- डॉ. सुधीर रा. देवरे
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली: चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला.
या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्याने आपल्या भिकारीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (नोकरी हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. (त्याच्यामागे प्रपंचही नव्हता. म्हणून त्याला इतक्या पैशांत उर्वरीत आयुष्य सुखात व्यतीत करता आलं असतं.) किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता.
पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून आपण चैन करायला लागलो आणि हौस मौज करता करता आपले पैसे संपले तर पुढं काय करायचं? पुन्हा भीक मागायचं काम आपल्याला जमेल का? अशा पध्दतीचा खोल नसला तरी वरवरचा विचार करून आपली भिकार्याची नोकरी त्याने सुरू ठेवली असावी. आणि जमा करून ठेवलेली एवढी मोठी रक्कम एक दिवस वार्यावर सोडून बिचारा रस्त्यावर सहज मरून पडला. त्याचं नाव गाव कोणालाही माहीत नाही. एक भिकारी इतकीच त्याची ओळख. एवढी मोठी रक्कम देशाला अर्पण करून त्याने मरणोत्तर सामाजिक काम केलं, हे खरं असलं तरी ते सकारात्मक सामाजिक काम म्हणता येणार नाही. अनायासे नाईलाजास्तव- इच्छेविरूध्द ते सामाजिक काम ठरतं.
उलट जमवलेल्या पैशांचा योग्य तो विनियोग त्याने त्याच्या हयातीत- त्याच्या हातून केला असता तर त्याची समाजाप्रती प्रतिमा उजळून निघाली असती. जमवलेल्या रकमेतून त्याने पंचवीसेक लाखांचा स्वत:साठी एखादा फ्लॅट घेतला असता. दहा लाख स्वत:च्या आरोग्यासाठी - मेडिकल खर्चासाठी राखून ठेवले असते. 65 लाख बँकेत टाकून या रकमेच्या व्याजावर आनंदात जगला असता. आणि वरचे 86 लाख समाजकार्याला वापरले असते. अथवा कुठंतरी चांगल्या कामाला देणगी दिली असती, तर तो मेल्यानंतरही कायमचा नावाने अमर झाला असता.
पण या भिकार्याला नावं ठेऊन चालणार नाही. आपणही कायम तेच करत असतो. स्वत: काटकसर करत दुसऱ्यांसाठी जगत राहतो. समाजासाठी जगत नसलो तरी स्वतःच्या कुटुंबासाठी- नातेवाईकांसाठी खस्ता खात राहतो- कमवतो. परवडण्याइतका खर्च करतो. मरेपर्यंत कायम कमवतच राहतो. आणि एक दिवस सर्व काही मागे टाकून गुपचूप कोपर्यात मरून पडतो. कुठं थांबावं हे माणसाला शेवटपर्यंत कळत नाही. (या भिकार्याइतकी संपत्ती सर्वसामान्य चाकरमान्याला कमवता येत नसली तरी त्याने कुठं तरी थांबलं पाहिजे. पंचवीस - तीस लाख काटकसरीने मागे टाकले की सर्वसामान्य माणसालाही सुखात जगता येतं. (पण आरोग्यासाठीचा खर्च आणि किती लागू शकतो, ते सांगता येत नाही. म्हणून अनेक लोक कायम धास्तावलेले असतात. भारतात वीस कोटी लोक एकतर उपाशी वा अर्धपोटी झोपतात, त्यांच्यासाठी हे गणित काही कामाचे नाही.)
कोणत्याही क्षेत्रात स्वेच्छानिवृत्ती घेता आली पाहिजे आणि आपण कुठं रमतो त्या छंदात उर्वरीत आयुष्य व्यतीत करावं. कमवलेली संपत्ती (खूप नसली तरी) योग्य मार्गाने खर्च करता आली पाहिजे. गरजवंताला मदत करता आली, तर जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.
खूप हाव सुटल्यासारखं शेवटपर्यंत कमवत राहायचं. पोटाला टाचे देत कमवलेलं बाजूला साचवत रहायचं. स्वतःसाठी आणि मनासारखं जगायचं नाही. याचा अर्थ, आपण या भिकाऱ्यासारखंच जगत राहतो. आणि कमवलेलं सगळं इथं टाकून एक दिवस कोणाला न कळता मरून जातो. अनामिकासारखं.
(अप्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
15 Sep 2019 - 8:54 pm | जालिम लोशन
फुकट खाणे हि प्रवृत्ती असते. गरीबीचा आणी भिक मागण्याचा संबध नसतो. माझ्या माहितीत असे लोक आहेत, प्रचंड गरीबी पण फुकट मिळालेले काही घेत नाहीत. स्वाभिमानाने जगतात.
16 Sep 2019 - 12:01 pm | डॉ. सुधीर राजार...
बरोबर. सहमत.
16 Sep 2019 - 10:34 am | सुबोध खरे
काही लोकांना फक्त पैसे मोजण्यात किंवा खात्यात किती पैसे जमा झाले याचा आनंद असतो. त्याचा जगण्याच्या शैलीशी काहीही संबंध नाही. मग तो भिकारी असो किंवा अतिश्रीमंत.
माझ्या माहितीतील एक प्रथितयश डॉक्टर आहेत ते फक्त रात्री २ ते ६ झोपतात बाकी दिवसभर फक्त काम आणि काम. अब्जावधी रुपये आहेत. म्हणून मग आता स्वतःचे मोठे रुग्णालय टाकले आहे. येन केन प्रकारेन तेथे रुग्ण कसे येतील याची सतत चिंता करत असतात. बरं मुलं नातवंडं सर्व काही व्यवस्थित भरपूर कमावते आहेत. आता बसून खाल्लं तरी ७ पिढ्या पुरून उरतील एवढे पैसे आहेत.
16 Sep 2019 - 12:02 pm | डॉ. सुधीर राजार...
बरोबर. सहमत.
16 Sep 2019 - 12:12 pm | जॉनविक्क
16 Sep 2019 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
असे म्हणणे जास्त चपखल होईल...
Simple living, high saving !
;) =))
16 Sep 2019 - 2:06 pm | जॉनविक्क
=)) =))
xD xD xD
17 Sep 2019 - 3:12 pm | पाषाणभेद
चैनै काहाला?
इठेच आहे ना!
दिवसभराची कमाई करत आहे.
17 Sep 2019 - 3:46 am | रमेश आठवले
हा एक मानसिक विकार आहे. हैद्राबादचा शेवटचा निझाम हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति मानला जात असे पण तरीही तो एखाद्या दरिद्रि माणसा सारखा रहात असे.
17 Sep 2019 - 5:55 pm | Yogesh Sawant
खरंय