शके १७१६ च्या फाल्गुन व. ५ रोजी म्हणजे रंगपंचमीला मराठे आणि निजाम यांचा खर्डे येथे इतिहासप्रसिद्ध सामना होऊन निजामाचा संपूर्ण पराभव झाला.
मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा हा प्रसंग आहे. खासा विजय अजूनहि मराठ्यांच्या बाहूंना स्फुरण चढवीत असतो. या लढयांत मराठ्यांचा पराभव झाला असता तर त्यांचे सार्वभौमत्व संपून निराळ्याच मनूस सुरुवात होण्यासारखी परिस्थिति होती. राक्षसभुवनच्या लढाईत निजामाचा पूर्वी एकदा पराभव झाला होता, परंतु तहांत ठरलेला मुलूख मराठयांना मिळाला नाही. नाना फडणिसांनी निजामाकडे काय येणे आहे याची यादी पाठविली, परंतु नानांना बेपर्वाईचे उत्तर मिळाले. पुण्यावर स्वारी करून ते जाळून पेशव्यांच्या हाती भिक्षापात्र देऊन त्यांस देशोधडीस पाटवू-" ही निजामाची भाषा नानांना कळल्याबरोबर युद्धाची तयारी झपाट्याने सुरू झाली. नुकतेच महादजी शिंदे आणि हरिपंत फडके वारले असल्यामुळे मराठ्यांना आपण सहज जिंकू अशी निजामाची कल्पना होती. इंग्रज आपणांस मदत करतील हीहि खात्री निजामास होतीच. या लढ्यांत दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर, गायकवाड, जिवबादादा बक्षी, भोसले, आदि सरदार सामील झाले होते ; हे पाहून सर जॉन शोअरने आयत्या वेळी निजामास मदत दिली नाही. एकंदर मराठ्यांची फौज ऐशी हजारपर्यंत तयार झाली. परशुरामभाऊ मुख्य सेनापति होते. प्रथम परिंडे या गांवीं दोनही सैन्यांच्या चकमकी झाल्या, आणि नंतर खर्डे या गांवी निजामची फौज कोंडली गेली.--" सकाळच्या दहा घटकांपासून अस्तमानपर्यंत लढाई झाली. संध्याकाळचे सुमारास त्यांचा मोड होऊन त्यांनी पळ काढला. खाचा किल्ला गांठला, आम्ही पाठीमागे लागलो, त्यांचेमागे कोसाचे अंतराने उतरलों, पूर्वेस घाटाचे बाजूस आमचे पेंढार उतरले, शत्रूस निघून जावयास मार्ग नाही. पाणी नाही, हैराण गत झाली", नंतर तह होऊन मराठ्यांना परिंड्यापासून उत्तरेस तापी नदीपर्यंतचा. मुलूख व युद्धखर्चाबद्दल तीन कोटी रुपये मिळाले.
-१० मार्च १७९५