बालकथा -लाडकं पाखरू
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवस चांगला वर आला होता . दिन्या आळोखे - पिळोखे देत उठला . उठल्याबरोबर त्याने उशापासली गलोल चाचपली .
दिन्याची आई चुलीपाशी बसली होती . उन्हाळ्याचे दिवस होते . गरम होत होतं अन चुलीपाशी तर जास्तच .तिने दिन्याला पाहिलं व ती म्हणाली , “ दिनू , लवकर आवर बाळा . मला शेतात जायाचं .बा गेलाय ना फुडं .”
दिन्या तोंड धुवून आला . आईने पुढे ठेवलेला चहा त्याने घाईने प्यायला व आईच्या हाकांकडे लक्षही न देता तो त्याची गलोल घेऊन बाहेर पळाला .
“ दिनू , आरं कुठं भिरभिरतो रं पाखरावानी - थांब तरी जरा . भाकरतुकडा खा की , “ आई म्हणाली .
पण दिन्या पळालाच . खरं असं कधी होत नसे . तो आईचं सगळं ऐकायचा , तिला सगळं - सगळं सांगायचा . मग आज ? -
आजची गोष्ट वेगळी होती .
आई हाक मारत होती तरी तिच्याकडे लक्ष न देता दिन्या बाहेर पडला. तो हातातली गलोल गरगर फिरवत चालला होता. गलोलीसारखे त्याचे विचारचक्रही चालू होते .
आज त्याची आणि शंकरची स्पर्धा होती. काल रात्री मारुतीच्या देवळापुढे त्यांची स्पर्धा लागली होती. सकाळी पुन्हा देवळापाशी भेटायचं ठरलं होतं. दिन्या आणि शंकर दोघेही गलोल चालवण्यात तरबेज होते .
-- पण दोघांमध्ये कोण भारी ?... त्याचा फैसला आज मारुतीरायाच्या साक्षीने व्हायचा होता . जणू काही , जो मागे पडेल , त्याच्या टाळक्यात मारुतीराया गदाच घालणार होता . तशी बाकीची पोरं होतीच , दोघांना चढवून द्यायला .
सावळासा , लुकडा दिन्या देवळाजवळ पोचला. पोरं वाटच बघत होती.
“ लई येळ केला . म्हणलं , येतोस का न्हाई ? का घाबरून बसलास घरातच “ शंकर खिजवून म्हणाला .
“ हूँ !” दिन्या म्हणाला व देवळाच्या पायरीजवळ गेला. त्याने समोरच्या बलदंड , शेंदरी मारुतीला तिथूनच हात जोडले. आंघोळ केलेली नव्हती ना ! ...
देवळात लावलेल्या उदबत्त्यांच्या धुराचा वास नाकात भरून घेत तो मागे वळाला . त्या वासाने त्याला प्रसन्न वाटायचं.
दिन्याने त्याच्या खाकी हाफपॅन्टमधून गलोल काढली. तिच्या रबराशी चाळा करत त्याने समोर नजर वळवली. समोर आंब्याचं एक झाड होतं. कैऱ्या लगडल्या होत्या. हिरव्यागार , छोट्या - मोठ्या कैऱ्या. त्यांचा वास हवेत पसरलेला.
त्या डेरेदार, दाट पानांच्या आंब्यांकडे पहात दिन्या म्हणाला, “ मन्या, चल दाखव.”
मन्याने एका कैरीकडे बोट दाखवले मात्र-
दिन्याच्या दुसऱ्या खिशातून दगड गलोलीवर चढला कधी आणि ती कैरी धप्पदिशी खाली पडली कधी, कळलंच नाही
दिन्याने विजयी नजरेने शंकरकडे पाहिलं. शंकर फक्त हसला.
नंतर एकेक मुलगा एकेक कैरी दाखवत राहिला व दिन्या ती - ती कैरी पडत राहिला. प्रत्येक वेळेला शंकर गालात हसत होता,
दांडगट शंकर आज वेगळीच कला आत्मसात करून आला होता !...
त्याने पलीकडच्या लांबच्या झाडावर गलोल रोखून दगड सोडला. त्या झाडावर बसलेला पोपटांचा थवा उडाला . त्यांच्या लांबलचक हिरव्या शेपट्या हवेत लहरत होत्या. तयारीत असलेल्या शंकरने दुसरा दगड सोडला. अन- त्या थव्यातला एक पोपट क्षणात उलटा होऊन जमिनीवर पडला . गतप्राण होऊन !
शंकरने गर्वानं साऱ्या मुलांकडे पाहिलं.
“ हे “ करून सारी पोरं ओरडली.
“ उडत्या पाखराला टिपलं शंकरनं ,” गणू म्हणाला.
“ भारी ! दिन्यापेक्षा भारी ! “ नामा म्हणाला.
“ चल, दाखव तुजाबी नेम, “ पक्या म्हणाला.
पण दिन्या तिथून निघालाच. खाली मान घालून. हरल्यासारखा! जणू तो दगड त्या पोपटाला नाही तर त्याला स्वतःलाच लागला होता.
त्याला ठाम वाटत होतं - उडतं पाखरू टिपायला आपल्याला जमणार नाही.
इतका राग आला होता. इतका अपमान झाल्यासारखं त्याला वाटत होतं. एका क्षणाला तर त्याने गलोल भिरकावून दिली. मग त्याच्या डोळ्यांत पाणी आलं . त्याने परत झुडपात फेकलेली गलोल शोधली. कुठे जावं ते त्याला कळत नव्हतं...तो चालत राहिला.
समोरून त्याला आई येताना दिसली. ती दळण घेऊन घरी चालली होती.
“ दिन्या...” आईने हाक मारली,
त्याने आईकडे लक्षही दिलं नाही.
“ आरं, घरी जा की - भाकर तर खा , “ आई म्हणाली.
तर तो पाण्याच्या दिशेने पळतच सुटला. आईला त्याचं वागणं कळेचना . ती विचारात पडली. पण तिलाही उशीर झाला होता. ती झपझप पाय उचलत चालू लागली.
दिन्या सरळ चालत पाण्यापाशी आला. तिथे एका बाजूला दाट झाडी होती. त्या पलीकडे मातीचा लांबवर पसरलेला पट्टा होता. लाल मातीचा. त्यापुढे अथांग पाणी होतं. पानशेत धरणाचं उलटं फिरलेलं अफाट पाणी. त्या बॅकवॉटरच्या सान्निध्यात दिन्याचं चिमुकलं गाव वसलेलं होतं .
समोर पसरलेल्या निळ्याशार पाण्याकडे पहात दिन्या चालत होता . त्याच्या पायाने लाल माती उडत होती , तर त्याच्या डोक्यात गलोलीतून सुटलेल्या दगडासारखे विचार भणभणत होते .
‘ आपल्याला उडतं पाखरू टिपता येत नाही , काय करावं बरं ? मोप तयारी करायला पाहिजे .
शंकरने तरी थव्यातल्या पोपटांपैकी एकच पोपट टिपला. आता अशी तयारी करायची - अशी तयारी करायची की एक तर एक पाखरू टिपता आलं पाहिजे.’
आकाशातून एक निळ्या चमकदार पिसांचा खंड्या पक्षी बाणासारखा पाण्यात झेपावला . तो पाण्यातून बाहेर येताना त्याच्या बाकदार चोचीमध्ये एक मासा होता .
“ वा रे खंड्या ! अस्सा नेम पाहिजे , “ दिन्याने त्या खंड्याचं कौतुक केलं . पण ऐकायला तिथे कोणीच नव्हतं . त्या परिसरात तो एकटाच होता .
मग दिन्याने गलोल उंचावून त्या खंड्यावरच रोखली . दगड सोडला . पण दगड त्याला ना लागता नुसताच खाली पाण्यात पडला . चुबुक आवाज करत , पाण्यामध्ये तरंग उमटवत .
‘ नेम चुकला . आपण जमिनीवर असल्याने चुकतोय का ? असं करू या, आंब्याच्या झाडावर बसू या.म्हणजे पक्षी नजरेच्या टप्प्यात येतील. सुरवातीला अशीच तयारी करायला पाहिजे.’
तो दाट झाडीमध्ये शिरला. तो त्याच्या आवडत्या आंब्याच्या झाडावर चढला. आंबा बहरला होता. हिरव्या-हिरव्या कैऱ्यांचा आंबटगोड वास पसरला होता. समोरून साळुंक्यांची एक जोडी उडत होती .
दिन्याला छान जागा मिळालेली होती. अन तो बसलेला सहजपणे कोणाला कळण्यासारखं नव्हतं.
दिन्याने दगड चढवला. गलोल ताणली. डावा डोळा बारीक केला. अर्जुनासारखा तो एकाग्र झाला.
‘पण पक्ष्यांना का मारायचं ?’
त्याने गलोल खाली केली. साळुंक्या त्याच्या टप्प्यातून उडत निघून गेल्या. तो त्यांच्याकडे नुसताच पहात राहिला. मग त्याने तो विचार झटकला. समोर एक बुलबुल उडत होता. छोटासा, काळ्या रंगाचा, शेपटीखाली मोठा लालबुंद ठिपका असलेला.
त्याने पुन्हा गलोल ताणली, नेम धरला.
‘ कैरी पाडणं वेगळं, पेरू पाडणं वेगळं. जिवंत पक्ष्याला का मारायचं ? त्याचा उगीच जीव घ्यायचा?
जाधव गुरुजी सांगतात कि निसर्गात प्रत्येक जीवजंतू महत्वाचा आहे. ही एक निसर्गाची साखळी आहे. प्रत्येक जीव दुसऱ्यावर अवलंबून आहे. कुठलाही प्राणी दुसऱ्याला उगा मारत नाही. फक्त माणूसच स्वतःच्या मजेखातर पशु-पक्षांना मारतो. निसर्गाचा नाश करतो. निसर्गसाखळी टिकायला पाहजे. निसर्ग जपला पाहिजे. पूर्वी वैशाखात वणवे लागायचे. आजकाल माणसं स्वतःच्या फायद्यासाठी जंगलांना आगी लावतात. गुरुजी सांगतात भारी!- पोरांनो , हे म्हणजे कोळसा पाहिजे म्हणून स्वतःचं घर जाळून घेण्यासारखं आहे.
मग आपल्या नेमबाजीच्या कौशल्यासाठी पक्षी मारायचा ? त्या शंकऱ्यापेक्षा भारी ठरण्यासाठी हे असलं काम करायचं ? छट !
आपणसुद्धा कोणावर तरी अवलंबून आहोत .... आईवर... आणि आई ? ती आपल्यावर अवलंबून नाही- तिचा आपल्यावर जीव आहे ! आपण तिचे लाडके आहोत !’
आईच्या आठवणीने त्याचं विचारचक्र तुटलं. त्याला वाईट वाटलं. सकाळी त्याने आईकडे नीटसं लक्षही दिलं नव्हतं. त्याने गलोल खाली केली. एक लालबुड्या बुलबुल नाजूक आवाज करत लांबच्या झाडावर गेला. त्याला बरं वाटलं. बुलबुल पक्षी त्याचं लाडकं पाखरू होतं.
‘ शंकऱ्या भारी तर भारी. पण ही पक्ष्यांना मारायची कला आपल्याला नको. जाधव गुरुजी एवढ्या तळमळीने बोलतात ,ते काय उगाच होय ? त्यांचं बोलणं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे.’
त्या विचाराने त्याला हलकं हलकं वाटू लागलं. तो समोर पसरलेल्या निळ्याशार पाण्याकडे, पिवळसर गवताने मढलेल्या मागच्या डोंगराकडे पहात राहिला. लख्ख ऊन असल्याने सारं कसं स्वच्छ दिसत होतं. त्या झाडावर बसून त्याला समोरचं दृश्य न्याहाळायला खूप आवडायचं. आज तर, समोर नुसतं पहात बसावं असं त्याला वाटू लागलं . तो त्या निसर्गात जणू हरवून गेला.
त्याचे विचार गाडीच्या आवाजाने तुटले.
खाली लांबवर मातीमधून एक उघडी जीप येत होती. तिचा वेग अतिशय कमी होता. गाडीतल्या लोकांचे कपडे भारी होते, शहरी होते. जीपसुद्धा स्पेशल होती, खास बनवून घेतलेली. गाडी चालवणाऱ्याने डोक्यावर हॅट आणि गॉगल घातलेला होता. दुसरा आडदांड उभा होता. उघड्या अंगावर त्याने नुसतं काळ्या रंगाचं हाफ जॅकेट घातलेलं होतं. आणि - त्याच्याकडे छर्र्याची , एअरगन होती.
जॅकेटवाला पट्टीचा नेमबाज होता. त्याने बंदूक उचलली व पाण्यात झेपावणाऱ्या खंड्याकडे रोखली.दुसऱ्या क्षणाला सूंई...करत गोळी निघाली. खंड्या पाण्यात कोसळला. पुन्हा पंख न उघडण्यासाठी. छर्रा वर्मी लागला होता. नेम अचूक होता.
“वा उस्ताद !” गाडी चालवणारा म्हणाला.
दिन्याने डोळे विस्फारले.
‘ हा शंकऱ्याचा मोठा भाऊच दिसतोय !’
बंदुकीच्या आवाजाने झाडीतून पोपटांचा थवा हवेत झेपावला.
त्याने बंदूक रोखली. पुन्हा.
त्याचवेळी- त्याचवेळी दिन्याने चड्डीच्या खिशातून दगड काढला. गलोलीवर चढवला. मनात मारुतीरायाचं स्मरण केलं.- जय बजरंगा ! अन दगड सोडला सण ण ण ...!
उडतं पाखरू टिपता येत नसलं तरी दिन्याही चांगला नेमबाज होताच.
दगड बंदुकीच्या दस्त्यावर बसला. तो खाली पडली. लगेच दिन्याने ठरवून दुसरा दगड मारला. तो बंदूकवाल्याच्या अंगठ्याजवळ बसला. त्याचा हात भणभणला व नंतर सुजला. आता दोन दिवस तरी त्याला बंदुकीचा खटका दाबता आला नसता, पक्ष्यांना मारणं लांबची गोष्ट !
“ कोण आहे रे ?” तो विव्हळला.
हॅटवाल्याने अपशब्द उच्चारत इकडे तिकडे पाहिलं. गर्द पानात बसलेला दिन्या त्यांना दिसणं शक्यच नव्हतं. ते गाडीतून खाली उतरले .
एव्हाना दिन्या झाडावरून उतरून मागच्या मागे पळाला होता. आनंदाने, समाधानाने. आज त्याने बरेच पक्षी वाचवले होते ! ...
उदबत्तीचा वास आल्यासारखं त्याला प्रसन्न वाटत होतं. तो पळत होता तरी रस्ता संपतच नव्हता.त्याला लवकर घरी जायचं होतं. आईच्या गळ्यात पडायचं होतं आणि सगळं सांगायचं होतं.
सकाळी आईकडे लक्षही दिलं नव्हतं. त्या साऱ्याची भरपाई करायची होती आता - आईकडून लाड करून घ्यायचा होता.
तोही तिचं’ लाडकं पाखरू ‘ होता ना !.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाताळच्या सुट्टीनिमित्त मुलांसाठी कथा
प्रतिक्रिया
30 Dec 2019 - 10:04 pm | शा वि कु
गोष्ट खूप आवडली.
31 Dec 2019 - 7:29 pm | छोटा चेतन-२०१५
छान वाटली कथा
2 Jan 2020 - 12:06 am | सुचिता१
खूप छान!! वेगळ्याच विषयावर आहे गोष्ट, मुलांना विचार करायला प्रेरित करते.
5 Jan 2020 - 6:46 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी आभारी आहे
6 Jan 2020 - 7:12 am | प्रमोद देर्देकर
तुमच्या गोष्टी खूप छान असतात लहान मुलांना प्रेरणा देणाऱ्या.
तुम्ही शिक्षक आहात काय ?
9 Jan 2020 - 9:47 pm | बिपीन सुरेश सांगळे
प्रमोदजी
आपली- मी शिक्षक आहे का ? ही प्रतिक्रिया आवडली .
खूप आभारी आहे.
मी शिक्षक नाही . पण लिहिण्याची आवड आहे.
पुन्हा आभार