सुके मटण - आता छायाचित्रांसह

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
21 Nov 2008 - 7:49 pm

नमस्कार मंडळी,

ललिता यांच्या 'सुके मटण' या पा.कृ. ला आमच्या फोटूंचा साज चढवत आहे (अर्थात परवानगी घेउन!). मुळ पा.कृ. ला प्रतिक्रिया देतांना अनेक मिपाकरांनी फोटू न टाकल्याची खंत व्यक्त केली होती. ती आता दुर होइल अशी अपेक्षा.

मुळ पा.कृ. - माझे छोटे बदल - फोटू

सुचना: ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं.

>> आम्ही मात्र त्याच दिवशी खाल्लं तरि मस्त लागलं!! (सामिष पदार्थ आज बनवुन उद्या खाण्यायेवढा संयम आमच्या कडे नाहि बुवा!)

साहित्य --

७०० ग्रॅम मटण (नळ्यांसकट असेल तर १ किलो)

>> मी एकटाच खाणारा त्यामुळे ३०० ग्रॅम वापरले (मी सिना आणि गर्दन आणतो)

५, ६ कांदे बारीक चिरून

>> ३ कांदे बारीक चिरुन

दोन मोठे टॉमेटो (सालं काढून किसून घ्यावे)

>> मी एक मोठा टोंमॅटो प्युरे करुन घेतला

१ मोठा कप भरून दही

>> अर्धा कपच घेतले

अर्धा कप तेल

>> हे मात्र न मोजता अंदाजाने घातले (अंदाज अपना अपना!!!)

२ टेबलस्पून आलं + लसूण + हिरव्या मिरच्या पेस्ट

>> हि मात्रा एवढिच ठेवली (लसुण-आलं-मिरची हे कस सढळ हस्ते हवं)

२ चमचे धने + १ चमचा जिरे + १ चमचा शहाजिरे (कोरडे भाजून पूड करावी)

>> आमच्या कडे धने-जिरे पुड असतेच. तेव्हा शहाजिरे भाजुन त्यांची पुड करुन घेतली. बाकी प्रमाण तेच.

मीठ चवीप्रमाणे

>> बरोबर. ते पण खाली दिल्याप्रमाणे मटण शिजल्यावरच घातले.

कोथिंबीर चिरून

>> नुसती चिरुन नाहि तर बारीक चिरुन टाकली :)

खडा मसाला --
४ लवंगा, ६-७ मिरें, दालचिनी (१"), २ मसाल्याची वेलची, ३-४ हिरवे वेलदोडे, पाव चमचा जायपत्री, २ तमालपत्रं

>> ५ लवंगा, ६ मिरे, १" दालचिनी,३ हिरवे वेलदोडे, पाव चमचा जायपत्री, १ तमालपत्र (मसाला वेलेची राहिली हे आत्ता लक्षात येतयं :( )

पध्द्त --

एका पसरट कढईत -कढई नसेल तर पसरट भांड्यात- तेल गरम करावे. तेलात खडा मसाला टाकून किंचित तळावा. त्यावर चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा.

त्यात आल्यालसणाची पेस्ट घालून दोन मिनिटे परतावे. नंतर मटण व धने+जिरें+शहाजिर्‍याची पूड एकत्र घालून मटणाचे तुकडे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. मटण जितके जास्त परतले जाईल तितकी चव खुलत जाते (स्वानुभव).

दही व टोमॅटो घालून मटण मंद आचेवर भांड्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे, अर्थात् मध्ये मध्ये ढवळत रहावे. गरज वाटली तरच अगदी थोडे गरम पाणी घालावे, शक्यतो टोमॅटो व दहयावरच शिजवावे. मटण पूर्ण शिजले की मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

वाढताना वरुन कोथिंबीर पेरावी व लिंबाच्या फोडी बाजुला लावून सजावट करावी.

टीपः उत्तम प्रतीचे मटण साधारण पाऊण ते एक तासामध्ये मऊ शिजलं पाहिजे.
>> आणि नाहि शिजलं तर मोठे लोक सांगुनच गेलेत - "शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी" :)

कूकरमध्ये शिटी काढून मटण कधीच शिजवू नये, लज्जत निधून जाते. मटण शिजल्यानंतर मीठ घातलं तर वातड होत नाही.

>> हे मात्र पटलं.

अवांतरः मटणाला धुरी दिली तर एकदम पंचतारांकित हॉटेल-शेफच्या हातचं मटण तयार! एक ज्वलंत कोळसा पाकृप्रमाणे तयार केलेल्या मटणात खळगा करून त्यात ठेवा, वर थोडा लिंबाचा रस व तूपाचे थेंब सोडा... धूर निघेल, लगेच बाजूचे मटण कोळशावर पसरून भांड्याला झाकण गच्च लावून १० मिनिटे ठेवून द्या. मटणाला सौम्य व लज्जतदार धुराचा वास लागतो.

>> कोसळा आणि वेळे अभावी हे मात्र जमलं नाहि....

करून पहा आणि रिपोर्ट द्या!
>> एकदम झकास पा.कृ.! आत्मा तृप्त!! धन्यवाद!!!

(आपला पा.कृ.भिलाषि) पांथस्थ...

प्रतिक्रिया

सुनील's picture

21 Nov 2008 - 8:05 pm | सुनील

मूळात पाकृ छान होतीच आता फोटोमुळे रंगत वाढली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ललिता's picture

21 Nov 2008 - 8:23 pm | ललिता

या पाकृला धन्य केल्याबद्दल! :)

पांथस्थ's picture

21 Nov 2008 - 8:49 pm | पांथस्थ

धन्य तर आम्ही झालो सुके मटण खाउन....

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

हा पदार्थ आता नक्कीच करुन खायला हवा.फोटो बद्दल काय लिहावे ? शेवटच्या फोटोला हात लावुन बघितला.पण तुकडा पकडता आला नाही. =))
पांथस्था धन्यवाद
वेताळ

सहज's picture

21 Nov 2008 - 8:56 pm | सहज

तुम्ही एक नवा मापदंड घालून दिला आहे, इथे पाककृती देण्यात.

धन्यवाद.

चित्रा's picture

21 Nov 2008 - 9:12 pm | चित्रा

असेच म्हणते. करीत असतानाचीही छायचित्रे घेणे म्हणजे खूपच काम झाले.

बिसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 10:43 pm | बिसोबा खेचर

पांथस्था..... गड्या पोटात खड्डा पडला रे चित्रे बघुन..... आता करुन बघितल्याशिवाय आत्मा थंड होणार नाहि.

सुंदर!!!
और भी आने दो!

खादाड's picture

22 Nov 2008 - 3:54 pm | खादाड

वा! मी आज शनिवरी हे पहिल ! उद्या रविवार मग काय होउन जाउ द्या ! फारच छान विवरण आहे !

विसोबा खेचर's picture

23 Nov 2008 - 12:34 pm | विसोबा खेचर

ज ब रा....!

जयवी's picture

24 Nov 2008 - 1:36 pm | जयवी

आई गं....... भूक चाळवली रे पांथस्था :)

मनस्वी's picture

24 Nov 2008 - 2:19 pm | मनस्वी

अरे काय खेळ लावलाय??
अप्रतिम फोटो. लगेचच्या लगेच पाकृ करून खावीशी वाटतीये.

कैलास अंकुश सोनावणे's picture

27 Oct 2016 - 4:50 pm | कैलास अंकुश सोनावणे

खुपच छन