आज काय घडले... पौष शु.९ पानपतच्या संग्रामानंतरची निरवानिरव !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
25 Jan 2021 - 4:19 pm

panipat
शके १६८२ च्या पौष शु. ९ या दिवशी आदल्याच दिवशी पानिपतच्या भयंकर संहारांत पतन पावलेले यशवंतराव पवार, विश्वासराव, भाऊसाहेब, तुकोजी शिंदे, संताजी वाघ, आदि लोकांच्या शवांना अग्निसंस्कार देण्यात आले.
पौष शु.८ ला भाऊसाहेब पडल्याची वार्ता रणांगणावर पसरतांच अनेकांनी पळ काढण्यास सुरुवात केल्यावर सर्वत्र पळापळ सुरू झाली; आणि जेत्यांनी एक प्रकारच्या आवेशाने पळणाऱ्यांची कत्तल केली. शेवटी दमून गेल्यानंतर कत्तल थांबली. दुसऱ्या दिवशी म्हणजे पौष शु. ९ ला १५ तारखेस मराठ्यांच्या छावणीत जे जिवंत सांपडले त्यांची पुन्हा अत्यंत क्रूरपणे कत्तल झाली. या दिवशी मोठमोठ्या मराठे सरदारांच्या प्रेतांचा शोध लावावा म्हणून शेषधर पंडित, गणेश पंडित इ. सदाशिवरावभाऊंच्या माहितीतील इसम बरोबर घेऊन स्वतः सुजाउद्दौला घोड्यावर बसून रणभूमीवर फिरत होता. एका ढिगाऱ्याखाली प्रेताच्या अंगावर तीनचार रत्ने चमकली म्हणून ते वर काढले. पायावरील व पाठीवरील जखमांचे वण पाहून तें सदाशिवरावांचे प्रेत होय असे समजून मंडळींनी त्यास अग्नि दिला. विश्वासरावांचे प्रेत पाहण्यास दुराणी लष्करांतून आबालवृद्ध जमले होते. पेशव्यांच्या घरांत विश्वासरावा एवढा सुंदर पुरुष झाला नव्हता. त्याचे शव पाहून अहमदशहा अब्दालीहि क्षणभर हळहळला! सुजाउद्दौलाचा सरदार उमरावगीर गोसावी याने तुकोजी शिंदे, संताजी वाघ, यशवंतराव पवार व विश्वासराव यांची प्रेते तीन लक्ष रुपयांना सोडवून आणून ब्राह्मणांकरवी त्यांना अग्नि दिला. भरतपूरच्या जाटानेंहि बहुत पैसा खर्च करून लोकांचे प्राण वाचविले. या पानिपतच्या युद्धांत मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. चांदी, सोने, हिरे-माणके, पांचशे हत्ती, पन्नास हजार घोडे, एक हजार उंट इत्यादि पुष्कळच संपत्ति मराठ्यांच्या छावणीतून अब्दालीस मिळाली.
-१५ जानेवारी १७६१

इतिहास