आज काय घडले... फाल्गुन शु. ११ इंग्रज-मराठे यांच्यांतील पुरंदरचा तह !

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
9 Apr 2021 - 11:13 am

marathe -ingraj

शके १६१७ च्या फाल्गुन शु. ११ रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यामधील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला.

सुवर्णमय असणाऱ्या भारतांत गोवें आणि उत्तर कोंकण येथे पोर्तुगीझांनी आपले बस्तान स्थिर केले आणि मद्रास व बंगाल इकडे इंग्रजांचा उत्कर्ष होत राहिला. मराठी राज्य काही काळपर्यंत तरी का होईना खंबीर असल्यामुळे मुंबईकडे इंग्रजांचा शिरकाव होणे दुरापास्त झाले. पुढे पेशव्यांच्या दरबारांत गृहकलह आहे की काय याचा तपास मॉस्टिन नांवाचा इंग्रज वकील करूं लागला. त्याच्या सुदैवाने राघोबादादा त्याला मित्र भेटले. नारायणरावांच्या खुनानंतर राघोबाविरुद्ध बारभाईंचे कारस्थान उभारले गेले व रघुनाथराव उत्तरेकडे पळू लागले. हरिपंततात्या त्यांचा पाठलाग करीत होते. ही संधि इंग्रजांनी साधिली. इंग्रजांनी पूर्वीचा सर्व तह विसरून साष्टी घेतली. राघोबा सुरतेस इंग्रजांच्या आश्रयास आले ; आणि घरभेदेपणा पत्करून त्यांनी इंग्रजांशी तह केला. आणि कर्नल कीटिंग यांच्याबरोबर अडीच हजार इंग्रजी फौज राघोबास मदत करण्यास सिद्ध झाली. शिदे, होळकर व हरिपंत रघुनाथरावांचा पाठलाग करीतच होते, परंतु राघोबास इंग्रजांचा आश्रय मिळाल्याचे पाहून शिदे-होळकर स्वस्थ राहिले. एकट्या हरिपंताने इंग्रजी फौजेशी सामना दिला. दोनहि पक्षांकडील बरेच नुकसान झाले. मध्यंतरी नवीन प्रकरण निर्माण झाले. कलकत्त्याच्या हेस्टिग्जने मुंबईकर इंग्रजांना कळविले, “राघोबाचा पक्ष घेऊन तुम्ही आपल्या अधिकाराबाहेर वर्तन केले. युद्ध ताबडतोब बंद करा." आणि सखाराम बापूसहि लिहिले की, “मुंबईकरांनी चालविलेले युद्ध आम्हांस मान्य नाही. तुम्हांकडे बोलणे करण्यास वकील पाठवतो. तहाची योजना करा." कर्नल अॅप्टन हा इंग्रज वकील कलकत्त्याहून तहाचे बोलणे करण्यास आला. बऱ्याच वाटाघाटी झाल्या, पण साष्टी वगैरे मुलूख मिळाल्यामुळे जो फायदा झाला होता तो सोडण्यास इंग्रज तयार नहते. परंतु मराठ्यांचीहि स्थिति ठीक नव्हती. तेव्हां दोघांच्यांत फाल्गुन शु. ११ रोजी तह ठरला. इंग्रजांच्या फौजा परत जाव्या, राघोबाने कोपरगांवीं रहावे; पेशव्यांच्या विरुद्ध इंग्रजांनी इतर कोणालाहि मदत करूं नये.
-२९ फेब्रुवारी १७७६

इतिहास