आज काय घडले...
पौष व. ७
स्वामी विवेकानंद यांचा जन्म!
शके १७८४ च्या पौष व. ७ रोजी भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर
प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला.
विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान् होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती. तिचा चेहरा भव्य व उदात्त असून त्यावर दिव्य शक्तीचे तेज ओसंडत असे. रामायण-महाभारतातील कित्येक भाग तिने मुखोद्गत केले होते. अशा या उच्च मातापितरांच्या पोटी विवेकानंदांचा जन्म झाला. नामकरणाच्या दिवशी अनेकांनी 'दुर्गादास' हे नांव सुचविले; परंतु भुवनेश्वरी देवीच्या पसंतीने 'वीरेश्वर' हे नांव ठेवण्यांत आले. पुढे नरेंद्र हेच नांव रूढ झाले. लहानपणी यांचा स्वभाव हट्टी व खोडकर असला तरी साधुसंतांविषयी प्रेम यांना होतेच. अलौकिक बुद्धिमत्ता, खेळाडूपणा, तेजस्विता या गुणांच्या साह्याने नरेंद्रांचे शिक्षण झपाट्याने होऊ लागले. यांचा आवाज मोठा मधुर होता. बी. ए. ची परीक्षा दुस-या दिवशी असतांना यांच्या हृदयांत अध्यात्मज्ञानाचा दिव्य आनंद निर्माण झाला. त्यांची वृत्ति अध्यात्मचिंतनांत गुंगू लागली. त्यांना योग्य असे रामकृष्ण परमहंस हे गुरु भेटले.... रामकृष्णांचा सहवास, हिंदुस्थानांतील भ्रमण, हिमालय व तिबेट येथील वास्तव्य, सन १८९३ मधील जपानमार्गे अमेरिकेचा प्रवास, धर्मपरिषदेंतील असामान्य कर्तृत्व, 'राजयोग' या ग्रंथाचे लेखन, इंग्लंडमधील पं. मॅक्समुल्लर व भगिनी निवेदिता यांची मैत्री, मायदेशी परत आल्यावर रामकृष्ण मठाची स्थापना, सन १८९९ मध्ये परत अमेरिकेस जाण्याची तयारी, वाटेत मधुमेहाचा विकार झाला म्हणून सिलोनमधूनच परत हिंदुस्थानांत आगमन आणि सन १९०२ मध्ये समाधिअवस्था असा यांचा संक्षिप्त जीवितक्रम आहे.
१२ जानेवारी १८६३