परतीचे प्रवास

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
25 Sep 2020 - 9:15 am

म्हातारी माणसे एकटीच बसून
अश्रू ढाळतात.
कधी सहजच पाणी येते त्यांच्या
डोळ्यातून उगाच.
अचानक विकल होतात ती मागचे
काहीबाहि आठवून.
सैरभैर होतात माना हलवत
चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन...

काय बर होत असेल त्यांना ?
कोण आठवतय आता या वयात ?
कशाने असे बावरले जात असतील ?
कसल्या वेदना पाझरताहेत मनातून?

आता खूप दूर निघून गेलेल्या
माणसांना काही सांगायचे असेल,
का आता जवळ असलेल्यांना
काहीच सांगता येत नसेल?

भोगलेल्या वेदनाचे माप ओतायचय
त्यांना कोणाकोणाच्या पदरात
की दिलेल्या दुखांच्या डागण्या
पुसायच्यात कापऱ्या हातांनि?
खोटे मुखवटे ओरबाडायचेत
उरल्या सुरल्या ताकतीने
का पडलेले चेहेरे पुन्हा एकवार
ठाकठीक करायचेत स्वतःचेच ?

जेव्हा काही हातात होते तेव्हा
केले नाही, याचे वाईट वाटतंय त्यांना
की
आता काहीही करता येत नाही याचे?
वेळेवर आपण बोललो नाही
याची बोच आहे की,
का बोललो उगाच, याची?
अपशब्द का ऐकून घेतले
याची खंत सलतेय की
बोबडे बोल ऐकायला
वेळच नाही काढला याची ?

पिकले फळ गळून पडते झाडावरुन
हे माहीत आहे त्यांना.
पण पक्व होईपर्यंत गळून पडायचीच
वेळ येते हे मान्य होत नाहिये का?
आयुष्यभर मांडत आणलेल्या
ताळेबन्दाचा हिशोब चुकल्याचा हां
भाव,
काही हातचे घ्यायला विसरून
गेल्याची ही चुकचुक,
आणि खाली दिसणाऱ्या मोठया रकमेतिल छळणारी शून्यांची जाणीव...

परतीच्या प्रवासातील
हे नकोसे अटळ सोबती...

कविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 3:24 pm | रंगीला रतन

खुप तरल लिहीलय!