नारायण... लॉकडाऊन इफेक्ट!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
13 Aug 2020 - 9:51 am

दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली.
त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन,

"काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली! सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला.

"बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?"

"नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले

आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही. त्याने सॅनिटायझरची बाटली दिली गण्याच्या हातात अन गण्याला बजावून सांगितलं

"हे बघ गण्या, दोन थेंबाच्यावर कोणाच्याच हातावर टाकू नको सांगून ठेवतो! संध्याकाळपर्यंत हीच बाटली पुरवायची आहे लक्षात ठेव"

"अहो पण चार बाटल्या आणल्यात ना नारायणभाऊ?

"म्हणून काय लगेच संपवायच्या का? किती महाग झालंय सॅनिटायझर माहितीये का? जेवढं उरेल तेवढं संध्याकाळी वापस करायला येईल असं बजावून आलोय त्या मेडिकलवाल्याला मी! तो मला सांगत होता वापस नाही घेता येत म्हणून. मी म्हटलं, त्याला काय एक्स्पायरी असते होय रे? की सोडा असतो त्याच्यात झाकण उघडलं की उडून जायला. मला सांगतोय! तू जपून वापर"

"बरं"

"आणि हे बघ, शिंच्या अत्तर समजून लोकांच्या अंगावर सॅनिटायझर शिंपडू नको लक्षात ठेव."

गण्याला उगाचच दम देऊन नारायण पुढे निघाला.

पुढे दोन बायका एकमेकांना चिपकून सेल्फी घेत होत्या. दोघीही 'अफाट' असल्याकारणाने एका फ्रेममध्ये बसणं शक्य नव्हतं.

नारायण लगेच खेकसला,
"ए ए शकुताई! काय चाललंय? काय सोशल डिस्टंसिंग वगैरे काही आहे की नाही? जवळ उभं राहून काय सेल्फी काढताय. तू या कोपऱ्यात जा अन तू त्या कोपऱ्यात जा! अन लागेल तेवढे फोटो काढा जा"

"ए असं काय रे नारायण? दूर उभा राहून कसं काय सेल्फी काढणार रे?"

"हे बघ..लग्नात सोशल डिस्टंसिंग पाळणार अशी हमी तुझ्याच नवऱ्यानं दिलीये पोलीस स्टेशनमध्ये. त्याचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावायचा नसेल तर सांगतो ते ऐक. नाहीतर तुझं तू बघ"

नारायण पुढे निघाला,
"नारबा, चहा-नाश्ता नाही आला अजून? व्याही पेटलाय तिकडं!"

"सकाळपासून तीन वेळा मी चहा पाजलाय त्यांना! कप सॅनिटाइझ्ड आहेत का असं विचारात होते मला. मी म्हटलं कप,बशी, साखर,चहा पावडर इतकंच काय तर गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. आता बोला !!

तेव्हढ्यात नारायणाला मुलीच्या आईने आवाज दिला..तिच्यासोबत सात-आठ बायका होत्या.
"नारायणा, अरे मुलाकडल्या बायकांना हळदी-कुंकू द्यायचंय. वाण म्हणून प्रत्येकीला एकेक मास्क देऊ म्हटलं. तर हे कसले सुती कापडाचे मास्क आणलेस रे. मुलाच्या आईला तरी किमान गर्भरेशमी मास्क आणायचास ना!"

"काय करायचंय थेरडीला गर्भरेशमी? सुती कापड बरं पडतं त्यापेक्षा"

सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर मनसोक्त हसल्या.

"नारबा...मुलाचे मित्र परगावावरून आलेत. आता क्वारंटाईन केल्याशिवाय कसं काय सामील करून घेणार त्यांना?"

"काका, काही काळजी करू नका. त्यांची 'सोय' मी वरच्या खोलीत केली आहे. संध्याकाळपर्यंत उठणार नाहीत"

"अरे म्हणजे, दारू बिरू आणलीस की काय?"

"कसली दारू? सॅनिटायझरमध्ये ८२ टक्के अल्कोहोल असते म्हणतात. तेच ठेवलंय ग्लासात भरून!!"

असे एकानंतर एक हल्ले परतवत नारायण आपला डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा कार्यालयात थैमान घालत असतो.

नवरा-नवरी बोहोल्यावर उभे राहतात. मंगलाष्टक म्हणण्याची वेळ येते. आणि नेमका आंतरपाट सापडत नाही.

"हे काय, साध्या आंतरपाटाची व्यवस्था करता येत नाही ह्यांना?", कोणतरी कुजबुजतं..

तेवढ्यात नारायण उत्तरतो,
"कश्याला पाहिजे आंतरपाट गुरुजी? लग्न लागण्याआधी एकमेकांचे चेहरे पाहायचे नाही हाच उद्देश असतो ना आंतरपाटाचा? हो ना!! मग हे काय मास्क लावलेत ना त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? चला सुरु करा मंगलाष्टक...म्हणा रे सगळ्यांनी..तदैव लग्न सुदिनं...."

आणि एकदाच लग्न लागतं..

नारायण डोक्यावर कफन बांधल्यासारखं चेहऱ्यावर मास्क बांधून पुढचा हल्ला परतवायला निघतो...

समाप्त...

चिनार

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

13 Aug 2020 - 9:59 am | चांदणे संदीप

गर्भरेशमी मास्क!..... फुटलोच! =)) =))

सं - दी - प

महासंग्राम's picture

13 Aug 2020 - 10:29 am | महासंग्राम

कडक हो कडक

प्राची अश्विनी's picture

13 Aug 2020 - 10:32 am | प्राची अश्विनी

जबरदस्त!!! सॉलिड आवडलाय.

आनन्दा's picture

13 Aug 2020 - 11:09 am | आनन्दा

मस्त

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Aug 2020 - 11:34 am | ज्ञानोबाचे पैजार

भलताच तयारीचा दिसतोय हा नारायण, गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये.

फारच आवडले... मस्त..

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

13 Aug 2020 - 11:40 am | शाम भागवत

मस्त.

Jayant Naik's picture

13 Aug 2020 - 12:10 pm | Jayant Naik

कल्पनाशक्तीला काय अफाट सोडलय ...चालू द्या ..

बाप्पू's picture

13 Aug 2020 - 1:01 pm | बाप्पू

मस्त..
पण अजुन बऱ्याच गोष्टी राहिल्या..
जेवण, आहेर आणि पाकिटे , DJ, नवरदेवाची मिरवणूक, सत्कार समारंभ, जावयाचे पाहुणचार, भावाकडूनची कानपिळी, बूट चोरी इ इ..

प्रमोद पानसे's picture

13 Aug 2020 - 1:20 pm | प्रमोद पानसे

भन्नाट..

सिरुसेरि's picture

13 Aug 2020 - 3:51 pm | सिरुसेरि

करोना काळातला नारायण लेख आवडला . आपल्या पराक्रमाची हकीकत रंगवुन सांगणारा नारायण डोळ्यासमोर आला .

"परवाच त्या यमीच्या लग्नातली गोष्ट . नवरदेव आयत्या वेळी डेटॉलचाच सॅनिटायझर पाहिजे म्हणुन अडुन बसला . आधीच सोमवारचा दिवस . सगळ्या पेठा बंद . मग काय , कॅम्पापर्यंत सायकल हाणीत गेलो . आणले डझनभर डेटॉल सॅनिटायझरचे बॉक्स आणी आदळले त्या नवरदेवापुढे . म्हणलं धु लेका किती हात धुतोयस ते ."

आनन्दा's picture

14 Aug 2020 - 8:49 am | आनन्दा

एकच बदल सुचवतो -

"धु लेका किती धुतोयस ते"

वीणा३'s picture

13 Aug 2020 - 8:01 pm | वीणा३

ग हे काय मास्क लावलेत ना त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? - :))

रातराणी's picture

13 Aug 2020 - 10:52 pm | रातराणी

छानय :)

टवाळ कार्टा's picture

14 Aug 2020 - 1:32 am | टवाळ कार्टा

लै म्हणजे लैच भारी....दिवसेंदिवस दर्जा वाढतोय....लगे रहो

वामन देशमुख's picture

14 Aug 2020 - 7:28 am | वामन देशमुख

खूप मस्त जमलाय लेख, चिनार भाऊ !

पण अगदी थोडक्यात आटोपला, भूक भागली नाही हो.

इरसाल's picture

14 Aug 2020 - 4:21 pm | इरसाल

वाचला रे मी पण लेख २ वेळा खुप आवडला हे तुला वेगळ सांगायला नको. आठवण करुन दिलीस.
पुलप्रेमींना (मित्रमैत्रीणींना) पाठवतोय तुझ्या नावासकट.

तुषार काळभोर's picture

15 Aug 2020 - 12:25 pm | तुषार काळभोर

मजा आली.

बबन ताम्बे's picture

15 Aug 2020 - 1:53 pm | बबन ताम्बे

मस्तच जमलंय !!
शेवटी नवरी पाठवणीच्या वेळी नारायणचं इंग्रजी पण हवं होतं .☺

सौंदाळा's picture

18 Aug 2020 - 5:37 pm | सौंदाळा

जबरदस्त
सध्याच्या काळात एकदम चपखल