आज काय घडले... फाल्गुन व.७ त्यांस ईश्वरें यश दिले !"

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:45 am

आज काय घडले...
फाल्गुन व.७
त्यांस ईश्वरें यश दिले !"
शके १६९२ च्या फाल्गुन व.७ रोजी हैदर आणि मराठे यांच्यांत प्रसिद्ध मोतितलावाची लढाई होऊन हैदराचा प्रचंड पराभव झाला.
माधवराव पेशव्यांचे सर्व लक्ष दक्षिणेकडील कर्नाटक प्रांती असे. कर्नाटकांत त्यांनी एकंदर पांच स्वाऱ्या केल्या; पैकी पहिल्या चार स्वारीतून ते स्वतः हजर
होते. पानिपतचे संकट कोसळल्यावर मराठयांच्या सर्वच शत्रूंनी उचल खाल्ली. त्यांत हैदरअल्ली प्रमुख होता. त्याने एकामागून एक असे मराठ्यांचे प्रांत घेण्यास प्रारंभ केला. तेव्हां त्याचा बंदोबस्त करणे माधवरावांना क्रमप्राप्तच होते. शके १६९२ च्या सुमाराप्त त्रिंबकराव मामाने बिदनूर प्रांतावर स्वारी करण्याचा विचार केला. मोठया सैन्यानिशीं हैदरहि तयार होताच. त्रिंबकरावांनी सखाराम हरि गुप्तेकरवी सर्व बारीकसारीक माहिती मिळवली; आणि मराठयांनी बिदनूर व श्रीरंगपट्टणच्या दरम्यान हैदरास कोंडले. परंतु कसे तरी करून हैदर मेलकोट्याहून श्रीरंगपट्टणास निघाला, त्याच वेळी त्याला मराठ्यांनी गांठले आणि तुंबळ युद्ध केले. हैदर उजवीकडच्या डोंगराकडे पळून गेला. टिपू फकिराचा वेष घेऊन निसटला. या लढाईस ' मोतितलावाची लढाई' असे नांव आहे. या लढाईचे वर्णन असे सांपडते.
" मराठ्यांनी थेट हैदराच्या तोफावर चालून जाऊन त्या बंद पाडिल्या, तेव्हां तोफा सोडून आराव्यांत शिरतांच त्याचा मोड झाला.,हत्ती, तोफा वगैरे सलतनत लुटली गेली. पंचवीस हजार माणूस, गाडदी बारा हजार, व पन्नास तोफा येणेंप्रमाणे एक घटकेत सत्यानाश झाला. मात्र या लढाईत नीळकंठराव त्रिंबक पटवर्धन व त्याचे दुसरे आठ इसम गोळी लागून ठार पडले. अनुचित गोष्ट झाली. नीळकंठराव मोठे रत्न होते! त्रिंबकराव मामा फारच श्रमी झाले. हैदर नायकाचे झुंज असे कधी झाले नाही. पंचवीस हजार गाडयांची एक शिलग होई तेव्हां गगन गर्जत असे. नीळकंठराव, परशुरामभाऊ, वामनराव बाबा या तिघांनी व लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी मोठी शर्थ केली. नीळकंठरावामुळे हर्षभंग झाला. श्रीमंत थोर पुण्यवंत, त्यांस ईश्वरें यश दिले."
-७ मार्च १७७१माधव राव पेशवे

इतिहास