मागील दुवा https://www.misalpav.com/node/43578
बरे झाले सरांनी टंप्याला निबंध वाचायला सांगितले नाही. मला समोर दोरीने बांधलेले चट्टेरीपट्टेरी लेंगा बनियन घातलेले टंप्याचे बाबा शिंगे उगारून हम्मा हम्मा करत आमच्या अंगावर येताना दिसू लागले.
शाळेत एक बरे असते. मुलांना कधी रिकामे बसू देत नाहीत. एका मागून एक काहीतरी चालूच असते. घटक चाचणी संपली आता काय हा प्रश्नच नसतो.
कधी हा उत्सव, कधी तो दिन , तर कधी कसलीशी स्पर्धा चालूच असते. हे काही नसेल तर चित्रकला , हस्तकला हे काहितरी असतेच.
ऑगस्ट सप्टेबर म्हणजे खरेतर पावसाळी दिवस. म्हणजे जुन जुलै मधे असतात तसे जोरात येणार्या पावसाचे तसे जोरदार पावसाचे नाहीत. सातारला तसाही पाटणसारखा पाऊस पडत नाही. पाटणचा पाऊस म्हणजे एकदम ताशेवाला चसतो. आला की तडम तडम पत्रे वाजत असतात घरावरचे. बाहेर पहायची सोय नाही. काही दिसतच नसतं मुळी. पाऊस पडून गेला की मज्जा असते. सगळे रस्ते वहात असतात.मल्हारपेठ कडून येणारा रस्ता तर नदीच झालेला असतो. रास्त्याशेजारून वहाणारी कोयना नदी आणि रस्ता यातला फरकच कळत नाही काही वेळा. गावातले रस्तेही असेच तांबड्या गढूळ पाण्याने भरुन वहात असतात. कुठून कुठून पाण्याचे ओहोळ सुरू होतात. रस्ता मिळेल तेथून धावत असतात शेवटी कोयनेकडे मिळतात. या त कागदाच्या होड्या करून सोडणे हा आम्हा सगळ्यांचा आवडता खेळ. पाऊस नसेल तेंव्हा कागदाच्या होड्या पाटाच्या पाण्यात पण सोडता यायच्या. पण या पावसाळी रेंदाळत येणार्या ओहोळाची मज्जा त्यात नाही. हे पाण्याचे ओहोळ सुरवातीला एकदम छोटे असतात . मोजायला गेलं तर बोटभरही जाडी नसते त्यातल्या पाण्याच्या धारेची. मग हळू हळू त्याला आसपासचे दोन चार ओहोळ मिळतात. पाण्याची धार चांगली मनगटाएवढी जाड होते. मग आणखीनच जोरात वाहू लागते. यात जर कागदी होडी सोडली तर ती फारतर दहा वीस पावले होतील इतकीच दूर जायची पाण्याच्या माराने भिजून मोडून जायची. पाटणची आज्जीला कितीतरी प्रकारच्या कागदी होड्या बनवायाला यायच्या. बंबी होडी , शिडाची होडी , दुहेरी होडी , घडीची होडी आणि साधी होडी . कागदाच्या घड्या घालुन ती याच होड्यांचे कितीतरीप्रकार करायची. गोल टोपली च्या आकाराची गवताने आणि तुराटीच्या काड्याने बनवलेली वसूदेव होडी ही तीची खास होडी. ती कधी बुडायचीच नाही. कोयनेच्या पाण्यात सोडली की अगदी एखाद्या दगडाला अडेपर्यंत किंवा कोयनेच्या धारेला लागे पर्यंत ती वहात जायची .
ही होडी सोडायच्या वेळेस आज्जी त्यात तुळशीचे पान ठेवे, साखरेचे दोनचार दाणे ठेवायची, होडी सोडताना म्हणायची बघ रे बाळकृष्णा माझी होडी तुझ्या हातात. आणि ती होडी दिसेनाशी होईपर्यंत पहात रहायची. नदीच्या त्या लालसर गढुळ पाण्यावर वहात जाताना बरीच लांबपर्यंत डुलकावे खात दिसत रहायची. होडी न बुडता दिसेनाशी झाली की आज्जी टाळ्या वाजवत हसायची. तीला उड्या मारून टाळ्या वाजवणे जमत नसावे नाहीतर तीने तेही केले असते. अगदी लहान मुलासारखे. त्यावेळी पाटणची आज्जी अगदी माझ्या एवढ्याच वयाची आहे असे वाटायचे. सोबत दंगामस्ती करायला आज्जी मनाने माझ्याएवढीच व्हायची. मी आज्जी ला विचारायचो होते की ती लहान असताना कशी होती. काय काय दंगा करायची म्हणून. अशावेळी आज्जी कुठेतरी दूर डोंगराकडे पहायची. डोळे मिचकावून म्हणायची की अरे माझे लग्न होऊन आले ना तेंव्हा मी परकर्या वयाची होते तेंव्हा झाले. सासरी आल्यावरही मी दंगा करायचे. घरात बसून सागरगोटे वगैरे खेळण्यापेक्षा लगोरीने आवळे चिंचा पाडणे, असलेच खेळ खेळायचे. सासर काय माहेर काय ते समजायचेच नाही. तरी मामंजीना मुलगी नव्हती ते ही मला स्वतःची मुलगीच समजायचे.
पण सासर ते सासर. लग्न झालं की जबाबदार्या पडतात बाईच्या जातीवर .संसार करताना स्वतःचं खेळणं कधी संपुन जातं आणि आपण दुसर्याच्या हाताचं खेळणं कधी होतो ते कळतही नाही . आपलं खेळायचं राहून जातं.
मला वाटतं आज्जीला लहानपणी खूप खेळायचं असेल आणि लग्न झाल्यामुळे ते राहून गेलं असावं . ते राहून गेलेलं खेळणं आज्जी माझ्या सोबत खेळून घेतेय दुपारभर होड्या सोडत पाण्यात हुंदडून घरी आलो की आज्जी कपडे बदलायला लावायची, तीच्या पदराने डोके पुसायची. डोके पुसून झाले की गरमागरम तिखटाचा सांजा द्यायची . कपाळाला आणि छातीला वेखंड चोळायची. पाण्यात खेळून दमल्यामुळे झोप आलेली असायची. आज्जीच्या मांडीची उशी व्हायची , मांडीवर झोपले की ताल देत थोपटत आज्जी गाणं म्हणायची
असा कसा देवाचा देव बाई ठकडा .
देव एका पायाने लंगडा
शिंकेचि तोडीतो मडकेचि फोडीतो
करी दह्या दुधाचा रबडा.
वाळवंटी जातो. कीर्तन करीतो
घेतो साधू संतांशी झगडा
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई
देव एकनाथाचा बछडा
... आज्जीचा तो देवघरातल्या घंटेसारखा किणकिणणारा किनरा आवाज .वेखंडाच्या मिरमिरीत वास , आज्जीचा थोपटणारा मऊसूत हात आणि आज्जीच्या जुन्या साडीच्या गोधडीची ऊब , पावसाळी कुंद गार हवा , झोप कधी लागायची ते समजायचेही नाही .
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Feb 2019 - 6:34 am | आनन्दा
__/\__
20 Feb 2019 - 8:38 pm | महाठक
नमस्कार घ्यावा
21 Feb 2019 - 2:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही मालिका वाचताना मला का कोणास ठाउक प्रकाश संतान्च्या लंप्याची आठवण येत राहते.
एकदा अथपासुन इतिपर्यंत ही मालिका वाचुन काढायची आहे. त्या आगेमागे झुंबर शारदा संगीत पंखा पण आलेच.
21 Feb 2019 - 5:49 pm | यशोधरा
खूप दिवसांनी हे गाणे पाहिले.. माझी आजी म्हणत असे. :)
आठवणी आल्या.
25 Feb 2019 - 5:17 pm | विजुभाऊ
_/\_
13 Jul 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा
व्वा, किती सुंदर पाऊस !
आजीच्या होड्या.... एकदम भारी !
सुरेख !
विजुभाऊ _/\_
13 Jul 2020 - 5:51 pm | चौथा कोनाडा
पुढील भाग :
दोसतार-१९