जमेल तितक्या वेगाने गाडी पळवत मी पलाश मार्गावर पोचलो. तिची कार तिथेच बंद अवस्थेत उभी होती. माझ्या उरात धडकी भरली. मी जवळ गेलो आणि जीवात जीव आला. ती आत बसली होती. मोबाईल कानाला लाऊन. मी बाहेरून खिडकीवर मध्यमा आणि तर्जनीच्या पाठमोऱ्या बाजूने टकटक वाजवलं आणि ती चांगलीच दचकली. काहीतरी बोलली आनंदानी. मी तिला काच खाली घ्यायची खूण केली आणि तिने सरळ दार उघडून मला घट्ट मिठी मारली. घामाघूम झाली होती अक्षरश:
"बरं झालं आलास. तुझा फोन का लागत नव्हता रे? किती घाबरले होते! बघ गाडी बंद पडली अचानक."
त्या पक्याला मी सोडणार नाही. मागच्या वेळी माझी गाडी बंद पाडली. तेव्हा लाल ड्रेस वाली मुळे मिळालेली अर्धी शक्ती मी बंद पडलेली टूव्हिलर ढकलत ढकलत घरापर्यंत नेण्यातच खर्च केली. मी मागच्या वेळी काहीच केले नाही. पण यावेळी मात्र हद्द झाली. हिच्या सोबत असं वागण्याची हिंमत कशी झाली त्याची? मी कडेच्या झाडाखाली नजर टाकली. पण तिथे नेहमी सारखा पक्या खिदळत उभा नव्हता. नाहीतर झाडांची पानं वेडीवाकडी हालली असती. वारा घोंगावला असता तिथे. पण सगळं शांत होतं.
मी तिला शांत करून बाजूला करणार तितक्यात डोळ्यांसमोर एक आकृती चालत पुढे येऊ लागली. मानवी नव्हती इतकं जाणवतंय न जाणवतंय, ती आकृती आमच्या बाजूला येऊ लागली. मी खविस, मुंजा, हडळ, भूत, चेटकीण वगैरे कशालाही घाबरत नाही. पण आत्ता घाबरला आहेस की नाही विचारू नका. पण ही आकृती..... ही आकृती खविस, मुंजा, हडळ, भूत, चेटकीण वगैरे पैकी कोणाचीही नाहीये, हे नक्की. तिने मला खूप घट्ट धरून ठेवले होते. मिठी सैल करायलाही तयार नव्हती. तिच्या पाठीमागून येणारी आकृती तिला दिसली नाही म्हणून. नाही तर..... मगाशी निव्वळ कल्पनेने घामाघूम झाली होती ती! आकृती पुढे येत राहिली. खूप जवळ आली. मी सुळे बाहेर काढले. माझी प्रतिष्ठा? आमची मैत्री? माझं गुपित? पण आत्ता तिचा जीव महत्त्वाचा होता. आणि त्या करता जे करणे योग्य आहे तेच करतो आहे मी.
आकृती आणि आमच्यात अगदीच फुटभर अंतर उरलं होत. तिला बाजूला करत मी सरळ त्या आकृतीवर झेपावलो. ती जोरात किंचाळली. आकृती नाही.... ती..... माझी मैत्रीण.
च्यामारी! पाठीतून निघालेली कळ डोक्यात गेली. त्या आकृतीच्या नाही ओ..... माझ्या! मी रक्त पिण कमी केलंय तेव्हापासून शक्ती कमीच होते आहे माझी. त्या आकृतीने मला झेलल्यासारखे करून जोरात खाली आपटले होते. किती तो क्रूरपणा!
बास! आता तू जे काही आहेस, मी तुला सोडत नाही. मी उठून त्या आकृतीच्या अंगावर सर्वशक्तीनिशी धावून गेलो. आणि ती आकृती अदृश्य झाली.
आता रस्त्यावर आम्ही चौघेच होतो. मी, माझी बाईक, तिची कार आणि घाबरलेली ती.
मी मागे वळून तिच्या जवळ आलो तशी ती घाबरली. मला घाबरली. मला!
मागे सरकत सरकत ती बॉनेटवर धडकली.
जोरात किंचाळली, म्हणाली, "दूर रहा..... दूर रहा."
"खौवलौन.... खौवलौन..."
"क.... क.... काय?"
मरायला ओठात काय रुततय? हात्तीच्या.... सुळे आत घ्यायला विसरलो होतो.
मी सुळे आत घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर भिती कमी आश्चर्य जास्त दिसू लागलं.
"कुल डाऊन..... कुल डाऊन"
इतके दिवस सोबत असूनही मला ओळखू शकली नाही म्हणल्यावर तिला तिची बौधिक पात्रता कळून दु:ख होणं सहाजिकच आहे.
"हे.... हे.... स्वप्न आहे ना?"
बघा..... मी हिच्या प्रेमात पडूच शकत नाही. पटलं ना तुम्हाला? बुद्धी आणि कॉमन्स सेंस दोन्हींचाही तुटवडा आहे तिच्याकडे. आणि वर त्याचा जरासाही न्युनगंड नाही.
"आपण निघूया का?"
"काय? म्हणजे?" ती गोंधळून बघत राहिली.
मी बाईकला चावी विसरलो होतो. बाईक रस्त्याच्या कडेला लावली आणि चावी काढून तिच्या कारच्या ड्रायव्हरजवळच्या सीट वर बसलो. ती माझ्याकडे नुसतीच बघत उभी होती तोंडाचा 'ऑ' आकार करून.
"आत ये."
ती कशी बशी ट्रायव्हर सीटवर बसली. माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती.
"चावी."
"अं?"
"अगं चावी फिरव. पोचायचय ना शहरात उद्यापर्यंत?" मी जमेल तितक्या नाजूक आवाजात बोलत होतो पण तिची नजर मला अस्वस्थ करून सोडत होती.
"हं." ती नुसती माझ्याकडे बघत राहिली विस्फारलेल्या नजरेने.
"मी चालवू गाडी?"
"अं?"
"मी चालवू गाडी?" ड्रायव्हिंग व्हिल फिरवण्याची ॲक्षन करून दाखवत मी पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"हं." तिने ठेकाच घेतला होता "अं? हं." चा. दुसरा शब्द तिला या परिस्थितीत कसा सुचणार होता म्हणा!
मी उठून तिच्या बाजूचा दरवाजा उघडला तरी ती माझ्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत बसली होती हात ड्रायव्हिंग व्हिलवर ठेवून.
"बाहेर येतेस?"
ती बाहेर आली तसा मी आत बसलो आणि ती तशीच बाहेर उभी राहीली माझ्याकडे बघत.
"अगं बस ना."
ती इतकी घाबरून पाहत होती की क्षणभर माझ्या हातात M9Aच्या रेंजच रिव्होल्व्हर आहे आणि तिला मी किडनॅप केलय असा भास मला झाला.
ती कार मध्ये शेजारच्या सीटवर बसली आणि मी कार शहराच्या दिशेने पळवत ४थ्या गिअरवर टाकली.
"जरा.... जरा...थांबवतोस का?" कितीतरी वेळानंतर तिने काहीतरी नीट बोलण्याच्या प्रयत्न केला हे पाहून मला जरा बरं वाटलं. सामान्य माणूस चालेल पण अतिसामान्य घाबरट मैत्रीण नको मला. मी गाडी कडेला घेतली. तिने उतरून बाटलीतल्या पाण्याने चेहरा धुतला. खूप वेळ एका जागी बसून एक्स्लरेटर पायाने दाबत बसलो होतो. अवघडल्यासारखं झालं होतं. पाय मोकळे मी ही करायला उतरलो.
"ते.... तू.... म्हणजे...." ती माझ्याकडे बघून काहीतरी विचारायचा प्रयत्न करत होती.
तिच्याकडे अनेक प्रश्न असणार होते.... पण माझ्याकडे उत्तरे कुठे होती? इतका ब्लॅंकली तर मी शाळेतल्या कुठल्या व्हायवाला पण सामोरा गेलो नसेन. ती प्रश्नांचा भडीमार करणार!
"बोल."
"तू.... तू.... व्ह... व्ह... व्हॅम... "
मी होकारार्थी मान हलवली.
"आणि तो पलाश मार्ग...."
"हं."
"म्हणजे तुझ्या घरातल्या त्या फ्रिजमधल्या लाल बाटल्या रेड वाईन च्या नव्हत्या."
मी नकारार्थी मान हलवली. "मी...."
"कुठल्याच प्रकारच अल्कोहोल घेत नाही...... म्हणला होतास तू मला." ती पुटपुटली, "मला वाटलं थाप मारत असशील." विचार करत ती माझ्याशेजारी बॉनेट वर टेकून उभी राहिली.
"ते....कोण होतं आज आपल्यावर हल्ला करणार, माहिती आहे?"
"माहिती नाही."
"म्हणजे?"
"आजच पहिल्यांदा पाहिलयं आज मी त्या आकृतीला."
"मग माझ्या मागे तिथे कसा आलास आधीच? फोन तर उचलला नव्हतास तू माझा."
"बाकीच्याही अनेक शक्ती आहेत तिथे त्रास द्यायला."
"ज्यांना तू अजिबात घाबरत नाहीस..... त्या खरचं आहेत तिथे?" एक भुवई उंचावून काही अर्थपुर्ण नजरेने बघत तिने मला विचारलं. मी शांत.
"तू.... हे कधी पासून आहेस?"
अरे यार..... काय उत्तर देऊ? माझं मलाच माहित नाही. आणि ही काय MBBS ची डिग्री होती का सगळीकडे सांगत मिरवायला? आता जस डॉक्टरच बिल पाहून लोकांचं हृदय जोरजोरात धडधडत तसेच माझे सुळे पाहूनही धडधडत इतकंच काय ते साम्य! मी अन्नाकरता पैसे खर्चून बनलेलं रक्त पितो आणि डॉक्टर तेच रक्त आटवून कमावलेला पैसा खातात! असो. मी उत्तर न देता नुसतं तिच्याकडे पाहिलं.
"तू.... तू..... मारतोस लोकांना?"
"नाही. ते स्वतःहून मरतात." मी उपरोधाने म्हणालो.
"काय?"
"अगं काय गं, इतके प्रश्न विचारते आहेस, तुला भिती नाही वाटतेय आता माझी?"
"नाही. तुझा हेतू मला मारण्याचा असता तर तू ते कधीही करू शकला असतास. कितीतरी वेळा आपण एकटे गप्पा मारत बसायचो तेव्हा, मी माझ्या घरात एकटी असायचे तेव्हा, काही क्षणांपूर्वी त्या रोडवर आपण होते तेव्हा....... अगदी मी शहरात जातेय असं तुला सांगायला आले तेव्हाही, आणि आत्ताही खरतर. माझ्याकडे कोणते वेपन तर आत्ताही नाहीये आणि इथे कोणी वाचवायलाही नाही....... पण मी अजून जिवंत आहे. म्हणजे निदान मी तरी सुरक्षित आहे तुझ्यासोबत नै का?"
ही काय मला हिंट देते आहे? पण ना ती माझं सावज आहे आणि ना प्रेयसी. मी तिच्या कडे पाहिले. इमोशनली बोलत होती. तिच्या नजरेत माझ्या बद्दल विश्वास वगैरे दिसू लागला होता. माझ्यावर माझे खरे रूप पाहिल्यावर विश्वास ठेवणारी पहिलीच व्यक्ती होती ही. मी उगाच भारावून वगैरे गेलो.
"किंबहुना, तुझ्याच मुळे जिवंत आहे. आज तू नसतास तर........! थॅंक्यु." तिने भावपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहिले.
मी नजर चुकवली. "निघूयात? उशीर होईल नाहीतर."
गाडी सुरू करून मी रस्त्यावर सुसाट सोडली. खरतर आधी मी तिने शहरात जाऊ नये या मतावर ठाम होतो. 'का' काय? गावात पोल्युशन कमी आहे.... नाही पटलं? मग तिथली लोकं खरी घुबडं असतात. म्हणजे रात्री सुद्धा झोपत नाहीत. पब काय, पार्ट्या काय.... तिथल्या माझ्यासारख्यांचे निव्वळ हाल होत असणार. सावज एकटे मिळणार कसे? तिथे तर ब्लड बॅंकांनासुद्धा स्विस बॅंकेसारखी टाईट सिक्युरिटी असते म्हणे. झाले का वांदे! इसीलिए, (उसका) शहर में रेहेना (मेरे) स्वास्थ्य के लिये हानिकारक हैं! आणि मी तिच्या सोबत असणे गरजेचे आहे...... असे बघू नका. तुम्ही पाहिलेत ना किती मंद मुलगी आहे ते? आज एका पिशाच्चावर विश्वास ठेवते आहे. मग उद्या दुसऱ्या कोणावरही ठेवेल. सिक्युरिटी म्हणून म्हणतो आहे मी!
पण आता गावात राहणे तिच्याकरता योग्य नाही. आणि आज तिने जे पाहिले त्यानंतर तर नाहीच नाही. ती शहरात आणि मी गावात बरा!
हे काय! मी मगाच पासून बघतोय! गेली १५ मिनिटं आम्ही त्याच फुटक्या स्ट्रीट लॅम्प च्या खालून जातो आहोत. तेच पिंपळाचं झाडं, तेच गोलाकार वळण, तोच हिरवा फलक, माझी पार्क केलेली टूव्हिलर सुद्धा दिसली मला!
शट्ट..... चकवा लागलाय! मी गाडी खर्कन ब्रेक दाबत थांबवली आणि.... आणि.... मला गरगरतंय..... डोळे मिटून थोडावेळ.... बरं वाटेल कदाचित!
माहिती नाही किती वेळ झोपलो होतो! डोळे उघडून किलकिले करून नजर फिरवली तर समोर.... समोर ती आकृती उभी होती. ए, जे कोण असशील ते..... मी अजिबात घाबरत नाही तुला! एक मिनिटं माझे हात.... लोखंडाचा थंड स्पर्श झाला. मी शहारलो.
"काय हवयं तुला? काय साध्य होणारेय मला बांधून?"
"माझं सावज." आकृतीचा आवाज घुमला आणि मी घाबरून इकडे तिकडे पाहिले. ती कुठेच दिसत नव्हती. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला.
"काय केलसं तू तिच्यासोबत?" मी किंचाळलोच.
"नाटक करू नकोस. आधी मला सांग कुठे लपवलंस तू तिला?"
हुश्श! म्हणजे ती याच्या तावडीत सापडली नव्हती. मी सगळं बळ लावून लोखंडी गज तोडायचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! मगाशी हा मलाही जुमानत नव्हता. म्हणजे हा.... तोच! इतकी शक्ती नृशंस कडेच आहे. आता काही खरं नाही. आजवर त्याची शिकार मी २-३ वेळा पळवली होती. आता तो ऐकणार नाही. निदान ब्लड बॉटलचा एक डोस तरी घ्यायला हवा होता. शक्तीच नाहीये अंगात! त्या अंधारात डोळ्यांसमोर नसणारे काजवेही चमकू लागले. मला जोशी बाईंचा डबा आठवू लागला..... ताज्या रक्ताची चव आठवू लागली.... अगदी ऑफिसच पेंडींग कामही आठवू लागलं.... आणि.... आणि ती सुद्धा! मैत्रीण म्हणून कदाचित!
"ती माझी शिकार आहे. मला आणून दे नाहीतर....." ती आकृती म्हणाली.
"नाहीतर काय? बोल ना.... काय करशील नाही आणून दिलं तर? पिशाच्चाची हत्या करता येत नाही, नृशंस. विसरतो आहेस तू." मी सुळे बाहेर काढले आणि रागाने लाल डोळे करून साखळदंड ओढून त्याच्यावर धावून जाण्याचा विफळ प्रयत्न केला. खरतर खेळण्यातली बंदूक दरोडेखोरावर रोखण्यासारखा मूर्खपणा होता हा. सोबत राहून सतत तिच्याशी गप्पा मारल्याने तिच्या बुद्धीकमतरतेचा परिणाम माझ्यावरही झाला की काय?
"सुर्यकिरणांबद्दल काय मत आहे?" त्याने माझा खराखुरा विक पॉईंट पकडला होता. हा असा अर्धवस्त्र मी (घरातून हाफ् पॅंट आणि विदाऊट कॉलरचा स्लिवलेस टीशर्ट घालून बाहेर पडलो होतो घाईत.) आणि वरती तळपणारा सुर्य असं भयावह दृष्य माझ्या डोळ्यासमोर येऊ लागलं. हा नृशंस मला जिवंत जाळण्याची उघड धमकी देत होता आणि मी असहाय्य! लाक्षागृह आठवले. समोर साक्षात दुर्योधन! विदुर काका..... मला वाचवा!
हे फार मनावर घेऊ नका. विचित्र बरळत असलो तरी परिस्थिती काही साधी सरळ नव्हती. आणि त्यात.....
"सोड त्याला."
मला वाटलं होतं तिला किमान बुद्धी का होईना आहे. पण माझ्या अपेक्षांवर पाणी फिरवायचा ठेकाच घेतलाय तिने. ही का आली परत इथे ? मी वळून आवाजाच्या दिशेने पाहिले आणि.... तिथे ती नव्हतीच.
समोर एक सामान्य आकारापेक्षा मोठ आणि प्रकाशमान वलय दिसत होत. पण आवाज तर.....
"तू?" नृशंस घाबरला. चक्क नृशंस!
काही निमिषांतच तो प्रकाशमान झोत प्रकाशाच्या वेगानेच नृशंस पर्यंत पोचला आणि त्याच्यावर आदळला. आघात झाल्यावर नृशंस खाली पडेल असे वाटत होते पण तो प्रकाश नृशंसच्या कणाकणात भिनू लागला. नृशंसचे विचित्र वेडेवाकडे आवाज वातावरणात पसरले आणि स्पोट झाल्यासरशी सारा रस्ता लख्ख प्रकाशात न्हायला. मी डोळे उघडले तेव्हा नृशंस नव्हता आणि प्रकाशसुद्धा.
आता समोर ती उभी होती आधी दिसायची तशी. मी तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिलो.
"ॲंक्यु!" मी त्यातही मॅनर्स सोडले नाहीत.
"सुळे." तिने नजरेने खूणवत सांगितले.
"ऑ" मी पुन्हा सुळे आत घ्यायला विसरलो होतो.
"हे.... हे.... काय झालं आत्ता?" मी भांबावल्यासारखं विचारलं, "तू.... तू...."
"तुला कधीच जाणवलं आजपर्यंत?"
एक मिनिटं..... काही वेळा पूर्वी हेच मी तिला संबोधून.....
"मी एकटी राहायला आले अश्या परिसरात ते ही एकटी. पलाश मार्गाची आणि पडक्या वाड्याची कुख्याती ऐकून सुद्धा. तरी संशय नाही आला तुला?"
तिला निदान माझा संशय तरी आला होता. पण मी पूर्णत: अनभिज्ञ होतो तिच्या या शक्ती पासून.
"हे बघ, मला खरचं काही समजलं नाही. मला नीट सांग."
"तु जेव्हा 'खविस, चेटकीण वगैरे वगैरेला घाबरत नाही' म्हणायचास ना, तेव्हाच कळलं होतं तुझं ज्ञान."
"म्हणजे?"
"म्हणजे अश्या काही योनी आहेत ज्यांना तू खूप घाबरतोस हे आज दिसलं मला." तिने स्मित केलं.
मी गांगरून तिच्याकडे बघत होतो!
"नृशंस! मला वाटलं माझ्याशी असलेल्या वैरामुळे कोणी तुझ्यावर हल्ला करेल....."
"पण त्याचं वैर माझ्याशीच होतं."
"आणि तू नक्की आहेस कोण?"
तिने नुसतचं माझ्याकडे पाहिले.
"चेटकीण?"
"अंहं"
"हडळ?"
"अंहं"
"भूत"
"नाही."
"पिशाच्च तर तू नाहीसच. मग कोण आहेस?"
"मानव!"
"काहीही काय? आणि खरचं तसं असेल तर ही शक्ती?"
"लहानपणापासूनच आहे. कशी आली माझ्याकडे, माहित नाही पण आज्जी म्हणायची तू देवदूत आहेस."
माझ्यासाठी तर आहेसच. मी मनात म्हणलं.
"मी वापरत नाही गरज पडल्याशिवाय."
"आणि नृशंस?"
"मुंजा, खवीस, हडळ..... गायब झालेत काही दिवसांपासून.... नै का?"
"हो. म्हणजे जाणवलं मला...."
"नृशंस कुठे वेगळा आहे या सगळ्यांपासून?'
"तो तर...."
"पिशाच्च आहे.... तुझ्यासारखा."
तिने माझ्याकडे अर्थपूर्ण नजर टाकली. माझ्या मनात भितीची लहर उठली. मी स्तब्धपणे निश्चल उभा राहिलो. खरे तर, मी सुटण्याचा प्रयत्न करायला हवा. पण मी तो प्रयत्न आधीच करून पाहिला होता. आणि आता प्रयत्न करायची इच्छाच मेली होती..... प्रयत्न करायची की तिथून सुटायची? मीच गोंधळलो.
"नाईलाज होता गं..... माझं शरीर अन्नापासून रक्त बनवायला असमर्थ आहे. रक्त प्राशन करूनच जगता येतं पिशाच्चांना. माझा खरचं नाईलाज होता." मी काकूळतीला आलो होतो.
"माझाही आहे!" तिचे शब्द माझ्या कानांत घुमले. आणि वातावरणात निशब्द शांतता पसरली क्षणभर. तिच्या नजरेला दु:खी किनार होती.
"पण.... म्हणजे...."
"गावकऱ्यांना या आपत्तीपासून वाचवण्याचे वचन दिले होते मी मंदिरात." तिचे डोळे पाणावले होते. पण चेहऱ्यावर निर्णयाचा ठामपणा होता.
"पण मी आता नाही मारत लोकांना. किंबहुना मी बंद केलयं ते केंव्हाच." मी म्हणालो. पण यात गयावया नव्हती.... खरचं नव्हती. संवाद साधायचा होता केवळ मला तिच्याशी. तिला सांगायचं होतं.... की मी बदललो आहे. मान्य करायच होतं.... की जोशी बाईंचं भविष्य खोटं नव्हतं. आकंठ प्रेमात बुडालोय मी तुझ्या. हे माहित असून की कदाचित काही क्षणांमध्ये तोच सुर्यप्रकाशाच्या तीव्र वलयांचा मारा तू माझ्यावर करशील आणि मी ही त्या नृशंसासारखा......! पण या वेळी मला तुझ्या नजरेत सहानुभूती पहायची आहे. मला विश्वास हवा आहे की बाकी काहीही बदलू दे.... तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना शिल्लक आहेत. अगदी मित्र म्हणून का असेना! माझ्या मनात आहेत त्याच्या एकांश तरी आहेत. नाहीच तर निदान तुझ्या आठवणींत तरी मला तू वितभर जागा देशील ना?
माझं गुपित.... माझी प्रतिष्ठा.... आपलं नातं.... माझ्याजवळ काही नाही राहिलं तरी तुझ्याशी बोलायची तळमळ मात्र अजून तशीच आहे. अस्तित्व संपण्याआधीची तळमळ! मी तुला खरं सांगितल्यानंतर आणि तू नकार देण्याआधी पर्यंतचे क्षण मला जगायचेत. कारण त्यावर हक्क आहे माझा. निदान मित्र म्हणून, माझी शेवटची इच्छा म्हणून तरी तितकासा वेळ देऊ शकशील?
मनात सगळं सुरु होतं. पण बोललो काहीच नव्हतो.
तिनेच शांतता भंग केला, "मला वाटलं होतं नृशंस माझे शेवटचे ध्येय आहे या गावातले. पण..... मला हे रूप दाखवायला नको होतंस रे तू. आजवर मुद्दाम दुर्लक्ष केलं मी प्रत्येक पुराव्याकडे.... जो हे सिद्ध करतो की तू मानव नाहीस. मुद्दाम लांब ठेवलं मी स्वतःला त्या शंकेपासून..... जी सुचवत होती तू पिशाच्च आहेस. का आलास तू इथे? सगळं संपणार होतं व्यवस्थितपणे. पण......" काही क्षण ती बोलायची थांबली. मी तिच्याबाबतीत सफशेल चुकलो होतो.
ती खरचं खूप बुद्धीवान आहे आणि संवेदनशील सुद्धा. खूप विचार करते ती सगळ्या गोष्टींचा. तेही योग्य समतोल राखून! पण.....
पण मला मारून शिक्षा नक्की कोणाला देणार आहेस तू? मला कि तुला स्वतःला? जमेल तुला मला मारणं? हात नाही थरथरणार? हृदय नाही कापणार? ते क्षण नाही आठवणार जे आपण तासनतास गप्पांमध्ये घालवले?
मला आठवतंय.... तू मला म्हणली होतीस, माझ्यासारखा मित्र तुला कधी मिळाला नाही. मी तुझा बेस्ट फ्रेंड् आहे, वगैरे.... ते खरं होतं ना? मनापासून होतं ना?
"मी प्रार्थना करेन तुझ्याकरता. पुन्हा जन्म घ्यावा लागलाच तर मनुष्य योनीत मिळावा. मानपूर्वक आणि सम्मानपूर्वक आयुष्य मिळावं! आणि लोकांचे शाप लागतील असं काही तुझ्या पदरी पडू नये."
मी तिच्याकडे बघत राहिलो...... खरं होतं तिचं. किती लोकांचे बळी घ्यावे लागले भुकेपायी? भूक नैसर्गिक होती पण मी त्या पायी केलेल्या हत्त्या? त्या कुठे योग्य होत्या? शेवटी पाप ते पापचं. मी कितीतरी घरे बेवारस केली होती, कितीतरी जणांना अनाथ बनवलं होतं. सगळं हिशोबाच्या पलिकडचं होतं. जवळच्यांची वाट पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये केवळ त्यांच्या जवळच्या माणसांच्या प्रेतांचे प्रतिबिंब भरून त्यांच्या आयुष्याला नरक बनवलं होतं. थंड रक्तावर मिटवलेली शेकोटी पुन्हा गरम ताज्या रक्ताची आहुती मागणार नाही कश्यावरून?
कधी, कुठून, कसा आपल्याला मृत्यू शोधून काढेल आणि घड्याळ दाखवत चल म्हणेल, कुणी सांगावे? आणि आता मी ही त्याच मृत्यूच्या समोर उभा आहे.
अंकगणित फिरली होती. कधी कधी शुन्याने गुणण्याऐवजी तो शून्य अंकाने पाठीमागे चिटकावून घ्यावा. स्वतःची किंमत वाढावी म्हणूनच नाही केवळ.... पण शुन्याशी गुणले जाऊन आपणही शून्य बनायला नको म्हणूनही.
पण.... जर त्या शुन्यामुळेच ती सम संख्या बनून २ने भागली गेली तर? त्या मुळसंख्येचे अस्तित्व राहिलंच कसे? मग नकोच अट्टाहास. गुणून टाक एकदाचे. अस्तित्व संपणारच असेल तर होऊनच जाऊ दे संहार आत्ताच्या आत्ता. मृत्यू पेक्षा भयंकर त्याची असहायतेने वाट पाहाणे असते. नको घालवूस वेळ वाया.
सगळं मनाच्या पटलांवर उमटतं होतं. पण मी निशब्द उभा होतो. तसही..... ही पश्चात्तापाची आग सुर्यकिरणांपेक्षा कमी दाहक कुठे आहे!
तिने हातांना गोलाकारात फिरवले. एक प्रखर प्रकाशवलय तयार झालं. मी पाहिलंय हे आधी. पण आता उष्णतेचा दाह जाणवतो आहे. तिच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते. मृत्यू यावा तेही इतक्या सुंदर रुपात? मोहिनी आठवली. तिच्या हातून अमृत काय विष प्यायलाही तयार व्हावं दैत्यांनी! आधी वाचली होती, ऐकली होती. आज पाहिली सुद्धा!
प्रकाशवलय जवळ आलं..... उष्णता... असह्यता.... तीव्र प्रकाश... दाहकता! आणि मनात वेगळेच काही उमटू लागले.......
गर दस्तक मौतभी देदे, तेरा हाथ थाम के दरपर
उसकाभी कर दू स्वागत, तू चाहे उस मंजरपर!
ये चांद तेरे मुखडे का........ आSSSSह्ह्ह!!
शरीराच्या प्रत्येक कण जळत होता. मी असह्य होऊन फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. तुम्हालाही कळालं असेल की किती मूर्खपणा होता तो ते! पण त्या त्या वेळी आपण तसे तसे रीॲक्ट होतो. व्यर्थच असले तरीही. आणिविचार करायला वेळ असतोच कुठे?
आग त्वचेतून हाडापर्यंत पोचू लागली. आssssह!!! दाह वाढला. शरीराचा प्रत्येक कोपरा व्यापला होता आगीने.
कातडीने केंव्हाच साथ सोडली होती आणि काहीच वेळात सगळं शांत! शांत? एक मिनिटं. मला खरचं जाणवत नाहीये काहीच. प्रकाश आहे सभोवताली. जो आता हळूहळू मावळतोय त्या शरीरात. कोणत्या काय? ते बघा खाली झाडाला बांधलेले शरीर. अधाशीपणे अंधाराने प्रकाश प्यावा तसा सामावून घेतय प्रकाशाला आणि विरोधही करत नाहीये. पुढच्याच क्षणात दोंन्ही गुप्त!
माझ्या चेहऱ्यासारखा चेहरा आहे त्या शरीराचा बहुदा. बहुदा? अहो, माझाच आहे तो चेहरा....... म्हणजे माझाच देह होता तो!!! कश्यावरून काय? ते बघा समोर ती आहे ना. माझी देवदुत. रडताना पण क्युट दिसते. जाऊन डोळे पुसू? पण स्पर्श तर मी कशालाच करू शकत नाहीये.
ती निस्तब्ध उभी होती. आता तिथे केवळ लोखंडाचे साखळदंड झाडाला विळखा घालून पडलेले होते. तिथे थांबण्याजोगे काहीही उरले नसावे. गाडीची चावी फिरवून तिने गाडी पडक्या घराकडे वळवली. पण मग मी इथे काय करू? या झाडावर बसून राहू? एकटा?
मग मी काय म्हणतो, ती इतकी सुंदर दिसते तर त्यावर एक शायरी लिहू का? पण लिहिणार कश्यावर? आणि त्याची व्यवस्था केलीच तरी सुचत तर काही नाहीच्चेय. मेंदू पण सोडून आलोय ना मी शरीरासोबत. पण म्हणे कविता मनापासून होतात. मुक्तछंद ऐकवू?
अंतर आहे सुंदर तेथे एकांताला अंत नसे
अश्रू गाळे चंद्र असा का? पडली त्याला भ्रांत दिसे!
हा मुक्तछंद नाही बहुदा! पण आवडलंय माझं मलाच! कोणाला ऐकवणार आहे मी इकडे हे पण? आणि ऐकणार कोण? रातकिडे की काजवे? समोरच..... अगदी समोरच एक भूत शांतपणे बसलं होतं माझ्या पलिकडच्या झाडावर. त्याला ऐकवूयात? पण माझ्या माहिती प्रमाणे तो स्वतः कवी होता आणि त्याला कोणीतरी सलग २० कै च्या कै कविता ऐकवल्याने त्रासून त्याने आत्महत्या केली होती म्हणे. खरं-खोटं देव जाणे! जाऊ द्या. सरळ मागच्या गर्द झाडीच्या वनात गेलो उडत उडत. म्हणजे मला आता वजनच नाहीये. त्यामुळे अधांतरी म्हणू शकता. तिथे काजव्यांचे थवे पानांवर विसावले होते. आणि त्यामुळे झाडांची पाने स्वतःच चमकत आहेत असा भास निर्माण झाला होता. त्यांचा प्रकाश एकत्रितपणे अधिकच मनमोहक दिसत होता. हे सौंदर्य पाहायचे राहूनच गेले होते. मग काय? आधी सावजावर लक्ष ठेवावं लागायचं! अजून एक बरं आहे की इकडे पक्या नाही आता. प्रत्येक गोष्टीत ठांग आडवायचा तो.
बघा.....जोशी बाईंचे म्हणणे खरे नसते प्रत्येकवेळी. मी एकदा मजेत म्हणालो होतो की मला मध्यरात्री काजवे पाहायला जायचे आहे. तेव्हा जोशी बाई म्हणाल्या "हे असे छंद आहेत म्हणूनच तुमच्या भाग्यरेषेत भयंकर गोष्टी दिसतात मला. काळजी पोटी सांगते हो, वनात जाऊ नका मध्यरात्री वगैरे. गावात काय काय सुरु आहे सध्या कल्पना आहे ना?" मी ही ऐकवले.... मी खविस, मुंजा, हडळ, चेटकीण वगैरे कश्यालाही अजिबात घाबरत नाही. (आणि आता इथे त्यातलं कोणीही नाही!) शेवटी मी काजव्यांचे थवे पाहिलेच. तेही मध्यरात्री. जोशी बाईंचे म्हणणे डावलून!
तुम्ही असे बघू नका माझ्याकडे. मुळात तुम्हाला आता मी दिसत नसणारच पण तरीही तुमची नजर कळते बरे मला. एकदाचे ठरवूनच का टाकत नाही की तुम्ही नेमके कोणाच्या पक्षात आहात! माझ्या की जोशी बाईंच्या? ? आणि माझ्या नसालं तर मी..... मी.... मी..... माझ्या शेजारच्या झाडावरील कवीला धाडून देईन सरळ तुमच्याकडे! ऱोज कविता ऐकवून कान किटवेल तुमचे तो!
अरे हो, आठवलं. जोशी बाईंचा पळवून आणलेला डबा अजूनही परत केला नाहीये मी. काय चव होती त्यांच्या हाताला! त्यांचा डबा माझा विक पॉईंट होता, नाहीतर त्यांच्याही रक्ताची चव..... पण आता भूकच लागत नाहीये.
मी रात्री तिच्या खिडकीत जाऊन बसलो. तिचे या कुशीवरून त्या कुशीवर वळणे सुरु होते पण तिला झोप काही केल्या येत नव्हती. ती अस्वस्थपणे बेडवर पडून राहिली.
दुसरा दिवस उगवला. मी अजूनही त्याच खिडकीत बसलो होतो. मला झोपच आली नाही. साधी डुलकीपण नाही आणि सुर्य उगवून कितीतरी वेळ झाला. पण मला भाजत नाहीये. कुठे सनबर्नस पण नाहीत.
तिला फोन आला आणि ती जागी झाली. अश्याप्रकारे झोपमोड करणाऱ्याचा खणखणीत अपमान केल्याशिवाय मी फोन ठेवत नसे. पण ती..... 'हो.', 'झालं.', 'येते.' इति! हंह..... फोनवर बोलून आवरायला निघून गेली आणि मी तिच्या घरभर फिरलो. सगळं सामान कार मध्येच ठेवलं असावं. इथे केवळ काही निवडक गोष्टी होत्या. त्यातली एक म्हणजे जोशी बाईंचा डब्बा. मी एकदा पळवून आणला होता तिच्याकरता ऑफिस मधून आणि परत करायचा विसरलो होतो. तसा सरळ मागितला असता तर दिलाच असता जोशी बाईंनी. पण इथेच खा, घरी कोणाकरता हवा आहे वगैरे शंभर चौकश्या केल्या असत्या. तिच्या बद्दल सांगितले असते तर चिडवलं असतं मला उगाच. आणि मी काही कोणाच्या प्रेमात वगैरे..... म्हणजे.... मी.... ते.....! एक मिनिट! मुद्दा तो आहे का? बाकी काहीही असो, जोशी बाईंनी कितीही सुग्रास अन्न बनवू दे आणि कितीही प्रेमाने ताटात वाढू दे, आमचे मतभेद कायम आहेत आणि पुढेही राहतील. ती बाहेर आली आणि डब्यावर तिची नजर पडली. नुसती बघत राहिली काही क्षण! नंतर तो पर्स मध्ये टाकून बाहेर पडली. तिने घराचा दरवाजा बाहेरून लॉक केला. मी पण तिच्यामागे मागे निघालो. कार गावच्या एकमेव मोठ्ठ्या मंदिरापुढे थांबली. मंदिरात पुजा करून सगळे बाहेर पडत होते.
एक सांगू? मी तुम्हाला नाही सांगू शकणार पुढे काय घडलं ते नीट. कारण मी निशब्द झालोय! पण.... तुम्ही सोबत होतात माझ्या. अगदी प्रत्येक प्रसंगात! त्यामुळे तुमचा हक्क आहे हे जाणून घेणं, की माझ्यात सामावण्याऱ्या ध्वनीलहरींमध्ये काय होतं!
"अगं, ये."
"नमस्कार!"
"तू खूप मदत केली आहेस बघ गावकऱ्यांची. तू आल्यापासून इथलं मृत्यूच तांडव थांबलं."
"हं. बोलावलंत...... काही महत्वाचे होते?"
"अगं म्हणलं, तुला प्रसाद देऊयात महापुजेचा! गावावरचं संकट टळावं म्हणून ठेवली होती."
हातात प्रसाद ठेवत त्या म्हणाल्या.
"मी निघायचं म्हणतेय आज इथून."
"हो चालेल ना. तुझी सुद्धा खूप कामं पेंडींग असतील ना शहराकडे. एका फोनवर आलीस तू धावत माझ्या. वर स्वतःची राहण्याची, खाण्याची सगळी सोय स्वतः बघितलीस. तुझे खूप खूप आभार. खरतरं सगळे विश्वास ठेवणार नाहीत तुझ्या शक्तीवर आणि प्रत्यक्ष दाखवली तर जादूटोणा म्हणतील. आमच्या ऑफिस मधले एक कलिग तर सगळ्याच अमानवी शक्तींना खूप घाबरतात आणि म्हणतात की देवाची मूर्ती जवळ ठेवून किंवा अभिमंत्रित धागा बांधून फिरले तरच सुरक्षित राहू. तर दुसरे मानतही नाहीत भविष्य वगैरे...... निशुतर वेड्यात काढतो सगळ्यांना असं काही बोललं कुणी तर. एक या टोकाचा तर दुसरा त्या टोकाचा! अश्याच एक ना अनेक तऱ्हा! पण एका गोष्टीवर सर्वांच एकमत आहे. इथले सगळे गावकरी एकवेळ भूतावर विश्वास ठेवतील पण दैवी शक्ती मानवाकडे असू शकते यावर नाही. हे सगळं असं आहे ना, म्हणून गं..... नाहीतर जाहीर सत्कार केला असता मी तुझा गावात."
"त्याची काही गरज नाही. काम होते माझे ते."
"आणि अगदी चोख पार पाडलं असणारेस तू ते, खात्री आहे मला. अगं, तू मानतेस म्हणून सांगते, तुझ्या आयुष्यात काही मोठे बदल घडले आहेत नुकतेच, असे दिसते आहे. काहीतरी शुभ होणार आहे बघ तुझ्या भविष्यात. ग्रह-ताऱ्यांची स्थिती अगदी उत्तम आहे सद्ध्या!"
हातात मिळालेला वड्यांचा प्रसाद तिने ग्रहण केला. "तुम्ही बनवलाय प्रसाद?"
"हो. तुला कसं कळलं?"
"चव!"
"पण तू पहिल्यांदाच खाते आहेस ना मी बनवलेलं?"
तिने पर्सवर हात घट्ट धरला.
"अहो, देवाकरता भक्ती भावाने केलेला प्रसाद कायमच चविष्ट असतो, आणि तुमची सगळी मंत्र शक्ती उतरल्यासारखी जाणवत होती प्रसादात! खूप चविष्ट होता ना म्हणून गेस केलं....."
त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आलं.
नमस्कार करून तिने गाडीला चावी फिरवली आणि शहराच्या दिशेने भरधाव सोडली. शेवटी ती माणूसच आहे. कशी विसरेल ती तोंडात रेंगाळणारी चव!
__________________
@मधुरा
प्रतिक्रिया
15 Oct 2019 - 7:04 pm | जॉनविक्क
जामच फिरवले कथानक. मज्या आली
टाळीफेक वाक्य. छान पेरणी केली आहे.
15 Oct 2019 - 8:12 pm | मृणालिनी
धन्यवाद!!
16 Oct 2019 - 1:47 am | पद्मावति
खुप सुंदर लिहिलंय.
16 Oct 2019 - 10:31 am | मृणालिनी
धन्यवाद ! :) :)
16 Oct 2019 - 1:16 pm | गामा पैलवान
संपल्यावर एकदम वाचेन म्हणून विचारतोय की संपली की क्रमश: आहे? धन्यवाद!
-गा.पै.
16 Oct 2019 - 4:54 pm | मृणालिनी
कथा संपली. (या सिझनची तरी संपलीये.) :)
16 Oct 2019 - 9:40 pm | गामा पैलवान
वाचून बघतो. धन्यवाद! :-)
-गा.पै.
16 Oct 2019 - 4:40 pm | खिलजि
छान होती कथा .. काहीतरी वेगळे वाचायला मिळाले ..
16 Oct 2019 - 4:55 pm | मृणालिनी
धन्यवाद! :)
16 Oct 2019 - 7:16 pm | महामाया
खुप सुंदर लिहिलंय.
16 Oct 2019 - 8:39 pm | मृणालिनी
धन्यवाद :) :)
16 Oct 2019 - 8:13 pm | शुभां म.
म्हणजे जोशी बाईनीच तिला बोलावलं ?
16 Oct 2019 - 8:40 pm | मृणालिनी
हो. :) आणि त्यांना कल्पनाही नव्हती की ते त्यांच्या एका कलिगची सुपारी देत आहेत. :D
18 Oct 2019 - 12:39 am | गामा पैलवान
मृणालिनी,
कथा खूप आवडली. विशेषत: देवदूतीस नाव न दिलेलं फारंच समर्पक वाटलं.
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : इथे दुकानांत गोटी टोमाटो मिळतात. त्यांच्यात सुळे खुपसून बघितले. काय ते घट्ट आणि लुसलुशीत मांस. साल जरा जाड असेल तर काढून टाकायचं. सुळा अगदी अलगद शिरतो मांसात. खायला मजा आली. आता सफरचंदावर हाच प्रयोग करून पाहणार आहे.
18 Oct 2019 - 9:01 am | मृणालिनी
धन्यवाद गामा पैलवान. :)
हाहाहाहा.... :D
19 Oct 2019 - 10:56 am | शित्रेउमेश
वाह!!! मजा आ गया.... खूप दिवसांनी येवढं भारी काहीतरी वाचायला मिळालं.....
|मी खविस, मुंजा, हडळ, भूत, चेटकीण वगैरे कशालाही घाबरत नाही|
जाम मजा आणली या वाक्याने...
19 Oct 2019 - 5:54 pm | मृणालिनी
धन्यवाद उमेशजी! :) :)
20 Oct 2019 - 10:12 pm | मराठी कथालेखक
आणि एकदम वेगळंही, पण कथा काहिशी विनोदी अंगानं लिहिण्याच्या नादात थोडी लांबवली गेली असं वाटलं (खासकरुन हा भाग ).
22 Oct 2019 - 12:43 am | विजुभाऊ
विनोद कुठे दिसला……...
22 Oct 2019 - 1:59 pm | राजे १०७
कंपुगिरी आणि डुआयडी हे वेगवेगळे issues आहेत.
कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एकदा मिपावर फेरफटका मारून ये.
Well, I won't suggest that you should do it.
तिकडे अपमान पण करून मिळतो फुकट. त्यामानाने मायबोली वर अजून हे जास्त पसरलेलं नाहीये.
कंपुगिरी सहसा चांगल्या हेतूने होत नाही. Those who sums up only to show someone down, are part of this.
एखाद्याची योग्य कारणासाठी केलेली पाठराखण किंवा एखाद्याला आपल्या मर्जीने सहमती दाखवत मत मांडणे, त्याच्यावर झालेल्या टिकेला उत्तर देणे, एखादं लेखन आवडून त्याला भरभरून प्रतिसाद देणे याला कंपुगिरी म्हणत नाहीत.
गटबाजी, झुंडशाही असे याचे शाब्दिक अर्थ आहेत.
Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 August, 2019 - 06:13
22 Oct 2019 - 4:09 pm | मृणालिनी
हा मेसेज प्रत्येक धाग्यावर टाकं हं...... अगदी न विसरता. तसही तुला काही काम नाहीये आणि सतत टाकल्याने मिपा admin तुझ्या आणि तुझ्या सारख्या कंपुबाज डुआयडींना उडवण्याचा विचार तरी करतील. तसही आधीच तुझे अनेक डुआयडी उडलेले आहेत. आता तुझ्या या आयडीलाही उडवण्याकरता तुझे चाललेले प्रयत्न admin विचारात घेतीलच.
काही लोकांचं आयुष्य दुसऱ्यावर जळण्यात आणि द्वेष करण्यात निघून जातं.
तू त्यातलाच एक!
तुझा हा ट्रोलिंगचा निर्लज्जपणा चालू ठेव. मला काडीचाही फरक पडत नाही.
आणि आता तर तुझा प्रतिसाद वाचायची सुद्धा तसदी घेणार नाहीये मी.
22 Oct 2019 - 7:18 pm | राजे १०७
मिपाला वाईट म्हणून तिथं येणे निर्लज्ज पणाचं लक्षण आहे. :-)