कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
2 Apr 2021 - 10:10 am
गाभा: 

ok

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज

.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
........................
पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
.......
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत :

१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:

लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).

यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.
लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकीहे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे.
इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.
महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 10:47 am | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला. चर्चा वाचायला आवडेल.

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 11:46 am | प्रचेतस

उत्तम लेख.
लस आणि उपचार, दोन्ही पद्धतींचा घेतलेला आढावा आवडला.

कुमार१'s picture

2 Apr 2021 - 4:37 pm | कुमार१

अ‍ॅ मा व प्रचे.
धन्यवाद !
..................
कुठलाही विषाणू निसर्गानुसार जनुकबदल करतच राहणार आणि त्याचे नवे अवतार येणार. यासंदर्भात वैज्ञानिक Daniel Reeves यांनी एक गणिती प्रारुप समोर ठेवले आहे. ते असे :

समजा, विषाणूच्या नव्या प्रकाराने एका व्यक्तीस बाधित केलंय आणि ही व्यक्ती समाजात त्रिसूत्रीचे पालन न करता वावरते आहे.
१. जर का तिचा संपर्क एका वेळेस अन्य एकाच व्यक्तीशी आला, तर विषाणूचा नवा प्रकार दुसऱ्यात जातो पण ‘बाय चान्स’ (संख्याशास्त्रानुसार) तो मरण्याचीही शक्यता बरीच असते.

२. पण जर ही बाधित व्यक्ती एका वेळेस पाच जणांच्या संपर्कात आली आणि त्या सर्वांना बाधित केले, तर आता नवा विषाणू जगण्याची व फोफावण्याची शक्यता बरीच वाढते.

३. त्याही पुढे जाऊन ही व्यक्ती एका वेळेस 20 जणांच्या संपर्कात आली तर प्रसारित झालेला विषाणू म्हणून पुढे जगतो तर जगतोच, आणि कालांतराने निसर्गात बलाढ्य होतो.

सारांश : त्रिसूत्री आणि विशेषतः समूह नियंत्रण सध्या महत्त्वाचेच. जनुक बदललेल्या विषाणूवर नियंत्रण आणण्याचा तो पण एक मार्ग असतो.

कोविड लस व नन्तर यासम्बन्धी समज गैरसमज याविशयी
.

चौकटराजा's picture

2 Apr 2021 - 5:22 pm | चौकटराजा

.

चामुंडराय's picture

4 Apr 2021 - 5:34 am | चामुंडराय

सध्या कायप्पा वर एका डॉक्टरांचा मेसेज फिरतो आहे IGg antibodies बद्दल. १०, १२, २०, २८ वगैरे आकडे दिले आहेत.
हे काय आहे?

किती पाहिजे IGg antibodies?

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 9:26 am | कुमार१

आपल्याला कुठलाही जंतुसंसर्ग झाला की काही दिवसांत आपले शरीर प्रतिपिंडे (Ab) तयार करते. ती एकूण ५ प्रकारची असतात.

त्यापैकी IgG व IgM ही प्रमुख असतात. कोविडमध्येही ही तयार होतात. अर्थात ती रक्तात मोजणे ही काही रोगनिदान चाचणी नव्हे. ती आढळली याचा अर्थ संसर्ग होऊन गेलेला आहे.

ती मारक व अ-मारक अशा २ प्रकारची असतात. यापैकी नक्की कुठली मोजली आहेत, चाचणी पद्धतीचे परिमाण कुठले, हे सर्व माहित असल्याशिवाय नुसत्या आकड्यांना काही अर्थ नाही.

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 6:13 am | मुक्त विहारि

वाखूसा

चौकटराजा's picture

4 Apr 2021 - 10:09 am | चौकटराजा

आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये डॉ उज्ज्वला दळवी यांचा प्रदीर्घ लेख विषाणू या संबंधी आला आहे तो सर्वानी सावकाश ,समजून घेत घेत अवश्य वाचावा ! काहीतरी वेगळे थ्रिल म्हणून न शिजवता मांसाहार करणे हे विषाणू मनुष्य देहात संक्रमित करण्याचा राजमार्ग आहे हे त्यांनी अधोरेखित केले आहे ! ( एच आय व्ही रिसस माकडे संबंध असाच आलेला काय ? )

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 4:33 pm | कुमार१

चौरा
तो लेख इ आवृत्तीत दिसत नाही.

चौकटराजा's picture

4 Apr 2021 - 5:37 pm | चौकटराजा

जमल्यास फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवतो !! )

नाही दिसत लेख तिथे.आणि मांस पूर्ण शिजवल्यावर जंतू मरतात ..मला वाटत बरेच विषाणूही मरतात ,तेव्हा संसर्गाचा धोका कच्च्या मांसामुळेच होऊ शकतात.

नाही दिसत लेख तिथे.आणि मांस पूर्ण शिजवल्यावर जंतू मरतात ..मला वाटत बरेच विषाणूही मरतात ,तेव्हा संसर्गाचा धोका कच्च्या मांसामुळेच होऊ शकतात.

Rajesh188's picture

4 Apr 2021 - 10:20 am | Rajesh188

कोणत्याही डॉक्टर नी, विचारवंतांनी,विज्ञान विषयात लेखन करणाऱ्या लोकांनी.
पूर्ण अभ्यास,भक्कम पुरावे,मोठ्या संख्येनी अभ्यास करून आलेला निष्कर्ष नसेल तर असल्या संवेदनशील मुद्द्यावर लेखन करून ती प्रसारित करू नये.
Dr दलवी ह्यांनी किती लोकांचा अभ्यास करून मांसाहार विषयी मत मांडले आहे.
त्यांच्या कडे भक्कम पुरावा आहे का.
की त्यांना वाटत म्हणून मांसाहार आणि विषाणू चा संबंध जोडला आहे.

चौकटराजा's picture

4 Apr 2021 - 4:14 pm | चौकटराजा

मांसाहार व विषाणू यांचा थेट संबंध नाही ! मांस कच्चे खाणे किंवा प्राण्यांशी शरीर संबंध यातून विषाणू माणसात संक्रमित होतो याविषयी जागतिक स्तरावर संशोधन झाले आहे . त्याचा आधार घेऊन डॉ दळवी यांनी लेख लिहिला असावा !

आनन्दा's picture

5 Apr 2021 - 8:43 am | आनन्दा

संम ला विनंती आहे की या आयडीला आपले अर्धवट मत कुठेही व्यक्त करायला मनाई करण्यात यावी..
पहिले पहिले मजा वाटत होती.
पण आता सगळीकडे तोडलेले असले तारे बघून वैताग यायला लागला आहे.

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 10:20 am | कुमार१

चौरा,
धन्यवाद
...

एच आय व्ही रिसस माकडे संबंध असाच आलेला काय ?

>>

याचे विवेचन मी आधी इथे केलेले आहे :
https://misalpav.com/node/43784

मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.

Rajesh188's picture

4 Apr 2021 - 1:45 pm | Rajesh188

बाधित व्यक्ती च्या किती वेळ संपर्कात आल्यावर संक्रमण होवू शकत.
नॉर्मल दोन चार मिनिट संपर्क पण बाधित करू शकतो का.
आणि संसर्ग होणे बाधित लोकशी संबंध आल्यावर कशावर अवलंबून असते.
प्रतिकार शक्ती चांगली असेल तर संसर्ग होत च नाही की symptron तीव्र नसतात.
नक्की काय.

Rajesh188's picture

4 Apr 2021 - 1:45 pm | Rajesh188

बाधित व्यक्ती च्या किती वेळ संपर्कात आल्यावर संक्रमण होवू शकत.
नॉर्मल दोन चार मिनिट संपर्क पण बाधित करू शकतो का.
आणि संसर्ग होणे बाधित लोकशी संबंध आल्यावर कशावर अवलंबून असते.
प्रतिकार शक्ती चांगली असेल तर संसर्ग होत च नाही की symptron तीव्र नसतात.
नक्की काय.

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 3:42 pm | कुमार१

राजेश

बाधित व्यक्तीच्या कितीकाळ पेक्षा निकटचा किंवा वारंवार संपर्क जास्त महत्त्वाचा आहे.
तसेच बाधित व्यक्ती किती प्रमाणात बाधित आहे हे महत्त्वाचे.
त्याचबरोबर ती शिंकत अथवा खोकत असेल तर ते अधिक घातक ठरते.

ज्या व्यक्तीला संसर्ग होईल तिच्या एकंदरीत प्रतिकारशक्ती आणि सहव्याधी आहेत किंवा नाही, यावर पुढील भवितव्य ठरेल

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 6:28 pm | मुक्त विहारि

घटा घटाचे रूप आगळे,

त्यामुळे एकाच वयोगटातल्या, सारखीच प्रकृति असलेल्या माणसांना पण, हा विषाणू बाधित करेलच असेही नाही आणि बाधित करणार नाहीच, असे ठोस काही सांगता येत नाही....

जसे की, एकाच मात्यापित्याच्या पोटी जन्म घेतलेल्या एका व्यक्तीला कॅन्सर होतो तर इतरांना नाही...

माझ्या मावशीला कॅन्सर झाला होता पण, तिच्या इतर भावंडांना नाही ...

प्लेग, देवी, काॅलरा ह्या साथीच्या रोगांत पण, हे आजारपण प्रत्येकाला झाला नाही...

चौकटराजा's picture

5 Apr 2021 - 9:42 am | चौकटराजा

आजच्या "म टा " मध्ये एका रखवालदाराने कुत्र्याबरोबर अनैसर्गिक चाळे केल्याची बातमी आली आहे ! रुचिवैचित्र्य असावे पण किती ... ? असेच चाळे आफ्रिकेत कोणीतरी माकडाबरोबर करून एक आय व्ही माणसात आणला असेल की नाही ...?

मी मुंबईत राहत असताना एका प्राणी रक्षक संघटनेकडे माझा संबंध होता. कुत्र्याचा बलात्कार (मानवाकडून) हि फारच कॉमन गोष्ट होती. सादर संघटना दिवसाला किमान १५ भटक्या कुत्रांना मदत करत होती आणि आठवड्याला किमान एक तरी कुत्री अशी मिळायची जिची दुखापत पाहून हिच्या सोबत कुकर्म केले गेले आहे हे समजायचे. मग किमान दोघा लोकांना (दोन्ही रखवालदार होते) पकडून पोलिसांच्या तावडीत दिले होते आणि एकाला तर चान्गली मोठी शिक्षा सुद्धा झाली होती. एकटा राजकीय कनेक्शन वापरून सुटला.

Rajesh188's picture

5 Apr 2021 - 10:23 am | Rajesh188

स्त्री सोडून बाकी कोणत्या ही प्राण्यांशी सेक्स ची भावना निर्माण होणे.
स्त्री स्त्री सेक्स ची भावना निर्माण होणे
पुरुष पुरुष सेक्स ची भावना निर्माण होणे.
ही सर्व विकृत मनोवृत्तीची लक्षण आहेत.
त्या मधून वाईट च रिझल्ट येईल.

कुमार१'s picture

5 Apr 2021 - 11:19 am | कुमार१

विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.
एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत. त्याचा हा आढावा.

१. एन ९५ मास्क्स: यांच्या रचनेत आतील हवेचा दाब बाहेरीलपेक्षा कमी होत असतो आणि त्यामुळे ते घातलेल्या व्यक्तीस कष्टप्रद श्‍वसन करावे लागते.
२.काम करतानाचे दृष्टीक्षेत्र कमी होते तसेच श्रवण मर्यादाही येतात. यातून शल्यक्रिया करताना बराच तोटा होऊ शकतो.

३. स्पर्श संवेदना कमी होते.
४. पोषाखामुळे उष्णतावाढ आणि शरीरदाह होऊ शकतो.

५. हलक्या दर्जाच्या उपकरणांमुळे अंगावर घट्टे पडणे वगैरे जखमा देखील होतात.
६.या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संबंधिताच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. काम केल्यानंतर प्रचंड शीण जाणवतो.

७.काही जणांना त्या पोशाखाच्या बंदिस्तपणामुळे गुदमरुन भीती देखील वाटते. काही वेळेस डोके हलके पडणे आणि बोटांना मुंग्या येणे हे देखील आढळले आहे.
८.सहकार्‍यांशी आवश्यक संवादावर विपरीत परिणाम होतो. अन्य सहकाऱ्यांना डॉ ची देहबोली समजणे अवघड होते.

९. हातांच्या अशा कौशल्यपूर्ण कामांवर दुष्परिणाम होतो.
१०. अखेरीस संपूर्ण पोषाख चढवणे आणि उतरवणे हेही खूप कटकटीचे काम असते. कित्येकदा पोशाख काढण्याच्या प्रक्रियेतून देखील अनेक डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना जंतूसंसर्ग झालेला आहे.

कुमार१'s picture

5 Apr 2021 - 11:20 am | कुमार१

वर उल्लेख केलेल्या आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :

१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे , मानेचे व हातांचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्त वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.

चौकटराजा's picture

5 Apr 2021 - 12:53 pm | चौकटराजा

पावसाळ्यात एक संध असा रेनकोट घातला की आपला चेहरा जरी उघडा असेल तरी त्वचेला कमालीचा त्रास होतो !!

कुमार१'s picture

5 Apr 2021 - 9:13 pm | कुमार१

नुकतीच मला महाराष्ट्र कोविड विशेष वैद्यक कृती दलाची रूग्णांसाठीची 23 मार्च 2021 ची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे मिळाली. त्यातील सर्वांना उपयुक्त असा निवडक भाग इथे टप्प्याटप्प्याने देईन.

पहिला तक्ता याप्रमाणे :
ok

लई भारी's picture

6 Apr 2021 - 8:52 pm | लई भारी

माहितीपूर्ण लेखमालिकेत भर. आपण निवडलेला फॉरमॅट चांगला आहे.
आपण म्हणालात त्याप्रमाणे दुर्दैवाने हा विषाणू प्रसार चालूच आहे त्यामुळे यावर अजून चर्चा करावी लागते आहे.

हा nature.com वरचा एक चांगला लेख वाचला होता म्हणजे आधीची गृहीतके कशी बदलत आहेत त्यामुळे सगळीकडेच कसा गोंधळ उडतोय याबद्दल थोडे लिहिले आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी संशयाने बघितल्या जातात त्या पार्श्वभूमीवर गरजेची माहिती.

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 7:43 am | कुमार१

ल भा,

तुम्ही एक चांगला दुवा दिलेला आहेत. धन्यवाद.
बरेच दिवसांनी तुमची भेट झाली.
त्या दुव्यामध्ये बरेच काही चांगले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.
सावकाशीने वाचायला घेतो.

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 12:18 pm | कुमार१

जागतिक आरोग्य दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

कुमार१'s picture

21 Apr 2021 - 9:41 am | कुमार१

कोविडच्या धुमाकूळानंतर एक लक्षात आले आहे की आता दीर्घकाळ या विषाणूसोबत जगावे लागणार आहे. त्यादृष्टीने लसीकरणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्याच्या लसीमधील मर्यादा आणि दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे आता त्या सुधारण्यासाठीचे भावी संशोधनही एकीकडे चालू झाले आहे. या संशोधनातून खालील सुधारणा करण्याचे योजिले आहे :

१. सामान्य वातावरणाच्या तापमानात स्थिर राहतील अशा लसी बनवणे.
२. लसीची मात्रा कमीत कमी राहील आणि शक्यतो एकच डोस पुरेल यादृष्टीने प्रयत्न.

३. इंजेक्शनविरहित लसी : याचे ७ प्रकारचे प्रयोग चालू आहेत. या नाकातून वा तोंडातून घ्याव्या लागतील.
४. करोना विषाणूंच्या सर्व ज्ञात जातीजमाती मिळून एकच सर्वसमावेशक लस करणे.

५. इन्फ़्लुएन्ज़ा आणि करोना या दोन्ही विषाणूंच्या विरोधातली संयुक्त लस निर्मिती

पाचही सुधारणा अगदी गरजेच्या आहेत आणि त्यांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ मिळेल.
हे लवकर होवो ही प्रार्थना!

अनेक अज्ञात जिवाणू विषाणू पृथ्वी वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विविध प्राणी ,पक्षी ह्यांच्या मध्ये अज्ञात विषाणू,जिवाणू असू शकतात ते कधी स्वतः मध्ये बदल करून माणसात संक्रमण करतील.
मला तर सर्वात जास्त भीती वाटते आहे ती ही .
माणूस चंद्र, मंगळ,विविध धूमकेतू,आणि स्पेस मध्ये जात आहे.ह्या अवकाश वारी मधून कधी पृथ्वी ला अगदी अनोळखी असलेला विषाणू ,जिवाणू पृथ्वी वर येवून हाहाकार majvu नये.
फक्त sars ला डोळ्या समोर ठेवून संशोधन करण्या पेक्षा .
विषाणू आणि जिवाणू वर अतिशय डिटेल संशोधन निरंतर चालू असावे. आणि त्याच बरोबर मानवी शरीराची प्रतिकार शक्ती कशी अभेद करता येईल ह्या वर संशोधन निरंतर होत राहिले पाहिजे.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2021 - 1:44 pm | चित्रगुप्त

मानवी आरोग्यासाठी हजारों वर्षांपूर्वीच योग-आयुर्वेद यांची निर्मिती केली गेलेली आहे. त्यांची कास आतातरी धरणे अत्यावश्यक झालेले आहे. (औषधे हा आयुर्वेदाचा फक्त एक लहानसा भाग आहे). महर्षी पतंजलींनी योगसूत्रात संपूर्ण आयुष्य आणि ब्रम्हांडाची उकल करुन ठेवलेली आहे. पतंजली योगसूत्रांबद्दल ओशोंचे विवेचन उत्तम आहे.

कुमार१'s picture

23 Apr 2021 - 4:46 pm | कुमार१

ताजी बातमी :
"ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या 'विराफीन' (Virafin) या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. "

हे औषध त्वचेखाली इंजेक्शनद्वारे एकाच डोसमध्ये घ्यायचे आहे.
Pegylated Interferon alpha-2b असे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

कुमार१'s picture

26 Apr 2021 - 1:47 pm | कुमार१

कोविडच्या राष्ट्रीय पातळीवरील एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो. त्यातून समजलेले उपयुक्त मुद्दे:

१.घरी पल्स ऑक्सीमीटरने मोजणी करताना नेहमी हाताचे मधले बोटच वापरा; तर्जनी नको.
कुठलीही लक्षणे नसताना मापन कमी आले तर लगेच अस्वस्थ होऊ नये. १ मिनिटाच्या अंतराने ३ मापने घ्यावीत व त्याची सरासरी बघावी. काही वेळेस उपकरण बदलूनही मापन वेगळे येते.

२. ज्याना कोविड होऊन गेला आहे त्यांनी लस कधी घ्यावी याचे एकच एक उत्तर नाही. लक्षणे ओसरल्यानंतर एक ते तीन महिने या मुदतीत कधीही घेतलेली चालेल ( पहिला डोस असो अथवा दुसरा).
३. आजाराच्या सौम्य अवस्थेत अँटिबायोटिक्स अजिबात घेऊ नयेत; त्यांची गरज नाही.

४. रेमडेसिविर हे फक्त रुग्णालयात दाखल असलेल्या व ऑक्सिजन द्याव्या लागणाऱ्या रूग्णांसाठीच वापरावे. प्रत्यक्ष आजाराचे दहा दिवस उलटून गेल्यावर त्याचा उपयोग होत नाही.
५. लक्षणे असून rtpcr -ve आल्यास पुन्हा करावी. सलग दोनदा -ve आल्यासच डॉ HRCT चा निर्णय घेतील. रुग्णांनी स्वतःहून HRCTचा आग्रह करू नये.

६. जे रुग्ण सौम्य आजाराचे असून घरीच आहेत त्यांना स्वतःहून पोटावर झोपून कुठलाही फायदा होत नाही. पोटावर काही काळ झोपविण्याचा उपाय हा फक्त रुग्णालयात दाखल व ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांसाठीच आहे.

तुषार काळभोर's picture

26 Apr 2021 - 2:38 pm | तुषार काळभोर

अधिकृत डॉक्टरांच्या अधिकृत कार्यशाळेतील हे अधिकृत मुद्दे व्हायरल करणे जास्त उपयुक्त आहे.

कुमार१'s picture

27 Apr 2021 - 11:36 am | कुमार१

हात तुटलेला रुग्ण >> शस्त्रक्रिया >> रुग्णाला कोविडबाधा >> यशस्वी उपचार.

जे जे हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर चमूचे हार्दिक अभिनंदन !

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 12:48 pm | बापूसाहेब

सुखद बातमी. डॉक्टरांचे कौतुक करावे तितके थोडे..

कुमार१'s picture

28 Apr 2021 - 8:06 am | कुमार१

ही पहा परदेशातील बनावट औषधविक्री :

एका अमेरिकी कुटुंबाने कोविडवर रामबाण उपाय म्हणून "Miracle Mineral Solution," असले एक बनावट औषध गेले वर्षभर कित्येकांना विकले व लाखोंचा धंदा केला.
वास्तविक हे पचनसंस्थेला त्रासदायकच प्रकरण होते. अखेरीस या कुटुंबाला अटक झालेली असून आता त्यांच्यावर खटला चालेल.

कठीण आहे - विकणारे आणि विकत घेणारे पण !

(U.S. District Court, Southern District of Florida: "Case 21-20242-CR-ALTONAGA/TORRES.")

आग्या१९९०'s picture

28 Apr 2021 - 8:23 am | आग्या१९९०

आपली जनता थोडक्यात बचावली अशा बोगस औषधापासून. WHO ने मान्यता दिली असा दावा केला होता ,वेळीच WHO ने खुलासा केला ते बरे झाले.

कुमार१'s picture

30 Apr 2021 - 10:46 am | कुमार१

कोविडोत्तर बुरशीजन्य आजार

सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.

या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 11:30 am | रंगीला रतन

माझे दोन नातेवाईक पहील्या लाटेत कोवीडग्रस्त झाले होते. त्यात एक स्त्री व एक पुरूष असुन दोघांचे वय ३० च्या आत आहे. आता त्याना आजारातुन बरे होउन वर्ष झाले असेल पण दोघांना जॅाइंट पेनचा खुप त्रास होतोय. कोवीडोत्तर काही जणांना असा त्रास होतो का? आपल्याही माहीतीत अशी उदाहरणे आहेत का?

कुमार१'s picture

30 Apr 2021 - 11:51 am | कुमार१

रंगीला

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
असे रुग्ण प्रत्यक्ष माझ्या पाहण्यात नाहीत. परंतु कोविडचे दीर्घकालीन परिणाम शरीरातील सात महत्त्वाच्या अवयवांवर / यंत्रणांवर होतात.
त्यानुसार काही रुग्णांच्या बाबतीत सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 12:06 pm | रंगीला रतन

काही रुग्णांच्या बाबतीत सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात
बापरे!

गॉडजिला's picture

30 Apr 2021 - 7:58 pm | गॉडजिला

परंतु कोविडचे दीर्घकालीन परिणाम शरीरातील सात महत्त्वाच्या अवयवांवर / यंत्रणांवर होतात.
नको नको. आता तर स्वप्नातही घराबाहेर पडायचे धाडस करणार नाही. चटकन लस घ्यावी आणी ठेवीले अनंते तैसेची राहावे...

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 8:22 pm | रंगीला रतन

असेच म्हणतो. फक्त एक बदल- मला लस पण नको!

कुमार१'s picture

3 May 2021 - 6:07 pm | कुमार१

आपल्यातील काही जणांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना मध्यम अथवा तीव्र आजारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागलेले आहे. अशा रुग्णांच्या गरजेनुसार विविध प्रयोगशाळा रक्ततपासण्याही केल्या जातात. एव्हाना मुख्य निदान चाचणी (rt-pcr) बद्दल सर्वांना पुरेशी माहिती आहेच. त्या व्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या पूरक चाचण्यांचे महत्त्व दाखविणारा तक्ता :
ok