सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

आज काय घडले... फाल्गुन व. १२ पालखेडला निजामाचा कोंडमारा मराठ्यांची विजयप्राप्ती !

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:58 am

बाजीराव

शके १६५० च्या फाल्गुन व. १२ रोजी पहिल्या बाजीरावाने पालखेड येथे निजामाचा संपूर्ण मोड केला.

या वेळी निजामुल्मुल्काने दक्षिणेत आपले बस्तान नीटपणे बसविले होते. दिल्लीच्या बादशहापासून दक्षिणच्या सहाहि सुभ्यांतून खंडणी घेण्याचा हक्क बाळाजीने मिळविला होता. त्याप्रमाणे मराठे वसूल करीतहि असत, परंतु आतां त्याना धुडकावून लावावे व आपण पूर्ण स्वतंत्र व्हावे असा प्रयत्न निजामाने सुरू केला. कोल्हापूरकर संभाजी महाराज निजामास जाऊन मिळाले. चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर हेहि आपल्या बाजूस आहेत असे पाहून वसूल करणाऱ्या लोकांना निजामाने दरडावून विचारले, “खरा वारसरदार कोण? कोल्हापूरकर की सातारकर, ते अगोदर ठरवा. मग खंडणीची बात बोला.” या प्रकारे निजामाचा उद्धटपणा पाहून शाहू राजांस संताप आला. त्यांनी निजामाचे पारिपत्य करण्यासाठी बाजीरावास आज्ञा केली. बाजीरावाने स्वारीची तयारी.करून निजामाचे साह्यकर्ते संभाजीराजे व चंद्रसेन एकत्र होण्यापूर्वीच जालना प्रांत हस्तगत केला व तेथील खंडणी वसूल केली. बाजीरावाचा पाठलाग निजामने मोठ्या कष्टानें केला, पण त्यात त्याला यश मिळाले नाही. मोंगल व मराठे यांच्यात वारंवार चकमकी होऊ लागल्या. शेवटीं पैठणशेजारी पालखेड येथे निजामाचा कोंडमारा केला, फाल्गुन व. १२ रोजी बाजीरावांने पालखेडनजिक आकस्मिकपणे निजामास गांठून त्याला कोंडून धरले. निजामाचा तोफखाना दूर राहिल्यामुळे त्याचे काही चालेनासे झाले. बाहेरचे दळणवळण तुटल्यामुळे कठीण अवस्था निर्माण झाली. दाणावैरण व अन्नपाणी बंद होऊन सैन्याचे हाल होऊ लागले. निजाम अगदी त्रस्त होऊन गेला. त्याचे साह्यकर्ते त्याला मदत करीनात. तेव्हां बाजीरावाशी समेट करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ऐवजखानाच्या मध्यस्थीने कराराची बोलणी सुरू झाली. संभाजी राजांसही आपल्या स्वाधीन करण्याविषयी बाजीरावाने आग्रह धरला. चौथाई व सरदेशमुखीचे हक्क निजामाने मान्य केले. काही किल्ल्यांचीहि प्राप्ति मराठ्यांना झाली. याप्रमाणे मराठ्यांना अनुकूल असा तह झाला.

-२५ फेब्रुवारी १७२८

इतिहास