माझं आणि प्रिंटरचं काय वैर आहे माहिती नाही.पण मी प्रिंट दिली अन प्रिंटरजवळ गेल्यावर ती आलेली दिसली असं कधीच होत नाही. त्या लॅनचा तरी प्रॉब्लेम असेल किंवा आतमध्ये आधीपासूनच कागदं तरी अडकलेले असतील किंवा प्रिंटर हँग तरी झालेलं असेल! एकतर मी बसतो तिथून प्रिंटभर कोसभर लांब आहे. अश्यावेळी आपण दहा-बारा प्रिंट्स देऊन प्रिंटरजवळ गेल्यावर तो मक्ख चेहऱ्याने आपल्याकडे बघताना दिसला की माझा तिळपापड होतो.
"अरे बाबारे, कंपनीत आम्ही आहोत ना मक्ख, आम्ही आहोत ना मठ्ठ !! तुला काय गरज आहे माणसात यायची !"
आता हे रोजचंच असल्यामुळे सवय झालीये. पण कधी कधी आपल्याला जेन्युईन अर्जन्सी असते. म्हणजे मीटिंग मधून आपल्याला रिपोर्ट घेऊन येण्याचा निरोप आलाय,आपण घाईघाईत प्रिंट देतोय, धावतपळत प्रिंटरजवळ जातोय .आणि हे भाऊसाहेब इकडे असहकार आंदोलन पुकारून बसतात ! मग त्यांच्या मिन्नतवाऱ्या करून रिपोर्ट घेऊन मीटिंगमध्ये पोहोचेपर्यंत तिकडे तो विषय संपलेला असतो.चिमणीच्या पिल्लाच्या बारश्याला निघालेली गोगलगाय त्याच्या लग्नापर्यंत तिथे जाऊन पोहोचते तशी आपली गत होते.
आता "त्यात काय एवढं!" असं वाटू शकतं. पण कॉर्पोरेट जगात त्या क्षणाला खूप महत्त्व असतं. Sometimes you are asked to prove your point on a piece of paper! आणि त्यावेळी फक्त प्रिंट वेळेवर येऊ न शकल्यामुळे आपला पराभव होतो. बरं गोगलगाय असण्याचं किंवा पराभवाचं दु:ख बाजूला ठेवलं तरी तो माकडतोंड्या प्रिंटर अजूनही आपल्याला वाकुल्या दाखवत असतो त्याचा जास्त राग येतो.
आणि आजकाल कंपन्यांमध्ये ते सेव्ह पेपर इनिशिएटिव्ह सुरु झालंय.मी प्रिंटरच्या कारट्रिजची शप्पथ घेऊन सांगतो, हा इनिशिएटिव्ह मी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून राबवण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या ज्या वेळी मी कागदं वाचवायचा प्रयत्न करतो त्या त्या वेळी ह्या प्रिंटरच्या आडमुठेपणामुळे मी तिप्पट-चौपट कागदं खर्च करून ते कारट्रिज संपवलंय ! सरळसाधी गोष्ट आहे, पाणी वाचवणं जरी आपल्या हातात असलं तरी ते वाचू देणं हे नळाच्याच हातात असतं. तसंच प्रिंटरचं आहे. पण सेव्ह पेपर हा इनिशिएटिव्ह प्रिंटरला मान्यच नाहीये. कारण त्याच्या बापाचं काहीच जात नाही ना !
लक्षात घ्या, हा माझ्या भावनांचा उद्रेक नसून मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकेल असा दावा आहे.
जाता जाता एक सांगतो, तुम्ही कितीही कॉर्पोरेट तीसमारखां असाल
पण प्रिंटरमध्ये अडकलेला कागद फाटू न देता जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुमचं कॉर्पोरेट जीवन व्यर्थ आहे
आणि
प्रिंटरमध्ये शेवटचा कागद उरला असताना शंभर लोकांमधून जर तुमचीच प्रिंट आली असेल तर समजून घ्या,
You are the chosen one!!
समाप्त
प्रतिक्रिया
26 Jun 2020 - 7:31 pm | मदनबाण
छोटेच पण मस्त लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior
29 Jun 2020 - 1:08 pm | मूकवाचक
+१
26 Jun 2020 - 8:28 pm | कंजूस
फटाफट!!
ही गोष्ट सांगण्यात मजा आहे. ती आली आहे.
-------------------------
((बाकी कुणी अशा कथेचं शंभर शब्दांत मोजून कोंबत असेल तर वाचणार नाही. ))
26 Jun 2020 - 8:51 pm | वीणा३
मजेशीर पण खरी समस्या.
26 Jun 2020 - 8:53 pm | सौंदाळा
कामासाठी, मिटिंगसाठी प्रिंट काढून खूप वर्षे उलटली. एके काळी A0, A1 इंजिनिअरिंग ड्राइंग साठी कचकून प्लॉटर वापरला आहे पण प्लॉटरवर मात्र कधीच असा अनुभव आला नाही.
शक्यतो परदेश दौऱ्यावर जाताना आणि तिकडून आल्यावर प्रिंटरशी संबंध येतो आणि अगदी अस्साच लेखातील अनुभव येतो. मस्त लेख
29 Jun 2020 - 10:55 am | चौथा कोनाडा
भारी खुसखुशीत अनुभव ! जणू माझाच ! मी पण प्रिंटरशी खुप लढाई केलीय !
सौंदाळा म्हणतात त्या प्रमाणे मी देखिल डिझाईन डिपा मध्ये त्याकाळात A0, A1, A2, A3 प्रचंड वापरला आहे !
आता मात्र सॉफ्टकॉपी जमाना असल्यामुळे प्लॉटर आणि प्रिंटर वापरणं जवळजवळ बंदच झालेय, चेकिंग सुद्धा सॉफ्टकॉपीमध्ये करून दुरुस्त्या मार्क करतो, क्वचित प्रिंट वापरतो !
चिनार, मस्त, जुन्या आठवणी ताज्या केल्या !
29 Jun 2020 - 11:34 am | संजय क्षीरसागर
इतके दारुण अनुभव नसून सुद्धा,
का कुणास ठाउक, पण
डे वन पासून प्रिंटींग नकोसं वाटायचं.
पण सरकारचं कागदाशिवाय पान हलत नाही, त्यामुळे नाईलाज व्हायचा.
हल्ली त्या लोकांना पण सॉफ्ट कॉपी आणि डिजिटल सिग्नेचरची सवय लावलीये.
गेली १० वर्ष मात्र संपूर्ण ऑफिस पेपरलेस केलंय,
जीवन फार सुखद आणि सोयीस्कर झालंय.
सगळ्यात धन्यवाद अनुभव म्हणजे या वेळचं बँक ऑडिट होतं !
रिमोट अॅक्सेस ऑडिट (घराजवळच्या ब्रांचमधून ऑडिट) आणि अक्षरशः एकही प्रिंट नाही !
29 Jun 2020 - 11:52 am | गवि
तंतोतंत अनुभवलेलं. १०० टक्के रिलेट केलं.
खुसखुशीत मस्त लेखन.
30 Jun 2020 - 2:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या हापिसात एक एनव्हायर्मेंट म्यानेजमेंट प्रोग्राम नावाचा एक रटाळ खेळ सुरु असतो. एखादी गोष्ट अडवायची असेल तर याचा ढाल म्हणुन उपयोग केला जातो. या कार्यक्रमा अंतर्गत "कागदे वाचवा" या मोहीमेचे नेतृत्व माझ्यावरती लादण्यात आले आहे.
सर्व सहकर्मचार्यांना कागद वाचवण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे माझे काम आहे.
साधारण २ वर्षापूर्वी आम्ही महिना ६००० इतक्या प्रिंट घेत होतो, अर्थात तेवढे कागद वापरत होतो, त्या नंतर आम्ही झपाटून काम केले व कागदाचा वापर कमी करण्याचे अनेक उपक्रम राबवले, यशस्वी उपक्रम राबवणार्यांना रोख बक्षीसेही दिली. याचा परीणाम म्हणुन आम्ही आता महिन्याला सरासरी फक्त ८००० प्रिंट घेतो.
या ८००० प्रिंट कशा कमी करता येतील याचा खल करण्यासाठी कंपनीच्या ६ उच्चपदस्थ अधिकार्यांची आठवड्यातुन एकदा दोन तास अशी मिटींग होते व त्या मधे नव्या कल्पनांचा उहापोह होतो व या मिटींगचा अहवाल एमडीं कडे पाठवला जातो.
पैजारबुवा,
30 Jun 2020 - 7:41 pm | चांदणे संदीप
मस्त, खुशखुशीत झालेय. मी तर एकेकाळी प्रिंटरमधून पेपर काढायच्याच कामाला होतो. =))
अति अवांतरः
ही गोष्ट चित्र किंवा व्हिडिओ स्वरूपात कुठे मिळेल का? माझ्या पिल्लांना ही गोष्ट खूप आवडते.
सं - दी - प