फाल्गुन व.३० संभाजी राजांची हत्या!

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 11:08 am

आज काय घडले...

संभाजी महाराज

शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजी छत्रपति संभाजी राजे यांची हत्या वडू (बुद्रुक ) येथे औरंगजेब याने अत्यंत अमानुषपणे केली!

सुमारे सव्वा महिन्यापूर्वी म्हणजे माघ व. ७ रोजी मुकर्बखानाने औरंगजेब बादशहाच्या सांगण्यावरून संभाजी राजे व कलुशा या दोघांना संगमेश्वर येथे कैद केले होते. ही बातमी बादशहास कळल्यावर त्याने विजयोत्सव सुरू केला. फार दिवसांची त्यांची मनीषा पूर्ण होणार होती. लागलीच त्याने आनंदाप्रीत्यर्थ गुलबर्गा येथील यवन साधूस दहा हजार रुपयांची भेट पाठविली. बादशहा या वेळी बहादुरगडास होता. संभाजी राजे व कवि कलश येत आहेत असे कळताच त्याने संभाजी राजांचा अपमान करण्यासाठी हुकूम पाठविला, “संभाजी राजांची धिंड काढीत घेऊन या.' आणि हुकुमाप्रमाणे मराठ्यांच्या या राजाला चित्रविचित्र पोषाख चढविण्यांत आला, डोक्यावर विदुषकी टोपी घालून तीस घुंगुरू लावले, आणि संभाजी राजांना उंटावरून मिरवीत वाद्ये वाजवीत हमीदुद्दीवानाने बादशहासमोर आणले. त्यांचा निकाल कसा लावावा याची सल्लामसलत झाली. “मुसलमानी धर्म स्वीकारून बादशहाची सेवा कराल तर जीवदान मिळेल" या औरंगजेबाच्या विचारण्याला संभाजी राजेंच्या अंगी उसळत राहणाऱ्या हिंदु धर्माच्या अभिमानाने उत्तर दिले. “मृत्यु किंवा हालअपेष्टा यांना भिऊन हा शिवाजीचा पुत्र जिवाची पर्वा करणार नाही."

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्याच रात्री संभाजी राजांचे डोळे काढण्यांत आले. कलुशाची जीभ कापण्यांत आली! आणि दोघांनाहि ठार करण्याचा हुकूम बादशहानें. फर्माविला! शेवटी फाल्गुन व. ३० रोजी संभाजीने व कलुशाचे एक एक अवयव तोडून आणि त्यांचे मांस कुत्र्यास देऊन दोघांचा शिरच्छेद करण्यांत आला! उभयतांची शिरें पेंढा भरून कैक दिवस निरनिराळ्या गांवांतून वाद्ये वाजवून मिरवण्यांत आली; पुढे ती फेंकून दिल्यानतर मराठ्यांनी तुळापूर येथे आणून भीमा-इंद्रायणीच्या संगमावर अग्निसात् केली!
-११ मार्च १६८९

इतिहास

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

26 Apr 2021 - 7:37 pm | चित्रगुप्त

अरेरे. काय अमानुष हे घोर कृत्य. म्हणूनच समर्थांना "बुडाला औरंग्या पापी" असे म्हणावे लागले.