शके १७२४ च्या पौष शु. ७ रोजी प्रसिद्ध असा वसईचा तह होऊन त्या दिवशी बाजीराव इंग्रजांना सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजीची इंग्रजांच्या मध्यस्थीने अनेक शकले झाली.
यशवंतराव होळकराने पुण्यावर चाल केली तेव्हां दुसरा बाजीराव रायगड, महाड या ठिकाणी निघून गेला. त्या वेळी होळकरांनी विनंति केली -
“धनी गादिचे आपण, आम्ही चाकर पायाचे असतां भिउनी आम्हां, करित ; हमामा सैरावैरा का पळतां ?
धनीपणाने येऊन माने, हिशोब घेणे दौलतिचा, दर्शन द्यावे, धन्य करावे, हीच एक की मनिं इच्छा"
परंतु 'सती अहल्येच्या लेकराने' केलेली ही विनंति बाजीरावास मान्य झाली नाही आणि मनांत फार घाबरल्यामुळे तो इंग्रजांच्या जहाजांत बसून ८ डिसेंबरला वसई येथे गेला. ज्या वसईचे ठाणे पूर्वी चिमाजीअप्पाने मोठा पराक्रम करून घेतले होते.
ह्याच स्थानी मोल देउनी स्वातंत्र्याच्या नरडीचे
विकत घेतले नामर्दाने रक्षण अपुल्या देहाचे!"
त्या वेळी इकडे पुण्यास अमृतरावांच्या नावाने कारभार सुरू झाला. होळकरांशी तह करण्यापेक्षा हाती आलेल्या बाजीरावाशी तह करणे अधिक इष्ट म्हणून कर्नल क्लोज हा वसईस गेला आणि त्याच्या तंत्राने बाजीराव व इंग्रज यांमध्ये पौष शु. ७ ला वसईचा तह झाला. इंग्रजांचे सैन्य पदरी बाळगावे, त्याच्या खर्चासाठी इंग्रजांना २६ लक्षाचा मुलूख तोडून द्यावा, पेशव्यांनी इतर युरोपियन पदरीं ठेवू नयेत. सुरतेवरील ताबा मराठ्यांनी सोडावा, इत्यादि कलमें या तहांत होती. या तहाने बाजीराव पेशवे इंग्रजांच्या हातांतील बाहुले बनले. शिंदे, होळकर, भोसले, यांना परम दुःख झाले :-“धन्याचे धनीपण गमावल्याचे धन्याला दुःख झाले नाही, इतके चाकरांचें चाकरपण गमावल्याने चाकरास झाले!"
-३१ डिसेंबर १८०२