आज काय घडले... फाल्गुन शु. १० सर ग्रियर्सन यांचे निधन !

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
9 Apr 2021 - 11:11 am

giyarson

शके १८६२ च्या फाल्गुन शु. १० रोजी भारतांतील भाषाशास्त्राच्या अभ्यासाचे जनक, पुरातत्त्ववेत्ते सर जॉर्ज आब्राहम ग्रियर्सन यांचे निधन झाले.

वयाच्या तेविसाव्या वर्षी सिव्हिल सर्व्हट म्हणून हे नोकरीत रुजू झाले. तेव्हांपासून ग्रियर्सन आपला वेळ भारतातील भाषा आणि लिप्या यांच्या संशोधनांत घालवू लागले. दांडगा व्यासंग व भरपूर मेहनत हे यांच्या कामगिरीचें वैशिष्टय होते. सन १८७७ मध्ये यांनी कालिदासावरील आपला पहिला निबंध प्रसिद्ध केला. साठ वर्षेपर्यंत अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास केला. यांच्या पंचायशीव्या वाढदिवशी 'व्हॉल्यूम ऑफ इंडियन अँड इराणियन स्टडीज्' हा ग्रंथ त्यांना अर्पण करण्यांत आला. त्यांत त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. या ग्रंथांतील वीस पृष्ठे यांच्या लिखाणांच्या सूचीने व्यापिली आहेत. भारतांतील दोनशेपेक्षा अधिक लिप्यांशी यांचा चांगला परिचय होता. अनेक भाषाहि यांनी अवगत केल्या होत्या. कित्येक ज्ञात आणि अज्ञात भाषांची व्याकरणे यांनी लिहिली आहेत. यांची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे 'लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' या ग्रंथाच्या वीस खंडांची निर्मिति ही होय. “ यामुळे हिंदुस्थानांतील भाषांच्या अभ्यासकांना पूर्वपरंपरा तर प्रगट करून दाखविलीच, शिवाय त्या त्या भाषेतील अनेक उतारे देऊन नवीन अभ्यासकांना सांगाडा निर्माण करून देऊन त्यांच्या घटनेचा अभ्यास करून त्यांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला. यांच्या या कार्यामुळे हिन्दी विश्वविद्यालयांचे भाषाशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाकडे लक्ष ओढले गेले.” ग्रियर्सन यांच्या या प्रचंड प्रयत्नामुळे भाषाशास्त्रांत नवीन नवीन शोध लागण्यास बरेच साह्य झाले. जगांतील सर्व भागांतून पदव्या आणि मानसन्मान यांचा वर्षाव यांच्यावर यांच्या उत्तरायुष्यांत झाला. बंगाल व मुंबई येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या शाखेचे हे ऑनररी फेलो होते. नागरी प्रचारिणी सभा (काशी), बिहार ॲण्ड ओरिसा रीसर्च सोसायटी, दि मॉडर्न लँग्वेज असोसिएशन, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया व वंगीय साहित्य परिषद, आदि संस्थांचे हे सभासदहि होते.
-८ मार्च १९४१

इतिहास