ह्या भागाला सिकन मटन फिस पार्ट २ असे म्हणायला हि हरकत नाही.
माझ्या कलाक्षेत्र च्या आठवणी लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत. कलाप्रेमींचे ते तीर्थक्षेत्र ...पवित्र आणि निसर्गरम्य जागा. अगदी समुद्राच्या जवळ असल्याने रात्री लाटांचा आवाज आणि खाऱ्या पाण्याचा (मासोळी बाजारात येणारा) वास घेत रात्रीची झोप लागायची. सगळीकडे समुद्र काठची बारीक रेती, उन्हा मध्ये गरम रेती वर चालले कि पायाला नॅचरल मसाज व्ह्यायचा. संध्याकाळी ७. ३० ला रात्रीचे जेवण झाले कि आम्ही थोड्या वेळ समुद्राचे गार वारे खात आकाशाकडे बघत बसायचो. मनाला इतका शांत त्यानंतर कधीच वाटलं नाही. आता इतक्या वर्षानंतर जाणवत आहे कि केवढं विचारपूर्वक बनवलेला वातावरण होते ते. आहार आणि विहार सात्विक त्यामुळे तो कलेमध्ये उमटत होता. आम्हा मुलींना नेहमी साडी किंवा पावडा दावणी (साऊथ इंडियन स्टाईल ची हाफ साडी) आणि मुलांना चक्क लुंगी नेसावी लगे. त्याला ते वेष्टी असे म्हणतात जे ऐकायला लुंगी पेक्षा खूपच भारदस्त वाटते. ह्या सर्व गोष्टींचा मनावर साकारात्मक परिणाम होत होता. पण हे त्यावेळी कळत नव्हते.
आत्ता नुकतीच टिव्ही वर आपल्या पंतप्रधानांची चेन्नई ला भेट आणि त्यांच्यासाठी आयोजित केलेला नृत्याचा कार्यक्रम बघितला आणि सगळ्या आठवणी तोच लयबद्ध ठेका धरून नाचू लागल्या. त्या कार्यक्रमात नट्टूङ्गम (ताल) वाजवत होत्या त्या निर्मला अक्का मला पहिली २ वर्ष शिकवायला होत्या. आणि बाकीचा वाद्यवृन्द पंधरा वर्षांपूर्वी होता तोच... परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन ( अगदी मोहोब्बतें स्टाईल) त्यात काहीही बदल जाणवला नाही. मी शिकत असताना हि अशीच मोठी माणसे कलाक्षेत्र ला भेट द्यायला येत होती आणि आम्ही त्यांच्या साठी कला सादर करत असू. एकदा इंग्लंड ची राणी एलिझाबेथ अली होती त्या वेळचा अनुभव असाच खास होता. त्या खास कार्यक्रमाला साऊथ चे दिग्गज कलाकार पण उपस्थित होते. वैजंतीमाला ला पाहिल्यावर खूप मोठा धक्का बसला होता. सिनेमात दिसणारी वयजांतीमाला आणि इतका भपकेबाज मेकअप केलेली व्यक्ती एकच आहे हे पटत नव्हते.... असो
हॉस्टेल मध्येच वेगवेगळ्या राज्यातले सण पारंपरिक पद्धतीने साजरे करता आले. दिवाळी ला आमचे हॉस्टेल असेच असंख्य दिव्यांनी उजळून निघाले. सकाळी सकाळी आम्हाला हॉस्टेल च्या वॉर्डन ने डोक्याला कसले तरी चिकट तेल लावले आणि वाटीभर शिकेकाई दिली. त्या शिकेकाई ने तेवढा चिकट आणि डोक्यावरून निथळून डोळ्यांच्या पापण्यांवरून गालावर ओघळलेले तेल निघत नाही हा धोक्याचा संदेश सिनिअर्स कडून आधीच मिळालेला होता. त्यामुळे शिकेकाई चा मस्त उताण्या सारखा वापर केला. खरंच छान घरघुती पद्धतीने केलेले उटणे असेच असते. शाम्पू ची बाटली अर्धी झाली तेंव्हा केसाचा चिकटपणा कमी झाला. दुपारच्या जेवणाला काय होते आठवत नाही पण पायसम असावे बहुदा. मला दुधाचे पदार्थ आवडत नसल्याने मी खाल्ले नसावे. कलाक्षेत्र मध्ये जेवणात तास फारसा फरक कधीच नसे. नाही म्हणायला आमचे डायरेक्टर जेंव्हा गेले तेंव्हा त्यांच्या प्रसादाच्या जेवणात बुंदी चे लाडू हॉस्टेल मध्ये दिले होते. एरवी मी नेहमी मला हा पदार्थ नको आहे, कुणाला हवा आहे का असे खास विचारून त्यांच्या साठी घेऊन येत होते. कारण एका मुलीला एकच लाडू मिळत होता. बुंदी च्या लाडवा साठी मात्र सगळ्यांना विचारले होते कुणाला नको असेल तर माझ्यासाठी घ्या म्हणून :) तर तात्पर्य हे कि अशा पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केली होती. त्या विरुद्ध ओणम खूप धुमधडाक्यात साजरा केला होता. हॉस्टेल मध्ये मल्याळी मुलींची संख्या पण खूप होती त्यामुळे ते साहजिकच होते. एका खोलीत त्यांनी सगळे पितळी दिवे घासून पुसून लखलखीत करून ठेवले होते. रात्रीच कुणाकुणाला दर्श घायचे आहे त्यांची नावे घेऊन ठेवली होती. मी पण उत्साहाने नाव नोंदवले. मला वाटले सकाळी उठून अंघोळ करून साडी नेसून जायचे दर्शनाला... पण आम्हाला रात्री रूम चे दरवाजे लॉक करू नका असे सांगितले होते. मग पहाटे ५ ला एकेक मुलीला हाताला धरून दर्शनाला घेऊन जात होते. आमच्या हॉस्टेल च्या तेंव्हा ३ बैठ्या इमारती होत्या. म्हणजे डोळे बंद करून चाचपडत जायला एका मुलीला ५ मिनिटे लागत होती. पण पहाटेचा प्रसन्न वातावरणात डोळे बंद करून निमूटपणे चालत राहिल्यानंर आम्हाला एका बंद खोली जवळ आणले आणि एकटीलाच आत सोडले. अद्भुत आणिअविस्मरणिय वातावरण होते. संपूर्ण खोली शांत तेवणाऱ्या समयांनी भरून गेली होती. सोबतीला मोगऱ्याचा सुवास आणि मोठ्या आरश्यामध्ये दिसणारं तेजाने उजळलेलं माझंच प्रतिबिंब. ते दिवस हि तसेच स्वतःकडे बघून भारावण्याचे असले तरी हा अनुभव काही औरच होता. आणि त्या दिवसाची आठवण आज इतक्या वर्षांनी हि तशीच ताजी आणि आल्हाद देणारी आहे. नंतर अंघोळ करून सगळ्या जणी जागोजागी फुलांच्या मोठमोठ्या रांगोळ्या काढतात. त्यानंतर संध्याकाळी सगळ्या जणी सेटट मुंडू (खास केरळी पद्धतीची पांढरी साडी) नेसून कैकोटकली, कोल्कली असे नृत्याचे प्रकार खेळले जात. मी खेळले असे लिहीत आहे कारण हे प्रकार जसे आपल्याकडे फुगडी, झिम्मा ह्याप्रकारात मोडणारे आहेत.
आणखी एक सण मुली खूप मोठ्या प्रमाणात साजरा करत होत्या तो म्हणजे शिवरात्री चा उपास. खरं तर हॉस्टेल मध्ये साजरा करण्यासारखे काहीच नसले तरी सगळ्या नॉर्थ इंडियन मुलींसाठी हा खूप मोठा सण होता. चांगला वर मिळावा म्हणून ह्या मुली दिवस भर पाणी सुद्धा ना पिता उपास करायच्या. आणि त्याच काळात आमचे प्रोग्रॅम्स असायचे त्यामुळे एवढ्या प्रॅक्टिस च्या अतिश्रमात सुद्धा त्या जिद्दीने उपास करायच्या. मी त्या उपासाच्या कार्यक्रमात माझे नशीब अजमावायला अजिबात गेले नाही. चांगल्या वराच्या नादात मी वर जायचे त्यापेक्षा खाऊन पिऊन मिळेल तो वर चांगला मानून ( चांगला बनवून ) घेऊ असे तेंव्हाच ठरवून टाकले होते. संध्याकाळी सगळ्या मुली छान नटून थटून कपालेश्वर च्या देवळात जाऊन येऊ. जाताना सगळ्या जणी शिस्तीत जात असू, येताना एकदा का हॉस्टेल च्या हद्दीत आलो कि मग खूप धमाल मस्ती, गाण्याच्या भेंड्या खेळत यायचो.
माझ्या ४ वर्ष्याच्या कारकिर्दीत मला भेटण्याच्या आणि त्यानिमित्ताने तिरुपती बालाजी चे हि दर्शन ह्या दुहेरी हिताचा विचारून करून बरेच जण भेटून गेले. आमच्या घराण्यात नृत्य शिकणारी पहिली मीच त्यामुळे सगळ्यांना भयंकर कुतूहल, काही कळों ना कळों. हॉस्टेल मध्ये एकाच फोन होता जो डायनिंग हॉल मध्ये ठेवला होता. तेंव्हा आमच्या घरी फ आला नव्हता त्यामुळे आई बाबा महिन्यातून एकदा बाहेर STD बूथ वर जाऊन फोन करायचे. गल्लीमध्ये एक कुत्रा भुंकायला लागला कि कशी आसपासची सगळी कुत्री भुंकायला लागतात तसे एक मुल्गी आरती फोन कॉल म्हणून ओरडली कि सगळ्या माझ्या नावाने शंख करत सुटायच्या. धापा टाकत फोन घेतल्यावर पहिली दोन मिनिटे काही सुचायचे नाही. त्यापेक्षा मला पत्रं वाचायला फार आवडायची. ४ वर्षात खूप छान आठवणीनी ओसंडून वाहणारी पत्रे मी गोळा केली आहेत. आजोबांची पत्रे अगदी सविस्तर आणि सगळ्यांची खुशाली कालावणारी असायची तर मैत्रिणींची विचारू नका. इतका फापट पसारा असायचा कि पत्र लिहून पाकीट चिकटवून झाल्यावर पुन्हा काही तरी सुचायचे मग बंद पाकिटावर पण मजकूर लिहिलेला असे. पोस्टमन ला काय मजा येत असेल वाचायला नाही? माझी चुलत भावंडे मुंबईची. काकू चे शिक्षण पुण्यात झाल्याने त्यांचे मराठी इतर मुंबैकरांपेक्षा बरेच बरे होते. काकु घरी मराठी ची शिकवणी घ्यायची आणि आमची तुफान करमणूक व्हायची. असाच एक किस्सा माझ्या भावाने पात्रातून लिहून पाठवला होता.
सहावी सातवी च्या मुलांना अचानक, भयंकर असे शब्द वापरून वाक्ये तयार करायला सांगितले होते. त्यावर एका मुलाने हे पुढील वाक्य लिहिले होते -
एक बाई बाजारातून घरी आली आणि अचानक तिला बाळ झाले...... आता लिहिताना पण मला हसू येत आहे. वाक्य बरोबर आहे का नाही हे विचारायचे राहूनच गेले. तुम्हीच सांगा ह्या वाक्याला मार्क द्यावे कि नाही?
तेंव्हा १४ फेब्रुवारी चं फ्याड नसलं तरी बऱ्याच मुलींना त्यांचे मानलेले भाऊ भेटायला यायचे.... वॉर्डन ला पण माहिती असायचे कि दक्षिणी लोकांमध्ये वाटते भावाशी लग्न हा नवीन प्रकार नाही त्यामुळे अशा भेटी फक्त रविवारी सकाळीच चालू शकायचा. माझे बाबा रेल्वे मध्ये असल्याने त्यांना नेहमीच प्रवास करावा लगे. असेच एकदा त्यांना आठवण अली माझी म्हणून सरळ हॉस्टेल मध्ये भेटायला आले. वॉर्डन ला वाटले माझा असाच मानलेला भाऊ आहे समजून तिने सांगितले कि रविवर शिवाय भेटायचे नाही. नशिबाने माझ्या मैत्रिणीने बघितले आणि ती सांगत अली कि तुला भेटायला कुणी तरी आले आहे. मी धावत पळत जाऊन बघितले आणि बाबांना बघितल्यावर वॉर्डन ला समजावून सांगितले. एन्नोड अप्पा, म्हणजे माझे वडील सांगताना चे फीलिंग काही औरच आहे...
सगळ्या साबण, क्रीम आणि पावडर च्या जाहिराती फिकीय पडल्या असत्या असा सीन होता :) आणि मम्मी म्हणून गळ्यात पडणाऱ्या ३ वर्ष्याच्या मुली ऐवजी बाबा म्हणून धावत येणारी षोडश वर्षीय मुलगी म्हणजे मी होते. मग मी आणि बाबा बाहेर गेलो आईस्क्रीम खायला घालून मला पुन्हा हॉस्टेल सोडून बाबा परत गेल्यावर सगळ्या जणी माझ्याकडे कुतूहलाने बघत होत्या कि तुझे बाबा अजून केवढे यंग दिसतात.
कलाक्षेत्र चा परिसर हि खूप रम्य होता. आमची सकाळची प्रार्थना एका मोठ्या वडाच्या झाडाखाली व्हायची. झाडाचा बुंधा म्हणजे असंख्य पारंब्यांचा जळिदार पिंजरा झाल्यासारखा दिसे. बुंध्याच्या पायथ्याशी गणेश ची चॅन मूर्ती आहे आणि रोज तिला नवीन हार आणि गंध लावले जाई. आम्ही पण सकाळी आले कि आधी गणपती पुढे हात जोडून मग जागेवर येऊन बसत होतो. उन्ह्याळ्याच्या सुरुवातीला खूप छान हवा पडायची. झाडाखाली प्रार्थना सुरु असायची आणि वाऱ्याच्या मंद झुळुकीने असंख्य पाने सळसळत अंगावर पडायची... ह्याच वेळी तलावात पांढरी कमळे उमलायची. असाच एक गणपती हॉस्टेल मध्ये डाईनिंग हॉल च्या शेजारी पण होता. त्याचे दर्शन मी रोज सकाळी नाश्ता च्या वेळी घायचे. हॉस्टेल मध्ये रोज सकाळी ७. ३० ला प्रार्थना आणि मग नाश्ता असायचा. सकाळच्या वेळी बऱ्याच मुली गाण्याचा सराव करायच्या. पहाटेच्या शांत वातावरणात ते गाण्याचे सूर साखरेसारखे विरघळून जायचे. उरायचा फक्त गोडवा. मला गाणे झेपणारे नाही हे मला पहिल्या दिवशीच कळून चुकले होते पण जाहिरातीच्या भडिमारामुळे कसा मनावर परिणाम होतो तसेच मला ह्या गानकोकिळांमुळे झाले होते. त्यांचे गाणे ऐकून मला हि उगाच आपल्यालाही गाता येते असे वाटे. त्यातूनच बाथरूम सिंगिंग चा जन्म झाला. कलाक्षेत्र सुटले तसे बाथरूम सिंगिंग चा पण आजार बारा झाला:)
आमचे कॉलेज सोमवार ते शुक्रवार पूर्ण दिवस आणि शनिवार अर्धा दिवस असायचे. शुक्रवारी आम्हाला खूप तासून काढले जाई. त्या दिवशी त्या दिवसापर्यंत जे काही शिकवले आहे ते सगळे करवून घेतले जाई. आम्ही त्याला मार्गम असे म्हणायचो. सकाळी मागं झाले कि हॉस्टेल वर येऊन गार पाण्याने अंघोळ करून जेवायला जायचो. मग दुपारच्या सेशन मध्ये थेअरी किंवा तालम चा सराव असे. शनिवार फक्त भारतातली लोकनृत्य शिकवली जायची त्यामुळे शुक्रवारचा मार्गम नीट पार पाडला कि आठवडा पदरात पडल्याचे सुख होते. ह्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागत, उदाहरण द्यायचे झाले तर सुरुवात ५० उंच उड्या मारून व्हायची. यात जर कुणी ४५ व्या उडी ला थांबले तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. त्यामुळे माझ्यामुळे इतर मुलीना त्रास नको हे डोक्यात फिट्ट बसले होते. तेंव्हा वाटायचे कि हे काय मिलिटरी शिक्षण आहे का पण शिस्तीचे महत्व तेंव्हा कळले नाही तरी ते तसेच अंगवळणी पडले आणि त्याचा फायदा हि होत आहे. कलाक्षेत्र मध्ये भरतनाट्यम बरोबरच कर्नाटकी संगीत, वीणा, व्हायोलिन, मृदंगाम, बासरी, कालमकारी, चित्रकला हि शिकवली जाते. जर कुणाला कलाक्षेत्र ला भेट द्यायचा योग्य आलाच तर त्या कालमकारी च्या दालनात अवश्य जा. तर अशा रीतीने शुक्रवारच्या ह्या अतिश्रमानंतर सगळे शिक्षक पण जरा थोडे निवांत होत. दुपारी झालाच तर हलका फुलका नृत्याचा प्रकार किंवा बसून गप्पा, तालम किंवा अवांतर चर्चा केली जाई. कलाक्षेत्र चे स्वतःचे एक ऑडिटोरियम पण आहे. तिथे आमचे शिवण कलेचे किंवा कशिदा काढण्याचे तास व्हायचे. क्लास ला जात येताना आमचे गुरु आणि सिनिअर्स तिथे सराव करताना दिसायचे. तेंव्हा कधी एकदा आम्हाला त्या स्टेज वर जायला मिळेल ते वाटत होते. सुदैवाने मला ती संधी पुढे खूप वेळा मिळाली आणि त्यासाठी मी देवाची आणि माझ्या गुरूंची कायम ऋणी आहे.
प्रतिक्रिया
25 Oct 2019 - 8:03 am | कंजूस
मी गेलो नाही इथे पण वाचनामुळे चेन्नई - महाबलिपुरम रस्त्यावरचे कलाक्षेत्रम नाही ना ही शंका आली. खरी ठरली.
पण तिकडे चार वर्षे शिकायला जावे लागण्याचे कारण काय होते?
कलाक्षेत्रम यास एखादे तमिळ नाव का ठेवले नाही? कला पुरम वगैरे?
25 Oct 2019 - 8:25 am | यशोधरा
छान लिहिलेय, पण थोडे शुद्धलेखन सांभाळले तर अधिक उत्तम.
25 Oct 2019 - 9:37 am | मृणमय
डोक्यात अनेक भाषांचा गोपाळकाला सुखाने नांदतो आहे, मराठी बोलताना सुद्धा कित्येक शब्दांची अदलाबदल होते, मग लिखाणाचे तर कर्म कठीण काम.
तरीही नेटाने पुढे जात आहे. पुढे काही लिहायचा योग आलाच तर काही टिप्स असतील तर नक्की सांगा.
25 Oct 2019 - 8:55 am | विजुभाऊ
वेगळा अनुभव वाचायला आवडला.
25 Oct 2019 - 9:03 am | पलाश
फार मस्त लिहिता आहात. या आठवणी वाचायलाही इतकं छान वाटतं आहे तर अनुभव किती सुंदर व आगळा असेल याची कल्पना करते आहे. :)
ओणम दिवशीचं लखलखतं दर्शन अतिशय आवडलं.
निर्विवादपणे छान लेखन पण लेख प्रकाशित करण्यापूर्वी एकदा वाचलात तर किरकोळ चुका टाळणे शक्य होईल असे वाटते.
25 Oct 2019 - 9:26 am | मृणमय
एकदा प्रकाशित केल्यावर सुधारणा करता येतात का? कशा?
मी इनपुट साधने वापरात आहे मराठी टायपिंग साठी. सोपे आहे टायपिंग पण बरेच वेळा खूप ऑपशन्स येतात एकाच शब्द साठी आणि योग्य ऑपशन सिलेक्ट नाही केला तर पहिला ऑपशन आपोपाप सिलेक्ट होतो जो बरेच वेळा चुकीचा असतो.
25 Oct 2019 - 9:57 am | पलाश
प्रकाशनानंतरच्या सुधारणेविषयी माहीत नाही.
मी IDC, IIT, Mumbai यांचं स्वरचक्र मराठी अॅप वापरते. अॅप, अॅपल असे केवळ "अ" या अक्षरावर चंद्रकोर लिहिताना थोडं विचित्र दिसणं वगळता कुठलीही समस्या आली नाही. सरावानं टायपिंगही जलद होतं. हे वापरून पहा असं सुचवावंसं वाटतं. अॅपचा वापर करण्याविषयी यूट्यूब व्हिडीओ उपलब्ध आहेत.
25 Oct 2019 - 9:41 am | सुधीर कांदळकर
स्मृतीपुष्पांचा भरगच्च गुच्छ झकास आहे. काही प्रसंग खास वाटले आणि आवडले. उदा तेवत्या समयांच्या खोलीतले आरशातले प्रतिबिंब, बाबांना ओढीने भेटायला जाणे, ते इतर मुलींना तरुण वाटणे, बाथरूम सिंगिंग. वृक्षाखालची पारंब्यांची जाळी आणि सर्वात छान ते प्रार्थनेवेळचे वृक्षाचे सळसळणे आणि अंगावर पर्णवृष्टी होणे.
भावविभोर आनंदाचा सुरेख प्रत्यय दिलात. धन्यवाद.
25 Oct 2019 - 1:17 pm | अनिंद्य
सुंदर चित्रदर्शी आठवणी आहेत. खासकरून ओणम पहाटेचा अनुभव वाचून प्रसन्न वाटले.
..... बाई बाजारातून घरी आली आणि अचानक तिला बाळ झाले.... खूप हसवले यानी, मी तर पैकीच्या पैकी मार्क दिले असते :-))
25 Oct 2019 - 10:51 pm | सुचिता१
तुम्ही कलाक्षेत्राची छान सफर घडवून आणली. शैली पण ओघवती आहे. आठवणींचा जणू खजिना च आहे तुमच्या कडे.
अचानक बाळ झाले, वाचून हहपुवा झाली. अश्याच लिहीत रहा.
पुलेशु.