काही सूर अवखळ मनाला बेईमान बनवतात. ते कानी आले की मनाला फुलपाखरांचे मोहक पंख फुटतात. स्पॅनिश गिटार टणकारले वा सेक्साफोन फणकारले की असे होते. ऍकॉर्डिअनमधून रेशीमलहरी बाहेर पडल्या की मग आपले आपण राहात नाही. मन स्मृतींच्या फुलपाखरांवर स्वार होते, कालाचे अदृश्य तट विरघळून जातात आणि ते सूर आपल्याला गतकाळात घेऊन जातात. ते स्वर कानी आले की प्रथम आठवतो तो नाताळ आणि त्यापाठोपाठ येणारा नववर्षोत्सव. एके काळी पॉप संगीताशिवाय हे उत्सव साजरे होत नसत.
धीरू पटेल आणि बाळ्या नाईक यांच्यामुळे गुजराती जवाहर मर्चंट, कन्नडिग रत्नाकर आचार्य, इ. नवे मित्र मिळाले. रत्नाकरच्या नावाची पहिली तीन अक्षरे पकडून रॅट असे त्याचे नामकरण झाले होते. प्रदीप पाठारेचे अर्थातच पद्या झाले होते. त्याचा भाऊ दीपक आणि किरण सोमणे ही सगळी कॉन्व्हेन्टची मंडळी मिळून गल्लीत अंडरहॅन्ड क्रिकेट खेळत असू. कधीकधी गुजराती शाळेत शिकलेले वा शिकणारे कमलेश मेहता, नरेंद्र, जवाहरचा धाकटा भाऊ हेमंत, धीरूचा मोठा भाऊ कौशिक अणि धाकटा भाऊ धरमेंद्र ऊर्फ धरमेंदू असे नवे बहुभाषिक कॉस्मॉपॉलिटन मित्रमंडळ कधी झाले ते कळले नाही. दर्जीकाम करणारा गुजराती ‘प्रद्युम्न दिवेचा’ च्या पहिल्या नावाचे प्रदुमन झाले होते. नंतर शिरीष पुरोहित आणि त्याचा आंध्राईट मित्र राधेश्याम कामऋषी पण येऊन मिळाला. यातले कॉन्व्हेन्टमधले मित्र, मी आणि बाळ्या नाईक असा आमचा पाश्चात्य संगीत ऐकणारा एक कंपू मस्त जमला होता.
ख्रिस्तजन्माचा उत्सव नाताळ. त्याअगोदर महिनाभर म्हणजे २२ नोव्हेंबर हा जवाहरचा जन्मदिन. एकदा जवाहर मर्चंटला त्याच्या आजीने वाढदिवसानिमित्त एचएमव्ही ६६६ हा नवीनच बाजारात आलेला रेकॉर्ड प्लेअर आणून दिला. त्याला तेव्हा नवीनच आलेले क्रिस्टल कार्टरीज होते म्हणून त्यातून आवाज छान येत असे. तो ऍन्टोनिओ डी’सिल्व्हा या कॉन्व्हेन्ट शाळेतला. त्याला इंग्रजी गाण्यांची आवड होती. मग आम्ही त्याच दिवशी त्याला टकीला ट्विस्टची नवीनच बाजारात आलेली ६ रुपये किंमतीची ४५ फेरे दर मि वेगाची तबकडी अभिनंदन भेटवस्तू म्हणून दिली. टकीला ट्विस्ट त्या तबकडीच्या मागच्या बाजूला ‘लिंबो रॉक’ वाद्यसंगीत होते. तेव्हा मी प्रथमच नवीनवी इंग्रजी गाणी ऐकली. त्याअगोदर फक्त ‘कम सप्टेंबर’ची धून ऐकली होती. संगीत हे संगीत असते. भाषेच्या सीमा पार करून हृदयाला भिडणारे. नवे विषय, नवे स्वरविचार, मला तेव्हां अपरिचित असलेल्या गायकगायिकांचे कर्णमधुर आवाज, मग त्या गाण्यांचे वेडच लागले.
कमी मात्रांचे छोटे ठेके, मधुर, देखणे आवाज, स्वराचा अचूक लगाव, मोहक सुरावट, बहारदार इन्टरल्यूड्स (कडव्यांच्या, शब्दांच्या मधले वाद्यसंगीत) यामुळे ती गाणी लोकप्रिय – पॉप्युलर झाली.जनमानसात या गाण्यांचे पॉप्युलर असलेले म्यूझिक ते ‘पॉप म्यूझिक’ असे लघुरूप झाले होते. चेंडूफळी खेळून झाल्यावर मग आम्ही त्या रेकॉर्ड प्लेअरवर गाणी ऐकत असू. एकदा धीरू पटेलने त्याच्या घरून जुनी ओऽऽ बॅनर्डीन ची ७८ आरपीएमची रेकॉर्ड आणली. तेही छान होते. रोज संध्याकाळी गृहपाठ वगैरे करून झाल्यावर रेकॉर्ड्स लावून गाणी ऐकणे हा एक मस्त छंद झाला.
एकदा रॅट म्हणाला रेडिओवर दर बुधवारी रात्री ‘मुंबई अ’ वर रात्री १० वाजता परेड ऑफ पॉप्स आणि शनिवारी सॅटर्डे नाईट नावाचा इंग्रजी गाण्यांचे कार्यक्रम असतात. रेडिओ सिलोनची हिंदी आणि इंग्रजी अशी दोन स्टेशने होती. हिंदी AM शॉर्ट वेव्ह २५ मीटर वर तर इंग्रजी १९ मीटरवर. हिंदीवर रोजच्या गाण्यांव्यतिरिक्त बुधवारी बिनाका गीतमाला. इंग्रजी सिलोनवर रोज सकाळी ८ ते ९ असा इंग्रजी गाण्यांचा कर्यक्रम असे पण आमच्या कोणाच्याच घरी कोण इंग्रजी गाणी ऐकूं देत नसे.
गॅलरीत किंवा रात्री बंद झालेल्या दुकानाच्या फळीवर ट्रान्झिस्टर रेडिओवर आम्ही टोळके जमवून इंग्रजी गाणी ऐकत असू. आमच्यापैकी काही जणांच्या घरी वीजेवर चालणारा रेडिओ आणि बॅटरीवर चालणारा ट्रान्झिस्टर रेडिओ असे दोनदोन रेडिओ सेट्स होते. कोणाच्या ट्रान्झिस्टर रेडिओवर शॉर्ट वेव्ह स्टेशने चांगली स्वच्छ लागतात आणि ढाले-किनरे दोन्ही आवाज छान ऐकू येतात ते पाहून ट्रान्झिस्टर रेडिओची निवड केली जाई. इथे बाळ्या नाईक असे पण मिलिंद आणि चंदू मात्र नसत. प्रथमच मला नवे असलेले हे संगीत ऐकतां ऐकतां नाताळ कधी उजाडला कळलेही नाही.
ऍन्टोनिओ डी’सिल्व्हा हायस्कूल हे ख्रिस्ती लोकांनी चालविलेले कॉन्व्हेन्ट विद्यालय. मुंबईच्या बहुरंगी-बहुढंगी संस्कृतीचा भाग असलेल्या इथल्या पाश्चात्य संगीत, मराठी नाटके अशा नानाविध कार्यक्रमांनी माझ्या जीवनात आगळेच मनमोहक रंग भरले. जे स्थान प्रायोगिक नाटके आणि शास्त्रीय संगीत देणार्या छबिलदासचे तेच स्थान मराठी व्यावसायिक नाटके देणार्या आणि पाश्चात्य संगीत ऐकवणार्या ऍन्टोनिओ डी’सिल्व्हाचे. नाताळच्या सुटीत या विद्यालयाच्या आवारात पाश्चात्य नृत्याचे सार्वजनिक सोहळे होत. (याच आवारात हल्ली दरवर्षी दसरादिवाळीत ‘मराठी व्यापारी पेठ’ भरते.) मुख्य प्रवेशद्वार आमच्या घरापासून दूर पलीकडच्या रस्त्यावर आहे. त्या रस्त्यावर माझे जाणेयेणे जवळजवळ नाहीच. एकदा कर्मधर्मसंयोगाने नाताळच्या पूर्वसंध्येला तिथून जाणे झाले. फारच छान, उत्सवी वातावरण होते. प्रवेशापाशी झगझगीत प्रकाशयोजना, नृत्यात सहभागी व्हायला येणारी युगुले, बहुतेक युगुले ख्रिस्तीच. विविध परफ्यूम्सचा मन प्रफुल्लित करणारा दरवळ, सुरेख कडक नव्याकोर्या सुटाबुटातले रुबाबदार पुरुष आणि आकर्षक पण पूर्ण कपड्यातल्या तरुणी. सगळे डान्सिन्ग शूज घातलेले. मुलींचे दोनतीन इंच उंच शूज, काही तर पेन्सील हील्ड. पेन्सिल हील्ड शूज घातल्यावर स्त्रियामुली न धडपडता कशा काय चालू शकत कोण जाणे. इथे तर त्या नृत्यही करीत. अर्धा-एक तास नृत्य आणि नंतर काही मिनिटांचे ‘रिलॅक्स ऍन्ड लिसन’चे मध्यांतर. पुन्हा अर्धा-एक तास नृत्य असा कार्यक्रम सकाळी पाच वाजेपर्यंत चाले. ही बाहेर ऐकू येणार्या तिथल्या ‘अनाउन्समेन्ट’ वरून मिळालेली महिती. आत जाऊन पाहावे, ऐकावे असे मात्र कधी वाटले नाही.
तेव्हा गाजत असलेली विविध इंग्रजी गाणी मध्यंतरात असत. खरे तर ही गाणी दरवर्षी नाताळात तिथून थेट घरात ऐकू येत. पण आता लक्षपूर्वक ऐकू लागलो. किशोरवयातील मुलांना पैलवान, बॉक्सर इ. बलिष्ठ व्यक्तींचे फार कौतुक असते. तसे ते त्या वयात आम्हालाही होते. ‘सिंग मोहम्मद …. कॅच मी इफ यू कॅन’ हे मुष्टीयोद्धा मोहम्मद अलीवरचे गाणे - हे तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते. या ओळीतल्या पातळ, किंचित अनुनासिक वाटणार्या आवाजातल्या ‘…… कॅन’चा सूर उचलत वाजणारे जाझचे इन्टरल्यूड ऐकतांना मन झोपाळ्यावर बसून उंच गगनाला भिडे. प्रियाराधनेचे गाणे कोणाला आवडत नाही? इन्गलबर्टचा आवाज ऐकला की मदनच रतीची मनधरणी करीत गातो आहे असे मला वाटे. इन्गलबर्टच्या ’टेल मी क्वान्डो क्वान्डो क्वान्डो’ ने आम्हां सर्वांवर गारूड केले होते, क्वान्डो (केव्हा) या शब्दातून घायाळ प्रियकराची विव्हळ अधीरता कशी मस्त प्रत्ययाला येते.
कर्क डग्लसचे पिचक्या आवाजातले ‘एव्हरीबडी कुंग-फू फायटिंग’ आठवते आहे. जेव्हा ब्रूस लीला पडद्यावर पाहिले तेव्हा या गाण्यात काय म्हणायचे आहे ते कळले अणि या गाण्याची लज्जत कळली.
विराणी गाणे हा तसा जुगारच. जमली तर ठीक नाहीतर वैतागच. टॉम जोन्सचा सुरेल, दर्दभरा, कधी पातळ तर कधी भरदार होणारा स्वतःचेच रंग क्षणाक्षणात बदलणारा आवाज काय वर्णावा? त्याची ‘व्हाय व्हाय डिलायला’ ही विराणी मस्त जमली.
आगगाडी पडद्यावर असली की पडदा न बघता संगीतावरून कळतेच. ‘सुझॅन रे’चा आवाज छानच. तिचे ‘एलए इन्टरनॅशनल एअरपोर्ट’ विमानतळाचे वातावरण मस्त डोळ्यासमोर उभे करते, शर्ली बॅसेच्या ठाव घेणारा आवाज क्षणात जमिनीवर तर क्षणात आभाळात. आवाजाची रेंज अफलातूनच. तिचे ‘फॉर वॉटेव्हर यू डू’ आपल्याला समूळ हादरवून टाकते.
डॉनी ऑस्मन्डचे ‘प्रिटी ब्लू आयज’ प्रेमगीत असले तरी अनोख्या रंगातले, ग्लेन कॅंपबेलचा आवाज ऐकला की डोळ्यांसमोर एखादा रांगडा पाश्चिमात्य ही-मॅन शेतकरी उभा राहातो. त्याचे 'आय ऍम अ र्हाईनस्टोन काउबॉय' मला फार आवडे, अजूनही आवडते. अशी गाजलेली पण सुरेल स्थानिक गायकगायिकांच्या आवाजातली गाणी नाताळात घरी ऐकू येत. कार्पेन्टर्स, ‘बॉनी-एम’, ऍब्बास वगैरे समूहांची गाणी होतीच. वेगळ्या चालीवरचे इंग्रजीतले ‘ओ मारिया’ हे गाणे देखील ऐकले.
आईमुलांचे विश्वव्यापी नाते काय वर्णावे! भारतीय असो वा पाश्चात्य. आई ही आईच असते आणि मूल हे मूलच असते. एक छोटा आईच्या आधाराची, प्रेमाची कृतज्ञता आणि तिच्या उपकारांची परतफेड करण्याची इच्छा कशी व्यक्त करतो ते ऐकून आपण हेलावून जातो. जेमी ऑस्मंडचे ’मदर मदर ऑफ माईन’ हे ते गाणे. तेव्हाचा आमचा एक आवडता वाक्प्रचारही आठवला; तोच या गाण्याबद्दल वापरतो. नाही हेलावून गेलात तर अर्धी मिशी उतरवून देईन.
१ जानेवारीला पहाटे सोहळ्याची सांगता होत असे. त्या शाळेचे हे आवार आमच्या घरापासून जेमतेम १०० पावलांवर. ध्वनीवर्धकावरून गाणी थेट आमच्या घरी ऐकू येत. ध्वनियोजना उच्च दर्जाची, अजिबात कर्कश नसल्यामुळे निद्रासाधनेत अजिबात व्यत्यय येत नसे. शब्दचित्र, स्वरचित्र वेगळे, अपरिचित असले तरी मन उंच आभाळात नेणार्या स्वरांचे गारुड तेच होती. रेशीमलकेरी कधी मंत्रजाल पसरत स्वप्नलोकात घेऊन जात ते कळतही नसे.
आता नक्की आठवत नाही पण बहुधा ७१ -७२ साली स्ट्रॅन्डला नवाकोरा मॅकेनाज गोल्ड आला. हा शोलेसारखा भव्य, गाजलेला चित्रपट होता. मी एकपाठी होतो. त्यातले ‘सदर्न’ उच्चारांचे अनेक संवाद मला मुखोद्गत झाले. कोजागिरी, पिकनिक्स अशा सोहळ्यात मला मॅकेनाज गोल्डचे संवाद अणि ‘सिंग मोहम्मद’ वा ‘पलूमा ब्लांका’ म्हणण्याची फर्माईश होत असे. कंपूत कॉन्व्हेटमधले आणखी पाचदहा असत. काहीं मुली पण सामील होत. कोजागिरी असो वा पिकनिक. फर्माईश करतांना कोजागिरीचे चांदणे तरुणाईच्या चेहर्यावर फुले. माझे दोनचार डायलॉग मारून झाले की सिंग मोहम्मद. यात इतर सारे कोरसमध्येस सामील होत. साथीला कोणीतरी बॉंगो तर कोणी माऊथ ऑर्गन आणलेला असे. मधले रॅप फक्त माझे. मुख्य म्हणजे मी सोडून बहुतेक सारे मस्त नाचत. मग कोणकोण एकेक गाणी म्हणत. सारे तल्लीन होऊन सुरात गात चारसहा मात्रांच्या छोट्या ठेक्यावर नाचत. भजन वा आरतीसारखा आरडाओरडा वा वाद्यांचा गोंगाट अजिबात नाही. बाकीची गाणी मला पाठ नव्हती. पण कोरसमध्ये री ओढता येई. पण एकदोन वर्षातच अभ्यास वाढल्यावर या कंपूची पांगापांग झाली.
नंतर बरीच वर्षे मुद्दाम वेळ काढून असे संगीत ऐकणे झाले नव्हते. रेडिओ, चित्रवाणीवर ऐकू येई तेवढेच. कधी हॉटेलात पण कानावर पडे. एकदा नाताळातल्या एका हॉटेलातल्या पार्टीत अतिशय मंद आवाजात ‘केनी जी’ ची कुठली तरी सुरावट लागली होती. आमचा मित्र चिन्या ती धून ऐकून वेडा झाला. पण तेव्हा त्याची सर्वांनी टर उडवली. कुठले तरी काहीतरी फालतू ऐकतो असे मी म्हणालो. तो भयंकर खचकला. पण नंतर संभाषणाचा विषय बदलला. मी एका संगीतकाराबद्दल अनुद्गार काढले म्हणून घरी जातांना मलाच वाईट वाटले. दुसर्याच दिवशी मी केनी जीची ऑडीओ कॅसेट आणली. तोपर्यंत मी मायकेल जॅक्सन, यान्नी वगैरे ऐकले होते पण केनी जीचे नावही ऐकले नव्हते. कॅसेट ऐकून मीही वेडा झालो. चकचकीत सोनेरी सॅक्साफोन एवढे सॅटीनसारखे गुळगुळीत आणि हृदयाला भिडणारे स्वर काढून आभाळात नेऊ शकतो असे वाटले नव्हते. पण कुठे बोललो मात्र नाही. नंतर काही वर्षांनी त्याने संगीत दिलेला टायटॅनिक आला. नंतर कधीतरी अशाच एका पार्टीत विषय निघाला तेव्हा मी केनी जीची थोरवी सांगू लागलो तेव्हा चिन्याने माझे पूर्वीचे उद्गार ऐकवून आता पायातला बूट काढ आणि थोबाडीत मारून घे म्हणाला आणि ते रास्तच होते.
नंतर कॉन्व्हेन्टमध्ये शिकलेला चिरंजीव नवीन इंग्रजी तसेच हिंदी गाण्यांचा आस्वाद घडवत असे आणि अप्रतिम असे नवे काहीतरी कानांना गवसे. ‘बार्बी गर्ल’चा प्रोसेस्स्ड आवाज मनावर अनोखे बालगारुड घालून गेला. ‘ल ल ल ल लाय्ज’ या अनोख्या बडबडगीतात ल च्या उच्चाराचे नानाविध विभ्रम आणि काही शब्दोच्चारांचे खनक कॅलीडोस्कोपमधून पाहिल्यासारखे मस्त श्रवणानंद देतात. अगदी देवांग पटेलची ‘बॉन्गो नंबर फाईव्ह’, ‘पिछाडी पे कुत्ता काटा’ सारखी फटकेबाजी पण मस्त करमणूक करून गेली. ‘ब्राझील’चा गोंगाट मात्र फारसा आवडला नाही. शॅगीचे राकट आवाजातले ‘स्लॅन्ग’ इंग्रजी अर्धवट कळले तरी रॅपमधल्या वेगळ्या विषयांमुळे मजा येते.
‘पलूमा ब्लान्का’ कोणाचे ते आठवत नव्हते. पण आमच्या चिरंजिवाला पाचवीसहावीत ती इंग्रजी कविता होती. त्याचा दुसरी ते नववी घरचा अभ्यास मीच घेतला. ही कविता तालासुरात पण माझ्या नसलेल्या वेगळ्या ऍक्सेन्टमध्ये माझ्याच नरड्यातून नाटकी आवाजात ऐकून त्यालाही गंमत वाटली होती. आत्ता तू नळीवर शोधतांना कळले की जॉर्ज बेकर सिलेक्शनचे होते. आणखी अनेक गाण्यांबद्दल बरेच लिहिता येईल. पण विस्तारभयास्तव काही मस्त पाश्चात्य गाण्यांचे फक्त दुवे खाली देत आहे. अथा तो पॉपसंगीतपुराणम्.
टाय यलो रिबन:टोनी ओर्लॅन्डो: https://www.youtube.com/watch?v=jtDQxJlcUxE
आय ऍम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड: कार्पेन्टर्स: https://www.youtube.com/watch?v=3hyFB6SA7b4
यस्टर डे वन्स मोअर:कार्पेन्टर्स: https://www.youtube.com/watch?v=YTaWayUE5XA
हॉटेल कॅलीफोर्निया: https://www.youtube.com/watch?v=EqPtz5qN7HM
वन वे टिकेट: बॉनी एम: https://www.youtube.com/watch?v=D4y_acTR0MY
फ्रॉम द वर्ल्ड ऑप बॅबिलॉन: : बॉनी एम: https://www.youtube.com/watch?v=ta42xU2UXLA
ब्राउन गर्ल इन द रिंग: बॉनी एम: https://www.youtube.com/watch?v=ywA_aZp1Vd8
मॅम्बो नम्बर पाईव्ह: लू बेगा: https://www.youtube.com/watch?v=bmfudW7rbG0
हू लेट द डॉग्ज आऊट: https://www.youtube.com/watch?v=Qkuu0Lwb5EM
पिछाडी पे कुत्ता काटा: https://www.youtube.com/watch?v=EbPVTxLiKm8
प्रतिक्रिया
31 Dec 2019 - 9:31 am | कुमार१
सुरेख स्मरणरंजन !
.
>>> +११
31 Dec 2019 - 10:04 am | शा वि कु
ऐकतो आता एकेक करून
31 Dec 2019 - 10:34 am | अनिंद्य
सुरेख लिहिले आहे.
जेमी ऑस्मंड नाव वाचूनच गहिवरून आले.
बॉनी एम आमचाही फेव्ह :-)
31 Dec 2019 - 1:39 pm | महासंग्राम
जियो........
31 Dec 2019 - 2:27 pm | गवि
अफलातून. सर्व जुना काळ जिवंत झाला.
धन्यवाद
6 Jan 2020 - 8:20 am | तुषार काळभोर
आणि नॉस्टॅल्जिया...
इंग्लिश पिक्चर आवडीने पाहिले तरी इंग्लिश गाण्यांची गोडी कधी लागली नाही. पण कधी कधी काही गाणी आवडून जातात.
मंगो जेरीचं इन द समरटाईम असच आवडून गेलेलं. वेडिंग क्रॅशर्स (ओह...रशेल मॅकॲडम्स!) सिनेमा पाहताना मध्ये याचा एक तुकडा वाजला आणि गाणं आवडू लागलं.
6 Jan 2020 - 12:06 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
31 Dec 2019 - 7:22 pm | सुधीर कांदळकर
डॉ. कुमारसाहेब, शाविकु, अनिंद्य, महासंग्राम, गवि आणि पैलवान, अनेक अनेक धन्यवाद.
मॅम्बो नं. ५ चा वर दिलेला दुवा चुकला होता.
1 Jan 2020 - 10:57 am | मदनबाण
ऍन्टोनिओ डी’सिल्व्हा हायस्कूल हे ख्रिस्ती लोकांनी चालविलेले कॉन्व्हेन्ट विद्यालय. मुंबईच्या बहुरंगी-बहुढंगी संस्कृतीचा भाग असलेल्या इथल्या पाश्चात्य संगीत, मराठी नाटके अशा नानाविध कार्यक्रमांनी माझ्या जीवनात आगळेच मनमोहक रंग भरले.
ऍन्टोनिओ डी’सिल्व्हा हायस्कूलच्या बाजुलाच असलेल्या पालन सोजपालच्या गॅलेरीत उभे राहताना तिथल्या संगीताचे सुर कानात पडलेले आठवतात ! :)
माझ्या आवडत्या गाण्यांची यादी देउन जातो :-
Snow - Informer (Official Music Video)
Rasputin - Boney M (with Lyrics)
Modern Talking - Brother Louie
Ray Charles - Hit The Road Jack (Original)
Ray Charles - Hit The Road Jack (remastered)
Salt 'N' Pepa - Whatta Man 1994 (feat. En Vogue)
Ini Kamoze - Here Comes The Hotstepper (Remix) (Video)
Will Smith - Gettin' Jiggy Wit It (Official Video)
Laura Branigan - Self Control 1984
Vanilla Ice - Ice Ice Baby (Official Video)
Shaggy - It Wasn't Me (Official Music Video)
Kula Shaker - Govinda (Official Video)
Spice Girls - Wannabe
Aserejé (The Ketchup Song) [Spanish Version] - Las Ketchup
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganapathi Bhajan | Sooryagayathri, Niranjana
1 Jan 2020 - 11:26 am | गवि
बाकी सर्व गाणी सुपरहिट आहेत, पण कुलशेखर उर्फ कुला शेकरचं "गोविंद जय्या जय्या , गोपाला जया जया, राधारम्मन्ना हरी गोविंद जय्य जय्य" हे गाणं लिस्टीत पाहून तुम्ही हार्डकोअर पहिल्या भारतीय MTV पिढीचे आहात हे कळलं.
1 Jan 2020 - 8:00 pm | मदनबाण
तुम्ही हार्डकोअर पहिल्या भारतीय MTV पिढीचे आहात हे कळलं.
अगदी बरोबर ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganapathi Bhajan | Sooryagayathri, Niranjana
2 Jan 2020 - 8:57 am | सुधीर कांदळकर
पाल्न सोजपालमधून नाताळमधली हीच गाणी ऐकणारे कुणीतरी आहे हे पाहून छान वाटले. दादर सोडल्यावर मग नाताळमधली गाणी ऐकणे कधी झालेच नाही. आपण दिलेल्या दुव्यापैकी शेवटची सात आवडली. शॅगीचे ऑडीओ माझ्याकडे आहे. मी फक्त ऑडीओ ऐकतो.
धन्यवाद. माहितीत भर घातल्याबद्दल गविं नाही धन्यवाद.
2 Jan 2020 - 2:02 pm | श्वेता२४
पॉप संगीत कधीही ऐकत नाही. त्यामुळे या लेखाला पास.
4 Jan 2020 - 6:52 pm | मुक्त विहारि
खूप मोठ्या आनंदाला मुकाल.
https://youtu.be/3ij_pUtJJrw
हे गाणे ऐका आणि मग ठरवा.
3 Jan 2020 - 5:50 am | पहाटवारा
मस्त ... पॉप बीनाका गीतमाला ..
एक एक सम्गीतप्रकार घेउन एक लेखमाला होउन जाउदेत ..
4 Jan 2020 - 6:52 am | सुधीर कांदळकर
दखल घेतल्याबद्दल धन्यवाद श्वेताताई.
@पहाटवारा: अनेक, अनेक धन्यवाद.
4 Jan 2020 - 11:12 am | नूतन
(संगीत हे संगीत असते. भाषेच्या सीमा पार करून हृदयाला भिडणारे)
अगदी खरं!
लिंक दिल्यामुळे ऐकता येईल.
4 Jan 2020 - 6:52 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
5 Jan 2020 - 6:39 am | सुधीर कांदळकर
नूतनजी धन्यवाद.
@मुवि: डान्सिंग क्वीनच्या दुव्याने अनेक आठवणी जाग्या झाल्या. छोट्या मुलींचे हे तेव्हा आवडते गीत होते. अनेक वर्षांपूर्वी एका सोहळ्यात ब्रेबॉर्नसमोरच्या अॅम्बॅसॅडर हॉटेलच्या फिरत्या सज्जात बसून 'स्क्रू ड्रायव्हर.बरोबर चमचमत्या क्वीन्स नेकलेसचे दृश्य मनात साठवत असतांना हे गीत ऐकू आले होते. अनेक अनेक धन्यवाद.
5 Jan 2020 - 7:27 pm | मुक्त विहारि
ह्यांनी खूप पार्टीत महत्वाचा सहभाग घेतला होता, आहे आणि घेतील.
ABBA ने सुरूवात करायची...Boney-M ने दुसरा अंक आणि मग उत्तर रात्री तलत मेहमूद आणि जोडीला सिंगल माल्ट....स्वर्ग म्हणजे हाच...