तंबोरा' एक जीवलग - ४

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
6 Sep 2019 - 12:33 pm

घरोघरी गणपती आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहालासुद्धा उधाण आलं असेल. गल्लोगल्ली बसलेल्या गणपती मंडपातून कानठळ्या बसतील इतपत वाजणार्‍या हिडीस गाण्यांबद्दल ओरड होत असते. ती रास्तच. उत्सव म्हणाजे आनंद. त्यात त्रासदायक असे काही नसावे खरं तर. पण हल्ली आनंदाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. हिडीस कान फुटणारी थिल्लर गाणी वाजवणे, ऐकणे, कानाचे पडदे फुटतील इतक्या मोठ्या आवाजात ढोल बडवणे हाच आनंद; असे मानणार्‍या पिढीचे हे उत्सव त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं 'साजरेच' असतात.

सोज्वळ करमणूकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असणारे माझ्या तरूणपणी साजरे केले जाणारे गणपती उत्सव आता लुप्त झालेले आहेत तरी त्याच्या स्मृती अजूनही आहेत. आता मी मुंबईत नसले तरी ऐन उमेदीची वर्षे मुंबईतच गेली माझी. वेगवेगळ्या मेळ्यांची गाणी, व्याख्याने, शात्रीय गायन, भावगीत गायन, नाट्यगीतांचे कार्यक्रम, भजने, वादन, नर्तन, नाटके असे कार्यक्रम असायचे. गणपती उत्सवात आम्हा कलाकारांना आजिबात उसंत नसायची. याची तयारी खूप आगोदरपासून सुरू व्हायची. बाज्याच्या पेट्यांची दुरूस्ती, स्वर काढून घेणे, तबल्याला ओढ काढून घेणे, शाई चढवणे, तंबोर्‍याच्या जव्हार्‍या, तारा इत्यादींची डागडुजी किंवा नवीन खरेदी, मिरजेहून मागवणे अशी लगबग उन्हाळा संपत आला की चालायची. साथीदार सांगून ठेवणे, तबजली, पेटीवाले, सारंगीवाले अश्या नेहमीच्या माणसात निरोप. पत्रापत्री भेटीगाठी सुरू व्हायच्या की समजावे गणपती जवळ आले आहेत. माघ महिन्यात होणार्‍या उत्सवातदेखील कमी अधिक फरकाने असेच चित्र असायचे. एक तर अशा कार्यक्रमांना भरपूर मागणी यायची, दुसरे म्हणजे सार्वजनिक खर्चाची बाब असल्यामुळे चांगली बिदागी मिळायची. गाणार्‍या कलाकारांना निश्चित उत्पन्न नसायचे त्यामुळे आमच्यासारख्यांना ही एक पर्वणीच वाटायची. आत्ताच्या कलाकारांच्या मानधनाचे आकडे ऐकताना घेरी येते. अर्थात मला त्यात दु:ख ,मत्सर, असूया असले मुळीच नाही. ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या वेळी एवढे पैसे मिळायचे नाहीत, कुणी मागायचे सुद्धा नाहित. यदाकदाचित कुणी मागितले तर सहज देऊ शकतील अशी मंडळे फारशी नव्हती. काही होतीही. पण ती अगदी थोडी.

ठराविक हिंदू उत्सव सोडले तर बाकी वर्षभर खाजगी गाण्यांतून जी कमाई होईल त्यात कलाकारांना भागवावे लागायचे. मुंबई पुण्यातील मोठीमोठी गणपती मंडळे अणि प्रतिष्ठित उत्सवांमध्ये अति प्रसिद्ध गाणार्‍यांची वर्णी लागायची. आईच्या काळात असे कलाकार कोणकोण होते त्यांची नावेच देते म्हणजे कल्पना येईल. गायिकांमध्ये चंपूताई म्हणजे हिराबाई बडोदेकर असायच्या. गंगूबाई असायच्या. मोगुबाई, केसरबाई ह्या गोवेकरणी, सरस्वती राणे, व्यतिरिक्त माणिकताई, ईंदिराबाई, जोत्स्नाबाई, प्रमिला ह्या तरूण गायिका. गायकांमध्ये व्यासबुवा, सुरेशबाबू, फुलंब्रीकर मास्तर, भीमसेन अण्णा, ओंकारनाथ, मन्सूरअण्णा, वसंतराव, कुमार, छोटे गंधर्व, मराठेबुवा असायचे. आणि फडके, वाटवे, नावडीकर असे अनेक तरूण भावगीत गायक असायचे. शोभाबाई, आई , सुमनताईही असायच्या. या शिवायही पुष्कळ असायचे. काही अपवाद सोडले तर सगळ्यां कलाकारांची एकमेकात उठबस असायची. एकमेकाच्या तारखा सांभाळून घेतल्या जायच्या. अर्थात पुन्हा सांगते की अपवाद असायचेच.

एकदा, " गणपतीच्या दर्शनाला या". असा हिराबाईंचा निरोप आईला आला. त्यांच्या घरी गणपती बसत असे. एवढ्या मोठ्या बाईंचा निरोप आला तेंव्हा अनमान कसा करणार? "आपण जाऊया" आई म्हणाली. आईचं गाणं होतं रात्री म्हणून संध्याकाळी आम्ही गेलो. तो प्रसंग अजूनही आठवतो. नवारोज हिलच्या पलिकडच्या परिसरात त्या रहात. चौरंगावर गणपती बसवला होता दोन्ही बाजूने चांदीच्या कमरेएवढ्या उंचीच्या समया लावलेल्या. सुगंधाचा घमघमाट होता. आपापले कार्यक्रम आटोपून किंवा सांभाळून बरेच कलाकार येत होते. रात्री त्यांच्याकडे गाणंही असायचं. पण आम्ही दर्शन घेऊन परतलो. एवढी अति प्रसिद्ध बाई ,पण शांत सौम्य. आमच्याशी आवर्जून बोलल्या. माझी चौकशी केली. त्या वेळेस मी लहान होते. गाणं शिकत होते. आटवलेल्या केशर दुधाचा आणि पेढ्याचा प्रसाद दिला. मी नमस्कार केला तर मोठी हो असं म्हणाल्या. आईशी बोलल्या. थोड्या वेळाने आंम्ही परतलो. ही आठवण आजही ताजी आहे.

मुगभाटात, शास्त्री हॉलला, घारपुरे लेन, फणसवाडी , गायवाडी असे जवळ जवळ गणपती बसायचे. एकमेकाच्या कार्यक्रमांना एकमेक कलाकारही येऊन बसायचे. साथीदार उसने दिले घेतले जायचे. सगळ्यांना सांभाळून घेतले जायचे तसे साथीदारांची पळवापळवीही चालायची. एक कला सोडली तर कलाकार म्हणजे सगळे मनोविकार असलेली सामान्य माणसेच असतात याचे दर्शन घडणारे अनेक प्रसंग घडत. पण आईने आयुष्यभर पाळलेले काही नियम मी सुद्धा पाळले. ते म्हणजे कुणाची निंदा नालस्ती करायची नाही. कुणाच्या कलेला जाहीर नावे ठेवायची नाहीत. त्या बाबतीत आपले मनातले मनातच ठेवायचे. या नियमांमुळे कलाक्षेत्रात कुणाशी संबंध पराकोटीचे बिघडले असे झाले नाही. मतभेद झाले पण त्याला सार्वजनिक स्वरूप आलं नाही. असे वागण्याचे तोटेही आहेत पण ते परवडले.

आणखी एक आठवण सांगते आणि हा भाग पुरा करते. हा अनुभव आईचा. मागच्या भागात 'मालकंसाची गोष्ट' असा जो उल्लेख आला आहे तोच हा अनुभव. त्या वेळेस आंम्ही गावदेवीला रहात होतो. ते घर बरेच मोठे होते पण आम्ही काहीच खोल्याच वापरीत होतो. बाकीच्या खोल्यांना घरमालकाने मोठी कुलुपे लावलेली होती. घर तसे बरे होते पण त्या घरात शिजवलेले अन्न पुरत नसे. नेहमी अन्न कमी व्हायचे. घरातील माणसे जेवायला बसली की प्रचंड भूक लागायची. एक एक जण वेड्यासारखा जेवायचा. कितीही खाल्ले तरी पोट भरले असे वाटायचे नाही. आईचे गाण्याचे शिक्षण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे तालमीचे झाले. खां साहेब आमच्याचकडे राहून शिकवत असत. ते आले की त्यांचा मुक्काम दोन दोन अडीच अडीच महिने सुद्धा असे. मी फारच लहान होते. मला हे काही आठवत नाही. पण आई नेहमी सांगत असे. आईचे कार्यक्रम आणि तालिम दोन्ही सुरू होते.

असेच खां साहेब आलेले होते. रात्री जेवण खाण झाल्यावर बर्‍याच उशीराने खांसाहेब आईला म्हणाले "हमारा तानपुरा लाओ" आईला नवल वाटले. पण विचारायचे कसे. रात्रीचे साडेअकरा वाजले असतील. तिनं खां साहेबांचा तंबोरा आणला. खां साहेबांनी मध्यमात तो लावला. आणि मालकंस गायला सुरवात केली. ते अप्रतिम गायन आई अवाक होऊन ऐकू लागली. अस्थाई झाली आणि आता अंतरा सुरू होणार इतक्यात कुठूनतरी एक वेगळाच सुगंध येऊ लागला. हळुहळु खोली त्या सुगंधाने भरून गेली. अंतर्‍याची दोन आवर्तनं होतात तो सुगंध घरभर सार्‍या खोल्यांतून झाला. मला घेऊन जिबाई आत झोपल्या होत्या. (ज्यांच्या अंगाखांद्यावर मी वाढले त्या आमच्याकडे असणार्‍या बाई. त्यांच्याबद्दल पुढे लिहीन) पसरलेल्या सुगंधानं त्यांनाही जाग आली. आत्ता रात्रीचे कोण उद-धूप जाळत आहे? असे वाटून पहाण्यासाठी त्या घरभर फिरून बाहेर आल्या. खांसाहेब भान हरपून अस्सा मालकंस गात होते की एका एका स्वराबरोबर वीज चमकावी. ते अद्भूत गाणे आई आणि जिबाई ऐकत राहिल्या. तासाभराने ते अलौकिक गायन संपले आणि खां साहेबांनी तंबोरा खाली ठेवला. गायन सुरू होते तो पर्यंत सुगंध येतच राहिला. गाणे संपल्यावर तो हळुहळु कमी होत नाहिसा झाला. पण तो कुठून आला आणि कुठे गेला हे शेवटपर्यंत कळलेच नाही.

दुसर्‍या दिवसापासून आधीच्या अंदाजानुसार शिजवलेले अन्न शिल्लक राहू लागले. घरातील माणसांना ती 'राक्षसी' भूक लागेनाशी झाली. अन्न गायब होणे बंद झाले. ते घर बाधित होते हे पुढे समजलेच. तसेही लौकरच आंम्ही ते सोडले. पण ही हकिकत आईने खां साहेबांना सांगताच ते म्हणाले "मालकंस बडी रुहानी चीझ है. उस वखत इस नाचीझ के गले से बडे दुरुस्त सूर लगे होंगे. तभी तो कोई करिश्मा मुमकिन हुआ."

पुढे अनेक कलाकारांनीही सांगितले की अतिशय सुरेल मालकंस जर मध्यरात्रीच्या सुमारास गायला तर त्या जागेत असलेली बाधा नाहिशी होते. खां साहेबांच्या त्या जादुई सूरांनी त्या वास्तूत असलेली बाधा नाहिशी केली होती. त्या घरात असे काही विचित्र घडत असे हे त्यांना माहितही नव्हते पण त्यांच्या गळ्यातल्या त्या सच्या सुरांची ती किमया होती. ही आठवण माझी आई आणि जिबाई कितीतरी वे़ळा सांगत असत. स्वर आणि आत्मा यांचे नाते असते असे मला या वरून आणि मला आलेल्या अनेक अनुभवांवरून वाटते.

गौरीबाई गोवेकर.

कलालेख

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 12:53 pm | तमराज किल्विष

मालकंसाची गोष्ट वाचून रोमांच उभे राहिले. कृपया खूप लिहा. तुमचं लिखाण अत्यंत सोज्वळ, सुंदर आहे. खूप धन्यवाद.

कंजूस's picture

6 Sep 2019 - 1:01 pm | कंजूस

भारी अनुभव की!

अनिंद्य's picture

6 Sep 2019 - 1:24 pm | अनिंद्य

@ गौरीबाई गोवेकर नवीन,

बाधा इत्यादींवर व्यक्तिशः विश्वास कमी पण 'मालकंस रुहानी चीज है' यावर पूर्ण आहे.
कोण जाणे त्या वास्तूला सुरांचेच डोहाळे लागले असावे.

सुरांची - शब्दांची ताकद मोठी _/\_

पु भा प्र,

अनिंद्य

मनिष's picture

6 Sep 2019 - 1:51 pm | मनिष

बाधा इत्यादींवर व्यक्तिशः विश्वास कमी पण 'मालकंस रुहानी चीज है' यावर पूर्ण आहे.

हेच म्हणतो.

'बाधा' हा शब्द मी चूकीचा वापरला की काय असं क्षणभर वाटून गेल. पण विचार केला तर त्याला पर्यायी शब्द सुचेना. आम्ही जुन्या काळची माणसे बाधाच म्हणतो. बाधा म्हणाजे अडचण/अडचणी असा अर्थ घ्या हवं तर. त्याने काय बाधा येते? अडचणी तर रोजच्या आयुष्यात पावला पावलावर असतात. अडचण दूर्‍ होते आपण सुटतो. तिच्या कारणमिमांसेकडे आपण वळत नाही प्रत्येकवेळेस. अंधश्रध्दा वगैरे मी ही मानत नाही. पण अशा सुटलेल्या पण कारणमिमांसा माहित नसलेल्या अडचणींना 'बाधा' म्हटालं तर कुठे बिघडल?

काही काही अनुभव अगम्य असतात. काहीजणांच्या पदरातच पडतात.

सुरेख लिहिलं आहे.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

6 Sep 2019 - 6:24 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

अनुभवांच्या मुळाशी दरवेळेस थेट भिडता येते असं नाही पण म्हणून त्यांना नाकारताही येत नाही. खरे आहे तुमचे म्हणणे

उगा काहितरीच's picture

6 Sep 2019 - 5:28 pm | उगा काहितरीच

वाचतो आहे. हा पण भाग नेहमीप्रमाणेच छान वाटला.
रच्याकने तुमच्या आईचे नाव कळू शकेल काय ? तुम्हाला मिसळपावसारख्या संस्थळावर सार्वजनिक होऊ द्यायचे नसेल तर हरकत नाही. तुमच्या गोपनीयता (privacy) ठेवण्याच्या इच्छेचा आदरच आहे.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

6 Sep 2019 - 6:17 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

अपेक्षित प्रश्न. कुणीतरी कधीतरी इथं विचारणारच हे माहित होतं मला. मी प्रामाणिक पणानं माझं जे खरं नाव आहे तेच दिलेलं आहे. आता आईबद्दल विचाराल तर ती त्या काळची एक प्रसिद्ध कलाकार होती. पूर्वीच्या भाषेत कलावंतीण. तिच्या, माझ्या जीवनातल्या अनेकानेक गोष्टी सांगायच्या असं मनात होतं. ती आता हयात नाही, मी सुद्धा वयस्क. तिचं नांव हवं तर सांगते. पण त्या नंतर मला जे लिहायचय ते मी लिहू शकणार नाही. तिचं नाव सांगून, हे लेखन गुंडाळून मला आपणा सर्वांची मला रजा घ्यावी लागेल. पुस्तक वगैरे लिहिण्याच्या भानगडीत मी पडणार नाहिये. काळाच्या पटलावर इथं तरी काही दस्तैवज रहावा असं मला वाटत होतं म्हणून मी माझी प्रकृती बरी नसताना, डोळ्यांना, गुढग्यांना त्रास असताना कुणाची तरी मदत घेऊन हे लेखन करते. अर्थात ते करण्याच्या सर्व सुखसोई माझ्याकडे आहेत. वेळ आहे, लेखनाच्या ओघात बर्‍याच गोष्टी येतील पण तिचा थेट नामोल्लेख मला करायचा नव्हता. याच्या मागे अनेक कारणं आहेत. काय कारणे आहेत ती ही तुम्हाला मी सांगेन. म्हणून तूर्त तरी तिच्या नावाचा मी उल्लेख करणार नाही. पण हट्टच असेल तर नांव सांगून तुम्हा सगळ्यांची रजा घेईन.

यशोधरा's picture

6 Sep 2019 - 6:21 pm | यशोधरा

काही गरज नाहीये नाव सांगण्याची.

उगा काहितरीच's picture

6 Sep 2019 - 7:52 pm | उगा काहितरीच

नको ! आपली ओळख सांगणे / न सांगणे हे सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. त्या इच्छेचा आदर आहे. अशाच लिहीत रहा. हा वाचनानंदही खूप भरभरून मिळतोय त्यात मी तरी समाधानी आहे.

सुबोध खरे's picture

14 Sep 2019 - 8:25 pm | सुबोध खरे

हट्टच असेल तर नांव सांगून तुम्हा सगळ्यांची रजा घेईन.

याची काहीही गरज नाही.

मिपावर असणाऱ्या एकंदर लोकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक टोपण नावाने लिहितात.

कित्येक लोक डू आय डी घेऊन लिहितात.

त्यांनी आपली खरी नावे जाहीर करावी आणि मगच तुम्हाला नाव सांगण्याचा आग्रह करावा.

तोवर तुम्ही त्यांना फाटा मारावा आणि आपले लेखन चालू ठेवावे.

इरामयी's picture

6 Sep 2019 - 6:35 pm | इरामयी

अहो नका सांगू.

पण मिसळपाववर लिहीत रहा. तुमचे संगीताबद्दलचे समृद्ध अनुभव शेअर करत रहा.

उगा काहितरीच's picture

6 Sep 2019 - 7:54 pm | उगा काहितरीच

+१

इरामयी's picture

6 Sep 2019 - 6:37 pm | इरामयी

अजून एक छान अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद!

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

7 Sep 2019 - 12:09 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद.

तुम्ही अगदी मनापासून लिहता.. त्यामुळे लेखन मनाला भिडते. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत असते.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

7 Sep 2019 - 12:09 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मनापासून धन्यवाद. वाचणारे असतील तर लिहिण्यात मजा.

संजय पाटिल's picture

7 Sep 2019 - 9:58 am | संजय पाटिल

रोमांचक अनुभव!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Sep 2019 - 11:31 am | ज्ञानोबाचे पैजार

"मालकंस बडी रुहानी चीझ है" हे अनुभवातुन आलेले बोल असावे. मला रागदारी मधले विषेश काही समजत नाही पण हे सतारवादन अतिशय आवडले आणि लक्षातही रहिले.

यात तुम्ही पहिल्या भागात उल्लेख केलेला छोटा तंबोरा वापरला आहे.

वरचा व्हिडीओ दिसला नाही तर इकडे क्लिक करा
पैजारबुवा,

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

7 Sep 2019 - 12:04 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

तंबोर्‍याच्या सुरांमधली बात तिच्या सुरात नाही. पण न्यायला आणायला सोईस्कर एवढच काय ये.

श्वेता२४'s picture

7 Sep 2019 - 11:39 am | श्वेता२४

तुम्ही आजन्म सप्तसुरांची साधना केलीय. ही साधना ईश्वरी अनुभव देते. तुमच्यावर तुमच्या आईचे संस्कार आहेत व त्यामुळे त्या ईश्वरी स्वरांचा अनुग्रह तुम्हांस लाभला. त्या ईश्वरी स्वरांची प्रामाणीकपणे केलेली सेवाच तुम्हाला व तुमच्या मातेला असे अलौकीकी अुभव देऊन गेली. खूप छान लिहीत आहात. असं वाटतंय की आजीच्या मांडीवर डोके टेकलेय आणि ती हळूवार केसात हात फिरवत काही सांगतेय. का कुणास ठाऊक तुमचं हे लेखन वाचून मन भरुन आलं. तुम्हाला प्रत्यक्ष भेटता येणार नाही त्यामुळे तुम्हाला इथूनच नमन करते. बाकी तुमचे लेखन म्हणजे अमृतानुभव आहे. खूप खूप लिहा. तुम्ही जो सुवर्णकाळ जगलात त्याचा अनुभव कमीतकमी तुमच्या लिखाणातून तरी अनुभवायला मिळेल. तुमच्या मातेची ओळख देण्याची अजीबात गरज नाही. पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

7 Sep 2019 - 12:02 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

तुम्ही लिहिलेलं खरं आहे. जन्मभर सुरांची साधनाच आहे ही. कोणतीही साधना खडतर असते. आयुष्यात खूप काही पचवावं लागतं. सोसावं लागतं. मी जे सोसलं त्याच्यापेक्षा आईने अनेक पटीनं अधिक सोसलं. आता मागे वळून पहाताना त्याच्याबद्दल खेद वगैरे नाही वाटत. कारण त्या वेळची ती रीतच होती. मी सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेतली आहे. त्या मुळे आपल्याला भेटता येईल की नाही हे माहित नाही. पण लेखनाद्वारे भेटूच. पुन: धन्यवाद.

जॉनविक्क's picture

7 Sep 2019 - 2:56 pm | जॉनविक्क

मंत्रावुन टाकणारी लेखमाला आणी अनुभव .

गिरगांवातील गणेशोत्सवातील कार्यक्रमांबद्दल फक्त ऐकले होते. आपण उल्लेख केलेल्या गायक्गायिकांपैकी मोगूबाई, सरस्वतीबाई आणि सुरेशबाबू यांचे गाणे ऐकण्याचे भाग्य लाभले नाही. प्रमिलाबाई कोण ते कळले नाही.


पण हट्टच असेल तर नांव सांगून तुम्हा सगळ्यांची रजा घेईन.

असे करू नका अशी अजीजीची आणि नम्र विनंती. सांगणे न सांगणे, खाजगीपण जपणे हा तुमचाच हक्क आहे. आधीच समाजात शास्त्रीय संगीताचे जाणकार आणि त्यातूनही नैसर्गिक देणगी लाभलेले फार कमी आहेत.


कुणाच्या कलेला जाहीर नावे ठेवायची नाहीत. त्या बाबतीत आपले मनातले मनातच ठेवायचे. या नियमांमुळे कलाक्षेत्रात कुणाशी संबंध पराकोटीचे बिघडले असे झाले नाही. मतभेद झाले पण त्याला सार्वजनिक स्वरूप आलं नाही. असे वागण्याचे तोटेही आहेत पण ते परवडले.

हेच आपले मोठेपण आहे.

आपले पहिले तीन लेख वाचून हवेत गेलो होतो. आपल्याला मिपावर अजून बरेच लेखन करायचे आहे.

मी फक्त कानसेन आहे. फक्त शास्त्रीय संगीतात रस आहे; किंबहुना तो माझा श्वास आहे म्हणून ही नम्र विनंती.

या सुरेख लेखाबद्दल शतशः आभार.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

14 Sep 2019 - 6:11 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

प्रमिला म्हणजे पूर्वीच्या प्रमिला जाधव. लग्नानंतरच्या जयमाला शिलेदार. रामभाऊ शिलेदारांच्या अर्धांगिनी, दिप्ती, किर्ती यांच्या आई.

जॉनविक्क's picture

13 Sep 2019 - 8:38 pm | जॉनविक्क

पण हट्टच असेल तर नांव सांगून तुम्हा सगळ्यांची रजा घेईन.

अहो, तेव्हडे फक्त करू नका.

लोकांना जितकी उत्सुकता तुमच्या अनुभवांची आहे, तितकी नावाची नक्कीच नाही. नावात आहेच काय म्हणतो मी ;)

जे काही आहे ते तुमच्या लेखणीत. ती तेव्हडी आवरती घेऊ नका प्लिज _/\_.

पुढील लेखन लवकर टाका. तसेच आता मिपा दिवाळी विशेशांकही बनत आहे. तेंव्हा एखादं तुमच्यासाठी काही खास असणारे लेखन त्यात करून आमची दिवाळीही खास बनवा अशी हात जोडून विनंती आहे.

प्राची अश्विनी's picture

14 Sep 2019 - 7:39 pm | प्राची अश्विनी

अजून लिहा प्लीज.