आज काय घडले....
पौष शु. १०
चिमाजीअप्पांचे निधन !
शके १६६२ च्या पौष शु. १० रोजी बाळाजी विश्वनाथांचे दुसरे पराक्रमी चिरंजीव चिमाजीअप्पा यांचे निधन झाले.
वडिलांच्याबरोबर हे दिल्लीला गेले होते. थोरल्या बाजीरावांनी मोंगलाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले, तेव्हा हे माळवा प्रांतांत मुलुखगिरीवर होते. चिमाजीअप्पांचे नाव वसईच्या युद्धामुळे अमर झाले आहे. सन १७३१ पासूनच पोर्तुगीझ व मराठे यांचा बेबनाव वाढीस लागला. शेवटी सन १७३८-३९ साली मराठयांनी वसईचा संग्राम चांगलाच गाजविला. वसईवर विजय मिळत नाहींसें पाहून मोठ्या वीरश्रीने चिमाजी बोलले, “वसई ताब्यांत येत नाही. माझा हेतु तर ती घ्यावी असा आहे. तरी तोफ डागून माझें मेलेलें शरीर तरी वसईच्या किल्ल्यांत पडेल असे करा.” तेव्हा सर्वांना वीरश्री चढली आणि निकराचा लढा झाल्यावर वसईवर मराठयांचे निशाण लागले. “या लढाईमुळे यांचे नांव अजरामर झाले आहे. मराठ्यांच्या इतिहासांत महत्त्वाच्या व अत्यंत जुटीने केलेल्या लढायांपैकी ही एक आहे. यांत मराठ्यांना फिरंग्याचा तीनशे चाळीस गांवें असलेला पाऊणशे मैल लांबीचा पट्टा, वीस किले व पंचवीस लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले."
त्यानंतर पुढल्या वर्षी यांनी दीव, दमण यांमधील रेवदंडा नांवाचे ठिकाण काबीज केले. या वेळी त्यांची प्रकृति फारच ढासळली होती. स्वारीतून परत आल्यावर पौष शु. १० रोजी यांचा अंत झाला. यांची पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्याबरोबर सती गेली. तिचे वृंदावन पुणे येथे ओंकारेश्वराच्या दारासमोर
आहे.
चिमाजीअप्पा हे शूर, धोरणी, मनमिळाऊ व नीतिमान असे होते. चिमाजीअप्पांची इतरहि पराक्रमी कृत्ये प्रसिद्ध आहेत. शाहूच्या आज्ञेवरून सिद्दीसातास यांनीच ठार मारिले. वसईच्या किल्ल्यांत सापडलेल्या फिरंग्यांच्या मुलीस यांनी सन्मानाने परत पाठविले ही आख्यायिका यांच्या नीतिमत्तेची साक्ष देते. बाजीरावाने उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल हेच लावीत.
-१७ डिसेंबर १७४०/