एडीपस आणि कूटप्रश्न

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
17 Dec 2007 - 1:37 am

एडीपस आणि कूटप्रश्न

"प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो,
दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो,
किती रे विकारी असे बंधु माझा..."
चिरंजीव ती स्फिंक्स हेरी तयाला.
कधी एक माणूस त्या ठायि आला
उखाण्यात पाहे जणू आरशाला
स्वतःलाच जाणून कोड्यात साचा -
स्वतःच्या विकारा, स्वतःच्या गतीला

"असू तुल्य सारेच एडीपसाशी
विलंबीत काळात त्या श्वापदाशी;
भविष्यात होऊ, नि भूतात होतो..."
असे ज्ञान झाल्यास गात्रांस गाळू!
"न हो हे..." म्हणे देव मोठा कृपाळू
विकारक्रमाने स्मृतिभ्रंश देतो.

मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस, मूळ भाषा : स्पॅनिश

(एडीपस याबाबत बहुतेक लोकांना हा तपशील माहीत असतो की त्याने अजाणतेपणाने आपल्या वडलांचा युद्धात वध केला आणि आपल्या आईशी विवाह केला. आपली चूक कळाताच त्याने स्वतःचे डोळे फोडून संन्यास घेण्याचे प्रयश्चित्त केले. ही शोकांतिका आहे, पण या प्रकाराच्या आधी एडीपसच्या वीरकथाही आहेतच. पैकी एक ही प्रसिद्ध आहे : थिबिस गावाच्या वाटेवर एक स्फिंक्स (अर्ध-सिंह-गरुड-नारी) वाटसरूंवर टपून बसलेली असायची. तिचा कूटप्रश्न न सोडवणार्‍यांना ती मारून खायची. प्रश्न : "सकाळी चार पायांनी, दुपारी दोन पायांनी, संध्याकाळी तीन पायांनी चालणारा प्राणी कुठला?" एडीपसला योग्य उत्तर सुचले : "मानव - जो बाळपणी हातापांवर रांगतो, मोठेपणी दोन पायांवर चालतो, उतारवयात काठीचा तिसरा पाय करून चालतो.". त्या कथेच्या आधारावर होर्हे लुईस बोर्हेस यांनी एक सुनीत लिहिले, त्याचे मराठी भाषांतर येथे दिले आहे.)

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Dec 2007 - 7:47 am | विसोबा खेचर

एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :)

अवांतर -

"प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो,
दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो,

हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :)

तात्या.

धनंजय's picture

17 Dec 2007 - 7:56 am | धनंजय

मनाच्या श्लोकांच्या चालीवर सर्व ओळी लागतील...
(भुजंगप्रयात-प्रवीणू) धनंजै

प्राजु's picture

17 Dec 2007 - 8:53 am | प्राजु

मनाच्या श्लोकांत एक्दम फिट्ट....
- प्राजु.

चित्तरंजन भट's picture

17 Dec 2007 - 11:49 am | चित्तरंजन भट

सुनीत छान आणि माहिती रोचक आहे.

स्वाती दिनेश's picture

17 Dec 2007 - 12:41 pm | स्वाती दिनेश

असेच म्हणते,
सुनीत आवडले.
स्वाती