गजाभाऊ : अरे काय म्हणतं सदा... काय लेका दिसतंच नाही तू आजकाल?
सदा: काही नाही भाऊ ...मी इथंच आहो तसा ....थोडं नवीन काम मिळालं होतं म्हणून तालुक्याला गेलतो चार दिवस.
गजाभाऊ : कोणतं काम मिळालं तुले?
सदा: ते थोडं शिक्रेट हाय भाऊ..
गजाभाऊ : एवढं काय शिक्रेट हाय बा..?
सदा: जौद्या ना भाऊ..
गजाभाऊ : अबे तुये सारे शिक्रेट मले माहिती आहे लेका, तुये बँकेचे सारे पासवर्ड मले माहिती आहे. अन ह्यापेक्षा मोठं कोणतं शिक्रेट हाय बे?
सदा: आता तुम्ही हॅकर माणूस भाऊ.. बँकेचे पासवर्ड तुमाले नाही सांगितले तरी माहित करून घेसान तुमी..अन तसा तुमच्यावर भरोसा हायेच म्हना..म्हणून सारे पासवर्ड सांगतले तुमाले..
गजाभाऊ : मंग हे गोष्ट काऊन लपवून राहिला?आता तं सांगतल्याशिवाय सोडतच नाही तुले.
सदा: ते थोडं गव्हरमेन्टचं काम होतं भाऊ..?
गजाभाऊ: गव्हरमेन्टचं ?
सदा: हाव ते इव्हीएम मशीन असतेत ना इलेक्शनच्या... त्याच काम होतं.
गजाभाऊ: तुले काय समजते त्यातलं?
सदा: काऊन? सारं काय तुमालेचं समजते का? आता आमी बी शिकलो भाऊ... इव्हीएम मशीन हॅक करून आलो आमी तालुक्यात जाऊन..
गजाभाऊ: हॅक????? अन ते पन इव्हीएम मशीन?
सदा: मंग... गव्हरमेन्टनं पेशल ट्रेनिंग दिलं आमाले.. अन पैसे पन दिले भाऊ बम्म..
गजाभाऊ: अन काय केलं तुमी हॅकिंग केलं म्हणजे? मले बी सांग ना जरा..
सदा: तुमाले तं सगळंच माहिती हाये ना.. मजा घेता का आमची?
गजाभाऊ: अबे तसं नाही ना बे... मले इंटरेस्ट हाय त्येच्यात..
सदा: आता इलेक्शन हाय ना भाऊ..मंग गव्हरमेन्टले परत निवडून याच हाय..म्हणून त्याईनं मशीनमदेचं फेरफार करायचं ठरवलं..आता कोणतं बी बटन दाबलं तरी व्होट गव्हरमेन्टलेच जाईन..
गजाभाऊ: असं कसं होईन पन..?
सदा: आमाले त्याईनं शिकवलं..बरेच लोकं होते मायासारखे..आमी आतल्या वायरीचं शेटींग बदललं. आता हातासमोरच बटन दाबलं तरी फुलाले व्होट जाते अन घड्याळासमोरचं बटन दाबलं तरी फुलाले व्होट जाते..
गजाभाऊ: पन तुमाले कसं मालूम फुलालेच व्होट गेलं म्हणून..
सदा: फुलासमोरचा लाईट लागते ना भाऊ.. एवढं येडं समजते का गव्हरमेन्टले ?
गजाभाऊ: म्हंजे तुया म्हणन्याप्रमाने, मायासारखे शंभर लोकं व्होटिंग करतीन तेंव्हा कोनी कोंचबी बटन दाबलं तरी फुलासमोरचा लाईट लागींनं..
सदा: हाव भाऊ..
गजाभाऊ: मंग आमच्या डोळ्याला काय पट्ट्या बांधून व्होटिंग करायले सोडणार हाय का गव्हरमेन्ट?
सदा: नाही भाऊ...पट्ट्या कायले बांधतीन?
गजाभाऊ: अबे तं सायच्या मले दिशींनं ना फुलासमोरचा लाईट लागला म्हणून. मी बोंबाबोंब नाही करनार का?
सदा: हाव भाऊ..
गजाभाऊ: मंग हे कोणतं हॅकिंग व्हय बे? वा रे लेका तुयी गव्हरमेन्ट!! पुऱ्या हॅकर जातीची इज्जत काढली लेका
सदा: तसं नाही ना भाऊ..
गजाभाऊ: अबे जे बटन दाबलं त्येच्यासमोरचा लाईट लागला तरी आतल्या शेटींगमुळे व्होट फुलालेच जाईन ह्याले म्हन्ते बा हॅकिंग..
सदा: हे तं लक्षातचं नाही आलं भाऊ..
गजाभाऊ: त्यादिवशी टीव्हीवर थो एक लीडर पन असंच सांगत होता की त्यानं डोळ्यानं पाह्यलं म्हने फुलासमोरचा लाईट लागताना. मले तं तेंव्हाच हासायले आलंतं बम्म. म्या म्हणलं गव्हरमेन्ट एवढी म्याट कशी आसन? पन खरंच म्याट निघाली लेका..
सदा: तसं नका समजू भाऊ.. गव्हरमेन्टनं अजून एक शेटींग केली आहे. त्याचं ट्रेनिंग हाये पुढच्या हप्त्यात..
गजाभाऊ: अजून काय शेटींग केली बा..?
सदा: कोनाले सांगजा नका भाऊ..
गजाभाऊ: नाही ना बे..
सदा: ते व्होटिंग झालं की साऱ्या मशीनां एका खोलीत ठेवतेत ना... त्या मशीनां चोरी करून तिथं दुसऱ्या मशीनां ठेवणार हाये गव्हरमेन्ट..अन त्या साऱ्या नवीन मशीनमदे सारे व्होट गव्हरमेन्टले पडले असतींनं
गजाभाऊ: च्या मायबीन.. हा तं लय डेंजर प्लॅन हाय बे..
सदा: मंग भाऊ..गव्हरमेन्ट हाय ते..
गजाभाऊ: पन मले एक सांग बे.. आता तुमी आदीच मशीनमध्ये शेटींग केलं हाय म्हंता कोणतं बी बटन दाबलं तरी फुलाले व्होट जाईन बरोबर..
सदा: हाव भाऊ
गजाभाऊ: आता समजा..देशातल्या अर्ध्या मशीनची तुमी शेटींग करून ठेवली अशींनं असं समजू. अन देशातल्या अर्ध्या लोकाईनं डोळे बंद करून व्होटिंग केलं असंही समजू. अन त्या खोलीतल्या मशीन रात्री अंधारात चोरी होतींनं असं समजू .अन त्या चोराजवळ बरोब्बर कोणती मशीन चोरी करायची ह्याची पण यादी असंनं असं समजू. अन बरोब्बर त्याचं खोलीत तेव्हढ्याच नवीन शेटींग केलेल्या मशीन बरोब्बर पोहोचतीन असंही समजू.
सदा: हाव बरोबर भाऊ..
गजाभाऊ : अबे पन साऱ्या देशातल्या एवढ्या पंचवीस तीस लाख मशीन चोरी करानं..त्येच्या जागी दुसऱ्या शेटींगवाल्या मशीन आनुन ठेवान..अन हे करताना कोनीच गव्हरमेन्टले बघणार नाही असं कसं होईन बे?
का पुऱ्या गावात मिरची पावडरचा फवारा मारून लोकाईले भोकनं करून मंग चोरी करनार हाये गव्हरमेन्ट?
अन त्या इलेक्शन डिपारमेन्टचे सारेच्या सारे अदिकारी...इलेक्शन ड्युटी लागलेले साऱ्या देशातले कर्मचारी..सारे पोलीस..सारे जवान..सारेच सामील हाये ह्याच्यात..अन ते शीशिटीव्ही कॅमेरे लावले असतींनं साऱ्या देशात त्येच्यात पन दारू ओतून ठेवली अशींनं नाही..काही शूटिंगचं होणार नाही त्येच्यात..
सदा: हाव भाऊ असंच हाय ते..
गजाभाऊ: मी काय म्हंतो... गव्हरमेन्टले म्हना तुमाले जे करायचं ते करा..पन याले हॅकिंग नका म्हणू बापा..
मायी जिंदगी गेली लेका हॅकिंगमदे...पन हे अशे म्याट धंदे नाही पहिले म्या..
सदा: भाऊ..तुमाले असली हॅकिंग तं म्या सांगितलीच नाही अजून...
गजाभाऊ: आता काय राहिलं बा अजून..?
सदा: आता एवढी मोठी शेटींग तं करून ठेवली गव्हरमेन्टनी. पन तरीपण काही झोलझपाटा झाला तर एक जबरदस्त शेटींग केली हाये गव्हरमेन्टनी.
गजाभाऊ: कोनती बा? दे सांगून..
सदा: देशात जिथं जिथं मतमोजणी होईन तिथं ते निकाल बोंबलून सांगायले माईक अन लाऊड स्पीकर लावले असते ना..ते सारे माईक हॅक करून टाकले गव्हरमेन्टनी. म्हणजे आतून माईकवरती कोणाचंही नाव घेतलं तरी बाहेरून लाऊडस्पीकरवर गव्हरमेन्टच्याच माणसाचं नाव ऐकू येईन... हाय की नई जबरदस्त शेटींग..!!
.
.
.
.
..
"अरं गजाभाऊ...गजाभाऊ..काय झालं तुमाले? अरं चक्कर आली का..वैनी वैनी या लौकर हिकडं.."
समाप्त
चिनार..
प्रतिक्रिया
22 May 2019 - 7:31 pm | धर्मराजमुटके
लै भारी ! राजकारण्यांपासून लपवून ठेवा बरका हा लेख नाहीतर उद्या तुमची कल्पना नक्की चोरीस जाणार !
23 May 2019 - 12:42 am | अभ्या..
"झाली का तुमची निवडणूक, आता आमचे आम्ही सरकार बनवतो" असे इलेक्शनच ह्याक करणारे ज्यादिवशी येतील तेव्हाच भारतीय राजकारण संप्रुक्त का समृध्द ते काय म्हणतात ते होईल ह्यात शंका नाही.
23 May 2019 - 6:27 am | सोन्या बागलाणकर
हाहाहाहा!
बम्म हसलो ना भौ!
असलं हॅकिंग तर म्यापन माह्या उभ्या जिंदगानीत न्हाय ना पाह्यलं!
23 May 2019 - 7:18 am | तुषार काळभोर
गजाभौ माज्या मनातलं बोलले.
मी गोरमिंटच्या विरोधात असलो तरी हे ईव्हीएम हॅकिंगवर आपला विश्वास नाय!
23 May 2019 - 8:47 am | चांदणे संदीप
खुसखुशीत.
Sandy
23 May 2019 - 9:44 am | महासंग्राम
भौ भारी लिवलं तुमीन, पण ह्ये अगदी भारत गणेशपुरे टाईप वाटते जे वऱ्हाडा बाहीरच्या लोकायले समजीन अश्या भाषेत लिवल्यासारखं. उल्साक आजूक वऱ्हाडी तडका ऍड करा लागत होता.
बिक गई है ये गोरमिंट
23 May 2019 - 11:19 am | गड्डा झब्बू
हि हि हि
23 May 2019 - 7:15 pm | शेखरमोघे
यकदम झकास आयडिअयाची कल्पना.
आणखी मोठी शेटिन्ग पन करून ठेवता यीएल गव्हरमिन्टाला.कुनीपन खुर्चीवर बसला तरीपन त्याचे नावच आपल्याला पयजेल त्याप्रमाणे बदलून टाकायच, म्हन्जी फुडचि सगलीच वर्सन येकच सरकार
23 May 2019 - 7:16 pm | नाखु
नावानं चांगभलं!
मती बारा झालेल्या मतदारसंघाच्या जवळचा मावळातील मराठमोळा नाखु
24 May 2019 - 8:03 pm | सुबोध खरे
दिवशी टीव्हीवर थो एक लीडर पन असंच सांगत होता की त्यानं डोळ्यानं पाह्यलं म्हने फुलासमोरचा लाईट लागताना. मले तं तेंव्हाच हासायले आलंतं बम्म
लै म्हंजे लैच हसलो बघा
24 May 2019 - 8:32 pm | ज्योति अळवणी
लै भारी राव
मजा आला