आज काय घडले... पौष व. १४ सुभाष 'चंद्रा'स ग्रहण?

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 11:34 am

shubhashchandra

शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला.

१६ जानेवारीपासून मौन धारण करून ते आपल्या खोलीत चिंतनात मग्न झालेले होते. व्याघ्राजिनावर बसून 'गीता', 'चंडी' व इतर धर्मग्रंथांचे पारायण करीत ते संन्यस्त वृत्तीने वागत होते. दि. २६ ला सकाळी त्यांच्या खोलीशी गेलेल्या लोकांना आढळून आले की, आदल्या दिवशी ठेवलेली फळे, दूध, पाणी ही जशीच्या तशीच आहेत. काहीच हालचाल दिसेना, म्हणून लोक आंत गेले. तो काय ? सुभाषचंद्र बिछान्यावर नाहीत! सर्व नातेवाईक घाबरून गेले. बेलूर, दक्षिणेश्वर, पांदेचरी येथे तारा करण्यांत आल्या, पण सुभाषबाबूंचा शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर खटला सुरू होणार होता. सरकारने तीन तास घराची झडती घेतली, अटक करण्याचे वॉरंट काढले, पण कोणालाही यश आले नाही. सारी भारतीय जनता चिंतामग्न झाली, सुभाषचंद्र कोठे गेले ? ध्येयवादित्वाचा, त्यागाचा, कर्तृत्वाचा, संघटनेचा, चतुरतेचा, नेतृत्वाचा आदर्श कोठं हरपला ? सदैव आपल्या प्रकाशाने तळपत असणाऱ्या या चंद्राला ग्रहण कां लागलें ? त्यांच्याविषयी सर्वांना फार प्रेम वाटे, त्यामुळे जनतेच्या मनात अनेक शंका-आशंकांची वादळे निर्माण झाली. विद्याभ्यास चालू असतांना सुभाष असेच अदृश्य झाले होते. गंगा-यमुनाकाठची पवित्र क्षेत्रे व हिमालयाची गिरिकंदरें गुरूच्या शोधार्थ हिंडूनहि मनःशांति लाभली नाही म्हणून हे परत आले होते. त्यांची वृत्ति मूलतःच तात्त्विक स्वरूपाची, गूढचिंतनात्मक आणि रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या शिकवणीत मुरलेली असल्यामुळे ते पुनः एकदा अदृश्य होऊन अध्यात्मसाधनांत गुंग झाले की काय असा तर्क करण्यांत आला.

सुभाषबाबूंनी या वेळी केलेले धाडस जगप्रसिद्ध आहे. मुक्या व बहिऱ्या अशा झियाउद्दिन पठाणाच्या वेशानें काबूलला जाणे, बर्लिनला राजकारण करणे, सिंगापूरला आझाद हिंद सेना स्थापन करणे या घटना जगाला थक्क करून सोडणाऱ्या होत्या.
२६ जानेवारी १९४१

इतिहास