शत शब्द कथा(ज)

विश्वनिर्माता's picture
विश्वनिर्माता in जनातलं, मनातलं
1 May 2021 - 2:25 pm

१. पश्चिमसमुद्रात खलाशी

डोळे उघडल्यावर दनिसला पहीला जाणवलं- सर्वांगातली वेदना, त्यानंतर खारट, फेसाळते तुषार. सोर्नसमुद्रात चाच्यांच्या तोफगोळ्याने कप्तान समुद्रात फेकला गेला, त्याच्या रक्ताचे पारदर्शक रिंगण पाहीले आणि होडीत उडी मारली. तिथे शुद्ध हरपली ती आत्ताच परतली.
दनिसने आभाळात असंख्य तारकांकडे पाहीले. नाकव्याचा तारा पश्चिमेकडे कललेला दिसत होता. पश्चिम...!
सोर्नच्या पश्चिमसमुद्राच्या कथा त्याच्या डोक्यात भणाणू लागल्या. पर्वताएवढ्या अष्टपादांच्या शाईने काळवंडलेले पाणी... हरवलेली जहाजे... अंधार्‍या तळातले विश्वभक्षकाचे घर...
त्याने थरथरत पाण्याकडे नजर टाकली. पाणी काळवंडलेले दिसत होते- हे रात्रीमुळे की शाईमुळे ?
होडीखालून काहीतरी अजस्त्र सर्रकन सरकले, आणि दनिस शुद्ध हरपून पाण्यात कोसळला.
देवमाश्याच्या अजस्त्र डोळ्याला काही औत्सुक्याचा विषय दिसला नाही. फवारा मारत ती पुढे निघाली.

२. मुहुर्तघटिका

“न’न्बाओएथुन-माल्कायिरनोरमातान “
“प्रत्येक ७३,१४४ वर्षांनी एथुनसणाला जेव्हा चंद्रोदय होईल,
पश्चिमेकडे वेदीवर लाली पसरेल, तेंव्हाच मातान पूर्वेकडे अवतरेल.”
अरमने पूर्वगामी जनसमुद्राला मनोर्‍यावरुन न्याहाळत विचार केला, पर्वतरांगेमागून क्षणभरातच चंद्र उगवेल...
तो अस्वस्थ होता. इतर मातानसेवकांना याचे कारण कळत नव्हते.
पुरातन संदेशातील एक शब्द त्याला बोचत होता- “तेंव्हाच.”
त्याने वेदीकडे पाहीले. मावळतीची किरणे ती युगांपासून झेलत आहे. मग “तेंव्हाच”मधली अनिश्चितता कश्यासाठी ?
चंद्र पर्वतांमधुन डोकावु लागताच अरम सेवकांच्या प्रवाहाविरुद्ध वेदीकडे धावला; चक्रावलेल्या सेवकांनी पूर्वेकडून आपली नजर हटवली नाही.
पूर्वक्षितीजामध्ये रंगांचा विस्फोट झाला. हिरव्या, जांभळ्या आभांमधून एका अजस्त्र हत्तीची आकृती असंख्य तारकांमध्ये क्षणभर दिसली; नाहीशी झाली.
मातानदर्शनाचा अंमल ओसरल्यावर वेदीवरुन ओघळणारे रक्त सेवकांना दिसले.

३. जकात

खोप्याच्या जमिनीवर मेलेल्या डासांचा थर पाहून तरुण आदीवासी थबकला.
“ हे काय...?”
“रातभर ढासं चावत हुते. ईळभर झोप नाय. म्हणुन सटासट हाणुन पार वसबुड करिवला मुडद्यांचा !” राजधानीतल्या पाहुण्याने बढाई मारली.
आदीवासी थरथरत गुडघ्यांवर कोसळलेला पाहून पाहुणा चक्रावला.
“मूर्ख ! तू राजधानीतल्या मवाळ देवांसोबत नाहियेस ! नैमिषारण्यात त्यांची सद्दी नाही ! आरण्यात आपापले क्षेत्र राखण्यासाठी इथले स्वामी खुद्द गस्त घालतात !”
“आरं, ढासं मारलीतर इव्हढी काय...”
आदीवाश्यानं त्याच्या छातीवरचं आवरण फटकार्‍यात भिरकावलं, आणि गोंदणांच्या गोतावळ्यात कावळ्याचे डोके असलेल्या आकृतीवर बोट आदळलं.
“हा येईल ! त्याला नैवेद्य न देता तू इतके जिव घेतलेस !”

....

त्या रात्री वटवृक्षाभोवती जमा आदीवाश्यांना समोरचं दृश्य पाहावत नव्हतं. पण नजर वळवता सुद्धा येत नव्हती.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

1 May 2021 - 9:46 pm | जव्हेरगंज

रोचक आहेत!!
पण समजल्या नाहीत :(

तुषार काळभोर's picture

2 May 2021 - 6:58 am | तुषार काळभोर

दुसरी ब्येश्ट!

गॉडजिला's picture

2 May 2021 - 10:19 am | गॉडजिला

मला शेवटुन तिसरी आवडली

बोलघेवडा's picture

2 May 2021 - 11:20 am | बोलघेवडा

दुसरी कथा अद्भुत आहे.
शेवटची पण आवडली

विश्वनिर्माता's picture

2 May 2021 - 2:00 pm | विश्वनिर्माता

जव्हेरगंज, तुषार, गॉडजिला, बोलघेवडा प्रतिक्रियेसाठी खूप आभार.

जव्हेरगंज- १०० शब्दात बसवण्याच्या नादात कथा थोड्या जास्तच अगम्य झाल्या आहेत असे वाटले. पुढील प्रयत्नात यावर ध्यान दिले जाईल.

टवाळ कार्टा's picture

2 May 2021 - 6:54 pm | टवाळ कार्टा

काय कल्लाव नाय

सामान्यनागरिक's picture

3 May 2021 - 10:56 am | सामान्यनागरिक

आपल्यलाही समजल्या नाहीत. तुम्ही मान्य केलं नसतं तर माझीही हिम्मत झाली नसती.

कथा छान आहेत. फार विचारपूर्वक समजून घ्याव्या लागतात. संदर्भ थोडा अधिक आणला कथेत तर आणिक मजा येईल! :-)

नावातकायआहे's picture

3 May 2021 - 3:49 pm | नावातकायआहे

क्रुपया विस्कटुन सांगाल का कोणी?

चौथा कोनाडा's picture

7 May 2021 - 12:22 pm | चौथा कोनाडा

ग्रेस, जीए इ. लोक आठवले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2021 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! क्या बात है. सर्वच गुढ कथा आवडल्या. पण कथंचा शेवट कळलाही पाहिजेत असे वाटले.
समजलं, समजलं, असं वाटतं. आणि मग विचार करणे सोडून द्यावे वाटतं. सध्या तान नकोच वाटतं.

पण, लिहिलंय भारी. कथा उलगडून सांगितल्या तर अजून आनंद घेता येईल.

लिहिते राहा. शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव's picture

7 May 2021 - 12:56 pm | आंद्रे वडापाव

ह्या पाककृती अंडे किंवा पनीर घालून करता येतील काय ?

विश्वनिर्माता's picture

7 May 2021 - 3:00 pm | विश्वनिर्माता

टवाळ कार्टा, राघव, सामान्यनागरीक, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, चौथा कोनाडा, नावातकायआहे, आंद्रे वडापाव - सगळ्यांचे आभार.

कथा समजावणे शक्य आहे पण त्यात काय मजा नाही. त्यामुळे सोडून देतो. क्षमस्व.

आंद्रे- हो चालतं की, अंडे किंवा/आणि पनीर घालून. तूप आणि कॅरॅमल पण छान लागेल बघा त्यात, ते पण टाका.
&#128539

जकात जरा कळली असे वाटते बाकी जवळ जवळ शून्य ... (असो आपल्याला तेवढे १०० शब्द पण जमणार नाहीत)
कथा थोड्या जास्तच अगम्य झाल्या आहेत असे वाटले
म्हणजे कसं कि जीए आणि खानोलकर यान्चायत बघितलं तर कधी कधी जीएच्या कथा डोकं उगाच दुखवय्यांच्या उगाच अगम्य वाटतात ( सर्व नाही, काही )
आणि पुढे खानलोकर आणि दळवी यांच्यात दळवी वाचायला जास्त सोप्पे पण तेवढेच मानवाची मनाचे कप्पे ओलंडनारे आणि चटका लावणारे लिहायचे

पर्वताएवढ्या अष्टपादांच्या शाईने काळवंडलेले पाणी..
ऑक्टॉपस किंवा कटल फिश जो काळी शाई सोडतो ... ( ती शाई घालून इटालियन लोक काळ्या शाई चा पास्ता करतात , दिसायला कसा तरी दिसतो चव चांगली असते म्हणे - दोन्हि प्राणी खाल्ले आहेत पन शाई चा पास्ता नाही )