आज काय घडले...
फाल्गुन व. ३
" श्रीशिवाजी राजे शिवनेरीस उपजले!"
शके १५५१ च्या फाल्गुन व. ३ रोजी शिवनेरी येथे स्वराज्यसंस्थापक श्रीशिवाजीमहाराज यांचा जन्म झाला.
निजामशाहीत मराठ्यांची दोन घराणी प्रसिद्धीस आली : एक भोसल्यांचे व दुसरें जाधवांचें. पैकी शहाजी भोसले आपल्या पराक्रमाने सर्वत्र तळपत राहिले. त्यांचे जीवित युद्धमय स्थितींतच असल्याने गरोदर असणाऱ्या जिजाबाई शिवनेरी किल्ल्यावर होत्या. भोवतालची परिस्थिति पाहून जिजाबाईस धाक उत्पन्न होई. त्यांनी शिवाईस नवस केला की, "मला मुलगा होऊ दे, मी त्याला तुझें नांव ठेवीन." त्याप्रमाणे मुलगा झाल्यावर त्यांनी त्याचे शिवाजी असे नांव ठेविलें. मातोश्री जिजाबाई या शिवाजी राजांच्या पहिल्या गुरु होय. परकियांच्या जाचाने त्रस्त प्रजा, पति सतत युद्धभूमिवर, अशा परिस्थितीत त्यांनी आपले सारे लक्ष शिवाजी राजांकडेच केंद्रित करून त्यांची उत्कृष्टपणे जोपासना केली. रामायण-महाभारतातील कथा सांगून त्यांच्या मनांत स्वाभिमान आणि शौर्याविषयी आवड निर्माण केली. घोड्यावर बसणे तिरंदाजी करणे, भाला मारणे, तलवार चालवणे, इत्यादि मर्दानी शिक्षण पदरी शिक्षक ठेवून त्यांनी शिवाजी राजांना दिले.
शिवाजी राजे लहान असतांनाच शहाजी राजांनी त्यांना विजापूरला नेले. तेथील सर्व प्रकार पाहून शिवरायांच्या अंगचा स्वाभिमान उफाळून वर आला. यवनांची दुष्ट कृत्ये त्यांच्या नजरेत भरली, गोवध करणाऱ्यांविषयी त्यांना संताप आला. विजापूर दरबारांत शहाजी राजांबरोबर शिवाजी राजे गेले परंतु मुजरा न करतां तसाच उभे राहिले, तेव्हां लेकरूं आहे, दरबार पाहून घाबरले, अशी सारवणी शहाजी राजांस करावी लागली. शिवाजी राजांनी डोळ्यांनी सर्व परिस्थिति पाहिली आणि यवनांच्या मगरमिठीतून देश, धर्म, लोक यांना सोडवावे अशा विचाराने लहान वयांतच जिवास जीव देणारे अनेक सौंगडी जमवून त्यांनी कार्यास सुरुवात केली. आणि थोड्याच अवधीत हिंदवी स्वराज्याची निर्मिति या थोर पुरुषाने केली!
- १९ फेब्रुवारी १६३० कमी पहा