स्वयंपाकघरात जेवायला बसलं की मागच्या दारातुन शाळेच्या छतावरुन लांबवरचा हिरवागार डोंगर दिसायचा. हो त्याचं पहिलं दर्शन हिरवंगारच होतं.
जुन महिना ,नविन शाळा ,लोणावळ्यातला पावसाळा आणी धुक्यात वेढलेला तो हिरवागार डोंगर एखाद्या गुढ ,अगम्य विचारवंतासारखा भासायचा.एवढं काही समजत नव्हतं पण त्या वयात वाचलेल्या परिकथांमधला एखादा राक्षस ,जादुगार किंवा चेटकीणीचं वास्तव्य असावं त्या डोंगरामागे असं वाटायचं.
मधुनच उन्हाची एखादी तिरीप त्यावर पडली की पाचुच्या त्रिकोणी खड्यासारखा चमकायचा. संह्याद्रीने लोणावळा परिसराला जी निसर्गाची देणगी दिली आहे त्याचा तो एक मुर्त दाखला आहे.एकंदरीत चिकीत्सक वृत्ती आणी अनंत किड्यांच्या डोक्यातल्या वारुळा बाबत कल्पना असल्याने काकाने आधीच तो भुताचा डोंगर आहे तीकडे जायचं नाही अशी ताकीत दिलेली.
साधारण गणेशोत्सवानंतर पावसाळा ओसरला आणी त्या डोंगराचं भयकंपीत करणारं गुढ नाहीसं झालं.निसर्गाची एक गंमत असते पावसाळ्यात गुढ भासणारा तो नंतर थंडीत ट्रेकर्सना सवंगडी वाटतो आणी उन्हाळ्यात अनुभवी पण रुक्ष आजोबा वाटतो.
आता उन्हात तो स्पष्ट दिसु लागला.अधुन मधुन काही गुरं आणी गुराखी यांची हालचाल दिसु लागली.आणी भुत त्यांना खाइल वगैरे चिंतेने मनात येणाऱ्या शंकांना कंटाळुन एक दिवस शनिवार असावा बहुतेक.काकाने संध्याकाळी मला त्या डोंगरावर न्यायचा प्लॕन केला.संपुर्ण तीन चार किलोमिटरचा रस्ताभर माझ्या अनंत शंका कुशंकांना न कटाळता उत्तरं देत तो मला डोंगराच्या पायथ्याशी घेउन आला.तीथल्याच एका झोपडीवजा घरात आवाज देत त्याने त्याच्या मित्राला हाक दिली.आणी त्याच्या मित्रापाठोपाठ एक माझ्याच वर्गातला मुलगा बाहेर आला.
अर्जुन घरदाळे माझा वर्गमित्र आणी ट्रेकींग मधला माझा पहिला आणी शेवटचा गुरु.या मित्राबरोबर पुढची चार वर्षे मी अनंत डोंगर चढाया केल्या.लोहगड, विसापुर,नागफणी ,राजमाची.संघाचे कँप अर्जुनची संगत.गुढगे ,ढोपरं फोडुन घेत अनवाणी पायांनी केलेल्या डोंगसफरींची कहाणी .मी मावळ अक्षरशः जगलो त्या काळात.
प्रतिक्रिया
13 Aug 2020 - 4:17 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर चित्र !
निसर्गाची एक गंमत असते पावसाळ्यात गुढ भासणारा तो नंतर थंडीत ट्रेकर्सना सवंगडी वाटतो आणी उन्हाळ्यात अनुभवी पण रुक्ष आजोबा वाटतो.
हे भारीच !
13 Aug 2020 - 9:39 pm | गणेशा
छान लिहिले आहे...
लिखाणातून तिकोना आणि तुंग हा परिसर डोळ्यासमोर येत राहिला..
13 Aug 2020 - 10:44 pm | रातराणी
छान लिहिताय.