को जागर्ती !

चाफा's picture
चाफा in जनातलं, मनातलं
8 Nov 2008 - 8:09 pm

"को जागर्ती?".......... सॉSSल्लीड दचकलो मी. एक तर रात्र इतकी झालेली त्यात स्टडीरुम मधे मी एकटाच. त्यात आज पौर्णीमा म्हणुन खिडकी उघडी टाकलेली. अश्यावेळी जर असं कुणी म्हणालं तुमच्या मागे, तर तुम्ही नाही दचकणार? दचकाल ना? मी पण जोरात दचकलो. इतका की बुडाखालची खुर्ची खर्रर्रर्रकन आवाज करत सरली.
"को जागर्ती?" पुन्हा एकदा. जरा सावधपणे आजुबाजुला नजर फ़िरवली अंSSहं कुणी नाही, बाहेर येउन बेडरुमच्या दारातुन नजर टाकली सौभाग्यवती गाढ झोपलेली. आईशप्पत, ही झोपेत बडबडते की काय ?
" को जागर्ती?" शक्यच नाही `ही' गाढ झोपेत घोरु शकते फ़क्त, बोलु नाही शकत. मग नक्की कोण बोलतय ? आता उत्तर द्यायचेच. अंगातले सगळे आवसान गोळा केले आणि पुन्हा हॉलमधे येउन बसलो सोफ़्यावर, कारण त्याच्या मागे भिंत आहे, मागुन कुणी मानगुट धरायची भीती नाही. आता माझे भिरभिरती नजर आजुबाजुला फ़िरत राहीली.
"को जागर्ती?"
"मीच आपला जागर्ती बाकी सगळे झोपर्ती " गोळा केलेले आवसान कधी सांडले ते कळले नाही.
"काय म्हणालास? बाकी काय करत आहेत?
" बाकी सगळे झोपर्ती...... आपलं झोपलेयत." होतं, थोडं अवसान होतं आजुन.
"का तुझे मित्र जागे आहेत ना आजुन?"
" आहेत ना जागे पण जरा वरच्या पातळीवर आहेत सध्या".
" मग तु नाही गेलास त्यांच्यात?"
"नाही, गेलो होतो थोडावेळ पण ते काळसर तपकीरी रंगाचे तरल द्रव्य त्यांच्या पोटात जाताच ते माझी ओळख विसरले"
"मग तु आता काय करत आहेस?"
" काहीतरी लिहीन म्हणतो एखादी भुताबिताची कथा"
" मग नखं चावत का बसला होतास?"
" विचार करत होतो."
" कसला?"
"म्हणजे बघा.... भूते असतात. सगळीच काही कुणाच्या मानगुटीवर बसत नाहीत, मग ती इतरवेळी काय करत असतील? कशी रहात असतील?"
" बस्स इतकेच?"
" इतकेच काय सोपे आहे का ते? नुसत्या कल्पनेने असे लिहीणे?"
" तु आजिबात कल्पना करु नको प्रत्य़क्ष अनुभव घे"
" क..क..काय"?
" का दचकलास?"
" नाही हो, इतक्या लवकर मरायचे नाही मला, आणि मरुन भूत तर बनायचे नाहीच नाही ."
"तुला मरावे लागणार नाही रे ! तु फ़क्त तिथली दृष्य पाहु शकशील"
" मग ठिक आहे, कुठे पाठवताय?"
" तु फ़क्त डोळे मीट"
पडत्या फ़ळाची आज्ञा घेउन मी डोळे मिटले. दुसयाच क्षणी मी एका भयाण काळोख्या रस्त्यावर उभा होतो. रस्ता तर निट ओळखता येत नव्हता. पण आजुबाजुची दाट झाडी आणि अवशेष राहीलेल्या घरांच्या भिंती, तिथुन जीव घेउन पळावेसे वाटत होते. पण तसे करणे शक्य नव्हते कसे परत जायचे तेच कळत नव्हते ना !
समोरची हालचाल बघुन मी स्तब्ध झालो. समोरुन एक हडळ येताना दिसत होती. आता हडळ याच साठी म्हणायचे की मी भूत मंडळीत आलो होतो हे मला माहीत होते. समोरुन आगदी नखरेल चालीने येणाया त्या हडळीकडे पहातानाच माझ्या मागुन एक जोरदार शिट्टी ऐकु आली. फ़ुटभर उंच उडाल्यावर ल़क्षात आलं की आपल्या मागे चार-पाच भूतांची टोळी आहे ती शिट्ट्या मारतेय. मी त्याना दिसण्याचा प्रश्न नव्हताच त्यामुळे मी सुऱक्षीत होतो.
" आयला, ती बघ आपल्या एरीयातली आयटेम".
" आज एकटीच कुठे निघाली ही दिपिका?" आयलाड, या दिपिकाची चर्चा या श्रेणीत पण? महान आहे हो लेक तुमची प्रकाश.
" निघाली असेल तिच्या युवीला भेटायला" आता मला आश्चर्य नाही वाटले कारण हे नाव तर येणारच तिच्या पाठोपाठ.
" तु तिला प्रपोज मारणार होतास ना ?"
" मारले ना प्रपोज पण च्यायला मला म्हणते, कवटी बघ आरशात त्यातले एक भोक कमी आहे काय? की सांगु दुसरे भोक पाडायला दादाला माझ्या?"
" तीचा दादा? भाउ पण आलाय तिचा इथे?"
" नाय रे, मानलेला भाउ आहे, तो मागच्या गँगवॉर मधे टपकवलेला येडा नंद्या"
" बाप रे ! तो जाम खतरनाक आहे यार जिवंतपणीची सवय आजुन नाही गेलीय, आजुन साला एरीयात राडे करतो."
" मग! मागच्या अमावस्येला आमच्या बाजुच्या वडावरच्या भूताशी राडा झाला त्याचा त्याची उलटी पावले सरळ करुन टाकली रे याने"
" आयला, टरकु लेकाचे आपण नाय घाबरत त्या येड्याला साला आपली वट आहे एका मांत्रीकाशी साल्याला बाटलीत बंद करुन टाकायला सांगेन. बस म्हणावं बोंबलत बाटली फ़ुटेपर्यंत"
" टोण्या तुझी त्या मांत्रीकाशी ओळख काय? त्यानेच तुला त्याच्या तालावर नाचवलाय"
" ए, तसं नाय हां"
" आयला, भांडण बंद करा रे ! समोर बघा आपल्या दिपीकाचा युवी येतोय"
मग मी पण जरा मन लाउन समोर पाहीले. समोरुन एक स्टायलीश भूत येत होते. जीन्स, टी-शर्ट आणि चालता चालता कवटीवरुन हात फ़िरवल्याची स्टाईल. ध्यानच होतं ते. एव्हाना मागे पुन्हा चर्चेला तोंड फ़ुटलं.
" साला, बघ काय स्टाईल मारतोय."
" आता मारेल स्टाईल पण दिपिकाच्या घरुन फ़टके पडतील तेंव्हा कळेल"
" का रे? तिच्या घरुन म्हणजे ती रहाते त्या घरातुन विरोध आहे का रे?"
" तगडा ! "
" तिच्या घरातले म्हणजे तो दिड पायाचा खवीस आणि ती जळलेल्या सांगाड्याची जखीण ना ?"
" तेच रे ! मुंबईच्या बाँबस्फ़ोटात तो उडाला ना ! त्यात त्याचा एक पाय गुल झालाय"
" आणि तीचे काय?"
" ती हुंडाबळी आहे रे त्यामुळेच दोघे यांच्या लग्नाच्या विरोधात आहेत"
" वेताळाशप्पथ, आपल्याला चान्स आहे आजुन"
" का रे? तु काय स्वतःला रणबिर समजतो का रे?"
" का समजु नको साल्या माझं जीवंतपण सगळं स्ट्रगलर म्हणुन गेलय"
" तो येडा नंद्या ल़क्षात आहे ना?"
" अले त्या येल्या नंद्याला काय घाबलताय? आपला एक मित्ल हाय त्याचे कलाटे क्लास चालवायचा, मोलुन ठेवेल त्याला" हा नविन बोबडा आवाज कुणाच ते जरा वळून बघितले, आपला तो राजपाल यादव आहे ना? त्याच्यापे़आ एखादा इंच कमीच असेल असे भूत बोलत होते. तोंडात समोरच्या बाजुचे दात गायब दिसत होते. नक्की काय झाले असावे?
" साल्या, चिंधीचोर तुला वाळत घातलेले कपडे पळवताना पब्लिकने पकडून धुSधुS धुतला त्यात तु इकडे आलास ते पण समोरचे दात तिथेच ठेउन तु काय ‘त्याची हाले मोलनाल’"? उत्तर सापडायला जास्त वेळ लागलाच नाही.
" म..म.. मी क.क्काय वाईट अ..आहे ?" हा पण नवाच आवाज.
" बे तोतल्या आधी बोलायला शिक रे !"
" तु तिला अ..अ आय ल..ल लव्ह य..य.. यु म्हणायला जितका वेळ घेशील ना? तितक्या वेळात ति चार वेळा बॉयफ़्रेंड बदलेल."
" ए, ते बघ दोघे तिकडे जुन्या बागेत चाललेत, इतक्या पहाटेच्या वेळी काय काय झोल चालतात रे तिकडे !"
" मायला, ती तिकडे जाउन तोंड पांढरे करते हे तिच्या घरी कळले तर?"
" चला, आपण पण जाउ तिकडे, साला बनी तो बनी नही तो?"
"अब्दुल गनी" कोरस मधे सगळे म्हणाले.
सगळे तिकडेच निघाले पण इतक्यात समोरुन एक रावडी भूत हातात तलवार घेउन येताना दिसले, आणि मागे हलकल्लोळ माजला!
" अबे, भाग तो बघ येडा नंद्या येतोय हातात तलवार घेउन, आता इथुन कल्टी मारु नायतर एखादा अवयव इथेच ठेउन जायला लागेल"
मागे पळापळीचे आवाज येत राहीले. आता हा येडा नंद्या कुणाचा गेम करणार हे उत्सुकतेने पहात असताना.
" इतक्या रात्री काय ध्यान लावुन बसलायस? सोफ़्यावर, झोपायचं नाही का?" सौभाग्यवतीच्या आवाजाने दचकुन डोळे उघडले.
" आलोच इतक्यात" तिला पुन्हा बेडरुमच्या वाटेला लावले. आणि पुन्हा डोळे मिटले पण फ़क्त अंधार मघाचे दृष्य दिसे ना ! म्हंटल काय स्वप्न बिप्न पडलं होतं की काय?
" स्वप्न नाही सत्यच होतं ते"
" मग परत का दिसत नाही?"
" तु मधेच डोळे उघडल्याने तिथली तुझी लिंक तुटली आता पुन्हा एखाद्या पौर्णीमेच्या दिवशी तुला पुन्हा त्या पातळीवरची दृष्ये दिसतील"
" पुन्हा कधीतरी म्हणजे नक्की कधी?"
" जेंव्हा वेळ येईल तेंव्हा मी येईन आणि पुन्हा तुला विचारेन ‘को जागर्ती?’"

आता यापुढच्या प्रत्येक पौर्णीमेला मी जागा रहाणार आहे आणि वाट पहाणार आहे पुन्हा त्याच प्रश्नाची "को जागर्ती?"

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

व्यंकु's picture

8 Nov 2008 - 9:09 pm | व्यंकु

अप्रतिम लिखाण

अनिरुध्द's picture

8 Nov 2008 - 9:22 pm | अनिरुध्द

वा! सुंदर लेखन. वाचताना मजा आली. :SS

मी-सौरभ's picture

21 May 2012 - 2:25 pm | मी-सौरभ

आवडेश

स्पंदना's picture

21 May 2012 - 5:07 pm | स्पंदना

आली का नाही परत?

रेवती's picture

21 May 2012 - 8:24 pm | रेवती

लेखन फारसं आवडलं नाही.