रविवार दिनांक 13-10-2019 च्या ‘महाराष्ट्र टाइम्स, संवाद’ पुरवणीत डॉ. सयाजी पगार यांनी लिहिलेले ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीवरचे परीक्षण:
व्यापक मनोविश्वाची प्रायोगिक कादंबरी
- डॉ. सयाजी पगार
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभ काळात प्रयोगात्मक मूल्यांच्या बंदिस्त जोखडात जखडलेल्या कादंबरी लेखनाला नवा आयाम देत नव्याने क्रांती करत
डॉ. सुधीर देवरे यांनी ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी सिद्ध केली आहे. या कादंबरी लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीत ‘यमुनापर्यटन’ या पहिल्या कादंबरीपासून ते आजतागायत ज्या कादंबर्यात लिहिल्या गेल्यात त्या सर्वच सलग लेखनात आहेत; त्याला ही कादंबरी अपवाद ठरते. ही पूर्ण कादंबरी अगदी जाणीवपूर्वक अनेक तुकड्यात विभागून एकत्र जोडली आहे. कादंबरीतील आशय, निवेदन, भाषाशैली, परिवेश, लोक सहवास, जिज्ञासा यातील सातत्य असं अभूतपूर्व मिश्रण निर्माण करीत गोष्टीत न मावणार्यान प्रचंड घटना कादंबरीभर अस्ताव्यस्तपणे पसारा मांडून भेटत राहतात.
ही कादंबरी आजपर्यंतच्या परंपरागत मैलांच्या दगड ठरलेल्या लेखन प्रपंचाला छेद देत नवीन लेखनाची प्रयोगात्मक स्वतंत्र बाजू अट्टाहासाने उभी करते. प्रस्तुत कादंबरीच्या अंतरंगात शिरल्यानंतर आत्मकथनात्मक निवेदन आपले स्वतंत्र चिंतनाचे चक्रव्यूह तयार करते आणि वाचकाला आपल्या भावविश्वात शेवटच्या ओळीपर्यंत जखडून ठेवत संमोहीत करते.
विषयांची विविधता, चिंतन, मांडणी विश्व व्यापक असून विज्ञान तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारत नव्या युगातील नव्या दमाचा शूर शिपाई असल्याची गर्जना देत; या कादंबरीतल्या प्रत्येक भिन्न तुकड्यात वेगवेगळ्या विषयांचा ऊहापोह करीत कादंबरीतला नायक लेखक बनण्याचा मार्ग प्रशस्त करत महालेखक होत जातो.
या महाकादंबरीतल्या पात्रांत जिद्द आणि आकांक्षा असल्यामुळे ते आयुष्य लढत राहतात. छोट्या छोट्या एका ओळीच्या तुकड्यात महान तत्वज्ञान सांगतात. कादंबरीतली साधी वाक्य आजच्या जगण्यातले सुविचार, सुभाषितं, वाक्सुतमने होऊन जातात. पण ही सुभाषितं पारंपरिक नाहीत. ती नव्यानेच आपल्याला गवसत राहतात.
अकल्पनीय- अनाकलनीय, गूढ आणि तरीही इतकी सोपी कादंबरी अजून माझ्या वाचण्यात आली नाही. कादंबरीत लेखकावर अमूक एका लेखकाचं अनुकरण दिसत नाही. मात्र या कादंबरीचं अनुकरण पुढे नवोदित लेखक करतील हे निश्चित. लेखन-वाचन करणार्याुला मार्गदर्शक ठरेल अशी ही कादंबरी. ब्लॅक कॉमेडी, तिरकस शैली, उपहास, प्रतीक, प्रतिमा, रूपक, दृष्टांत वापरत कादंबरी पुढे जात राहते. कादंबरीत काळाचा पैस मोठा आहे. डायरी- दैनंदिनी लिखाणाशी तुलना करता येईल, असाही काही ठिकाणी या कादंबरीचा फॉर्म दिसतो.
अनेक कथा संभव वा अनेक कथांची बीजं या कादंबरीत दिसतात. आपण कोणाचे तरी आत्मचरित्र वाचत आहोत की काय असाही भास होऊ शकतो. कादंबरीचा काही भाग वाचल्यावर जरा थांबून, वाचून झालेल्या भागाचं चिंतन करावं लागतं. म्हणून कादंबरी शांतपणे वाचावी लागते.
ही कादंबरी 1982 पासून 2003 सालापर्यंत म्हणजे एकवीस वर्ष लिहीली जात आहे, असा कादंबरीत उल्लेख येतो. विशेष म्हणजे या काळातील सार्वत्रिक घटनांचा पडसाद कादंबरीत ऐकू येत राहतात. कादंबरीतील नायकाला पृथ्वीवरील मानवाची काळजी वाटते. भारतीय संस्कृतीबद्दल काळजी वाटते. प्रंचंड पसार्यामच्या कथा कलात्मक होत संपृक्तऐपणे कादंबरीत सारांशाने आविेष्कृत होत राहतात.
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, समाज, राजकारण, कर्म, भक्तीढ, धर्म, अधर्म, अध्यात्माच्या मार्गाने जात मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन कादंबरी घडवते. जिद्द, प्रयत्न, यश, अपयशाला सामोरे जाण्याचे धाडस या पात्रात दिसते. आपल्याच कोषात मग्न राहणार्या् कादंबरीतील लेखकाचं मनोविश्व फार व्यापक आहे. ह्या नायकाचं जीवनचरित्र पाहिल्यानंतर आपण अवाक होत राहतो. म्हणूनच व्यापक मनोविश्वाची प्रायोगिक कादंबरी असा तिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. डॉ. सुधीर देवरे यांची ही कादंबरी परंपरागत बंदिस्तपणातून निश्चितपणे सुटलेली आहे. तिच्याकडे कोसला सारखं प्रयोग म्हणूनच कायम पाहिलं जाईल, सरदार जाधव यांनी कादंबरीचे मुखपृष्ठ केलं असून एक तरल काव्य ठरावं इतकं ते अप्रतिम झालं आहे.
कादंबरी: मी गोष्टीत मावत नाही
लेखक: डॉ. सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ: सरदार जाधव
प्रथम आवृत्ती: 25 फेब्रुवारी 2019
पृष्ठ संख्या: 137 , मूल्य: 170 रुपये
प्रतिक्रिया
18 Oct 2019 - 11:11 pm | शशिकांत ओक
बुकगंगा.कॉम वरून दर्शवलेली पाने वाचली.
तुकडे-तुकडे करत कथन सरकते. मनातील विचार जसे तुटक तुटक एकमेकांशी संबंध नसलेले असतात. तसे वाचत राहायची चिकाटी हवी. असे त्यातले कथनच म्हणते.
काहींना आवडेल.