जवाहर नगर.गोरेगाव पश्चीम रोड नंबर नऊ , बीट नंबर दोन.
निदान पोलीस स्टेशनच्या बाहेर च्या पाटीवर तरी हेच नाव होते. एरवी ही पाटी नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी पोस्टर होर्डिंग ने च्या मागे लपलेली असते त्यामुळे कोणाला दिसत नाही. लोकल कॉर्पोरेटर आणि गल्लीतील भावी नेते यांची ही तर हक्काची जागा.
मनाचा राजा , राजासारखे मन. गल्लीतील भावी नेते. पप्पू भाऊ . दिनके आगे रात है हम तुम्हारे साथ है. अशा काही घोषणा लिहीलेले बोर्ड दिसायचे. आता कापडी बोर्ड जाऊन फ्लेक्स आले इतकाच काय तो फरक गेल्या दहा वर्षातला.
कधी कधी गम्मत व्हायची. फ्लेक्स्ची साईज कमी असेल तर आघाडीचे नेते या खाली मूळ पाटीवरचे बीट नंबर दोन. ही अक्षरे दिसायची.
यातली गम्मत ज्याना कळायची ते गालातल्या गालात हसत जायचे. बाकीचे नुसतेच वाचून जायचे.
एक मात्र होते ही पाटीवरची फ्लेक्स ची जागा कधीच रिकामी नसायची. कुणाचा ना कुणाचा वाढदिवस असायचाच. आज मात्र या पाटीवर पाटीझाकून टाकणारा एकही फ्लेक्स नव्हता. त्यामुळे पोलीस स्टेशन ची पाटी आज जरा जास्तच डोळ्यात भरत होती.
आज मात्र या पाटीवर पाटी झाकून टाकणारा एकही फ्लेक्स नव्हता. त्यामुळे पोलीस स्टेशन ची पाटी आज जरा जास्तच डोळ्यात भरत होती.
अर्ध्या तासापूर्वी शेवटची विरार स्लो गेली. स्टेशनवरच्या अनाउन्स मेंट चा आवाज ही बंद झाला. त्यामुळे रात्रीचा एक वाजून गेला होता हे नक्की.
पोलीस स्टेशन समोरचा एरवी दिवसभर गजबलेला रस्ता एखादा दुसरा रेंगाळणारा सोडला तर रिकामाच होता. मुंबईत हे असले रिकामे रस्ते अंगावर दडपण आणतात.
गर्दीचे काही वाटत नाही. पण बीनगर्दीचे रस्ते काहितरी घडणार आहे असे उगाचच सांगत असतात.
त्यातून सोडीयम व्हेपरच्या दिव्याचा पिवळा उजेड रस्त्याला अधीकच भगभगीत करुन टाकतो. बंद दुकानांच्या पायरीवर वर्तमान पत्र टाकून झोपलेले लोक , कुठेतरी रस्त्याच्या मधोमध एक डोळा मिचकावत पडलेला कुत्रा , तिरकी करून पार्क केलेली एखादी मोटारसायकल , पार्क केलेल्या गाड्या, रिक्षा रांगेत लावून आत झोपेलेले रिक्षावाले, हे या रस्त्या या वेळेचं चित्र. चित्र यासठी म्हणायचं कारण ते निदान पुढचे तीन ते चार तास तरी तसंच फोटो काढल्यासारखं अस्संच स्थिर दिसणार.
त्यात बदल म्हणजे इकडे झोपलेले एखादे कुत्रे जागा बदलणार किंवा अंग खाजवायला म्हणून उभे रहाणार. इतकंच. दिवसभर अंगावरून वहाणार्या रहदारीमुळे दमून जाऊन तो रस्ता सुद्धा गाढ झोपलाय असे वाटतं
समोर पोलीस स्टेशन आहे तिथे काही लोक जागे असतात म्हणून थोडी जाग आहे म्हणायचं झालं. तिथे लाईट चालू असतो. आत बसलेले हवालदार जाम्भया देत का होईना जागे असतात.
तिथे तरी काय . सब इन्स्पेक्टर बराहाते पेट्रोलिंग साठी बाहेर . आज दोघेच हवालदार केरबा आणि काँस्टेबल आमणे हेच दोघे
."काय आमणे आज काय नवे. ?" ड्यूटी रजीस्टरमधील नोंदी वाचून झाल्यावर हवालदार केरबाने हवालदार आमणेला प्रश्न केला.
"हं, अं अं म्म्म्म ह्म्म्म्म ह्म्म्म्म "
"ओ आमणे ...ह्म्ह्म्म्म्म काय करताय मी काहितरी विचारलं तुम्हाला." नाही म्हंटलं तरी हवालदार केरबाला आमणेचं बोलणं ऐकून काही शष्प कळाले नव्हते. कळणार तरी कसे. तोंडात तंबाखू सांभाळत बोलणे हवालदार आमणेलाच काय कुणालाही अवघडच असते. त्यातून गेला अर्धा तास ते दोघे काहीच बोलले नव्हते. ते दोघे सोडा पण टेबलावरची फोनची घंटीही वाजली नव्हती. तो पण शांत होता.
"नवं काय अन जुनं काय सगळे सारखेच की आपल्याला. या बंगल्यावर इकडे ड्यूटी करायच्या ऐवजी तिकडे इतकेच. " हवालदार आमणेने त्याच्या" म्म्म्म ह्म्म्म्म ह्म्म्म्म" चे स्पष्टीकरण दिले. तो तरी काय करणार. पोलीस स्टेशनात असताना कधी काय येईल ते सांगता येत नाही. त्या पेक्षा बंगल्यावरची ड्यूटी चांगली. एकाच जागी उभे राहुन कंटाळा येतो पण निदान उन्हातान्हात तरी रखडावं लागत नाही. शिवाय मिनीस्टर साहेब बंगल्यावर असतील तर अधूनमधून चहा नाष्ता वगैरे तरी होतो. अट एकच जे काय होईल ते डोळ्यानी नोंद करत रहायचे. ते सगळे एल आय बी च्या लोकांना सांगायचे. यात ड्यूटी नक्की काय तेच कळायचे नाही. बंगल्याबाहेर उभे रहायची की एल आय बी ला सांगणे ही. या लोकांची गम्मतच वाटायची. तीन पक्षाचे सरकार आणि चौथा विरोधी पक्ष हे सगळेच जण एकमेकांवर नजर ठेवून. सेंट्रल आणि राज दोन्ही सरकारे एकमेकांवर नजर ठेवून. स्टेट होम ला पण रीपोर्ट पाठवायचा आणि सेंट्रल ला पण. अर्थात रीपोर्ट पाठवायचे काम इन्स्पेक्टर साहेबांचे. आपण फक्त कोण आले कोण गेले किती वेळ होते काय आणले काय नेले इतकेच सांगायचे. हे सगळे करत असताना येणारा जाणारा प्रत्येकाला हात वर करून सलाम ठोकायचा. ती त्री नॉट थ्री ची रायफल हातात ठेवून दिवसातून तीस तीस वेळा कडक् सलाम ठोकून हात दुखून यायचा इतकाच काय तो त्रास.
सालं आपल्या नशीबात थ्री नॉट थ्रीच. कधीतरी ती कार्बाईन ए के ४७ हातात यावी. त्या दिवशी स्वप्नातसुद्धा अतीरेक्यांशी लढताना हातात सेफ्टी पीन ने गोळ्या झाडत होतो. हवालदार आमणेला परवा पडलेल्या स्वप्नाचे अजूनही हसू येत होते. स्वप्नात रवी कट्टा गँग चे दोन गुंड खंडणी मागायला थेट पोलीस स्टेशन मधे आले होते. आणि त्या दोन गुंडांच्या हातात देशी कट्टे होते. तोंडाला रुमाल. अगोदर वाटले की ते बी एम सी चे सफाई कर्मचारीच आहेत. म्हणून त्याना वो पीछे की गटर का झाकण तुटा है भौत बास मारता है. वगैरे सांगितले. पण हातातले ते देशी कट्टे पाहिल्यावर खात्री पटली. पण स्वप्नात काही सांगता येत नाही. कट्ट्यासारखे दिसणरे मोबाईलही असतील. मग त्या गुंडांना पोलीसी खाक्या दाखवला. दोन धपाटे घातले. त्यांनी हातातले कट्टे वर करत दोन गोळ्या झाडल्या . एक भिंतीवरच्या ट्यूबला लागला , दुसरा साहेबांच्या टेबलावरील ग्लासला. दोन्ही फुटले. मग आपण ठरवलं आपण पण पोलीस स्पिरीट दाखवायचं, थ्री नॉट थ्री ची कोपर्यात ठेवलेली रायफल घ्यायला वेळ नव्हता. खाली टेबला आड बसायला म्हणून वाकलो. पोटाला काहीतरी टोचलं म्हणून पाहिले . शर्टाचं मधलं बटन तुटलं होतं म्हणून हीच्याकडून हातातली पीन घेऊन लावली होती. वाकताना ती टोचली. आयत्या वेळेस जे हाताला लागेल ते हत्यार. ही पीन तर थेट पोटाला लागली.
मग पीन काढली. तीची क्लीप उग्घडली.मागच्या बाजूने गोळ्या भरल्या आणि ट्रीगर ओढला. दोन गोळ्या सुटल्या दोन्ही गोळ्यानी त्या दोन गुंडांच्या हातातले गावठी कट्टे खाली पाडले. लगोरीने कैर्या पाडाव्या तशा. मग ते दोन्ही गुंड घाबरले. गयावया करू लागले. त्यांना पीन ची क्लीप काढून टोचली. मग ते पायाच पडू लागले. त्यातला एक गुंड हेड कॉन्स्टेबल मिसाळ मामांसारखा दिसायला लागला. तरी पण मी ओळखले. कारण मिसाळ मामा काही गयावया करत बोलणार नाहीत. एकतर त्यांना ग हा शब्दच म्हणता येत नाही. ग ऐवजी व म्हणतात. गावाला गेलो म्हणायचे असेल तर वावाला वेलो म्हणतात.
दुसरा गुंड तर अगोदर जग्याभाईसारखा दिसत होता नंतर एकदम हीचा धाकटा भाऊ संपत सारखा दिसायला लागला. निदान धाकट्या बहीणीसारखा तरी दिसायचं ना. पण नाही. सालं स्वप्नात सुद्धा असे होणार नाही. पण संपत सारखा दिसणार्या त्या गुंडाने मला एकदम कॉलरलाच धरले. मी ओरडलो. सोड सोड. वर्दीवर हात टाकतोस. सोड सोड. " खरं तर आपण स्वप्नात ओरडत होतो. पण ते हीला ऐकू गेलं . तीने झोपेतच आपला धाकटा जितू समजून " मेला जरा डोळा लागला तर नीजू पण देत नाही एकसारखा" म्हणत आपल्या पाठीत धपाटा घातला. पाठ पार हुळहुळली राहुल्या जित्या इतका सहनशील असेल हे त्यादिवशी कळलं.
ते स्वप्न सांगावं की नाही आणि सांगितलं तर कुणाला तेच समजत नव्हतं. एकटच हसायला येत होतं.
स्वप्नं पण असलीच. थ्री नॉट थ्री. धड फायर करता येत नाहीत धड हातात धरता येत नाहीत. त्यापेक्षा लाठी बरी निदान टेकायला म्हणून तरी वापरता येते. ही थ्री नॉट थ्री रायफल म्हणजे कितीतरी वर्षे नुसती साफ करत बसायची. कधीतरी वर्षातून कुणाला मनवंदना द्यायची असेल तर त्यातून गन पावडरच्या फाल्स बुलेट झाडायच्या.
हे गुंडांना पण माहीत असतं ते अज्याबात घाबरत नाहीत.
" आमणेमामा आमाला तरी सांगा काय हसताय ते" एक वाक्य बोलून आमणे गप्प झाला आणि स्वतःशीच हसत बसलाय हे पाहून हवालदर केरबा पुन्हा एकदा विचारले.
" आता काय सांगायचं. हसलो असाच. ए परवा टीव्ही वर कुणीतरी सांगत होतं माणसाने हसत जावे. कारण नसताना सुद्धा हसावे" स्वप्न वाली स्टोरी कशी सांगायची हा विचार करत असताना जे सुचलं ते आमणेनं सांगून टाकलं.
" बरंय बाबा तुमचं . तुम्हाला टीव्ही बघायला तरी मिळतो. आमच्याकडे जेंव्हा बघावं तेंव्हा मंडळी ते कसल्या बायकांच्या सिरीयली बघत बसलेली असते. आन ह्याना जरा काय विचारावं त्या सिरीयली चाललेल्या असताना. कपाळावर पिंपळाच्या पानाच्या जाळीवर ला कमी असतील इतक्या सत्तरशेसाठ रेषा येतात." त्या सिरीयल्स बघत बसण्यापेक्षा हिते बसलेलं . डोक्याला ताप कमी."
"जाऊ दे हो. सगळीकडं तेच आहे. फार काही वेगळी परिस्थिती नाही. मी पण ऐकलं ते कोणत्यातरी सिरीयलमधेच ऐकलं . या बायकांना त्या सिरीयलमधे इतकं काय बघायचं असतं देव जाणे. " सासूच्या कागाळ्या करणार्या दोन सुनांना वाटत असेल तितकी सहानुभूती आमणेला केरबाबद्दल वाटायला लागते.
दुसरं काय . सगळी कडे तेच. मी तर ते बघण्यापेक्षा ड्यूटीवर येतो. नाईट ड्यूटी असली तरी चालते मला त्यामुळे. निदान सिरीयल चालू असतात त्यावेळेत घराबाहेर पडता येतं. डे टाईमला तशाही कायतरी भानगडी निस्तारत असतो . कटकटीनं दमून घरी जाऊन शांत पडावं म्हणून जावं तर त्या सिरीयली चालू असतात." केरबाची सिरीयल पासून लांब रहायला मिळते म्हणून नाईट ड्यूटी.
" तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण नाईट ड्यूटी चा माझा अनुभव जरा वेगळाच आहे. म्हणजे काम असेल तर बरं असते. कुठं इमर्जन्सी ड्यूटी वगैरे असेल तर जरा डोकं काहीतरी चालू रहातं. पण जर काम नसेल तर अवघड होतं . त्यात पुन्हा कुणाच्या बंगल्यावर ड्यूटी असेल तर बरं असतं . सोबत कोणीतरी विडीकाडीला असतं तरी." आमणे असेच काहितरी बराच वेळ बोलत रहतो. जरा बरंवाटतं. पोलीस स्टेशन मधे शांतते इतके दुसरे भयानक काही नसएत. याचा अनुभव आमणे ने बरेचदा घेतलाय. शांत काहिहे न घडाणारं पोलीस स्टेशन. डोक्यावर घरघरणारा पंखा. त्याचा तो एक सुरी कण्हल्यासारखा आवाज , भिंतीवरच्या जुनाट घड्याळाच्या सेकंद काट्याचा आवाज , समोर उघडे असलेले ड्यूटी रजिस्टर, कोपर्यात संध्याकाळी आत घेतलेला गर्दुल्या जब्बर मारामुळे निपचीत पडलेला , कधितरी त्याच्या तोंडून येणारा रडण्याचा विचीत्र आवाज. लांब वर ओरडणारी कुत्री भेसूरपणात भरच घालतात.
वायरलेस सेटवर कोणीतरी सतत बोलत असेल तर ती तरी सोबत असते. पण ते एकसुरी बोलणे पण कानाला टोचत रहाते.
डे टाईम ड्यूटी त निदान काहितरी सतत हालचाल चालू असते. फोन एकसारखा खणखणत असतो. शहरात काहीना काही घडत असते. गुन्हे तक्रारी भांडणे कागाळ्या मारामार्या , शिवीगाळी , मोर्चे , पाकिटमारी यातून शहर जागे असल्याच्या खुणा जाणवत रहातात. संध्याकाळ हे वेगळीच असते. मटकेवाले त्यांचे आकडे घेतात. पाकिटे पोहोच होतात. दुपारी एखादा संशयीत किंवा असाच कोणी सापडलेला गाडीतून आणलेला असतो. त्याची चौकशी करायची असते. कोणीतरी वकील कागद फडकावत आलेला असतो. त्याच्यासोबत त्याचा एखाद ज्यूनियर , बेल असेल तर त्याची कागदपत्रे पहाणे ही सगळी गजबज . धरून आलेला जर एखादा फासे पारधी किंवा पाकिटमार असेल तर गोष्ट वेगळी असते.रेल्वे स्टेशनवरच्या केसेस इकडे येत नाहीत ते एक बरे आहे. नाहितर गोंधळ आणखी वाढला असता.
रात्र होत जाते तशी वर्दळ जरा कमी होत जाते. नाईट चे लोक रात्री आठ पासून यायला सुरवात होते नऊ वाजेपर्यंत . रजिस्टर देणे चार्ज घेणे सोपस्कार करून झाले की स्टेशन ही सुस्तावते. खाण्याच्या गाड्या असतात त्या वर तेवढी थोडी काय ती माणसे दिसत रहातात ती अकरा साडे अकरा पर्यंत. तिथल्या तक्रारी पेट्रोल वर असतानाच थोडा दम देऊन मिटवता येतात. त्या स्टेशनपर्यंत येतच नाहीत.बारा साडेबारा पर्यंत एखाद दुसरा कोणी अशी ये जा होते. त्या नंतर मात्र चिडीचूप असते. ड्यूटीवरच्या हवालदाराला वायरलेस च्या बॅग्राउंड म्यूझिक वर स्टेशन मधून समोर दिसणारा चित्रासारखा स्तब्ध रस्ता पहाणे हाच काय तो उद्योग उरतो.
अर्थात प्रत्येक रात्र अशी असेल असे नाही. कधीतरी इमर्जन्सी येते पोलीस स्टेशन खडबडून जागे होते. गाड्या येतात, सायरन वाजवत बाहेर जातात. फुटपाथ दुकानाच्या कडेला झोपलेली जागी होऊन शिव्या देत बघत रहतात.
इमर्जन्सी पण रोज नसते. घरगुती भांडणे , झगडे ही येतात कधितरी. रस्त्यावरची पोरं असली के दोघांच्याही कानफाटीत वाजवली की जातात निघून. पण दोन शेजारी किंवा भाउ भाऊ यांची भांडणे हा वेगळा विषय ठरतो. तिथे सगळी डोके शांत ठेवून काम करावं लागतं. ते काम शक्यतो साहेबावर ढकललेले बरे असते.
पोलीस स्टेशन म्हणजे रोज सगळे काही भांडण मारामार्या खून दरोडेखोरी असलेच नसते. परवा एक पेदाड. पोलीस स्टेशन वर आला. त्याचे विमान फारच वर गेले होते. थेट पोलीस स्टेशन मधेच आला.येताना तोल थोडा इकडे तिकडे झाला ही , पण पायर्या चढून आला. केरबा च्या जोडीला भैराट होता. साहेबही होते.
त्याला तक्रार करायची नव्हती. कोणालातरी त्याची नवी कविता ऐकवायची होती.
मजा आली. अर्थात हे काही नेहमी होणारे नाही. रोजच्या कामात असा बदल पाहिजेच की. नाईट ड्यूटी ला काहीजण रीलीव्ह ड्यूटी पण म्हणायचे.
"केरबा आज आज काहितरी होणार आहे असे वाटतय." इतकावेळच्या शांततेचा भंग करत बोललेल्या आमणे कडे केरबाने चमकून पाहिले.
"कशावरून म्हणताय" केरबाच्या आवाजातून कुतूहल लपले नाही. शुभ बोल रे नार्या असाही एक भाव त्या उद्गारात होता. आजची नाईटला एखादी भागड झाली की दुसर्या दिवशी किमान दुपारपर्यंतरी ड्यूटी सम्पत नाही. सालं पोलीस झालो हेच चुकलं. गावाकडे साधं चहा बिस्किटाची गाडी टाकली असती तरी बरे . निदान घरी वेळेवर तरी गेलो असतो रोज. . हे सगळेभाव त्यात डोकावून गेले.
आता हेच बघा ना ज्या ज्या वेळेस नाईट ला असे शांत राहिलो त्या त्या वेळेस त्या त्या वेळेस काहितरी होतं नक्की सांगतो. काय आहे माहीत नाही पण असे होतं हे खरं. खेरवाडी नाका वर अशीच नाईट ड्यूटी होती.रात्री साडेतीन पर्यंत एकदम शांतता. अन पहाटे पावणेचार वाजता फोन वाजला. दिलीप शेट्टी आणि अस्लम पारकर न्यू भारत बार जवळ येणार म्हणून ." आमणे सांगायला लागला.
केरबाला पुढचे माहीत होते. दिलीप शेट्टी चा एन्काउंटर कसा झाला हे त्यालाच काय पण बीट नंबर २ च्या प्रत्येक आला ते पाठ होते. कितीही थ्रीलिंग असली तरी तसली गोष्ट केरबाला नको होती. रीटायरेमेंटला राहिलेली दोन वर्षे धावपळ चालेल पण चौकशी नको.
" पुढचे माहीतच असेल ते एकदा झाले नंतर असेच एकदा नाईटला होतो. पहाटे चार ला फोन आला. रमा नाईक समता नगर ला येणार म्हणून.हातातले काम टाकून तस्से निघालो. रमा नाईक नाही पण येडा यादव सापडला. मग तो वाँटेड होताच. तिथेच. गेम वाजवला यादव चा. मी ज्या ज्या वेळा नाईट ला असतो आणि शांतता असते ना तेंव्हा असेच होते." आमणे बोलत होता. केरबाला निदन आज तरी हे असे होऊ नये असेच वाटत होते..
" आन त्या दिवशी. दिवशी म्हणजे रात्रीच दुपारी .सिद्धार्थ कॉलनीत किरकोळ भांडणे झाली होती. रात्री तीन ला त्यातले एकाने दुसर्याची गाडी पेट्रोल टाकून जाळली. हे कोणीतरी पाहिले . इकडचे तिकडचे सगळे जागे झाले. वेळेत समजले म्हणून बरे , कामत साहेब स्वतः पेट्रोल जीप मधे. हेड ऑफीस मधून तीन व्हॅन मधून सगळा फोर्स आला. रायफल घेऊन. सगळा एरीया सील केला. म्हणून बरे . दंगा होता होता वाचला." आमणे सांगतच होता.
तो बिल्डर रुपाणी मर्डर पण अशाच नाईट ड्यूटी च्या वेळेसच झाला होता. मी जेंव्हा जेंव्हा मी नाईट ड्यूटीला असतो ना तेंव्हा तेंव्हा असे काहितरी होणार हे ठरलेले आहे अमावस्या असेल तर अगदी १०० टक्के." आमणेचा या योगायोगावर ठाम विश्वास
" मी एकदा बाबाजीं कडेही गेलो होतो. ते म्हणाले तुझ्या पत्रीकेत योगच तसा आहे. पनवती योग .शनीची आठवी द्रुष्टी आहे राहूवर. हे असे होणारच. तेंव्हापासून मी अमावस्येला नाईट ड्यूटी घेत नाही. बंगल्यावर ड्यूटी असेल तरी चालेल पण नाईट नको."
" मग तुमाला काय म्हणायचंय. आज पण काहीतरी होणार?" केरबाला खरेतर मनातून असे काही व्हायला नको असंच म्हणायचंय.
" होणार म्हणजे नक्की होणार. त्यातून आज अमावस्या पण आहे. म्हणजे फुल्ल चान्स . आजवरचा रेकॉर्ड आहे माझा. श्रद्धा म्हण ना. "
आमणेची ही श्रद्धा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला बोलवून काढून टाकायला हवी . निदान आजतरी आमणे ची श्रद्धा खरी व्हायला नको "
काय कुठे आणि किती वाजता ते माहीत नाही.आपण वाट पहायची. आज काहीतरी होणार हे नक्की.
( क्रमशः )
प्रतिक्रिया
5 Jun 2020 - 10:19 am | राजाभाउ
मस्त सुरुवात. शिर्षका वरुन तरी कायतरी भारी असणारे, सावरुन बसलोय.
5 Jun 2020 - 10:50 am | मोहन
उत्कंठा तर चांगली वाढवली आहे. पुढचा भाग लवकर टाका. प्लीज
5 Jun 2020 - 11:08 am | भीमराव
झकास सुरू झालं आहे.
5 Jun 2020 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरुवात झकास, लवकर लिहा पुढील भाग.
०दिलीप बिरुटे
5 Jun 2020 - 4:07 pm | संजय क्षीरसागर
आणि निरिक्षणातल्या बारकाव्यांमुळे कथा चांगली जमतेयं > लगे रहो !
5 Jun 2020 - 11:12 pm | वीणा३
सुरवात मस्त झालीये !!!
6 Jun 2020 - 8:45 am | ज्ञानोबाचे पैजार
लगे रहो विजुभाउ
पैजारबुवा,
6 Jun 2020 - 11:40 pm | एस
वाचतोय. पुभालटा.
7 Jun 2020 - 8:09 am | निनाद
सुंदर सुरुवात
11 Jun 2020 - 11:35 am | रातराणी
छान सुरुवात. पुभाप्र.