूर्यबापा- पृथ्वीच्या नात्यात
तू घातला औत अडसराचा
तू तोडला दोन तत्त्वांचा संबंध मग
पोटपुजकांनी ओरपला तुझा घाम
आणि चवीला रक्‍ताचा खरपूस खर्डा
घेतला कालवून.
हजारो वर्षे खपल्या तुझ्या पिढ्या
तुझ्या आयाबायांच झालं शेण
तुझ्या शक्‍तीचं झालं कंपोस्ट
विकलीस मातीमोल किंमतीला तुझी वंशावळ
तुझ्यावर भरला पाहिजे अधिकचा खटला
स्वतःची फसवणूक केल्याचा
आता तू निघालास यातून सुटून निघायला
मात्र तू अडकलेला शेंबडातल्या माशीगत
हीच तुझी सक्‍तमजूरी हेच तुझे कारागृह
तुझ्या जमिनीचे पट्टे तुझ्याभोवती गुंडाळून
तुझे पाळीव प्राणी तुझ्याच पाळतीवर
पाऊस कधी येईल जाईल

तुला दाणागोटा मागणार खाणारी तोंड
नाहीतर तुला ठरवणार देशद्रोही
काढून घेणं चाललंय
तुझ्या पेरीचा वारसा तुझ्याकडून
देतायेत तुझ्या हाती विमानाची तिकीटं
भरतायेत तुझे खिसे नोटांच्या बंडलांनी
तुझ्या पोरासोरांना दाखवलीय त्यांनी
स्वप्नातच उत्तान फिल्लम
आता येऊन रस्त्यावर बोंबल
मोर्च्याला चला, आंदोलनाला
लोक मग्न झालेयत आता घरातल्या थेटरात
तुच त्यांचा महानायक
जो घडवणार आता रस्त्यात काही चमत्कार
तू निसर्ग व्यवस्थेचा पहिल्यांदा खून केलेला
तुलाच पुढल्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी
तू तर ठेवलीय गिलोटीनखाली मान
आता पडेल पातं
चांडाळांच्या हातून

ते पिटतील पिटात टाळ्या
बघतील लाईव्ह तमाशा तुझ्या मरणाचा,
वाहतील श्रद्धांजली तुला
'बाईट' देताना
सांगतील मेला आमचा पिकविणारा
करतील आनंदानं सह्या
शेतमाल आयातीच्या कायमस्वरुपी करारावर
तू भारतवर्षातला शेतकरी
झाल्याचे तुला तेव्हा सगळ्यात
मोठे दुःख होईल
तू बिनसरणाचा पेटून उठशील
उभा आहे तिथंच राख होऊन जाशील.
- संतोष पद्माकर पवार (‘खेळ’ दिवाळी अंक २००७)
(प्रस्तावना: ‘आडवं धरुन बोलणं’ असा बोलीभाषेत एक वाक्प्रचार आहे. या कवितेत शेतकर्‍याला असं आडवं धरुन बोलताना शेतकर्‍याचीच बाजू कवी भक्कमतेनं मांडतो.)
‘खेळ’ दिवाळी २००७ चा दिवाळी अंक वाचताना ‘शेतकर्‍याविरुद्ध एक आरोपपत्र' ह्या संतोष पद्माकर पवार यांच्या कवितेने माझे लक्ष वेधून घेतले. कवितेचे वेगळेपण लक्षात येताच ती त्याच वेळी दोनतीनदा वाचली. कवितेतला आदिम वास्तवतेचा मुद्दा महत्वाचा वाटला. त्यानंतर केव्हातरी 'पंख गळून गेले तरी!' या माझ्या पुस्तकावर प्रतिक्रिया देण्यासाठी संतोष पवारांचा फोन आला. तेव्हा या कवितेबद्दलही त्यांच्याशी बोललो. प्रत्यक्ष कविता वाचताना उठलेले विचारांचे तरंग आणि संतोषशी बोलत असताना त्यावेळी माझ्याकडून तात्काळ उच्चारले गेलेले शाब्दीक अभिप्राय यातूनच कवितेवर थोडक्यात टिपण लिहायचे ठरुन गेले.
अलीकडे शेतकरी आत्महत्या करताहेत. गेल्या चोवीस तासात अमूक इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या अशा बातम्या ऐकून आत्महत्या तासात मोजाव्या लागाव्या इतक्या वाढल्या. शेतकर्‍यांसाठी काही करता आले नाही तरी सहानुभूतीने बोलणे सगळ्यांनाच जमू लागले. त्यातल्यात्यात काही वर्षांपासून ‘शेतकरी संघटना’ अस्तित्वात आल्यामुळे शेतकरी जीवनावर कविता, कथा, कादंबर्‍या लिहिणे पुर्वीपेक्षा वाढले. अशा कलाकृती उचलल्याही गेल्या. अशा सगळ्या सहानुभूती वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कवी संतोष पवारांनी शेतकर्‍यावर आरोपपत्र ठेवावे हाच एक मोठा गुन्हा ठरु शकतो. तरीही त्यांनी तो धोका पत्करत शेवटी शेतकर्‍याचीच बाजू घेतली आहे.
आदिमतेचा वसा आणि परंपरेविरुद्धचा उपहासात्मक शाब्दीक धबधबा म्हणजे ही कविता. रांगडी बोलीभाषेतील गतिमान शैली व रोखठोकपणा कवितेत उठून दिसतो. कवितेत शेतकर्‍याच्या मूलगामी वृत्तीचा धिक्कार केलेला आहे. हा धिक्कार केवळ पारंपरिक रुढीग्रस्त समाजाला धक्का देण्यासाठी आला नसून जे आदिम सृष्टीतत्व आहे त्या सृष्टीतत्वाच्या बाजूने उभे राहून शेतकर्‍याला धिक्कारले आहे. कविता लिहिताना कवी ज्या जागेवर उभा आहे (point of view), ती जागा खूप महत्वाची वाटते. ह्या जागेचाच इथे विचार केलाय. कवितेत शेकर्‍यावर हे आरोपपत्र कवी ठेवत नाही, तर खुद्द सृष्टीच ठेवते आहे की काय, इतकी ही जागा अचूक आहे. कवितेतल्या शैलीने अचूक फटके मारत खरोखर शेतकर्‍याला वास्तवात फैलावर घेतल्याचे जाणवते तर केव्हा शेतकर्‍याचा आतून कैवार घेत त्याला व्यवस्थेविरुध्द उपहासात्मक फैलावर घेतल्याचे नाटक ही शैली करताना दिसते.
मानवाची जशी उत्क्रांती झाली, त्या उत्क्रांतीचा माग काढत कविता पुढे सरकते. कवितेच्या सुरुवातीलाच आजचा शेतकरी हा शेतकरी बनण्यापूर्वी कोण होता, त्याचा हा प्रवास कवी दोनच ओळीत सांगतो,
‘‘तू आधी नुसताच होता
शिकारी, मग बनला गुराखी’’
एखाद्या अभ्यासकाला तात्विक विवेचन करीत हा इतिहास दोनशे पृष्ठांतही मांडता आला नसता, ते कवीने एका (खूप दीर्घ नसलेल्या) कवितेत नेमकं सांगून टाकलं. म्हणूनच ही कविता एक वस्तुनिष्ठ आविष्कार म्हणून भावली. पहिल्या काही ओळीतच कवी जी शब्दांवरची पकड घेतो ती गतिमान शैलीने शेवटपर्यंत पकडून कवी शेतकर्‍याचा तिरकस निषेध करीत राहतो.
‘‘पावसापाण्याचे गणित शोधून
करीत राहिलास गाळपेर;
वेळ साधून नद्या हटवून पाडलास मुडदा
तू एका प्राकृतिक व्यवस्थेचा
उगवून आल्या रोपांना तू केली आळी
पडत्या पावसाला घातले सरी वरंबे
आणि झाली सुरु तुझी
सत्ता निसर्गाच्या चक्राविरुद्ध’’
पुन्हा तिसर्‍या कडव्यात जोरदार चपराक दिल्यासारखी शब्दांची आतषबाजी पाहण्यासारखी आहे...
‘‘तू फोडलेस आपसूक उमलणारे
फुलणारे लयाला जाणारे घड्याळ
आणि लागलास फिरवू काटे मनमानी...’’
शेतकरी पिढ्यान् पिढ्या ‘सृष्टीवर अनन्वित अत्याचार’ करीत असल्याची यादी कवी देत राहतो. शेतकर्‍यानेच पहिल्यांदा सृष्टीवर अत्याचार करायला सुरुवात केली. नंतर इतरांनी. माणूस शेतकरी होऊ लागला तेव्हा त्यानेच जंगल तोडायला सुरुवात केली. पिकांचे अंदाज घेत सृष्टीतत्वाला धक्का देणार्‍या शेतकर्‍याला कवी सुनावतो, ‘हा तुझा सृजनाच्या मातीवरचा प्रयोग नाही, बलात्कार आहे बलात्कार’. कवी बलात्कार शब्दाची द्विरुक्‍ती करुन बलात्कार संज्ञेवर जोर देतो. हा केवळ बलात्कारच आहे हे अधोरेखीत करण्यासाठी कवीने बलात्काराचे द्वित्व मुद्दाम वापरले आहे.
शेतकर्‍याला अन्नदाता संबोधून त्याचे उदात्तीकरण करण्यामागे इथल्या राजांचेच नव्हे तर प्रेषितांनीही त्याची तात्पुरती स्तुती केली आणि शेतकरी पुन्हा सृष्टी खोदत राहिला. धर्माच्या नावाने यज्ञात जाळले जाणारे अन्न आणि शेतकरी पाळत असलेल्या प्राण्यांच्या आहुत्या वाचवून बुद्धाने शेतकर्‍याचा सन्मान केला. तरीही शेतकरी प्रवाहपतीत होत लुटारुंना जाऊन मिळाला, म्हणजे व्यवस्थेला शरण गेला. प्राण्यांचे दूध त्यांच्या करडं, वासरू, पारडूंसाठी असले तरी शेतकर्‍याने तिथे लबाडी केली. आधी विकण्यासाठी दुधाला शेराचं माप लावलं आणि नंतर उरल्यासुरल्या दुधावर करडं, वासरु, पारडू यांची भूक भागवली. काढलेलं दूधही तो शुद्ध स्वरुपात विकत नाही. तिथेही पाणी वाढवून लबाडी करतो. मात्र हाच शेतकरी असलेला माणूस आपल्या माद्यांच्या दुधाचं मार्केटींग करत नाही. अशा दांभिक समाजाने- व्यवस्थेने शेतकर्‍यालाही या भ्रष्ट व्यवस्थेत ओढून नीरक्षीरविवेकाने त्याला कोळून प्याले. लबाडी करुनही वरुन गोंडस नाव द्यावे ‘नीरक्षीरविवेक’. हा शब्द कवीने खूप काटेकोरपणे कवितेत वापरला आहे. रांगड्या बोलीभाषेला संस्कृतातली प्रबोधनाची टोपी घालून. फुलं, फळं, कणसं, पिकणं, खुडणं, धान्य भरण्याची कला ह्या सगळ्यांचे मार्केटींग म्हणजे सृष्टीविरुद्धचे कटकारस्थान असल्याचे कवी सारखं सांगत राहतो.
एवढं सगळं करुनही शेतकरी थांबलेला नाही. तो सगळ्यांनाच गुलाम करुन आपल्या दावनीला बांधून राबवू लागला. जनावरांना तर शेतकर्‍याने गुलाम केलंच पण हवा, पाणी आणि माणसालाही राबवून घेतलं.
‘‘तू गुलाम केलंस हवा पाण्याला, माणसाला
गाय, बैल, शेळ्या, खेचरं, कोंबड्या, घोड्यांना.
या सार्‍यांनी तुलाच जुंपलंय आता घाण्याला
आणि पाडतायेत तुझ्यातून तेल
जे नव्हतंच तुझ्यात कधी
सूर्यबापा - पृथ्वीच्या नात्यात
तू घातला औत अडसराचा
तू तोडला दोन तत्त्वांचा संबंध...’’
असे सर्व प्रकारचे आरोप करुन झाल्यावर सृष्टी शेतकर्‍यावर रोखठोक आसूड मारते, ‘तू निसर्ग व्यवस्थेचा पहिल्यांदा खून केलेला...’ शेतकर्‍याने उतून मातून होतं तोवर ओलं जाळून घेतलं. आणि आता शेतकरी परिस्थितीने पिचला. त्याच्या परिस्थितीला तो स्वत:च कसा जबाबदार आहे हे सांगण्यासाठी सृष्टी त्याला आरसा दाखवत त्याचा पाणउतारा करत तिरकस उपहासात्मक फटकारते... ‘‘हजारो वर्षे खपल्या तुझ्या पिढ्या
तुझ्या आयाबायांच झालं शेण
तुझ्या शक्‍तीचं झालं कंपोस्ट
विकलीस मातीमोल किंमतीला तुझी वंशावळ
तुझ्यावर भरला पाहिजे अधिकचा खटला
स्वतःची फसवणूक केल्याचा...’’
कर्जबाजारी होत शेतकरी दशोधडीला लागला. निसर्गही त्याच्या विरुध्द गेला आणि ज्या व्यवस्थेने त्याला शेतात अडकवले ती व्यवस्थाही त्याच्या विरुध्द उभी राहिली. शेतकरी आता अन्नधान्य पिकवायला कमी पडला तर व्यवस्था बाहेर तडजोडीला तयारच आहे... (अलीकडे तयार झालेला कायदा आपण इथे आठवू शकतो.) ‘‘…मेला आमचा पिकविणारा करतील आनंदानं सह्या शेतमाल आयातीच्या कायमस्वरुपी करारावर
तू भारतवर्षातला शेतकरी
झाल्याचे तुला तेव्हा सगळ्यात
मोठे दुःख होईल
तू बिनसरणाचा पेटून उठशील’’ पण हा शेतकरी कोणाचाच नसणार. ना धर्माचा, ना व्यवस्थेचा, ना सृष्टीचा. आणि म्हणून तो (तू) ‘उभा आहे तिथंच राख होऊन जाशील.’
हा झाला या कवितेचा कलाविष्कारांतर्गत मध्यवर्ती आशय, घाट आणि विषय. बाकी सगळं क‍वीने इतिहास सांगावा इतक्या ठळक, स्पष्ट आणि धडधडीत सोपं करुन कवितेत सांगितलं आहे. मुद्दा होता वेगळ्या, वास्तव व आदिम सृष्टीतत्वाचा. जो या विवेचनात बराचसा स्पष्ट झालेला आहे.
(लिखाण: डिसेंबर 2007, कविता-रती, मार्च-एप्रिल व मे-जून 2020 च्या अंकात प्रकाशित आणि ‘वर्णमुद्रा प्रकाशना’च्या ‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या पुस्तकातील हा लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 May 2021 - 9:53 am | डॉ. सुधीर राजार...

197 वाचक धन्यवाद

करतील आनंदानं सह्या
शेतमाल आयातीच्या कायमस्वरुपी करारावर

एव्हढ्या दोन न पटणार्‍या ओळी सोडून बाकीची कविता आवडली.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 May 2021 - 11:53 am | डॉ. सुधीर राजार...

खूप खूप धन्यवाद