त्याचं कसं असतंय..
कंपनीत कोणाच्यातरी एका छोट्या चुकीने एखादा छोटामोठा प्रॉब्लेम उद्भवतो. आणि हल्ली फारच अनकॉमन झालेला कॉमन सेन्स वापरला तर तो प्रॉब्लेम लगेच सोडवला जाऊ शकतो.
पण पण पण.... जो हायलाईटच झाला नाही तो प्रॉब्लेम कसला ! या कार्पोरेट नियमाप्रमाणे तो प्रॉब्लेम चुगलकी पद्धतीने तुघलकी मॅनेजमेंटसमोर मांडल्या जातो. मग गुन्हेगारांची रीतसर पेशी होते. आणि समस्येचे मूळ शोधण्यासाठी 'जाऊ तिथे माती खाऊ' अश्या हायली एक्सपीरिअन्सड लोकांची समिती नेमण्यात येते.
पुढचे काही दिवस समिती गुन्हेगारांची उलट तपासणी घेते. ही उलटतपासणी होत असताना बाकीचे कलीग,"घेन्न बाबू आता" ह्या नजरेने बघत असतात. गुन्हेगार चौकशीत सहकार्य करत नाही अशीही आवई उठवण्यात येते. आणि एके दिवशी, मीटिंग बोलावून समितीचा अहवाल सादर होतो. अहवालाच्या प्रत्येक वाक्यात वूड हॅव बिन, कूड हॅव बिन छाप शब्दांची भरमार असते. समस्येचा विचार केल्यास अहवालाचा प्रमुख भाग हा अश्मयुगीन मानवाचे राहणीमान, चाकाचा शोध, डायनासॉरचा विनाश, पहिले हिमयुग, डार्विन थियरी, इ इज इक्वल टू एमसी स्क्वेयर, मुघलांचे आक्रमण, छत्रपतींचा उदय, पेशव्यांचे पानिपत, इंग्रजांची जुलमी राजवट, दांडीयात्रा, चले जाव आंदोलन, नेहरू, आणीबाणी, आरक्षण, किल्लारीचा भूकंप, एन्रॉन प्रकल्प, आर्थिक मंदी, गॅट करार, पोखरणची अणुचाचणी, गोध्रा, गुजरात मॉडेल, बिग बँग थियरी, नोकीयाचे दिवाळे, नोटबंदी आणि जीएसटी इतका रिलेव्हंट असतो.
टाळ्यांच्या गडगडाटात अहवालाचे कौतुक केल्या जाते. अगदी कुडोस गिडोसचा हैदोस होतो. मग प्रत्येकच डिपार्टमेंटला "आस्क दी स्टेटस को " टाईप सल्ले मिळतात. एखादा उत्साही HR लगेच,"सर व्हाय डोन्ट वी कन्डक्ट सच एन्क्वायरीज इन ऑल डिपार्टमेंट? असा प्रश्न विचारतो. बस्स हाच तो क्षण असतो जिथं समोर बसलेल्या सगळ्या लोकांच्या घशात नुकताच खाल्लेला समोसा अडकतो. सगळे जीव मुठीत धरून एमडीच्या रिप्लायकडे लक्ष देतात. नेमका त्याचं वेळी एमडीच्या तोंडात समोसा असल्यामुळे तो लगेच काही बोलू शकत नाही. तेवढ्या वेळात कितीतरी लोकं नवस बोलून मोकळे होतात. काहीतर आत्ताच एमडीला हार्ट अटॅक यावा इथपर्यंत प्रार्थना करतात. एमडी सावकाश पाणी वगैरे पिऊन स्क्रीनकडे बघतो. आणि खाल्ल्या समोस्याला जागून, "येस.. शुअर..वी मस्ट डू इट " असे सांगतो. सगळयांना अचानकच ऍसिडिटी सुरु होते. इतक्या वेळ लहान तोंड करून बसलेले गुन्हेगार एकदम खुशीत येतात. "आता घ्या ना सायचेहो", अश्या मुद्रेने ते सगळ्यांकडे बघतात. एखादा डिपार्टमेंट हेड एमडीला ,"सर ऍक्चुअली धिस मे नॉट बी रिलेव्हंट इन ऑल दी डिपार्टमेंट्स. इस्पेशियली इन माय डिपार्टमेंट यु सी.." असे समजावण्याचा प्रयत्न करतो. पण एमडी बधत नाही. "आय डोन्ट वॉन्ट टू लिसन ऑल धिस बुलशीट", असे एमडी ठणकावून सांगतो. इथं इन डायरेक्टली एमडीने सगळ्या एचओडीना ,"तुम्ही बैलं आहात" हे सुनावलं असतं. सगळी बैलं माना डोलावतात. एमडी परत फर्मान सोडतो "धिस हॅज टू बी इम्प्लिमेंटेड इन ऑल दि डिपार्टमेंट्स इंक्लूडिंग HR !" आता HR हेडच्या कपाळ्यावर आठ्या येतात. ज्या उत्साही HR ने हे सुचवलं असतं तो "आता वं माय" करून डोक्यला हात मारतो. मीटिंग संपते.
गुन्हेगारांसहित सगळे आपापल्या जागेवर येतात. ज्या समस्येमुळे हे महाभारत घडलं असतं ती अजूनही वाकुल्या दाखवत उभी असते.
समाप्त
प्रतिक्रिया
28 Jun 2019 - 4:41 pm | प्रलयनाथ गेंडास...
हार्ड हैं तु भाय ... एकदम हार्ड हैं !
28 Jun 2019 - 4:51 pm | उगा काहितरीच
लॉल ! जब्राट !
28 Jun 2019 - 5:52 pm | तुषार काळभोर
एक लंबर!!
28 Jun 2019 - 6:48 pm | जालिम लोशन
बाऊन्सर गेला.
28 Jun 2019 - 7:00 pm | सुबोध खरे
तो "आता वं माय" करून डोक्यला हात मारतो.
हे वाचून हहपुवा
मी काम करत असलेल्या बांद्रा येथील कॉर्पोरेट रुग्णालयात लोक उशिरा येणार यावर काय उपाय करायचा यावर मोठी चर्चा झाली. मुंबईत लोकल ला उशीर होतो विशेषतः पावसाळ्यात त्या वेळेस बरेच लोक अगतिक असतात.
पण अध्यक्ष वेळेचे एकदम पक्के (लोकांच्या)
त्यात एच आर मॅनेजरने यांनी सुचवले कि महिन्यात ३ वेळे पर्यंत ५ मिनिटे उशीर माफ केला जाईल.
चौथ्या वेळेस उशीर झाला तर अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाईल
आणि पाचव्यांदा उशीर झाला तर पूर्ण दिवसाचा पगार कापला जाईल.
पंचे चाळीस मिनिटे चर्वित चर्वण झाल्यावर ही सुचना अध्यक्षांना फार पसंत पडली.
आणि तिची अंमल बजावणी होणार होती
एवढ्यात मी सुचवले कि सर माझे ८ पैकी ५ रेडिओग्राफर (एक्स रे टेक्निशियन) अंबरनाथ कल्याण वसई नाला सोपारा इथे राहतात. त्यांना चार वेळेस उशीर झाला तर ठीक आहे. पण पाचव्या वेळेस उशीर झाला हे अंबरनाथ स्थानकावरच कळेल. मग नाहीतरी जर पूर्ण दिवसाचा पगार कापला जाणार असेल तर तो माणूस कामावर येईलच कशाला?
अध्यक्षांनी चेहरा त्रासिक करून एच आर एम कडे पाहिले. त्याने माझ्याकडे चिडून पाहिले. मी हसत होतो. मी म्हणालो प्रत्येक विभागप्रमुखाला माहिती आहे कि कोणता कर्मचारी कामचुकार आहे आणि कोण प्रामाणिक आहे. तेंव्हा दरवर्षी होणाऱ्या पगारवाढीच्या वेळेस हा मुद्दा ध्यानात घ्यावा. पण आपले अधिकार असे विभागप्रमुखांकडे देण्यास अध्यक्ष आणि एच आर तयार होईनात.
परत ३० मिनिटे काथ्याकूट झाला. आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्धार अध्यक्षांनी बोलून दाखवला. सर्वानी मान डोलावली.
मी परत म्हणालो तुम्ही पगार कापणार असलात आणि माणूस आला नाही तर आपल्याकडे लांबून आलेले (उदा अंधेरी घाटकोपर कांदिवली) १००% रुग्ण उद्या बोलावल्यावर परत येणार का? नाहीच. कारण तंत्रज्ञ कर्मचारी नाही म्हणून तुम्ही रुग्णाला परत बोलावणार असाल तर उद्या शल्यक्रिया येथे करून घ्यायची का हा विचार रुग्ण करणारच. आणि महिन्याला एका रुग्णाने हृदयाची शल्यक्रिया करायची नाही ठरवले तरी तुमचे ३-५ लाखाचे नुकसान होणार.
मग रुग्णालयाचे होणारे नुकसान किती आणि कर्मचाऱ्याला देण्यात येणारी शिक्षा याचा ताळमेळ बसतो आहे का याचा विचार व्हावा?
अजून अर्धा तास गुऱ्हाळ चालवून हि चर्चा संपली.
आणि या गोष्टीला आता १० वर्षे झाली तरी हा प्रश्न अजून सुटलेला नाही.
30 Jun 2019 - 3:43 am | चामुंडराय
आमचा हेच आर चा किस्सा.
पहिल्याच दिवशी हेच आर ने ( तेव्हा पर्सनल म्हणत) सगळी नवीन मेंढरं सक्काळी सक्काळी मिटिंग रूम मध्ये गोळा केली.
नवीन नोकरीची उत्सुकता, आनंद, दडपण असलेले भांबावलेले चेहरे. ओळख पाळख झाल्यावर हेच आर ने गंभीर चेहऱ्याने सांगितले -
द्येयार ईज वोणली वन्न ल्येट्ट अलाऊड पर ड्ये.
हे ऐकल्यावर अर्ध्या ग्रुपच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले तर उरलेल्या अर्ध्या ग्रुपच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
ते बघितल्यावर त्याने अंडरस्टुड्ड? असा प्रश्न फेकला. आता हे नक्की काय प्रकर्ण आहे कोणाला कळेना तेव्हा एकाने धीर गोळा करून "सर, व्हॉट डू यू मीन बाय दॅट? " असा प्रश्न विचारला.
हेच आर ने मग परत एकदा तेच वाक्य फेकले आणि काही क्षणांच्या पिनड्रॉप सायलेन्स नंतर
"वोणली इन्न द इव्हिनिंग्ग " असा बॉम्ब टाकला. त्यामध्ये सगळे ट्रेनी भुईसपाट झाले आणि मग सुरु झाली रोजची जिंदगी हा नियम पाळण्यासाठी !!
28 Jun 2019 - 9:22 pm | धर्मराजमुटके
आता HR हेडच्या कपाळ्यावर आठ्या येतात.
मग ठीक आहे. आमच्या कडे कपाळावर नाही. कपाळात येतात.
28 Jun 2019 - 9:33 pm | अनिंद्य
:-))
28 Jun 2019 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
29 Jun 2019 - 12:59 am | फारएन्ड
धमाल लिहीले आहे :)
29 Jun 2019 - 10:39 am | झेन
जबरदस्त लिवलय
29 Jun 2019 - 11:29 am | सस्नेह
जबरी !
पर्फेक्ट कार्पोरेट !
29 Jun 2019 - 12:15 pm | ज्ञानोबाचे पैजार
आगदी मना जवळचा विषय आणि लेखक चिनारभाउ.... आवडणारच ना....
आमच्या दिव्य कंपनीत केव्हातरी बस वेळेवर आणण्यावरुन येच आर साहेब लैच कडक पणे वागतात. ड्रायव्हरला बोलवून बस वेळेवर येण्यावरुन झाडतात. मग दुसर्या दिवशी ड्रायव्हर बस मधे तणतण करतो. नंतर दोन तीन दिवस कोणी जर स्टॉप वर उभा नसेल तर बस न थांबवणॅ वगेरे प्रकार होतात.
मग एखाद्या दिवशी कोणी तरी संध्याकाळी बस वेळेवर का सोडत नाही म्हणून तमाशा करतो. ( एक दिवस तर स्वतः एच आर साहेबच उशीरा आल्याने तावडीत सापडले)
मग परत सगळे नियम काही काळापुरते शिथिल होतात.
परत मग अॅपरायझल वगेरे सुरु झाली की एच आर साहेबांना बस वेळेवर आणायची हुक्की येते.
पैजारबुवा,
29 Jun 2019 - 12:53 pm | जॉनविक्क
तसाही अप्राईजल चा मोसम नाही म्हणून अपील कमी होत असावे.
29 Jun 2019 - 9:25 pm | नाखु
दुसर्याच्या खुर्चीखाली फटाका लावण्यासाठी उठताच स्वतच्या खुर्चीखाली फटाका फुटू शकतोच शकतो हेच कारपोरेट मुकादमांना कळत नाही.
बिनबुडाचे एरडी गुर्हाळ चर्चा सत्र अनुभवलेला नाखु
29 Jun 2019 - 9:59 pm | शेखरमोघे
छान छान - या विषयावर आणि धाटणीवर आणखीही लिहा!
माझ्या एका मित्राने नोकरी बदलल्यावर उत्पादन प्रमुखाना मदत व्हावी म्हणून त्याच्याकडे HR खेरीज Factory Administration असे एक संदिग्ध काम सोपवले गेले. त्याने नवेपणाच्या उत्साहात factory मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या वाहनांची आत येतांना तसेच बाहेर जातानाही तपासणी करण्याचा फतवा काढला. असे केल्याने gate मध्ये वेळा लागतो आणि internal control मुळे "आतल्या" लोकांना "उचलण्या"सारखे कांही नसल्याची खात्री असल्याने अशा सगळ्या तपासणीतून आधी "आतल्या" लोकांच्या वाहनांना सूट होती आणि फक्त "बाहेरच्या" वाहनांची आत येताना तसेच बाहेर जातांना कसून तपासणी होई. या नवीन फतव्यानंतर gate वरच्या लोकांनी उत्पादन प्रमुखाना विश्वासात घेऊन "आतल्या" लोकांना जाता येताना न थांबवता फक्त माझ्या एका मित्राची चारचाकी आत येतांना तसेच बाहेर जातानाही प्रथम कडक सलाम, मग तपासणी आणि मग पुन्हा कडक सलाम अशा पद्धतीने या नवीन फतव्याची अंमलबजावणी चालू केली. माझा मित्र अर्थात बऱ्यापैकी खूष. काही महिन्यानंतर उत्पादन प्रमुखांनी एका पार्टीमध्ये हसत हसत ही परिस्थिती माझ्या मित्राला सांगून त्याचा फतवा "बदलून" पुन्हा परिस्थिती जैसे थे वर आणवली.
29 Jun 2019 - 10:54 pm | विजुभाऊ
एच आर डिपार्टमेंट चे कामच मुळी कशासाठी असते हेच त्याना कळत नसते.
त्यात पुन्हा त्याना आपण कंपनीतल्या लोकाना रोजगार देतो असे वाटत असते.
एच आर लोकाना जर कधी झापायची वेळ आली तर हे सर्वात अगोदर जबाबदारी झटकायचा प्रयत्न करतात.
असून अडचण नसून खोळंबा असे हे डीपार्टमेंट असते.
मात्र वरच्या मॅनेजमेंटला चुकीच्या धोरणांसाठी त् एच आर ही लपण्यासाठी उत्तम जागा असते https://www.thehindu.com/business/Industry/mahindra-apologises-to-sacked...
29 Jun 2019 - 11:29 pm | टर्मीनेटर
नर्मविनोदी लेखन आवडले.
29 Jun 2019 - 11:59 pm | अथांग आकाश
LOL :-)
1 Jul 2019 - 1:13 am | एकुलता एक डॉन
५ मिन उशिरा आलो म्हणून चढणारा HR ला सांगतो मी आठवडा भर काम नाही केले पगार देऊ नका
https://www.misalpav.com/node/44129
माझा पण अनुभव
2 Jul 2019 - 1:55 pm | Rajesh188
वाचताना एवढे हसायला येत होत की मध्ये मध्ये हास्य ब्रेक घेणे भाग पडत होत.
पण तुम्ही विनोदी पद्धतीने किती तरी उणीव वर बोट ठेवलं आहे
3 Jul 2019 - 6:56 am | जेम्स वांड
जब्बर लिहिलंय चिनार भाऊ, एकच नंबर नादखुळा, आमची बोर्डरूम आठवली :D
3 Jul 2019 - 3:48 pm | लई भारी
फुटलो :)
3 Jul 2019 - 5:17 pm | स्वधर्म
एच अार वाल्यांना कार्पोरेट मध्ये बर्याचदा खूप सत्ता असते. बर्याचदा ४-२ वर्षांचा अनुभव असलेले एच अार मुले मुली अगदी सिनिअर लोकांना अडचणीत अाणतात, काही कळत नसून. बर्याच अाय टी कंपन्यात हे लोक अत्यंत अाॅपरेशनल गोष्टीतच काम करतात अाणि अाव मात्र अत्यंत स्ट्रटेजिक असल्याचा अाणतात. एच अार डिपार्टमेंट म्हणजे असून अडचण अाणि नसून खोळंबा हे परफेक्ट वर्णन अाहे.
** मॅकबुकवर टेक्स्ट एडीट वापरून ‘अा’ हे अक्षर लिहीताना ठीक दिसते, पण मिपामध्ये चिकटवल्यावर वरीलप्रमाणे विचित्र दिसते. कृपया उपाय माहित असल्यास सांगा.
3 Jul 2019 - 5:59 pm | जॉनविक्क
कृपया उपाय माहित असल्यास सांगा.
विंडोज अथवा लिनक्स वापरा.
Actually हा कॅराक्टर एनकोडिंगचा प्रॉब्लेम आहे. अती सुलभ उपाय म्हणजे पेस्ट झाल्यावर बॅक स्पेस वापरून चूक दुरुस्त करा, अथवा मोझीला फायरफॉक्स वापरा. बाकी तज्ञ सांगतीलच पण त्यासाठी अजून माहिती लागेल.