राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल. मा.पंतप्रधान मोदी यांच्या एका मॉर्निंग वॉकचा व्हीडीयो पाहण्याता आला आणि आनंदाला पारावर उरला नाही. इतका मोठा माणूस, इतका व्याप, पण सकाळच्या प्रसन्न वातावरणात, निसर्ग सौंदर्यात त्या वॉकचा काय अवर्णनीय आनंद असेल. बॅग्राऊंडला मस्त संगीत असावं, आजूबाजूला मोर-लांडोर असावेत, त्यांच्यासोबत केलेल्या वॉकचे मजा काही औरच.
भोर भयो, बिन शोर
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूर श्याम सुहाना
मनमोहक, मोर निराला.
सकाळ झालीय, कोणताच आवाज न होता, मनही अगदी मोर झाले आहे. भयो म्हणजे, झालं, होणे. मन विभोर झालं आहे. सावळा कृष्ण सुंदर वाटतो, तसेच मोर हा तितकाच मनमोहक आहे, खरं तर राष्ट्रीय पक्षी मोर आणि त्याचं शरीर-पिसारा फूलवतो ते दृश्य अतिशय सुंदर असे होते. अशा मोरांबरोबर जेव्हा मॉर्निंग वॉक होत असेल तर तेव्हा सर्व समस्या, मनातील विचार दूर होऊन, मनाला प्रसन्नता लाभत असेल. मन उत्साही राहण्यासाठी काही उत्साहवर्धक गोष्टी हव्या असतात. मला मोरोपंताच्या श्लोककेकावलिची आठवण होते. मन गलबलून टाकणारी करुणार्त भावना अत्यंत उत्कटपणे यावे तसा तो आर्त सूर आणि प्रसन्नता त्यात दिसते. व्याकूळता आहेच, श्वास खोल आणि खोलवर जावा तशी ती अनुभूती. आणि हे देवा, तुझ्या उदराने अनेक शरणांगतांचे अपराध पचवले, तसे सर्व सुष्टीचे अपराध पोटात घेऊन एक नवी सकाळ हळुहळु फुलांप्रमाणे उमलत आहे.
रग है, पर राग नही,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूंजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज.
वेदना आहे, दुखणे आहे, पण कोणताच राग नाही. रागाचा अभाव असलेला तो विराग, तोच विश्वास आहे. कोणतीच आसक्ती नाही. आजही घराघरात कृष्ण-बासरीचे गाणं आहे, जगणे मुरली आहे, आणि मरणेही मुरली आहे, असे हे सुंदर भावकाव्य आणि मनोहर संगीत असलेल्या मॉर्निंग वॉकचा काय आनंद असेल. केवळ सुंदर. माणूस आज सुखासाठी धपडपडतांना दिसतो. विवंचना, अडचणी, दु:ख, अशा गोष्टीतून असा एक वेगळा प्रसंग सुखद आनंद देऊन जातो.
टीप : रचना मा.मोदींच्या ट्वीटरवरुन घेतली आहे. दिवा बत्ती. थाळी-टाळी- जीएस्टी, लॉकडाऊन अनलॉक टेष्ट्स वगैरे विषयांकडे धाग्याला घेऊन जाऊ नये, अशी अपेक्षा.
प्रतिक्रिया
7 Sep 2020 - 1:42 pm | ज्ञानोबाचे पैजार
पण मोदीजी कितीही आदरणिय असले तरी त्यांची ही कविता मात्र इतकी काही भावली नाही. (जसे आमच्या संक्षी सरांचे विडंबन नाही आवडले तसेच काहीसे ही कविता वाचल्यावर झाले होते) त्यामुळे त्याचे रसग्रहण तरी कितीसे भावणार?
कविता लिहाव्या तर त्या अटलजींनी त्यांच्या प्रामाणिक, शुध्द, निरागस आणि नितळ कविता आजही तितक्याच आवडतात.
पैजारबुवा,
7 Sep 2020 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'ऐकूनि विश्व सुखावे ज्या केकीचा अपूर्व तो टाहो,
त्याला आयुष्याचा इशकृपेने कधी ना तोटा हो.
तातडीने प्रतिसाद दिल्यामुळे माझा लेखनाचा उत्साह वाढला,
मन:पूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
7 Sep 2020 - 1:58 pm | प्रचेतस
एकदा मी आणि एक मिपाकर परममित्र असे दोघेच बेडसे लेणी भटकायला गेलो होतो, लेणी पाहून झाल्यावर पवनेच्या बॅकवॉटरला फेरी मारु लागलो. एके ठिकाणी चहा घ्यायला थांबलो, तिथं पाळलेले मोर आणि काही बदके होती. मोर पाळीव असे समजून आमचे मित्र मोराच्या जवळ गेले आणि त्याला काही खुणा करुन दाखवू लागले, मोरही प्रतिसाद देऊ लागला. आमच्या मित्रांचा धीर चेपल्यामुळे ते मोराच्या अधिकच जवळ गेले तितक्यात मोराने क्वॅक्क्क.....असा मोठा आवाज करुन मित्रांच्या अंगावर उडू लागला. मित्रांची पळताभुई थोडी झाली. त्यांचा तो भेदरलेला चेहरा अजूनही स्मरणात आहे.
7 Sep 2020 - 2:00 pm | प्रचेतस
ह्या काव्यपंक्ती पण खरेच आवडल्या. लयबद्ध आहेत.
रोजच्या धकाधकीचा,करोनाच्या टेन्शनच्या, आर्थिक अडचणींचा विसर पाडण्याचे दोन क्षण ह्या व्हिडियोने नक्कीच दिलेत, आपल्याकडेही एखादा पाळीव मोर असावा असं वाटू लागलंय.
7 Sep 2020 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही वरील चारच ओळीच आवडल्या आणि व्हीडीयोतला तो पिसारा फुलवलेला मोर.
भोर भये पनघट पे, मोहे नटखट शाम सताये.
मोरी चुनरी ओ लीपटी जाये. ते एक आठवून गेले.
घरा-दारात पाळीव प्राणी असले पाहिजे. पोपट, मोर, पाळीव कुत्री, यांना पाहिलं की आपण आपले दु;ख विसरुन जातो. मलाही आपल्याप्रमाणे आपल्या अंगणात मोर यावे असे वाटते. टेंशन् पासून दूर राहण्यासाठी असे काही छंद असले पाहिजेत. बाकी प्रतिसादाबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
7 Sep 2020 - 11:29 pm | प्रचेतस
मोर पाळण्याबाबत काही वन्य जीव सुरक्षा कायद्याची अडचण वगैरे?
8 Sep 2020 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत मोर पाळता येत नाही. कायद्यानुसार तीन वर्षाची शिक्षा आहे. मात्र राजकीय वजन असेल भरपूर पैसे असतील तर अशावेळी कायद्याकडे दुर्लक्ष होते. उदा. लालूप्रसाद यादवांकडे म्हणे दहा पाळलेले मोर होते, त्यावर अनेकदा टीका झाली आहे. मा.पंतप्रधान यांच्या परिसरात असलेले हे पाळीव मोर आहेत की कसे काही माहिती नाही. परंतु जबलपूरच्या नगरध्यांक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मलाही मोर पाळायची परवानगी द्यावी असे म्हटल्याचे वाचनात आले. (संदर्भ) राजकारण जाऊ द्या बाजूला.
पण कायद्याच्या अडचणीमुळे मोर पाळू नका. शेजारी-पाजारी काड्या करुन तुम्हाला अडचणीत आणतील. पण मोर पक्षी आहे खूप सुंदर.
मोरोपंतांचे एक स्नेही होते रामजोशी सोलापूरकर म्हणून, मोरोपंत आपलं लेखन यांच्याकडे पाठवत असायचे. रामजोशी तमाशा करीत असायचे, पण त्याकाळी नटाचे तोंड पाहणे शास्त्रविरुद्ध म्हणून पंत जात नसत पण कवने ऐकायला म्हणून पंत गेले असता ती कवने ऐकूण पंत खुश झाले आणि म्हणाले, या पेक्षा किर्तन करीत राहा. पण, किर्तनाचं मटेरियल नै ना आमच्याकडे म्हटल्यावर पंत म्हणाले, तुमच्या किर्तनासाठीच आता तशी काव्यरचना करीत आहे. पुढे रामजोशीच्या किर्तनात एक प्रसिद्ध आर्या आली ती अशी.
जैसी जनके दिधली सच्चीद्धन राम जो सिता त्याला,
तैशी मयुरे दिधली आर्या ही रामजोसि तात्याला.
काय मस्त लोक होते त्याकाळी. भारी. असो. अशा गोष्टी आठवतात आणि आठवणी अशा कुठल्या कुठे जातात. एकदा तुम्ही आणि तुमचे प्रतिसाद समोर आल्यावर असे होते. असो.
-दिलीप बिरुटे
8 Sep 2020 - 12:19 pm | प्रचेतस
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तसेही फ्लॅट सिस्टममुळे मोर पाळणे शक्य होणार नै. हां, ग्यालरीत कबुतरे येतात, एखादे पाळीन म्हणतो.
मोरोपंतांचा उल्लेख वाचून त्यांच्याच केकावलीतील एका आर्येची आठवण झाली.
दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे;
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे; ।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे ॥
7 Sep 2020 - 2:06 pm | Bhakti
मलातर मोर खुप खुप आवडतात.. मस्त विषय
7 Sep 2020 - 2:14 pm | कंजूस
झक्कास. एकदम सर गुजरातला कसे काय गेले असा विचार आला. मग एकेक पीस बाजूला झालं.
आता तुमचं नावच राजाचं - दिलीप. मग तुमच्याही अंगणात परसात वाटिकेत मोर असतील.
--------
दुसरा वल्लीचा मोरही छान आहे.
---------
पर्यटनाला सकाळी बस/गाडीतून भारद्वाज किंवा मोर दिसले की तो दिवस चांगला जातो ही आमची अंधश्रद्धा खोटी ठरली नाहीये.
7 Sep 2020 - 2:37 pm | शा वि कु
कविता खरच छान आहे.
7 Sep 2020 - 2:47 pm | शा वि कु
आमच्या घराभोवती खूप दाट झाडी आहे. चिमण्या, कबुतर, मैना आणि लालबुड्या बुलबुल इतके असतात की त्यांच्या दंग्याने दुपारी झोपणे अशक्य होऊन जाते.
7 Sep 2020 - 3:31 pm | टर्मीनेटर
मनोगत आवडले हो सर... फक्त ते
“खरं तर राष्ट्रीय प्राणी मोर” ऐवजी “ खरं तर राष्ट्रीय पक्षी मोर” असा बदल सुचवतो.
बाकी काव्य, पद्य, कविता वगैरे मला समजत नसल्याने माझा पास...
7 Sep 2020 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज मन मोरमय झालेलं असल्यामुळे सर्व भेद राहून गेले होते. मनासमोर सारखा पिसारा फुलवलेला मोरच येतोय. 'नाच रे मोरा माझीया बनात' आज असं भांबावलेपण आलंय. माझं मीपण, विसरुन जाणे ही अवस्था, पण तुमच्या ज्या काही अवस्था आहेत त्याही विसरुण जाणे, अशी ती तल्लीनता. फार कमी वेळा येते.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
7 Sep 2020 - 4:00 pm | विनिता००२
चा छान लिहीलेय :)
माझ्या घरामागच्या शेतात काही मोर आहेत, रोज पहाटे त्यांचा तो गोड 'मियाऊ' केका फार सुखद वाटतो.
7 Sep 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्तच !
लेख आणि कवितेच्या ओळी, दोन्ही आवडले !
लेखातील सुंदर शब्दकळा वेगळ्याच वातावरणात घेऊन गेली !
मन प्रसन्न झाले !
7 Sep 2020 - 6:14 pm | कुमार१
आवडल्या. लयबद्ध आहेत.
छान.
7 Sep 2020 - 7:27 pm | गणेशा
छान लिहिले आहे..
आवडले.
7 Sep 2020 - 7:36 pm | शेखरमोघे
मनाच्या अवस्थेचे छान वर्णन.
अनेक इतरत्र पाहिलेले मोर आणि त्यान्ची वर्णने आठवली.
गीरच्या जन्गलातल्या मोराना कदाचित अनेक लोक आजूबाजूला असण्याची सवय असावी. निर्धास्त फिरत असतात आणि फोटोकरता मुद्दाम थाम्बल्यासारखे वाटतात.
मनाच्या "मोर" अवस्थेचे आणखी एक सुरेल वर्णन : बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला https://www.youtube.com/watch?v=43Ax-b2P8cI
7 Sep 2020 - 9:50 pm | गणपा
छ्या काय मज्जा नाय लेखात. सगळं कसं गुडी गुडी.
बाकी तो फोटो पाहून आमच्या एका जवळच्या मित्राला रोम जळत असताना फिडल वाजवणा निरो आठवला होता.
7 Sep 2020 - 10:03 pm | गवि
ओला पाचोळा पेटत नव्हता. ओतलेत घासलेट?? हे राम..
8 Sep 2020 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या पाककृतीचा फॅन असल्यामुळे आपली ही प्रतिक्रिया महत्वाची आणि मोलाची आहे.
वेळावेळ काढून 'फिडेल' सॉरी 'मोर' वाजवल्याबद्दल आभारी आहे. :)
-दिलीप बिरुटे
8 Sep 2020 - 1:47 pm | दुर्गविहारी
भारी लिवलय सर! मा.मोदींवर तुम्ही धागा काढलेला बघून अनेकजणांचे हात शिवशिवत होते.पण बहुधा धाग्याचे कंटेंट वाचून बर्याच जणांनी पाठ फिरवलेली दिसते. ;-)
असो.
9 Sep 2020 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किंचित अवघडल्यासारखं नक्की झालं असेल. पण 'मोरप्रेम' आणि त्या 'दाना-पाण्यामुळे' करुणाभाव निर्माण झाला असावा.
थोरा मोठ्यांना निसर्गाशी एकरुप व्हायला नेहमीच आवडते, निसर्ग तुमच्यात उर्जा भरतो, जगण्याची एक नवी दृष्टी देतो.
साक्षात, मोरोपंत म्हणतात 'दयामृतघना, अहो हरी वळा मयुराकडे'
सर्व भवतालच्या वास्तवाचा विसर पडला नाही, तर नवल कसले.
-दिलीप बिरुटे
8 Sep 2020 - 1:50 pm | Gk
पुलंचा मित्र त्यांना मोराची चित्रे , फोटो दाखवत होता
फार वेळ झाल्यावर ते बोलले नो मोर
8 Sep 2020 - 7:07 pm | सुबोध खरे
रागाचा अभाव असलेला तो विराग,
विरागचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे संसारातून मुक्त झालेला वैराग्य आलेला किंवा विरक्त असा आहे.
याचा अपभ्रंश म्हणून हिंदीत बैरागी म्हणतात
उदा. विरागी कि म्हणू भोगी ? हि ओळ मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गाण्यात येते
तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.
11 Sep 2020 - 4:41 am | कोहंसोहं१०
माझ्या माहितीप्रमाणे मूळ शब्द (संस्कृतमध्ये) राग आहे ज्याचा अर्थ आसक्ती. त्याला सुरुवातीला 'वै' आणि शेवटी 'य' प्रत्यय लावून होणार शब्द विरुद्ध अर्थ दर्शवतो. उदा. गुण आणि वैगुण्य, चित्त आणि वैचित्य (चित्त थाऱ्यावर नसणे). त्याचप्रमाणे राग आणि वैराग्य (आसक्तीपासून मुक्ती).
हे वैराग्यपण असणारा मनुष्य वीतरागी (संस्कृत शब्द) म्हणूनही ओळखला जातो. त्याचा अपभ्रंश होत होत विरागी आणि बैरागी आले.
बाकी विचित्र हा शब्द सुद्धा संस्कृतमधील वैचित्य या शब्दाचा अपभ्रंश आहे
8 Sep 2020 - 7:11 pm | सुबोध खरे
राष्ट्रपती भवनात अनेक मोर होते/आहेत.
कारण डॉ अब्दुल कलामांचे आवडते मोर होते आणि त्यांच्या प्राणीप्रेमाबद्दल अनेक कहाण्या ऐकल्या होत्या.
9 Sep 2020 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व वाचक, मिपाकर, प्रतिसादकर्ते यांचे मनःपूर्वक आभार.
आपले प्रतिसाद आणि प्रोत्साहन नेहमीच लिहायला उभारी देतात.
तहेदिलसे शुक्रिया...!
-दिलीप बिरुटे
9 Sep 2020 - 10:49 am | नीलस्वप्निल
आपले कवि एकच .... माननीय रामदासजी
9 Sep 2020 - 11:07 am | Gk
पुच्छ पसरूनि मयूर विराजे
मज पाहता भासती यादवराजे
9 Sep 2020 - 11:07 am | Gk
पुच्छ पसरूनि मयूर विराजे
मज पाहता भासती यादवराजे